22 Sept 2017

न्यूटन रिव्ह्यू

'मत' में है विश्वास...
-----------------


SPOILER AHEAD
---------------------

न्यूटन या शीर्षकाचा हिंदी सिनेमा येतो आहे, म्हटल्यावर आपल्या डोळ्यांसमोर ज्या काही कल्पना येतात, त्यांना छेद देणारा असा हा सिनेमा आहे, हे आधी सांगितलं पाहिजे. आपल्याला एकच न्यूटन माहिती... अॅपलवाला... या सिनेमाचा नायक मात्र सरकारी नोकरी करणारा साधा माणूस आहे. भौतिकशास्त्रात एम. एस्सी. केलेला आहे, एवढाच काय तो त्याचा आणि न्यूटनचा संबंध. त्याचं नाव खरं तर नूतनकुमार असं आहे. पण शाळेत या नावावरून मुलं चिडवायची म्हणून त्यानं दहावीच्या फॉर्मवर स्वतःचं नाव 'न्यूटन' असं लिहून, बदलून टाकलं. छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या  या न्यूटनची (राजकुमार राव) स्वतःची म्हणून काही तत्त्वं आहेत. त्याचे पारंपरिक वळणाचे आई-वडील एक सोळा वर्षांची मुलगी त्याला दाखवायला नेतात, तेव्हा ती अल्पवयीन आहे म्हणून तो नकार देऊन निघून येतो. कामात तो अतिशय शिस्तीचा आहे, वेळ पाळणारा आहे. अशा या न्यूटनवर सरकारी कर्मचारी म्हणून निवडणुकीची ड्यूटी करण्याची वेळ येते. तसा तो राखीव कर्मचाऱ्यांमध्ये असतो, पण छत्तीसगडमधील एका अतिशय दुर्गम व माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या भागात एका निवडणूक केंद्रावर जाण्याची वेळ त्याच्यावर येते. त्याच्याबरोबर दोन कर्मचारी सहकारी म्हणून येतात आणि एक स्थानिक तरुणी ब्लॉक ऑफिसर म्हणून यायची असते. निवडणूक केंद्र असलेलं ठिकाण इतकं दुर्गम असतं, की त्यांना हेलिकॉप्टरमधून त्या ठिकाणी नेलं जातं. दोघा सहकाऱ्यांपैकी एक जण लोकनाथ (रघुवीर यादव) म्हणून असतात, ते निवृत्तीला आलेले असतात आणि केवळ नाइलाज म्हणून या कामावर आलेले असतात. दुसरा असतो, तो केवळ हेलिकॉप्टरमधे बसायला मिळावं म्हणून आलेला असतो. या मतदान केंद्रावर केवळ ७६ आदिवासींचं मतदान असतं. त्या केंद्रावर जाण्याआधी रात्री या तिघांना निमलष्करी दलाच्या कॅम्पवर नेलं जातं. तिथं त्यांची गाठ तिथल्या आत्मासिंह या अधिकाऱ्याशी (पंकज त्रिपाठी) पडते. हा अधिकारी या परिसरात चांगलाच मुरलेला असतो. त्याला न्यूटन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी हे काम भराभर संपवून निघून जावं, असं वाटत असतं. सुरुवातीला तर तो कॅम्पमधूनच त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्न करतो; पण न्यूटनच्या खमकेपणापुढं त्याचं काही चालत नाही आणि अखेर या सर्वांना आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या निवडणूक केंद्रापर्यंत चालत जावं लागतं. तिथं गेल्यावर या सर्वांना कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, आदिवासी मतदान करायला येतात की नाही, लष्करी अधिकारी नक्की काय करतो, राज्याचे पोलिस महानिरीक्षक आंतरराष्ट्रीय पत्रकार महिलेला घेऊन तिथं भेट द्यायला येतात तेव्हा काय होतं हे सगळं पडद्यावरच पाहायला हवं.
अमित मसूरकर या दिग्दर्शकाचा हा दुसराच सिनेमा. मात्र, या दिग्दर्शकानं एवढं अप्रतिम काम या सिनेमात केलंय, की 'हॅट्स ऑफ' असं म्हणावंसं वाटतं. (या सिनेमाची भारताची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून कालच निवड झाली, त्यावरून सिनेमाची एकूण गुणवत्ताही सिद्ध झाली. एरवी प्रायोगिकच वाटेल, अशा या सिनेमाला मुख्य प्रवाहात मिळालेलं स्थान आणि मिळणारा प्रतिसाद आशादायी आहे.)
भारतातील लोकसभा निवडणूक आणि त्यानिमित्त वापरली जाणारी जगड्व्याळ यंत्रणा हा आपल्याच नव्हे, तर साऱ्या जगाच्या कौतुकाचा विषय आहे. देशाच्या अगदी दूरवरच्या, दऱ्याखोऱ्यांतल्या, जंगलातल्या दुर्गम केंद्रांमध्ये निवडणूक कर्मचारी जातात आणि मतदान पार पाडतात, हा देशवासीयांसाठी आणि माध्यमांसाठी कायमच कौतुकाचा विषय राहिलेला आहे. दर निवडणुकीच्या वेळी याच्या बातम्याही येतात. छत्तीसगडमधील माओवादी/नक्षलग्रस्त भागांत तर खरोखर स्थानिक विरोध डावलून अशी निवडणूक घेणं किती अवघड आहे, याची कल्पना सर्वांनाच आहे. याच विषयावर हा संपूर्ण सिनेमा केंद्रित आहे. असा विषय निवडल्याबद्दल आणि त्याचा उत्तम अंमल केल्याबद्दल दिग्दर्शकाचं अभिनंदन केलं पाहिजे.
या सिनेमाची सुरुवात होते ती छत्तीसगडमधल्या एक स्थानिक नेत्याच्या प्रचाराने. नंतर हा नेता जंगल भागातून जात असताना नक्षलवादी त्याची गाडी अडवतात आणि सरळ गोळ्या घालून त्याला ठार मारतात. या प्रसंगातून सिनेमाचा एकूण टोन सेट होतो. त्यानंतर आपल्या नायकाचं घर दिसतं. त्याचे मध्यमवर्गीय आई-वडील दिसतात, त्याचा मुलगी पाहण्याचा व तिथून परततानाचा बसमधला प्रसंग आणि त्यातून त्याचं व्यक्तिमत्त्व समोर येतं. त्यानंतर फार वेळ न घालवता सिनेमा थेट मुख्य कथाविषयाकडं येतो. छोट्या छोट्या प्रसंगमालिकेतून दिग्दर्शक आपल्याला मुख्य घटनाक्रमाकडं कसा घेऊन जातो आणि त्या दृष्टीनं प्रसंगांची केलेली रचना पाहण्यासारखी आहे. अगदी एखाद-दुसऱ्या दृश्यामधून संबंधित घटनेतील पात्राचं व्यक्तिमत्त्व प्रस्थापित करण्याचं त्याचं कौशल्य दाद देण्यासारखं आहे. पंकज त्रिपाठीनं रंगवलेला आत्मासिंह स्वभावानं नक्की कसा आहे, हे त्याच्या पहिल्याच अंड्याच्या प्रसंगातून आपल्या लक्षात येतं. तीच गोष्ट रघुवीर यादव यांनी साकारलेल्या लोकनाथची आणि अंजली पाटीलनं उभ्या केलेल्या मलकोची. अंजली पाटीलची मलको ही स्थानिक तरुणी तर खरोखर तिथलीच असावी, असं वाटावं एवढ्या ऑथेंटिसिटीनं तिनं ती रंगविली आहे. कथानक एकदा जंगलात शिरल्यानंतर बदललेल्या गडद रंगाचं अस्तित्व अंगावर येतं; तसंच मोडकळीस आलेल्या शाळेच्या खोलीचं नेपथ्यही जमून आलेलं आहे. याशिवाय प्रत्येक संघर्षाच्या प्रसंगी न्यूटनचं कमालीचं निग्रही राहणं आणि इतरांचे त्यानुरूप बदलत गेलेले प्रतिसाद हा सर्व प्रकार सिनेमाची उंची वाढवायला मदत करतो.
यातून न्यूटनचं काहीसं विक्षिप्त, पण अंतर्यामी कणखर व सच्चं व्यक्तिमत्त्व दिग्दर्शक आपल्यासमोर उभं करतो. त्यातून हळूहळू जाणवत जातं, की हा न्यूटन म्हणजे अशा अनेक लाखो भारतीयांचाच प्रतिनिधी आहे. कायद्याचं पालन करून आपलं कर्तव्य बजावण्यातील त्याची असोशी कित्येक जणांच्या अंगात असते. देशाच्या कानाकोपऱ्यात असे कित्येक 'न्यूटन' शांतपणे आपलं काम करत असतात. त्यांच्यामुळं ही सगळी व्यवस्था नीट सुरू असते. अशा सर्व लोकांना हा सिनेमा म्हणजे आपलीच कहाणी वाटेल. निवडणूक केंद्रावर जाण्यासाठी न्यूटन मोबाइलमधला गजर लावून पहाटे उठतो, तिथपासून शेवटी मतदान तीन वाजता संपायला दोन मिनिटं असतात, तर तेवढा वेळ झाल्यावरच पेपरवर सही करण्यापर्यंत न्यूटनची कर्तव्यदक्षता दिग्दर्शकानं अनेक प्रसंगांत टिपली आहे. आपण एका निवडणूक केंद्राचे केंद्राधिकारी आहोत; म्हणजेच थोडक्यात आत्ता आपण सरकार आहोत, या जबाबदारीच्या भावनेतून न्यूटन एक क्षणही विचलित होत नाही. त्यामुळंच तो कित्येकदा जीव धोक्यात घालतो, त्या लष्करी अधिकाऱ्याशीही कैकदा पंगा घेतो. सोबत असलेल्या त्या तरुणीचीही त्याला भाषा समजण्यासाठी मदत होते. तिला सुरक्षितपणे घरी जाता यावं यासाठी तो धडपडतो. अशा अनेक बारीकसारीक गोष्टींमधून न्यूटनची कर्तव्यनिष्ठता दिग्दर्शक लखलखीतपणे आपल्यासमोर आणतो. आपणही आपल्या आयुष्यात अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टींतून आपली कामाप्रती किंवा देशाप्रती असलेली निष्ठा व्यक्त करत असतो. त्यामुळंच 'न्यूटन'चं ते वागणं आपल्याला अगदी आपलंसं वाटतं.
​ राजकुमार राव यानं रंगवलेला 'न्यूटन' पाहण्यासारखा आहे. हा अभिनेता दिवसेंदिवस फॉर्मात येत चालला आहे. या वर्षातला हा त्याचा तिसरा जबरदस्त चित्रपट. तिन्हीतली कामे वेगवेगळी आणि उत्कृष्ट! साधासरळ चेहरा ठेवून सर्व प्रकारचे भाव व्यक्त करण्याची त्याची खासियत जबरदस्त आहे. तीच गोष्ट पंकज त्रिपाठीची. हा अभिनेताही सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. यात त्याला नेहमीपेक्षा वेगळा, लष्करी अधिकाऱ्याचा रोल मिळाला आहे. तो त्यानं जोरदार केला आहे. रघुवीर यादव, अंजली पाटील यांची साथ मोलाची... मोजक्या प्रसंगांत संजय मिश्रासारखा कलावंत छाप पाडून जातो.
थोडक्यात, 'न्यूटन'सारखे सिनेमे आपल्याला स्वतःवरचा विश्वास आणखी भक्कम करण्यास मदत करतात. त्यामुळं ते पाहायला पर्याय नाही.
---
दर्जा - साडेचार स्टार
---

4 Sept 2017

धोनी - मटा लेख

माहीला पर्याय नाही...
--------------------



महेंद्रसिंह धोनी म्हणजे एक अफाट व्यक्तिमत्त्व आहे. डोक्यावर बर्फाची लादी ठेवून वावरणारा हा माणूस म्हणजे कमाल आहे. अशी वृत्ती स्वतःवर कमालीचा विश्वास असल्याशिवाय अंगी येत नाही आणि स्वतःवर विश्वास असण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. धोनीकडं दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळंच तो फार न बोलता, जे काही बोलायचंय ते बॅटद्वारे आणि यष्टींमागे उभं राहून बोलून दाखवतो. 
सध्या धोनी ३६ वर्षांचा आहे. म्हणजे क्रिकेटपटूंच्या दृष्टीनं करिअरच्या उताराचा काळ. क्रिकेटची पुढची विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये होणार आहे. तेव्हा धोनी ३८ वर्षांचा असेल. त्यामुळंच तो विश्वचषकाच्या संघात असेल का, असावा की नसावा अशा काही चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये आणि माध्यमांमध्येही सुरू झाल्या आहेत. पण श्रीलंकेत सध्या सुरू असलेल्या एकदिवशीय मालिकेत धोनी सध्या ज्या तडफेनं खेळतोय ते पाहता विश्वचषकातही 'माहीला पर्याय नाही' असंच म्हणावंसं वाटतं. त्याची कारणं पाहू या...
एक तर धोनीचा फिटनेस. धोनी शरीरानं, हाडापेरानं चांगलाच मजबूत आहे. रोज शेरभर दूध पिऊन आणि तेवढाच घाम गाळून त्याचं शरीर कणखर झालं आहे. त्याच्या हालचालींत कुठंही मंदपणा दिसत नाही. यष्टींमागं उभा असताना अजूनही तो बाइज जाऊ देत नाही किंवा झेल सुटू देत नाही. यष्टिचीत करण्यामधलं त्याचं चापल्य अजूनही वादातीत आहे. एक विराट कोहली सोडला, तर भारतीय संघातील त्याच्यापेक्षा किती तरी तरुण खेळाडूंपेक्षाही धोनी फिटनेसच्या बाबतीत सरस वाटतो. एकेरी धावा घेतानाची त्याची चपळाई बघण्यासारखी असते. महत्त्वाचं म्हणजे कसोटी असो वा वन-डे, दोन्हीतले आंतरराष्ट्रीय संघ निवडताना आज कठोर अशी फिटनेस चाचणी घेतली जाते. त्यात तुम्ही उत्तीर्ण झालात, तरच संघात स्थान मिळतं. तिथं तुमची पूर्वपुण्याई काही कामाला येत नाही. तेव्हा धोनी संघात आहे याचाच अर्थ ही कठोर अशी चाचणी तो दर वेळी उत्तीर्ण होतो आणि स्वतःचा फिटनेस सिद्ध करतो! 
दुसरा मुद्दा म्हणजे धोनीचा नेतृत्वाचा अनुभव. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघानं २००३ च्या विश्वचषकात उपविजेतेपद मिळवलं आणि त्यानंतर भारतीय संघात काही फेरबदल झाले. तोपर्यंत भारतीय संघाला नियमित यष्टिरक्षकच नव्हता. गांगुलीच्या पारखी नजरेनं धोनीमधली गुणवत्ता हेरली आणि त्याला २००४ मध्ये भारतीय संघात आणलं. तेव्हापासून गेल्या एक तपाहून अधिक काळ माही भारतीय संघाचा अविभाज्य भाग ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं पहिली टी-२० स्पर्धा पाकिस्तानला हरवून जिंकली. त्यानंतर सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे २०११ मध्ये विश्वचषक जिंकला. भारतानं आत्तापर्यंत दोनदाच विश्वचषक जिंकला आहे आणि कपिलदेवनंतर धोनीच अशी कामगिरी करू शकला आहे, हे महत्त्वाचं! त्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं कसोटी क्रमवारीत २०१३ मध्ये पहिला क्रमांक पटकावला. याशिवाय गेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारत उपांत्य फेरीपर्यंत एकही सामना न गमावता पोचला होता. आतापर्यंत पाच-पाच विश्वचषक खेळणारे काही खेळाडू होऊन गेले आहेत. धोनी २०१९ चा विश्वचषक खेळला, तर तो त्याचा चौथा विश्वचषक असेल. त्यामुळं त्यानं खेळणं फार काही आश्चर्याची गोष्ट असणार नाही. 
तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धोनी कर्णधार असताना त्यानं बऱ्याच नव्या खेळाडूंना संधी दिली. (काहींवर अन्यायही केला, हे खरंय!) अश्विन, जडेजा, रोहित, धवन, रैनापासून ते अलीकडच्या हार्दिक पंड्या, बुमराहपर्यंत अनेक खेळाडू धोनीच्या नेतृत्वाखाली प्रथम खेळले. धोनीला सीनियर असलेले सगळे खेळाडू एक तर निवृत्त झाले किंवा संघातून बाहेर फेकले गेले. सध्याचा कर्णधार विराट कोहली यालाही धोनीविषयी आदर आहे. परवाच्या धोनीच्या तीनशेव्या सामन्याच्या वेळी विराटनं 'तू आमचा कायमच कर्णधार असशील,' असे उद्गार काढले होते. त्यामुळं या संघातल्या सर्व खेळाडूंचा खेळ धोनीला चांगला माहिती आहे. त्यांच्यातल्या गुणांची, दोषांची त्याला नीट कल्पना आहे. आता संघात सगळ्यांत सीनियर खेळाडू धोनीच आहे. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवणारे, त्याच्याकडून प्रेरणा घेत शिकलेले हे सगळे खेळाडू आहेत. धोनी यष्टींमागे उभा राहून सदैव या सगळ्या खेळाडूंशी बोलत असतो. त्यांना युक्तीच्या चार गोष्टी सांगत असतो. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना प्रोत्साहन देत असतो. त्याच्या उपस्थितीमुळं विराटवरचं बरंचसं दडपण कमी होत असणार, यात शंका नाही. 
चौथा मुद्दा म्हणजे, धोनीची खेळाची समज आणि 'आउट ऑफ बॉक्स' विचार करण्याची त्याची वृत्ती. परवा श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पहिले दोन्ही बळी धोनीच्या रिव्ह्यूमुळेच मिळाले, असं म्हणता येईल. खेळताना त्याचं चौफेर लक्ष असतं आणि तो जेव्हा मैदानात असतो, तेव्हा शंभर टक्के 'काया-वाचा-मनेन' संघासोबत मैदानात असतो. त्याचा उत्साह पाहण्यासारखा असतो. तो कधीही 'स्लेजिंग' करताना दिसत नाही. त्याउलट आपल्या खेळाडूंशी सतत बोलून त्यांना प्रेरणा देताना दिसतो. 'आउट ऑफ बॉक्स' विचार करण्याची त्याची वृत्ती विश्वचषकासारख्या स्पर्धेत फार उपयोगाची असते. अत्यंत अटीतटीनं सगळे खेळत असतात. गुणवत्ता सगळ्यांकडंच असते. अशा वेळी थंड डोक्यानं, वेगळा विचार करून प्रतिस्पर्ध्याला नमविण्यासाठी धोनीसारखा खेळाडूच हवा. पहिल्या टी-२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जोगिंदर शर्माला शेवटचं षटक देण्याचा त्याचा निर्णय असाच अफलातून होता. आयपीएलमध्ये चेन्नईच्या संघाकडून अनेकदा अश्विनला गोलंदाजीची सुरुवात करायला देणे किंवा फलंदाजीच्या क्रमवारीत बदल करून स्वतः आघाडीवर लढणे (विश्वचषकाचा अंतिम सामना) अशा अनेक गोष्टी माहीच्या वेगळ्या विचारांची साक्ष देतात. त्याच्या बहुतेक अशा निर्णयांचा संघाला फायदाच झालेला दिसतो.
पाचवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, धोनीनं दोन वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आणि फक्त एक-दिवशीय व टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित केलं. धोनीला स्वतःला त्याचा खेळ वन-डे व टी-२० या प्रकारांसाठी अत्यंत अनुकूल वाटतो. पन्नास षटकांच्या सामन्यात तर घसरलेला डाव सावरण्याची कामगिरी त्यानं अनेक वेळा केली आहे. अगदी सध्या सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या मागच्या तिन्ही सामन्यांत धोनीनं नुसती ही डाव सावरण्याची कामगिरी केलीय असं नाही, तर सामने जिंकूनही दिले आहेत. त्याच्या केवळ समोर असण्यानं भुवनेश्वरसारख्या गोलंदाजालाही उत्कृष्ट फलंदाजी करण्याची प्रेरणा मिळते आणि तो अर्धशतक ठोकून सामना जिंकून देतो. धोनीला जगातला 'सर्वोत्कृष्ट फिनिशर' असं म्हणतात ते उगीच नाही. सहाव्या-सातव्या क्रमांकावर खेळायला येऊनही केवळ तीनशे सामन्यांत त्यानं साडेनऊ हजारहून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या मनगटातला जोर आणि ताकद यामुळं जगातल्या कुठल्याही मैदानावर, कुठल्याही गोलंदाजाला मैदानाबाहेर भिरकावण्याची त्याची क्षमता कोणीही नाकारू शकत नाही. 
सहावा थोडा भावनात्मक मुद्दा... २०११ च्या विश्वचषकात सगळे खेळाडू सचिनसाठी विश्वचषक जिंकूनच द्यायचा, या भावनेनं फार प्रेरित होऊन खेळले. या खेळाडूंमध्ये धोनी आणि विराटही होते. आता धोनीलाही असाच गोड निरोप देण्याची जबाबदारी विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांवर आली आहे. अशी काही तरी अंतःप्रेरणा असेल तर सगळ्यांचीच कामगिरी अंमळ सुधारते, असा अनुभव आहे. या प्रेरणेतून भारतीय संघ खेळला आणि त्यांनी पुन्हा तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकून माहीला 'अलविदा' म्हटलं तर धोनीसारखा नशीबवान आणि सुदैवी खेळाडू दुसरा कोणी नसेल. गेल्या १३ वर्षांत त्यानं भारतीय संघासाठी केलेल्या कामगिरीसाठी... 'इतना गिफ्ट तो बनता ही है बॉस'!

------
(पूर्वप्रसिद्धी : महाराष्ट्र टाइम्स, पुणे : ३ सप्टेंबर २०१७)
----