30 Dec 2016

संवादसेतू दिवाळी अंक लेख

मराठी सिनेमा : तंत्रातून 'अर्था'कडे... 
-----------------------------------



गेल्या पंधरा वर्षांत मराठी चित्रपटांचा प्रवास मांडायचा झाला तर तो अनेक अंगांनी मांडता येईल. आशयाच्या अंगाने बोलता येईल, तंत्राच्या अंगाने बोलता येईल, प्रसिद्धीच्या अंगाने बोलता येईल किंवा निर्मितीमूल्याच्या अंगाने काही बाबी सांगता येतील. मी २००३ ते २०१४ या काळात अनेक मराठी सिनेमांचं परीक्षण केलं. परीक्षण केलेल्या सिनेमांव्यतिरिक्त इतर मराठी सिनेमेही अर्थातच पाहिले. त्यामुळं मराठी सिनेमांचा गेल्या पंधरा वर्षांतला प्रवास अगदी डोळ्यांसमोर आहे. या लेखात मला प्रामुख्यानं तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर मराठी सिनेमाच्या आशयद्रव्यात कसा फरक पडत गेला किंवा मुळात असा फरक पडला का, याविषयी चर्चा करावीशी वाटते. कारण आपल्याकडं कुठल्याही कलाकृतीचं मूल्यमापन करताना त्या कलाकृतीच्या जन्माच्या वेळी त्या समाजात प्रचलित असलेल्या अर्थव्यवहाराचं भान ठेवलेलं खूप कमी पाहायला मिळतं. त्यामुळं हे मूल्यमापन कायमच एका वेगळ्या अवकाशात राहतं आणि वस्तुस्थिती बऱ्याचदा वेगळी असू शकते. 
हे अर्थव्यवहाराचं भान म्हणजे नेमकं काय? समाजाचा प्रवास अनेक बाजूंनी सुरू असतो. समाज सदैव पुढं जायचा प्रयत्न करीत असतो. हा प्रवास सांस्कृतिक बाजूनं असतो, तसा आर्थिक बाजूनंही असतो. किंबहुना आर्थिक बाजूचा प्रवास जास्त ठळक दिसणारा असतो किंवा जाणवणारा असतो. या बदलांचं प्रतिबिंब आपल्या कलाकृतींमध्ये कळत-नकळत पडत असतं. तर या बदललेल्या आशयद्रव्याचं तत्कालीन अर्थव्यवहाराच्या अंगानं मूल्यमापन करणं गरजेचं असतं. तसं ते न केल्यास मूल्यमापनात काही तरी अपुरेपणा राहतो आणि तो सर्वांनाच जाणवतो. आपल्याकडं मोबाइलचं युग अवतरल्यानंतर हा बदल अगदी स्पष्ट जाणवणारा दिसतो. एकविसावं शतक सुरू झालं, तेव्हा आपल्याकडं १९९१ मध्ये सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांनी एक दशक पूर्ण केलं होतं. सिनेमाच्या बाबतीत बोलायचं तर मराठी चित्रपटांची अवस्था त्या काळात फारच बिकट होती. म्हणजे वर्षाला केवळ सात ते आठ सिनेमे तयार होत होते. एका वर्षी तर राज्य पुरस्कारांसाठी त्या वर्षी तयार झालेल्या सर्वच सिनेमांना कुठलं ना कुठलं नामांकन मिळालं होतं, असं सांगितलं जातं. याची काही कारणं होती. मराठी चित्रपटांच्या जन्मापासून त्याचे काही ठळक टप्पे सांगता येतात. त्यात १९९० चं दशक हे विनोदी चित्रपटांचं दशक मानलं जातं. यात काही चित्रपट चांगले होते, तर अनेक चित्रपट तद्दन टाकाऊ होते. केवळ अनुदानाच्या योजनेचा लाभ घ्यायचा म्हणून अनेक अमराठी निर्मात्यांनी मराठीचा गंधही नसताना अनेक कथित 'इनोदी' चित्रपट तयार केले. या लाटेमुळं आपला प्रेक्षक मराठी चित्रपटांपासून दूर गेला. मराठी चित्रपटांची संख्या तेव्हा अतोनात वाढली, तरी गुणवत्ता रसातळाला गेली होती. सचिन, महेश कोठारे यांसारख्या दिग्दर्शकांच्या करिअरचा पहिला अन् अत्यंत यशस्वी टप्पा तोपर्यंत संपला होता. सचिननं तर 'कुंकू' या चित्रपटानंतर अत्यंत प्रदीर्घ असा १२-१३ वर्षांचा ब्रेक घेतला, तो थेट २००५ मध्ये 'नवरा माझा नवसाचा'पर्यंत. दरम्यान, महेश कोठारेंचे सिनेमे अधूनमधून येत होते आणि चांगलं यश मिळवीत होते, पण ते तेवढं पुरेसं नव्हतं. स्मिता तळवलकर १९८९ मध्ये 'कळत-नकळत'द्वारे धाडसाने मराठी चित्रनिर्मितीत उतरल्या आणि त्यांनी सातत्याने दीर्घकाळ चांगले मराठी सिनेमे दिले. पुढं १९९५ मध्ये 'दोघी' या चित्रपटाद्वारे सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर ही जोडी मैदानात उतरली आणि त्यांनीही ठरावीक अंतरानं सातत्यानं दीर्घकाळ चांगले मराठी सिनेमे देण्याची परंपरा कायम राखली. या सर्वांचं वैशिष्ट्य म्हणजे या सर्व निर्माता-दिग्दर्शकांनी आपापला असा एक प्रेक्षकवर्ग तयार केला होता आणि त्या प्रेक्षकवर्गाकडूनच तो सिनेमा पाहिला जाई. उदा. महेश कोठारेंचे सिनेमे ग्रामीण भागातला प्रेक्षक डोळ्यांसमोर ठेवून तयार केले जात, तर स्मिताताईंचे शहरी मध्यमवर्ग डोळ्यांसमोर ठेवून! भावे-सुकथनकर यांचे चित्रपट तर आणखीनच मर्यादित वर्तुळापर्यंत पोचत होते आणि पाहिले जात होते (अपवाद 'दहावी फ'चा...)! 
इथं एक उल्लेख केला पाहिजे. पूर्वी आपल्याकडं चातुर्वर्ण्य व्यवस्था होती, तशी मराठी सिनेमांतही एक चातुर्वर्ण्य व्यवस्था होती व आहे. राजा परांजपे ते नागराज मंजुळे असं त्याचं थोडक्यात वर्णन करता येईल. महाराष्ट्रातील सामाजिक वर्णव्यवस्था अगदी स्पष्ट आहे. या व्यवस्थेला साद घालत अनेकांनी इथं हा व्यवसाय केला. फक्त या गोष्टी उघडपणे बोलल्या जात नसत. पण जो तो आपापला प्रेक्षकवर्ग सांभाळून असे. (आता सोशल मीडिया उपलब्ध झाल्यामुळं 'तुमची कट्यार, तर आमचा सैराट' असं म्हणण्यापर्यंत ही मजल गेली आहे.) ही व्यवस्था आजही एवढी भक्कम आहे, की सुमित्रा भावेंचा प्रेक्षक 'फँड्री' किंवा 'लय भारी' बघायला जात नाही आणि 'सैराट'च्या प्रेक्षकानं 'वास्तुपुरुष' किंवा 'संहिता' ही नावंही ऐकलेली नसतात. गंमत म्हणजे हे सिनेमे तयार करणाऱ्या सुमित्राताई किंवा नागराजच्या मनात हे कप्पे असतील, असं मुळीच वाटत नाही. पण जातीपलीकडं विचार करू न शकणारे आपले बहुसंख्य प्रेक्षकच असा सैराट विचार करत असतात आणि हे मुळीच गुपित नाही. जागोजागी ते ठळकपणे कधी प्रत्यक्ष, तर कधी अप्रत्यक्षरीत्या दिसत असतं, जाणवतही असतं.
अशा परिस्थितीत गेल्या १५ वर्षांत मराठी सिनेमा कुठून कुठं गेला, हे नोंदवताना ही सर्व पार्श्वभूमी महत्त्वाची ठरते. ती पाहिल्यावर तंत्रज्ञानातील प्रगतीची खरी फळं आपल्याला चाखायला मिळू लागली तो काळ आणि मराठी सिनेमामध्ये आलेल्या एका क्रांतिकारी बदलाचा काळ एकच असावा, यात आश्चर्य वाटत नाही. साधारण १९९७-९८ मध्ये मराठी सिनेमांच्या निर्मितीनं तळ गाठला होता. एक तर १९९१ नंतर भारतात उपग्रह वाहिन्या सुरू झाल्या होत्या आणि लोकांना घरबसल्या मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले होते. शिवाय मराठी चित्रपट आशयदृष्ट्याही फार काही वेगळं देत नव्हते. अजूनही एकपडदा सिनेमागृहांचीच मक्तेदारी होती आणि सिनेमांची निर्मितीही याच चित्रपटगृहांतून मिळणाऱ्या व्यवसायाचं गणित मांडून केली जात होती. त्यात काही गैर नव्हतं. एखाद्या चित्रपटानं पुण्याला 'प्रभात'मध्ये किंवा मुंबईत 'प्लाझा'मध्ये किती आठवडे मुक्काम ठोकला यावरच त्याचं यशापयश मोजलं जात होतं. 
अशा वेळी आजूबाजूला बदललेल्या सामाजिक, आर्थिक वातावरणाचं प्रतिबिंब म्हणावेत असे दोन चित्रपट या वेळी, म्हणजे १९९९ मध्ये आले आणि त्यांनी मराठी चित्रपटांकडं बघण्याची प्रेक्षकांची दृष्टीच बदलून टाकली. यातला पहिला होता चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'बिनधास्त'. नाटकांमध्ये अनेक वर्षं काम करणाऱ्या चंदूनं चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण केलं तो हा चित्रपट. भारतातल्या आर्थिक सुधारणांनंतर समाजात, विशेषतः शहरांत जे बदल घडत होते, त्याचं प्रतिबिंब 'बिनधास्त'मध्ये पडलं होतं. म्हटलं तर ही एक मर्डर मिस्टरी होती. पण कॉलेजच्या होस्टेलमध्ये शिकणाऱ्या दोन तरुणींना तोपर्यंत मराठी सिनेमात नायिका कुणी दाखवलं नव्हतं. (चाळिशीचे, पण तरीही कॉलेजकुमार दाखविलेले नायक तोपर्यंत अनेक पाहिले होते...) किंबहुना या सिनेमात महत्त्वाचं असं एकही पुरुष पात्र नव्हतं. संपूर्णपणे स्त्री कलाकारांनी अभिनय केलेला हा वेगळा सिनेमा होता. यातल्या मुली आधुनिक होत्या. 'तुझी नि माझी खुन्नस' म्हणत टशन देणाऱ्या होत्या. नवी फॅशन, पेहराव करणाऱ्या होत्या. खोट्या वर्गण्या गोळा करून, जीप उडवत ट्रिपची धम्माल करणाऱ्या होत्या. 'डोंगर किसिंग तुफान वारा' असं गात बिनधास्त जगणाऱ्या होत्या. 'दोन मित्रांची मैत्री आयुष्यभर टिकते, तशी दोन मैत्रिणींची का नाही टिकू शकत?' असा थेट सवाल विचारणाऱ्या मैत्रिणी यात दिसल्या. शिवाय उत्तम पटकथा आणि शेवटपर्यंत खुनी कोण, याचं उत्तमरीत्या राखलेलं रहस्य यामुळं हा सिनेमा सुपरहिट ठरला. शहरातल्या आधुनिक स्त्रियांच्या, तरुणींच्या मानसिकतेचा अचूक वेध घेणारा हा सिनेमा होता. चंदू कुलकर्णींनी त्यापूर्वी व्यावसायिक रंगभूमीवर 'चारचौघी' आणि 'चाहूल'सारख्या नाटकांतून आधुनिक स्त्री-मनाचा ठाव घेतला होताच. पहिल्या सिनेमातही त्यांनी ही विचारधारा जपली आणि खऱ्या अर्थानं 'प्रागतिक' अशा मराठी मुलींची प्रतिमा (बहुदा पहिल्यांदाच) पडद्यावर दाखविली. 'बिनधास्त' गाजल्यामुळं मराठी प्रेक्षक पुन्हा चित्रपटगृहांकडं वळला. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रसिद्धीवरही बराच खर्च केला होता आणि अशा प्रकारची वृत्तपत्रीय प्रसिद्धी त्यापूर्वी तरी कोणत्याही सिनेमाची झालेली मी तरी पाहिली नव्हती. अर्थात मूळ कलाकृतीत दम होता, म्हणूनच प्रेक्षकांनी तो उचलून धरला, हे निर्विवाद सत्य. पण प्रेक्षकांना थिएटरमध्ये खेचून आणण्यासाठी आता पारंपरिक मार्गांपेक्षा वेगळ्या 'मार्केटिंग गिमिक'ची गरज पडणार आहे, हे 'बिनधास्त'च्या यशानं सिद्ध केलं. 
याच वर्षी आलेला असा दुसरा सिनेमा होता - 'सातच्या आत घरात'. स्मिता तळवलकर निर्मात्या आणि संजय सूरकर यांचं दिग्दर्शन होतं. या सिनेमानं शहरी, महानगरी तरुणाईच्या भावभावनांना प्रथमच पडद्यावर चेहरा दिला. अर्थात जुन्या पिढीचं अस्तित्व होतंच आणि ते थोडंसं 'तुमचं कसं चुकतंय' हे तरुणाईला सांगण्यासाठीच होतं. पण तरीही या सिनेमानं तरुणाईची भाषा पडद्यावर आणली आणि तिच्या भावविश्वातल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर आणल्या हे नक्की. रात्री उशिरा घरी सोडणाऱ्या बॉयफ्रेंडला किस करणारी तरुणी याच सिनेमानं दाखविली. शहराबाहेर उशिरा पार्टी करणाऱ्या ग्रुपमधील एक मुलीवर झालेला बलात्कार आणि त्या घटनेनं हादरलेले तिचे मित्र-मैत्रिणी हा सिनेमाचा विषय असला, तरी या सिनेमानं जाता जाता अनेक सामाजिक घटनांवर सूचक भाष्य केलं होतं आणि ते सर्व प्रेक्षकांना तेव्हा आवडलं होतं.
या दोन चित्रपटांनी तेव्हाची बदलती सामाजिक, आर्थिक परिस्थिती अचूकपणे दाखविली होती आणि त्यामुळंच त्यांना मोठ्या प्रमाणात लोकाश्रयही लाभला. सिनेमा अनेक अर्थांनी समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब असतो, हे खरं आहे. पूर्वी तर सिनेमात काळाच्या पुढच्या गोष्टी दाखवत आणि मग लोक त्यांचं अनुकरण करीत. उदा. नायिकांच्या विविध वेशभूषा किंवा फॅशन. 'साधना कट' हे याचं उत्तम उदाहरण सांगता येईल. मराठी सिनेमाच्या बाबतीत अशी परिस्थिती नसली, तरी किमान चालू काळातील सामाजिक, आर्थिक बदलांची दखल त्यांनी घ्यावी, अशी अपेक्षा असतेच. या दोन्ही सिनेमांनी ती गरज पूर्ण केली. 
विसावं शतक संपून एकविसावं शतक उजाडलं ते सिनेमांंच्या जगात एक क्रांती घेऊनच. मुंबईमध्ये पहिलं मल्टिप्लेक्स सुरू झालं आणि पाठोपाठ २००१ मध्ये पुण्यात सातारा रोड इथं सिटीप्राइड हे पहिलं मल्टिप्लेक्स सुरू झालं. मल्टिप्लेक्स युगाची नांदी अनेक बदलांनी घेऊनच आली. आर्थिक सुधारणांचं पर्व सुरू झालं, त्याला दहा वर्षं झाली होती आणि त्या सुधारणांची फळं आता देशभरात विविध रूपात दिसू लागली होती. देशभरात महामार्गांचं जाळं विणलं जात होतं, मोठमोठ्या मॉलची उभारणी होत होती, आयटी कंपन्यांच्या आगमनानं पुणे किंवा हैदराबाद, बंगलोर यासारख्या शहरांचा तोंडवळा बदलू लागला होता. मल्टिप्लेक्सही याच काळात आले. समाजातला मध्यमवर्गाचा एक मोठा समूह झपाट्यानं वरच्या आर्थिक पातळीवर झेप घेऊ लागला. लोकांची क्रयशक्ती वाढली. चांगल्या सेवेसाठी पैसे द्यायला लोक तयार होऊ लागले. चांगले हायवे पाहिजेत, तर टोल द्या किंवा अगदी चांगलं स्वच्छतागृह हवं असेल तरी पैसे द्या अशी मानसिकता घडविण्यात येत होती. या आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गाला हे मान्य होतं. देशातल्या अनेक टिअर-२ शहरांत मोठमोठे गृहप्रकल्प बांधण्यात येऊ लागले. टाउनशिप उभ्या राहिल्या. जागांचे भाव वाढले. छोट्या गावांतून शहरांत आलेल्या मोठ्या वर्गानं या ठिकाणी घरं घेतली आणि ते कायमस्वरूपी शहरांचे रहिवासी झाले. महाराष्ट्रातही हे मूक स्थलांतर मोठ्या प्रमाणावर घडून आलं. गावं बऱ्यापैकी ओस पडली. शहरांत वेगळी कार्यसंस्कृती उदयाला आली. गिरण्या, बँका किंवा सरकारी कार्यालये एवढ्यापुरत्याच मर्यादित असलेल्या नोकऱ्या प्रचंड वैविध्यानं विस्तारल्या. सेवा क्षेत्राला बरकत आली. वेगवेगळ्या शिफ्टमधल्या नोकऱ्या सुरू झाल्या. लोकांना घरी नेण्यासाठी आणि कामावर नेण्यासाठी खासगी टॅक्सी धावू लागल्या. बँका मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ लागल्या. शहरांत अनेक ठिकाणी एटीएम उभारणी करण्यात आली. पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज उरली नाही. क्रेडिट कार्डची संस्कृती आली. लोक भरमसाठ कर्ज घेऊ लागले. अनेकांची आयुष्यंही यापायी उद्ध्वस्त झाली. मराठी सिनेमानं याची दखल घेतली. गजेंद्र अहिरे यांच्या 'दिवसेंदिवस' नावाच्या चित्रपटात याच समस्येचं दर्शन घडलं. क्रेडिट कार्डच्या मोहापायी अवास्तव स्वप्नं पाहणाऱ्या एका जोडप्याची वाताहत त्यांनी यात दाखविली होती. 
या बदलत्या काळाचं प्रतिबिंब मराठी चित्रसृष्टीतही पडू लागलं. आशयदृष्ट्याही नवे प्रयोग होऊ लागले आणि त्यांना चांगल्या निर्मितीमूल्यांची जोड मिळू लागली. या काळातला माइलस्टोन मानला जाणारा 'श्वास' २००४ मध्ये आला. 'श्वास' अनेक अर्थानं आधुनिक काळातला सिनेमा होता. या सिनेमावर इराणी सिनेमांचा प्रभाव जाणवण्यासारखा होता. पण तरीही त्याला इथल्या मातीचा सुवास होता. 'श्वास'मध्ये ठोकळेबाज नायक-नायिका आणि खलनायक नव्हते. सिनेमाची पारंपरिक चौकट नव्हती. स्टोरीटेलिंगमध्ये नावीन्य होतं. कॅमेराचा कल्पक वापर होता. या माध्यमाची ताकद वापरलेली होती आणि चांगल्या आशयसूत्राचीही जोड होती. या जोरावर 'श्वास'नं थेट ऑस्करपर्यंत धडक मारली. अनेक वर्षांनी मराठीला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. खेड्यातल्या मुलाला डोळ्यांवरील उपचारांसाठी शहरात यावं लागतं, या कथानकात आर्थिक परिस्थितीचा, आर्थिक स्तराचा एक अंतःप्रवाह निश्चित होता. वर उल्लेख केलेला 'दिवसेंदिवस' किंवा नंतर बऱ्याच काळानं आलेला भरत जाधव व भार्गवी चिरमुले यांचा 'वन रूम किचन' या सिनेमांत शहरी मध्यमवर्गीयांची बदलत्या आर्थिक परिस्थितीतली स्वप्नं दाखविली होती. मल्टिप्लेक्समुळं वेगळ्या आशयाचे आणि विशिष्ट वर्गातला प्रेक्षकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून सिनेमे काढता येऊ लागले. त्यामुळं याच काळात निशिकांत कामत, सचिन कुंडलकर, उमेश कुलकर्णी, गिरीश मोहिते, सतीश मनवर, सुजय डहाके, मंगेश हाडवळे यांच्यापासून ते नागराज मंजुळेपर्यंत अनेक दिग्दर्शकांनी स्वतःचे पहिले सिनेमे काढले. या सर्वांच्या पहिल्या कलाकृती अगदी सर्वांनी दखल घ्यावी अशाच होत्या. सचिनचा 'रेस्टॉरंट' असो, की सतीश मनवरचा 'गाभ्रीचा पाऊस'... या कलाकृतींच्या गाभ्यात आर्थिक मुद्दा होताच.
यात एक महत्त्वाचा सिनेमा होता - निशिकांत कामतचा 'डोंबिवली फास्ट'! २००५ मध्ये आलेल्या या चित्रपटात डोंबिवलीत राहणाऱ्या माधव आपटे या मध्यमवर्गीय माणसाचा व्यवस्थेविरुद्धचा संताप अगदी अंगावर येणाऱ्या पद्धतीनं दाखविण्यात आला होता. मध्यमवर्गाला वरच्या स्तरात जायचं होतं, पण इथली जुनाट राजकीय, सामाजिक व्यवस्था त्यात अडथळा ठरत होती. भ्रष्टाचारामुळं हा वर्ग गांजून गेला होता. त्याला चोख सेवा देणारी व्यवस्था हवी होती. हे सगळं 'डोंबिवली फास्ट'मध्ये आलं. त्या काळातला आर्थिक असमानतेतून येणारा हा संघर्ष या सिनेमानं अगदी चोख दाखवला होता. या चित्रपटानं वेगळी चित्रभाषा आणली. मल्टिप्लेक्समध्ये जाणाऱ्या शहरी प्रेक्षकांनी हा सिनेमा जोरदार उचलून धरला.
समाजाचा आर्थिक स्तर बदलत होता. मध्यमवर्गाकडं आता पैसा खेळत होता. पती-पत्नी दोघेही चांगल्या ठिकाणी नोकरीला, मुलं चांगल्या दर्जाच्या शाळेत, दोन दोन फ्लॅट, दारात चारचाकी, एखादी परदेशी ट्रिप असा हा वर्ग वाढू लागला होता. याच काळात आलेल्या 'मातीच्या चुली'नं बदलत्या आर्थिक परिस्थितीतला मध्यमवर्ग आणि त्याच्या महत्त्वाकांक्षा नेमक्या दाखविल्या. जुन्या पिढीशी कुटुंबातल्या मूल्यांबाबत त्याचा सुरू झालेला संघर्ष यात अगदी लखलखीतपणे समोर आला. 'तुझ्या-माझ्यात'सारख्या चित्रपटानं पती-पत्नी आणि त्यांच्यात आता सहजतेनं येऊ घातलेली 'ती' (किंवा 'तो'ही) आणि त्यातून उद्भवणारे प्रश्न मांडले. वेगानं बदलणाऱ्या आर्थिक वातावरणामुळं आपल्या पारंपरिक मूल्यव्यवस्थेला वेगानं धडका बसत होत्या. पारंपरिक पद्धतीनं लग्न ठरविण्यासारखा विषय आणखी गहन होऊ लागला होता. महानगरी तरुणाई याकडं वेगळ्या नजरेनं पाहत होती. राजीव पाटीलच्या 'सनई-चौघडे'नं हा विषय नेमका उचलला आणि त्यामुळंच प्रेक्षकांनीही या सिनेमाला जोरदार दाद दिली. 'रिटा'सारखा अगदी वेगळ्या पर्यावरणात नेणारा सिनेमा याच काळात आला, तर 'सुखान्त'सारखा इच्छामरणाच्या विषयावर आधारित असलेला सिनेमाही मराठी चित्रपटसृष्टीनं पाहिला. बदलत्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचं प्रतिबिंबच या विषयांमध्ये पडलेलं दिसत होतं. 
मराठी चित्रपट निर्मितीतही या काळात आमूलाग्र बदल झाला. मोठ्या वाहिन्या किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या व्यवसायात उतरल्या. त्यामुळं निर्मितीमूल्यात वाढ झाली. मराठीतही भव्य सिनेमे बनू लागले. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या चित्रपटानं तर इतिहास घडविला. प्रथमच मराठी चित्रपटानं पहिल्याच प्रदर्शनात २५ कोटी रुपये कमावण्याची कामगिरी केली. याच काळात आलेल्या 'मुंबई-पुणे-मुंबई'सारख्या चित्रपटानं शहरी आणि मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांची वेगळी वर्गवारी पुन्हा सिद्ध केली. नंतरच्या काळात हे मग रुटीन झालं. आपापला विशिष्ट प्रेक्षकवर्ग ओळखून त्यालाच अपील होईल अशी कथा आणि त्यावर सिनेमे बनू लागले. मग 'आरंभ'सारखा पित्याकडूनच मुलीचं लैंगिक शोषण होण्यासारखा गंभीर विषय असेल किंवा 'ताऱ्यांचे बेट'सारखा ग्रामीण भागातल्या मुलांच्या भावविश्वाचा वेध घेणारा सिनेमा असेल, या सिनेमांनी पुन्हा मध्यमवर्गीय, शहरी प्रेक्षकांना मोहवून घेतलं. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'बालगंधर्व' किंवा 'लोकमान्य'सारखे वेगळे बायोपिकही याच काळात पडद्यावर आले. उत्तम निर्मितिमूल्यं आणि व्यावसायिक सफाई ही आधुनिक आर्थिक व्यवहारातील शिस्त या सिनेमांच्या निर्मितीमध्ये पाळण्यात आली होती आणि त्याची फळंही त्यांना व्यावसायिक यशाच्या रूपानं मिळालेली दिसली. 
गेल्या आठ-दहा वर्षांत तर स्मार्टफोनच्या आगमनानं आणि फेसबुक, ट्विटर किंवा व्हॉट्सअपसारख्या संवादमाध्यमांनी सगळ्यांच्या जगण्याचंच परिप्रेक्ष्य बदलून गेलं आहे. नातेसंबंध, कौटुंबिक संबंध यांची पुन्हा तपासणी होते आहे. व्हर्चुअल नाती तयार होत आहेत. आभासी जगानं वास्तव जगण्याला अजगरासारखा विळखा घातला आहे. या सर्वांचं प्रतिबिंब मराठी सिनेमात पडतं आहे. अगदी गेल्या वर्षी आलेल्या 'राजवाडे अँड सन्स'नं उच्चभ्रू मराठी माणसांचं एक वेगळंच भावविश्व दाखवलं. ते तोपर्यंत मराठी सिनेमात कुठं आलं नव्हतं. यंदा आलेल्या आणि प्रचंड चर्चा झालेल्या 'सैराट'मध्येही जातवास्तवाबरोबरच अर्थवास्तवही होतंच. आर्थिक दरीतून आलेल्या असमानतेचा अंतःप्रवाह या कथासूत्रात सातत्यानं जाणवत राहिला. 
सिनेमा आणि समाजाची आर्थिक वा भौतिक प्रगती यांचं हे नातं कायम राहणार आहे. याचं कारण म्हणजे समाजाचा अर्थव्यवहार आणि त्यातून तयार होणारी त्या समाजाची विशिष्ट संस्कृती या गोष्टी कुणीच दुर्लक्षित करू शकत नाही. मराठी सिनेमाचं जगही त्याला अपवाद नाही. गेल्या पंधरा वर्षांतले सिनेमे पाहिले तर आपलं जगणं कसं बदलत गेलं हे आपल्याला कळेल. त्या अर्थानं या सिनेमांनी समाजासमोर एक आरसाच धरला आहे. तो एकाच वेळी वास्तव आहे आणि आभासीसुद्धा... या समाजासारखाच!
---
(पूर्वप्रसिद्धी - संवादसेतू दिवाळी २०१६)
---

24 Dec 2016

दंगल रिव्ह्यू

'दंगल' हो... मंगल हो...!!
-----------------------------



आपल्याकडं चांगल्या क्रीडापटांची तशी वानवाच आहे. 'चक दे इंडिया' हा अलीकडच्या काळात आलेला आणि चांगला जमलेला पहिला क्रीडापट म्हणावा लागेल. त्यानंतर 'भाग मिल्खा भाग', 'मेरी कोम' ते नुकताच आलेला 'एम. एस. धोनी - अनटोल्ड स्टोरी'पर्यंत अनेक क्रीडापट आले. त्यातले बरेचसे चांगले प्रयत्न होते. खुद्द आमीर खान आणि आशुतोष गोवारीकर यांनी भारतीयांचं क्रिकेटप्रेम अचूक हेरणारा 'लगान' १५ वर्षांपूर्वी काढला होता, तोही एका अर्थानं क्रीडापटच (पण काल्पनिक) होता. याच आमीरनं आता नीतेश तिवारीच्या 'दंगल' या नव्या हिंदी चित्रपटातून पुन्हा एकदा अस्सल, अगदी शब्दश: या 'मातीतला' क्रीडापट तयार केला आहे. 'दंगल'चं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ कुस्तीवरचा क्रीडापट राहत नाही, तर त्यापलीकडं जाऊन काही मूलभूत मुद्द्यांवर बोलतो. मुलींना आपण एक समाज म्हणून देत असलेली हीन वागणूक, आपल्याकडं असलेला क्रीडा संस्कृतीचा अभाव, बाप आणि मुली यांच्यातलं नातं अशा अनेक गोष्टींना सहृदयतेनं स्पर्श करतो. एक कलाकृती म्हणून आपल्या गाभ्यात असलेलं नाट्य नीट खुलवतो, प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो आणि त्यांच्या मनातल्या काही आदिम भावभावनांना साद घालतो... त्यामुळंच सिनेमा संपतो तेव्हा आपण एक माणूस म्हणून थोडेसे उन्नत झालो आहोत, असा काहीसा फील हा सिनेमा देतो. आपल्या देशावर आपल्या मनाच्या तळात कोपऱ्यात कुठं तरी असलेलं प्रेम एकदम पृष्ठभागावर आणून ठेवतो. मग आपण या कलाकृतीचा आनंद लुटत असताना अनेकदा हसतो, ओरडतो, चित्कारतो, मुठी वळतो, निराश होतो आणि हताशही होतो... डोळ्यांत पाणी येतं, अंगावर रोमांच उभे राहतात, पोटात कुठं तरी हलतं... आपलं सर्व शरीर असं त्या कलाकृतीला जैव प्रतिसाद देऊ लागतं. असा अनुभव देणारे सिनेमे कमी असतात. 'दंगल' पाहताना हे सगळं घडतं म्हणून तो सिनेमा आपल्याला आवडतो. प्रेक्षक म्हणून आपण त्यात एवढे घुसतो, एवढे तद्रूप होतो, की सिनेमात राष्ट्रगीत सुरू झालं, की आपणही नकळतपणे उठून उभे राहतो आणि सिनेमाच्या नायकासोबत आपलेही डोळे पाणावतात.
आमीर खानचं वैशिष्ट्य असं, की त्यानं एखाद्या गोष्टीत रस घेतला, की ती परिपूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. इथंही महावीरसिंह फोगाट या हरियाणवी कुस्तीगीराची भूमिका साकारताना त्यानं कोणतीही कसूर ठेवलेली नाही. महावीरसिंह यांनी आपल्या गीता आणि बबिता या दोन्ही मुलींना कुस्तीपटू म्हणूनच वाढवलं आणि त्यांनी देशासाठी पदकं जिंकून आणावीत, असं स्वप्न पाहिलं. हे स्वप्न हरियाणासारख्या सर्वाधिक स्त्री-भ्रूणहत्या होणाऱ्या राज्यात साकारणं सोपं नव्हतं. पण कुठली तरी दुर्दम्य आशा माणसाला सदैव काही तरी अलौकिक करण्याची प्रेरणा देत असते. महावीरसिंह यांनी आपलं स्वप्न स्वतःच्या दोन्ही मुलींच्या माध्यमातून साकारलं. हा प्रवास दाखवताना आमीरला महावीरसिंह यांची भूमिका करायची होती आणि त्यासाठी भरपूर वजन वाढवावं लागणार होतं. आमीरनं ते केलंच; पण त्या हरियाणवी भाषेचा लहेजाही (म्हारी छोरियाँ छोरों से कम है के?) छान उचलला. त्याला या भूमिकेत पाहणं अगदीच आनंददायी अनुभव आहे. (आता आमीरनं एखादी मराठी व्यक्तिरेखा साकारावी, असं वाटू लागलं आहे.)
'दंगल'च्या गोष्टीचा नक्की जीव कशात आहे, हे दिग्दर्शक नीतेश तिवारीनं बरोबर ओळखलं आहे. त्यामुळंच सिनेमा लांबीनं मोठा (पावणेतीन तास) असला, तरी तो कुठंही कंटाळवाणा वाटत नाही. सिनेमाची पटकथा चांगली आहे. ती बांधीव असल्यानं अनावश्यक फापटपसारा नाही. सिनेमा अगदी मुद्देसूदपणे गोष्ट सांगत पुढं सरकत राहतो. त्या दृष्टीनं सिनेमाच्या अगदी सुरुवातीलाच येणारा आमीर व दुसऱ्या एका कुस्तीगीराचा शॉट पाहण्यासारखा आहे. इथं नायकाला एस्टॅब्लिश करण्यासाठी अगदी अचूक प्रसंग निवडण्यात आला आहे. नंतर महावीरसिंहांना लागोपाठ चार मुली होणं, त्यामुळं मुलगा होईल आणि तो कुस्ती खेळेल, या त्यांच्या पारंपरिक विचारांना बसलेला धक्का, त्यातून आलेलं नैराश्य हा सगळा घटनाक्रम भराभर पुढं जातो. महावीरसिंहांच्या दोन्ही मोठ्या मुली एकदा मारामारी करून दोन मुलांना चांगला चोप देतात, हा प्रसंग सिनेमाचा टर्निंग पॉइंट ठरतो. इथंच महावीरसिंहांना कळून चुकतं, की आपल्या मुली पहिलवानकीचं रक्त घेऊनच जन्माला आल्या आहेत. त्याच क्षणी ते मुलींना कुस्तीपटू करण्याचा निर्धार करतात आणि तो मोठ्या जिद्दीनं, समाजाची पर्वा न करता तडीस नेतात.
या सगळा प्रवास नीतेशनं रंजक पद्धतीनं बांधला आहे. पूर्वार्धात अनेक ठिकाणी हास्याच्या लकेरी पेरल्या आहेत. ओंकार हे या मुलींच्या चुलतभावाचं पात्र इथं महत्त्वाचं आहे. हा ओंकार केवळ कथेचा निवेदक नाही, तर तो स्वतः या घटनाक्रमामधलं एक महत्त्वाचं पात्र आहे. या मुली सुरुवातीला त्याच्याबरोबरच कुस्तीची प्रॅक्टिस करतात. त्याच्याबरोबर पळतात, भांडतात... सख्खा भाऊ नसला, तरी हा ओंकार त्यांच्यासाठी असा छान सखाच बनून जातो. इथं येणारं 'बापू तू सेहत के लिए हानीकारक है' हे गाणंही धमाल आहे. पुढं या मुलींचे केस कापण्याचा प्रसंग असो, वा पहिल्यांदा मुलाबरोबर जाहीर कुस्ती लावण्याचा प्रसंग असो, महावीरसिंहांची जिद्द सगळीकडं प्रकर्षानं दिसत राहते. खूप कष्टानं गीताची प्रगती होते. महावीरसिंह तिला अगदी कुस्तीत तरबेज बनवतात. गीता राष्ट्रीय विजेती ठरते. यानंतर तिला पतियाळातल्या क्रीडा अकादमीत जावं लागतं....
उत्तरार्धात मोठ्या झालेल्य गीता आणि बबिताचा वेगळ्या पातळीवरचा संघर्ष आणि त्यातून कधी बिघडत, तर कधी घडत जाणारं त्यांचं पित्याबरोबरचं नातं दिग्दर्शकानं फार सुरेख मांडलंय. गीताला क्रीडा अकादमीत एक खडूस कोच (गिरीश कुलकर्णी) भेटतो. गीता पहिल्यांदाच घर सोडून बाहेर पडलेली असते. इथं तिला तिच्या तारुण्याची, स्त्रीत्वाची होणारी जाणीव नीतेशनं फार सट्ली, हळुवारपणे दाखवली आहे. यामुळे आणि इतर काही गोष्टींमुळं तिच्यात आणि वडिलांत दुरावा निर्माण होतो. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत भाग घेऊनही गीताच्या पदरी फक्त अपयश येतं. दिल्लीच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकायची संधी गीतासमोर येते, तेव्हा मात्र महावीरसिंहांना राहवत नाही. पुढे अशा काही घटना घडत जातात, की बाप-लेकींमधलं नातं आणखी घट्ट होत जातं आणि शेवट अर्थात नाट्यमय व गोड होतो.
या सगळ्या सिनेमाच्या प्रवासात जमलेली गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे कास्टिंग. मोठ्या गीताच्या भूमिकेत फातिमा साना शेख या अभिनेत्रीनं काम केलं आहे. हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. मात्र, ती गीताच वाटावी, एवढी जबरदस्त कामगिरी तिनं केली आहे. विशेषतः शेवटाकडील कुस्तीची दृश्यं तर तिनं अफलातून दिली आहेत. त्यासाठी रीतसर कुस्तीचं प्रशिक्षणही घेतलं आहे. मोठ्या बबिताची भूमिका सान्या मल्होत्रानं केली आहे. तिनंही छान काम केलं आहे. अधिक कौतुक वाटतं ते लहान गीताचं काम करणाऱ्या झायरा वासिम आणि लहान बबिताचं काम करणाऱ्या सुहानी भटनागरचं. या दोघींनी सिनेमाचा पूर्वार्ध व्यापला आहे. एकाच वेळी अत्यंत निरागस, वडिलांवर प्रेम असणाऱ्या, पण त्याच वेळी स्त्रीसुलभ गोष्टी करण्याचं स्वाभाविक आकर्षण असलेल्या या दोन तरुण मुली झायरा आणि सुहानीनं कमालीच्या कन्व्हिन्सिंगली साकारल्या आहेत. साक्षी तन्वरनं या मुलींची आई चांगली उभी केली आहे. ओंकारच्या भूमिकेतल्या अभिनेत्यानंही लक्षात राहण्यासारखं काम केलं आहे. गिरीश कुलकर्णींनी खडूस प्रशिक्षकाची भूमिका नेहमीच्या टेचात, झक्कासच केली आहे.
संगीत प्रीतमचं आहे. सिनेमात चार-पाच मोठी गाणी आहेत. ती गाणी चांगली असली, तरी लक्षात राहिली नाहीत. कथानक पुढं न्यायला त्यांचा बऱ्यापैकी उपयोग झालेला आहे.
तेव्हा हा सिनेमा सर्वांनी बघावा नक्की. आपल्या देशात एकूणच खेळ संस्कृतीचा अभाव आहे. 'शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्' या सुविचाराची आपण जेवढी विटंबना करीत असू, तेवढी अन्यत्र कुठे क्वचितच होत असेल. खेळत असा वा नसा, उत्तम शरीरसंपदा राखण्यात काहीच गैर नाही. उलट बलवान माणूस जास्त खिलाडू वृत्तीचा असतो. आपल्याला हा सिनेमा पाहून हेही शिकता आलं तर खूपच चांगलं!
एक गोष्ट मात्र सांगायला हवी. महावीरसिंह फोगाट यांनी आपल्या मुलींवर स्वतःची जिद्द लादली तर नाही ना, असं सुरुवातीला नक्कीच वाटून जातं. याचं कारण त्या मुलींना कुस्ती खेळण्याची आवड असते, असं नसतं. मात्र, एकदा वडिलांनी ठरवलंय म्हटल्यावर त्या मुली निमूटपणे सगळं करतात. अर्थात हेतू वाईट नसल्यानं हेही चालून जातं. पण तरी वडिलांनी मुलींची इच्छा विचारायला हवी होती, असं वाटतं हे खरं.
बाकी 'दंगल' ही सर्वथा 'मंगल'च आहे.
---
दर्जा - **** (चार स्टार)
---

23 Dec 2016

तैमूर - मटा लेख

दुरितांचे ‘तैमूर’ जावो... 
---------------------------

आपल्याकडं फेसबुक आणि व्हॉट्सअॅप आदी सोशल मीडिया अस्तित्वात आल्यापासून एक गोष्ट निश्चित झाली. ती म्हणजे सेलिब्रिटींविषयी घडणारी कुठलीही गोष्ट नोंद घेतल्याविना जाणार नाही, हे ठरून गेलं. संपूर्ण भारतात सेलिब्रिटींविषयी कुठंही खुट्ट वाजलं, तरी सोशल मीडियावर असंख्य बोटं कळफलकांवर नाचू लागतात. भराभरा पोस्ट पडतात, त्यावर कमेंट्स पडतात. एकूण तो दिवस साजरा होतो. परवाच्या मंगळवारीही असंच झालं. हिंदी चित्रपटसृष्टीतला एक बरा नट सैफ अली खान आणि कपूर खानदानात जन्मलेली त्याची पत्नी करिना कपूर यांनी एका पुत्राला जन्म दिला. सेलिब्रिटी दाम्पत्य असल्यानं या दोघांची प्रत्येक हालचाल माध्यमं टिपत होती. करिनानं तर ती गर्भवती झाल्यापासूनच ही गोष्ट अजिबात लपविली नव्हती आणि जाहीरपणे मिरविली होती. ती यासाठी अर्थातच कौतुकास पात्र आहे. या दोघांना मंगळवारी मुलगा झाला, ही बातमी लगेचच सगळीकडं पसरली. तोपर्यंत त्या बातमीत कुणाला फार रस वाटेना. मात्र, ज्या क्षणी या मुलाचं नाव ‘तैमूर’ असं ठेवल्याचं जाहीर झालं, त्या क्षणी कळफलकांवर नाचण्यास आतुर अनेक रिकाम्या बोटांना मोठाच आधार मिळाला.
भारतावर आक्रमण करणाऱ्या तैमूरलंगाचं नाव त्यानं कशाला ठेवायचं, हा मुख्य आक्षेप! मग सैफचं मुस्लिम असणं, त्याचा ‘हिंदू’ करिनाशी विवाह, आधीची पत्नी अमृतासिंह हीदेखील ‘हिंदू’ असणं अशा सगळ्याच गोष्टी निघाल्या. वास्तविक, आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा पूर्णपणे सैफ आणि करिना या दोघांचा अधिकार! इतरांनी त्यात लुडबूड करायचं कारण नाही. आणि राहिला प्रश्न त्यांच्या मुस्लिम-हिंदू विवाहाचा. त्याला तर ‘लव्ह जिहाद’ची पार्श्वभूमी जोडण्यापर्यंत अनेकांची मजल गेली. इथं एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे आपली हिंदी चित्रपटसृष्टी बऱ्यापैकी धर्मनिरपेक्ष आहे. अशा अर्थानं, की इथं अमुक एक व्यक्ती अमुक जातीची म्हणून त्याला काम मिळतं अशी परिस्थिती नाही. इथं गुणवत्ता वाजवून दाखवावी लागते. शिवाय या चित्रपटसृष्टीतल्या लोकांना पैशांपुढं बाकी कशाचीच फिकीर नसल्यानं ते धर्म वगैरे गोष्टींचा किती गांभीर्यानं विचार करतात किंवा त्याचं पालन करतात, हा एक प्रश्नच आहे. म्हणजे सैफ अली मुस्लिम म्हणून सेटवर पाच वेळा नमाज अदा करतो किंवा अक्षयकुमार हिंदू म्हणून रोज सेटवर सकाळ-संध्याकाळ आरती करतो, अशी चर्चा कधी ऐकिवात नाही. मुळात हे लोक अशा धर्म वगैरे गोष्टींच्या पलीकडं गेलेले असतात. धर्मविषयक त्यांच्या काही हालचाली दिसल्याच, तर त्या फक्त धंद्याशी निगडित असतात. सलमान खानचे सिनेमे ईदला प्रदर्शित होतात, यामागे केवळ प्रेक्षकांच्या धार्मिक भावना पैशांच्या रूपात वसूल करणं हीच एकमेव गोष्ट असते. खुद्द सलमानच्या घरी सगळेच सण साजरे होतात.
ज्या सैफचा विषय इथं चर्चेत आहे, त्याची आई शर्मिला टागोर ही बंगालच्या रवींद्रनाथ टागोरांच्या प्रख्यात बंगाली हिंदू ब्राह्मण घरातली आहे. सैफची बहीण सोहा अली खान हिनं ‘हिंदू’ कुणाल खेमूशी लग्न केलं आहे आणि तिला ते करू देण्यात आलं आहे, हेही विसरता कामा नये. करिनाच्या घरातलं उदाहरण घ्या. करिना कपूरच्या आजोबांचं त्या काळातल्या प्रख्यात मुस्लिम अभिनेत्रीबरोबर - अर्थात नर्गिसबरोबर - अफेअर होतं, ही गोष्ट सर्वच जाणतात. त्यांचं लग्न होऊ शकलं नाही, ही बाब अलाहिदा. गंमत म्हणजे नर्गिसनं नंतर लग्न केलं तेही ‘हिंदू’ सुनील दत्तबरोबर आणि जन्मलेल्या मुलाचं नावही संजय असं ‘हिंदू’च ठेवलं. (एवढं छान हिंदू नाव असलेल्या या मुलानं नंतर काय पराक्रम गाजवले, हे आपल्याला माहिती आहेच.) याशिवाय प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट हेही मुस्लिम आई (शिरीन महंमद अली) आणि हिंदू पित्याचे (नानाभाई भट) अपत्य आहेत. (त्यांची आई शिरीन महंमद अली ही तमिळ ब्राह्मण रामशेषाद्री अय्यंगार आणि लखनौच्या एका मुस्लिम महिलेची मुलगी होती, ते वेगळंच!) याखेरीज अयशस्वी प्रेम-प्रकरणं असलेल्या किती तरी हिंदू-मुस्लिम जोड्या सांगता येतील. त्यात धर्मेंद्र-मीनाकुमारीपासून ते गुरुदत्त-वहिदापर्यंत अनेक नावे सांगता येतील. हिंदू पत्नीला तिचा धर्म पाळण्याची मुभा देणारे शाहरुख आणि आमिर यांचाही उल्लेख करायलाच पाहिजे. सांगायचा मुद्दा असा, की या फिल्म इंडस्ट्रीत लोक एखादा माणूस हिंदू वा मुस्लिम आहे, म्हणून त्याच्यावर प्रेम करत नाही. पैसा नावाचा त्याहूनही अधिक ताकदवान ड्रायव्हिंग फोर्स त्यामागं असतो. किंवा मग क्वचित वेगळेच खरेखरे प्रेमाचे बंध असतातही! नाकारण्यात अर्थ नाही. 
सैफ आणि करिना या दाम्पत्याकडं पाहताना ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. सैफचं घराणं नवाबाचं. त्याचे वडील मन्सूर अली खान पतौडी भारतीय क्रिकेट संघाचे लोकप्रिय कर्णधार होते. पतौडी या हरियाणातील तत्कालीन संस्थानाचे हे नवाब. सैफ अली खानचे राजकीय आणि धार्मिक विचार काय आहेत, याची कल्पना नाही. मात्र, देशभरातील तमाम मुस्लिम संस्थानिकांप्रमाणेच त्याचे वाडवडील काँग्रेसचे पाठीराखे होते आणि आहेत, हे निश्चित. सेलिब्रिटी किंवा संस्थानिक मंडळींना तसेही फार तीव्र डाव्या किंवा उजव्या राजकीय विचारांना धरून चालता येत नाही. त्यांना जनतेला आवडेल असाच मध्यममार्ग निवडावा लागतो. असं करणं हेच ‘पॉलिटिकली करेक्ट’पण असतं. त्यामुळंच आपल्या देशातले बहुतांश सेलिब्रिटी (काही अपवाद करता) फार जहाल टोकाचे राजकीय वा धार्मिक विचार पसरवताना दिसत नाहीत. या मुद्द्यावर सैफ जरा वेगळा निघाला, हे निश्चित. त्यानं ठेवलेलं नाव मुस्लिम आक्रमकाचं आहे, हे त्याला माहिती नसेल असं वाटत नाही. तरीही त्यानं हे नाव ठेवलं हे नक्कीच काहीसं खोडसाळपणाचं वाटू शकतं, हे मान्य आहे. पण ते काहीही असलं, तरी स्वतःच्या मुलाचं नाव काय ठेवायचं हा सर्वस्वी त्याचा अधिकार आहे, यात वाद नाही.
सैफनं त्याच्या मुलाचं नाव मुस्लिम आक्रमकाचं ठेवलं, यापेक्षा तो या मुलाला कसं वाढवतो, इथल्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही व्यवस्थेत त्याला वाढू देऊन या समाजाचा, या व्यवस्थेचा आदर करायला शिकवतो की नाही, हे अधिक महत्त्वाचं आहे. एक माणूस म्हणून त्याला सर्वांशी माणुसकीनं, प्रेमानं वागायला शिकवतो की नाही, हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी ‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअरनं म्हटलं आहे ते खरंच आहे. चिमुकल्या तैमूरला मुस्लिम वा हिंदू होण्यापेक्षा चांगला भारतीय होण्यासाठी शुभेच्छा देऊ या.
--- 
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती - २३ डिसेंबर २०१६)

19 Dec 2016

कॉफीशॉप पहिला वर्धापनदिन



कुरकुरीत कॉफीशॉपचा खुसखुशीत, फर्मास अनुभव
-----------------------------------------------------------------

मंजूषा आमडेकर

श्रीपादचं कॉफीशॉपपुस्तक बघता बघता एक वर्षाचं झालं. पण त्याला मिळालेला प्रतिसाद मात्र अत्यंत प्रगल्भ होता. पुस्तक वाचून मी त्याला आवडल्याचं कळवलंही होतं, पण तरीही मला माझीच प्रतिक्रिया अपुरी वाटली. या पुस्तकाबद्दल काहीतरी लिहायचा मोह मला टाळता आला नाही. खरं सांगायचं, तर गेली कित्येक वर्षं लेखनाच्या क्षेत्रात मी काम करते आहे, अन् तरीही मला श्रीपादच्या लेखनशैलीचं खूपच कौतुक वाटतं. कारण, इतक्या कमी शब्दांत, कमी वेळात, खूप काही सांगणं, आणि तेही खमंग, चुरचुरीत शब्दांत... मेरे बस की बात नहीं है. विशेषत: त्याची शीर्षकं! मला ती अतिशय आवडतात. ‘‘महागाईचा वळू किंवा आणिपाणी’’, ‘दिवाने आम’’ असो, की ‘‘वीसवात्मके देवे’; त्याला ती कशी सुचतात, हा प्रश्न विचारणंच व्यर्थ; कारण, कवीला कविता कशा सुचतात, या प्रश्नाला उत्तर देणं अवघड असतं, तसंच याही प्रश्नाचं उत्तर अवघड आहे. तो केवळ आणि केवळ त्याच्यातल्या प्रतिभेचा मामला आहे.
आम्हा स्त्रियांना रोज उठून आज कुठली भाजी करावी, हा यक्षप्रश्न सोडवताना भलताच वात येत असतो; इथे जे वर्तमानपत्र रोज लाखो लोक वाचणार असतात, अन् तेही वेगवेगळ्या वयोगटांचे, सामाजिक थरांतले, निरनिराळ्या आवडी-निवडी असणारे अनंत प्रकारचे लोक... त्या सर्वांना एकसाथ अपील होऊ शकेल, असा विषय इतक्या झटपट, उत्स्फूर्तपणे सुचतो तरी कसा या माणसाला... खरंच नवल आहे! बरं, महिन्याभरात देतो हं लेख, अशी सवलत मागायचीही सोय नाही. जे काही लिहायचं ते आत्ता, या क्षणी! तेही समर्पक, अचूक, कुणाच्याही जिव्हारी न लागणारं, आणि तरीही, नेमकं वर्मावर बोट ठेवणारं, गालातल्या गालात हसत आयुष्यातली विसंगती सांगून जाणारं... ही करामत श्रीपादला अगदी सहजपणानं जमून गेलेली आहे. ही शैली त्यानं कमावलेली आहे, असं कॉफीशॉपपुस्तक वाचताना कुठेही वाटत नाही.
या पुस्तकाची आणखी एक गंमत म्हणजे, तुम्ही ते सलग नाही वाचलंत तरी चालतं. प्रत्येक लेख वेगळा, आपल्या परीनं संपूर्णच असतो. लिंक तुटायचा प्रश्न नाही, संदर्भ लागायची समस्या नाही. कधीही, कुठलंही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा, हवं तिथे थांबा. जितकं वाचून झालं असेल त्यातून मिळायचा तो आनंद मिळाल्याविना राहणारच नाही. प्रवासात वाचा, एकटे असताना वाचा, कुटुंबासोबत चहा पिताना कुरकुरीत खारी, चकली चावताना वाचा, कुणाची तरी वाट पाहताना वाचा, बसस्टॉप, रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, ट्रॅफिक जॅम... किती तरी क्षण सापडतील हे पुस्तक वाचायसाठी. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यातला प्रत्येक लेख ज्या संदर्भात लिहिला गेलाय, त्याची पूर्वपीठिका आपल्याला माहीत नसली, तरीही त्यातली गंमत अनुभवण्यात अडचण येत नाही.
याला कारण म्हणजे, लेखनाची खुमासदार शैली. जागोजागी मुद्दामहून न पेरता सहज जमलेल्या कोट्या, नर्मविनोद आणि झटकन एखाद्या गंभीर, अस्वस्थ करणाऱ्या विसंगतीला जाता जाता केलेला स्पर्श. बहुतेकशा विनोदी लेखकांचं हे अगदी खास, हुकमी असं शक्तिस्थान असतं. श्रीपादला हे निश्चितपणानं जन्मत:च अवगत आहे, असं मला नक्की वाटतं. कारण लिहायला जमतं, म्हणून विनोदी लिहिता येईलच असं नाही, हे मी अनुभवानं सांगू शकते. विनोद लिहायला खास अशी प्रतिभा असावी लागते. ती माणसाच्या निरीक्षणशक्तीवर, विसंगती टिपण्याच्या क्षमतेवर, शब्दभांडारावर, विनोद उघडपणे बोलून दाखवण्याच्या साहसी वृत्तीवर, अफाट वाचनावर, मनुष्यसंग्रहावर, सजग अशा सामान्यज्ञानावर, ताजेपणानं जगत राहणाऱ्या, चहा-कॉफीसारख्या तरतरी आणणाऱ्या तरोताजा वृत्तीवर, कुणाला न दुखावता काही तरी महत्त्वाचं, कदाचित टोचत असणारं, घडू नये ते घडत असणारं काही तरी, हळूच बोट ठेवून सांगता येण्याचं कौशल्य असण्यावर अवलंबून असतं. हे सगळे पैलू श्रीपादमध्ये आहेत, म्हणूनच त्याला अशा प्रकारचं हलकं-फुलकं आणि तरीही आशयघन लेखन करायला जमलेलं आहे.
कॉफीशॉपमधल्या विनोदाच्याही अनंतरंगी छटा आहेत. हसरा दसरा,दिवाळी,धंदे का टाइममधल्या मोरूचं टिपिकल मध्यमवर्गीय वर्णन वाचताना गंगाधर गाडगीळांच्या बंडू आणि स्नेहलताची आठवण होते. बांधले मी बांधलेमध्ये हळूच चिमटा काढणारा उपहास आहे. हॅप्पी पाडवासारख्या लेखांमधल्या कोट्या वाचताना मजा येते. रंगीला रेकिंवा पेर्ते होऊ यात अलगद, सहजपणानं येणारं आयुष्याचं साधं-सोपं तत्त्वज्ञान हळूच अंतर्मुख करून जातं. ‘‘महागाईचा वळूलेखातला हापूस आंबे आपली पायरीओळखून खावेत,’ हा विनोद मनापासून दाद घेऊन जातो. ओलेते दिवसलिहिताना मात्र श्रीपामधला प्रणयरम्य, नवतरुण कॉलेजकुमार बोलतोय की काय असं वाटतं. दिवाने आम’’मध्ये तर धमालच उडवून दिली आहे. यातल्या कोट्या अत्यंत चपखल जमलेल्या आहेत. एकेक वाक्य वाचून त्यातला आमरसचाखून पाहावा असेच आहे. बिहाराष्ट्रतले चिमटे मुळीच बोचत नाहीत, हसूच येत राहतं आणि त्याच क्षणी ठरवलं, आता वाजपेयींचा उल्लेखही यापुढे नुसता अटल वाजपेयीअसाच करायचा!हे शेवटचं वाक्य मनसोक्त हसवतं.
गेले ते दिवसआणि ‘‘गे मायभूहे लेख भलतेच मिश्कील झाले आहेत. यातले विषय ‘हट के’ आहेत, प्रौढ आहेत, श्रीपादनं दिलेली शीर्षकं द्व्यर्थी असूनही जराही अश्लीलतेकडे न झुकणारी अन् चपखल आहेत. श्रीपादच्या सभ्य विनोदाला या विषयाचंही वावडं नाही, हाही एक जगण्याचा पैलूच आहे असं सहज सांगणारे हे लेख गंमत आणतात.
क्या कूलहैं हमकाय किंवा चंद्र माझाकाय, अशा लेखांमधून पुणेरी पुणेकराला जाता जाता कोपरखळी मारताना श्रीपादनं दाखवलेल्या खोडकर कौशल्याला जातिवंत पुणेकरही दाद दिल्यावाचून राहणार नाही. ‘‘गॅस : एक देणेहा लेख वाचताना तर हसून हसून मुरकुंडी वळते. पुणेरी, कोकणी, वऱ्हाडी, बम्बईय्या... कुठल्याही बोलीची गोफण श्रीपाद सरसर घुमवत असतो. हुकी हुकी सी जिंदगी,युवराजांचा विजय असोआणि आई ग्ग!सारख्या लेखात खेळ आणि राजकारण आणि या दोन्हीतल्या खंडोबाचा अचूक वेध घेण्यात आला आहे. नेमक्या लक्ष्यावर शरसंधानकरण्यातलं श्रीपादचं कसब टाळी घेऊन जातं. गाढवीसंकल्पखुसखुशीत टपली मारतो.
३६५ - (/) = मध्ये केलेला पत्नी किंवा स्त्रीचा आठ मार्चअसा उल्लेख मजेशीर वाटतो आणि शेवटी, वर्षातले ३६५ दिवस पुरुष दिनच साजरा केला जात असतो, या पुरुषप्रधान संस्कृतीतल्या कटु सत्यावर अचूक बोट ठेवलेलं आहे. ‘‘आठ मार्चच्या डोळ्यांतलं प्रेम पाहून आमचे ओले डोळे म्हणाले... चिअर्स मॅन’!’ ही शेवटची ओळ लिहून श्रीपादनं तमाम स्त्रीवर्गाची मनं कायमची जिंकून घेतलेली आहेत, हे मी पैजेवर सांगू शकते.
लतावरच्या कवितेत मात्र कुणीही काव्यगुण शोधायचा अट्टाहास करू नये; त्यामागचा भाव पाहावा, तो आपल्या सर्वांच्याच मनातला आहे, एवढे नक्की!
शेवटचे दोन लेख, प्र. के. अत्रे आणि द. मा. मिरासदार यांची क्षमा मागून श्रीपादनं लिहिले आहेत खरे! पण माझी खात्री आहे, की श्री. मिरासदारांनी तर श्रीपादला दाद दिलीच असेल, पण अत्रे आणि पु. ल.ही आत्ता हयात असते तर त्यांनी श्रीपादच्या पाठीवर जोरदार थाप दिली असती. आपण खरंच भाग्यवान आहोत मित्रांनो, की हा असा कसदार विनोदी लेखनाचा वारसा मागे ठेवून जाणारे महान लेखकही आपल्याला लाभले आणि त्या वारशावर हक्क दाखवू शकतील, असे श्रीपादसारखे वारसदारही आपल्याला लाभले आहेत. कॉफीशॉप वाचल्यावर माझी खात्री पटली आहे, की पृथ्वीच्या अंतापर्यंत महाराष्ट्राच्या आकाशावर मराठीभाषेचा तारा दिमाखात तळपत राहीलच राहील!
---

12 Dec 2016

कॉमेडी कट्टा दिवाळी अंक लेख

नस्ती 'कटकट'
--------------

पुरुषाच्या जन्माला येण्याचे जसे खास फायदे आहेत, तसेच अर्थातच तोटेही आहेत. दाढी, मिशा आणि डोईवर वाढणाऱ्या केशसंभाराची निगा राहणे हे काम आयुष्यभर करत राहावे लागते. डोईवरल्या केशसंभाराचा भार पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या पारड्यात अंमळ अधिक असायचा. हल्ली तसं काही राहिलेलं नाही. मात्र, सांभाळण्याचा जाच दोघांनाही आहेच. त्यामुळे डोईवरले केस सोडून देऊ. मात्र, दाढी आणि मिशा आयुष्यभर पुरतात. डोक्यावर जसं टक्कल पडून त्या जाचातून मुक्तता होते, तसं दाढीचं का टक्कल पडत नाही, हा बालबुद्धीचा असला, तरी फार महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाय तो 'बाल'बुद्धीचाही प्रश्न आहे! केवळ रोज दाढी करावी लागते आणि महिन्यातून किमान एकदा 'बाल'दिन साजरा करावा लागतो, या धास्तीने अनेकांनी संन्यास घेतला आहे, असे हिमालयातील गुहा आदी ठिकाणी राहणाऱ्या साधूमंडळींशी चर्चा केली असता, सहज समजून येईल. हवं तर स्वतः जाऊन खात्री करून या. 
रोजच्या रोज केलेली गुळगुळीत दाढी हे सामान्य संसारी माणसाचं हृदयद्रावक प्रतीक आहे. विशेषतः नोकरी करणाऱ्या माणसाला हे कार्य रोजच्या रोज सिद्धीस न्यावं लागतं. दाढी करता येणं ही एक साधना आहे. संसारी माणसांना ती सहज साध्य होत नाही. त्यासाठी अनेक वर्षं सराइतासारखा फिरणारा हात लागतो. आजीच्या हातच्या पुरणपोळीची सर आईच्या हाताला येत नाही आणि आईच्या हातच्या पुरणपोळीची चव बायकोच्या हाताला येत नाही, तीच स्थिती इथं आहे. चाळिशीत तयार झालेला हात अर्थातच विशीत नसतो. अस्मादिकांना प्रथम ओठांवर आणि मग हनुवटीवर लव फुटली, तेव्हा 'लव 86' नामक सिनेमा जोरात होता. चिकण्याचुपड्या नायकांची चलती होती. त्या प्रभावामुळं की काय, अस्मादिकांनी प्रथमपासूनच मिशीला चाट दिली. पहिली दाढी ही पहिल्या चुंबनाएवढीच रमणीय आठवण असते. बहुतेकदा ही दीक्षा एखाद्या परममित्राकडूनच मिळते. काहींना वडील किंवा मोठा भाऊ किंवा काका, मामा यांच्याकडूनही मिळते. सुदैवानं आमच्या काळापर्यंत यूज अँड थ्रो रेझर आले होते. त्यामुळं पहिला प्रयोग त्या रेझरद्वारेच झाला. होस्टेलवरच्या खोलीतला तो चिमुरडा आरसा, त्यात जेमतेम दिसणारं आपलं मुखकमल, आंघोळीच्याच मगातून आणलेलं किंचित कोमट पाणी, मग त्या शेव्हिंग क्रीमचा फुगत जाणारा फेस आणि त्यात हळूहळू माखला जाणारा आपला मुखचंद्रमा... अहाहा... काय ते अविस्मरणीय दृश्य! त्यात आपल्याला ही दीक्षा देणारा मित्र आपल्याला मार्गदर्शन करतोय की आपलं अवसान घालवतोय अशा काही तरी अगम्य सूचना देत असतो. मग अगदी अलगद गालावरून फिरणारा तो रेझर, रेझरच्या रुंदीएवढा गालावर उठलेला स्वच्छ पट्टा, तेथील केस निघून गेल्याचं पाहून झालेला अपरिमित आनंद... वाहव्वा... मग सावकाश सगळा फेस उतरवणं, पुन्हा एकदा दाढी घोटणं आणि पुन्हा हाच प्रयोग करून दाढी अध्यायाची सुफळ समाप्ती करणं... तोंड धुतल्यावर आरशात दिसणारा आपला वेगळाच चेहरा आणि तो पाहून ओठांच्या कोपऱ्यात फुटलेलं नकळत हसू... त्या आठवणी अगदीच गुळगुळीत आणि सुगंधी आहेत. दुर्दैवानं पहिल्या चुंबनाप्रमाणंच पहिल्या दाढीचा अनुभव हा पहिल्या दाढीपुरताच अविस्मरणीय वगैरे ठरतो. बाकी कुठल्याही गोष्टीचं रुटीन झालं, की त्यातली मजा संपलीच म्हणून समजा.
पहिल्यांदा चेहऱ्यावर आलेली लव बरेच दिवस टिकते. पण एकदा का दाढी केली, की मग रोज भराभर तिथं केस उगवायला लागतात. '...की तोडिला तरु, फुटे आणखी भराने' हेच तत्त्व! मग आयुष्यभर हे रोजचं गिरमिट मागं लागतं. म्हणूनच काही धोरणी तरुण पहिली दाढी होता होईल तो लांबवतात. काही काही जणांनी तर विसाव्या वर्षापर्यंतदेखील दाढीच्या ब्रशला किंवा रेझरला हात लावलेला नसतो. पुष्कळदा ही अशी अर्धवट फुटलेली दाढी छानच दिसते. तरुणाईच्या बेफिकीर, बेधुंद आणि बेदरकार वागण्याचं जणू ती प्रतीकच असते. शिवाय त्या वयात एवढी महत्त्वाची कामं असतात, की त्यात दाढीबिढी करायला वेळ देणं म्हणजे वेडेपणाच! मात्र, चुकूनमाकून एखाद्याची मजल गर्लफ्रेंडला डेटला घेऊन जाण्यापर्यंत गेली, तर त्याला अचानक गुळगुळीत दाढीचं महत्त्व पटतंच. मग तो रोजच्या रोज दाढी करायला लागून एकदम 'संसारी'च होतो. 
आणि प्रत्यक्ष संसारात पडल्यावर तर काय विचारता! दाढीचा सोहळा अगदी सुरुवातीला मासिक, मग पाक्षिक, मग साप्ताहिक असा होत होत लग्न होईतो दैनिक होऊन जातो. नोकरदार माणसाला तर पर्यायच नसतो. रोजच्या रोज गुळगुळीत दाढी करून, फॉर्मल कपडे, शूज वगैरे घालूनच त्याला ऑफिसात जावं लागतं. मग सुरू होते दाढीची लढाई! इतिहासात पानिपतची लढाई, खर्ड्याची लढाई किंवा प्लासीची लढाई आदी लढाया प्रसिद्ध आहेत. पण रोज घराघरांत चालणाऱ्या या दाढीच्या लढाईचं नाव इतिहासात का नाही? आम्ही शेकडो बिनीचे सरदार या लढाईत घायाळ होत असतो. (अर्थात, नंतर छान इ. दिसून कुणाला तरी घायाळ करू, हा एक गोड गैरसमज त्यामध्ये दडलेला असतो, तो भाग वेगळा!) वास्तविक ही लढाई म्हणजे एक प्रकारे स्वतःशीच लढाई. मोठमोठे आध्यात्मिक गुरू 'फाइट विदीन', 'स्वतःशीच लढा' वगैरे तत्त्वज्ञान सांगत असतात. पण त्यांना बेसिनच्या आरशासमोर उभं राहून, केवळ बनियन आणि खाली गुंडाळलेला टॉवेल अशा तुटपुंज्या वस्त्रांनिशी स्वतःच्याच प्रतिमेकडे निरखून पाहत पाहत चाललेली ही घनघोर लढाई का बरे दिसत नाही? ही स्वतःशीच चाललेली लढाई नव्हे काय? शस्त्रही आमच्याच हाती, ते ज्यावर चालवावयाचे तो देहही आमचाच... पण कुरुक्षेत्रावर अडचणीत सापडलेल्या पार्थाप्रमाणे आम्हाला 'आता शस्त्र कुणावर चालवू' वगैरे कुठलेही प्रश्न पडत नाहीत. (अर्जुन रोज दाढी करीत होता काय? असता, तर त्यास हे असले प्रश्न पडले नसते.) 'न धरी शस्त्र करी मी' असला यादवी बाणा इथं उपयोगाचा नसतो; अन्यथा ऑफिसात महाभारत हे ठरलेलं! त्यामुळं रोज इथं सकाळी समरभूमी असते. यात अर्धांग नावाचं एक महत्त्वाचं पात्र मोलाची भूमिका बजावत असतं. आपल्या ब्रशपासून ते चहा घेण्यापर्यंत संथगतीनं चाललेल्या हालचालींचं रूपांतर विजेच्या चपळाईनं होणाऱ्या हालचालींत करण्याचं सामर्थ्य तिच्या 'अहो, आता आवरता, का...' या एका वाक्यात दडलेलं असतं. या वाक्याची प्रत प्रत्येक घरानुसार निराळी असू शकते. मात्र, त्याचा अंतिम परिणाम हा दाढीधारी इसमाचं दाढी करण्याचं कार्य वायुवेगानं पार पाडण्यातच होतो.
अशी किती संकटं, किती आव्हानं! रविवारची सकाळ असते. छान लोळत पडावंसं वाटतं. आंघोळ आदी तिरस्करणीय गोष्टींची आठवणही आपण पाल झटकल्यासारखी मनातून काढून टाकत असतो. दाढीलाही फाटा द्यावा, असा तीव्र विचार मनात येतो आणि त्याच वेळी हनुवटीवर फुटलेल्या पांढऱ्या केसाचा एक अंश आपल्याला सहज दिसतो. हाच तो क्षण, हीच ती वेळ! आपण पुन्हा एकदा विजेच्या चपळाईनं हत्यार चालवून वाढत्या वयाची जाणीव करून देणारा तो दुष्ट पुरावा क्षणार्धात नष्ट करतो. मग आफ्टरशेव्ह लोशन लावून मस्त पावडर-बिवडर लावल्यावर मग पुन्हा आपण आरशात पाहतो तेव्हा कुठं हुश्श वाटतं. केवढा धोरणीपणा... केवढी मेहनत... परंतु पुरुषांच्या घरगुती कर्तृत्वाला जगात मान नाही हेच खरे! काही काही भाग्यवंतांनी दाढी राखून रोजच्या रोज करायच्या या लढाईवर विजय मिळविलेला असतो. पण त्यांचीही एक वेगळीच लढाई सुरू असते. ही दाढी राखणं म्हणजं अक्षरशः 'राखणं' असतं. ती नीट ट्रिम करणं, कलर करणं या भानगडींपासून त्यांचीही सुटका नसतेच. त्यामुळंच पुरुषांच्या या दाढीच्या लढाईला इतिहासात महत्त्वाचं स्थान मिळायला हवं.
मिशी हे एक याच अध्यायातलं महत्त्वाचं प्रकरण आहे. अक्कडबाज, तलवारकट, हिटलर, चॅप्लिन, फ्रेंच असे मिशांचे आणि मिशीवाल्यांचे अगणित प्रकार आहेत. मिशी आणि मर्दानगी यांचं एक उगीचच नातं आहे. मानलेल्या बहीण-भावाच्या नात्यासारखंच हे नातं तकलादू आणि खोटं म्हणायला हवं. कारण वास्तविक असं काही नसतं. पण काही गैरसमज असतात, तसंच हे! भरल्या मिशीला पीळ देत मर्दानगी दाखवण्याचे निवड आता आखाड्यातसुद्धा राहिलेले नाहीत, या चालू वर्तमानकाळाचे आपण सर्व जण 'साक्षी' आहोत. तेव्हा मिशीला पीळ न दिलेलाच बरा! 
या दैनंदिन दाढी लढाईसोबत आणखी एक मासिक कटकट पुरुषांच्या मागे लागलेली असते, ती म्हणजे कटिंग. महिन्यातील एखादा रविवार असा घातवाराच्या रूपानं उगवतो आणि आपण अक्षरशः पाय ओढत त्या केशकर्तनगृही जाऊन पोचतो. तिथं आपल्यासारखीच शत्रूच्या हाती मान द्यायला असलेल्या अभागी पुरुषांची लाइन लागलेली असते. कुणी पेपर वाचतं, कुणी एकमेकांत गप्पा मारतं, तर कुणी मोबाइलवर चॅट करीत बसतं. आपला नंबर शक्यतो लवकर येऊ नये आणि उशीर झाला, या कारणाखाली पळ काढता यावा, अशीच आपली मनोमन इच्छा असते. किमान एक आठवडा तरी हे संकट पुढं ढकलता येईल, तर बरं, असं वाटत असतं. पण नियती नेहमीच शत्रूला साथ देते. त्याप्रमाणे 'चला काका,' ही आरोळी कानी येते. आपण इकडं-तिकडं पाहू लागतो, पण हे संबोधन आपल्यालाच आहे, हे आपल्या कमी झालेल्या डोईवरच्या भाराकडं पाहून समजून घ्यायचं असतं. खरं तर अस्मादिकांच्या डोईवर आता केवळ नावालाच काही ऐवज अस्तित्व राखून आहे. अशा वेळी केशकर्तनकार काकांनी आम्हाला निम्म्या किमतीत कापणी करून द्यायला हवी. पण येथे त्यांची व्यावसायिक नीतिमत्ता आड येत असावी. प्रत्येकाला समान काम, समान दाम या तत्त्वानं आपल्यालाही फुल्ल चार्ज बसतो. त्या परिसरात सर्वत्र केसच केस पडलेले असतात. जगात केसांची एवढी विपुल संख्या असताना, परमेश्वरानं आपल्याच पदरी निम्मं माप का घातलं, या विचारानं आधीच खिन्नता आलेली असते. त्यात कर्तनकाकांना 'जले पें नमक छिडना' या वाक्प्रचाराची अंमलबजावणी करायची हौस येते. आपल्या डोक्याकडं तुच्छ कटाक्ष टाकून, 'काय हो, काहीच राहिलं नाही की...' अशा अर्थाचं काही तरी वाक्य बोलल्याशिवाय कात्रीची टोकं उघडणारच नाहीत. अशा वेळी आपणही 'मग आता निम्मेच पैसे घ्या माझे' असा काही तरी विनोद करून, आपल्याही अंगी मुठेचंच पाणी आहे, हे दाखवायचं असतं. ते कर्तव्य आम्ही दर वेळी नित्यनियमाने करतो. आपल्या या विधानावर कर्तनकाका बोलत काहीच नाहीत. मात्र, क्षणोक्षणी आपली मुंडी पिरगाळून, इकडं-तिकडं सटासटा वळवून, खाली घालायला लावून पुढील काही मिनिटांत सर्व अपमानाचं उट्टं काढतात. खरोखर, एवढी मान खाली घालायची वेळ तर अर्धांगासमोरही येत नाही! कटिंग करता करता, गल्लीतल्या नगरसेवकाच्या कर्तृत्वापासून ते ओबामाच्या नाटो धोरणाविषयी आणि फ्लॅटच्या वाढत्या किमतींपासून ते कमी पावसामुळं घटलेल्या डाळ उत्पादनापर्यंत सर्व विषयांवर कर्तनकाका मुक्त चिंतन करीत राहतात. आपण ते खालच्या मानेनं ऐकायचं असतं. जरा मान वर केली, की कर्तनकाका ती पुन्हा खाली ढकलतात आणि वर 'हलू नका ओ, कातरी लागंल,' असंही ठणकावतात. आपल्या आयुष्यात ऐन प्रभातसमयी पातलेली ही 'कातरवेळ' कधी एकदा संपते, असं होऊन जातं. एकदाची कटिंग संपते. पैसे देण्याआधी काखा वर करायचा कार्यक्रम होतो. (वास्तविक हा कार्यक्रम पैसे देताना करायची आपली इच्छा असते. पण ते कधीच जमणार नाही.) गुळगुळीत काखा आणि हुळहुळीत मान घेऊन आपण 'सेंट्रल जेल' अशी पाटी लिहिलेल्या मोठ्ठ्या दारातून सिनेमाचा नायक कसा बाहेर येतो, तसे बाहेर येतो आणि 'ही सृष्टी मजला पुन्हा दाखविल्याबद्दल, हे आकाशातल्या बापा, तुझे आभार,' अशा नजरेनं सभोवताली पाहून घेतो. मेन्स पार्लर किंवा युनिसेक्स पार्लर आदी कितीही उच्च दर्जाचं कटिंगचं दुकान असलं, तरी मान व खांदा या परिसरात सदैव टोचणारे केस न पाडणारा कर्तनवीर आम्हाला अद्याप भेटायचा आहे. ही आमच्या आयुष्यात कायमच टोचून राहिलेली एक सल आहे, म्हणा ना! कधी घरी येऊन शॉवर घेतो, असं होऊन जातं. बऱ्याचदा ही आंघोळ या मासिक कृत्याच्या नावानंच केली जाते, हे वेगळं सांगायला नकोच.
अशी ही आम्हा पुरुषांच्या आयुष्यात जन्मभरासाठी लागलेल्या कटकटीची कहाणी तुम्ही कोणतीही कटकट न करता, वाचलीत याबद्दल तुम्हाला एक कटिंग चहा... भेटा, कटकट न करता!
---
(पूर्वप्रसिद्धी - कॉमेडी कट्टा दिवाळी अंक २०१६)

11 Dec 2016

जयललिता लेख

'अम्मा' नावाचं गारूड
--------------------

तमिळनाडूच्या लोकप्रिय मुख्यमंत्री - पुरुच्ची थलैवी (महान नेत्या) - जे. जयललिता यांच्या निधनानं तमिळनाडूच्याच नव्हे, तर भारताच्या राजकीय पटलावरील एक महत्त्वाचं आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्व अस्तंगत झालं आहे. जयललिता तमिळी जनतेसाठी 'अम्मा' (आई) होत्या. एक अतिशय लोकप्रिय अभिनेत्री ते जनतेची आई हा त्यांचा प्रवास मोठा रंजक आणि अनेकांच्या प्रतिभेला वाव देणारा आहे. जयललितांचं आयुष्य वादळी अन् नाट्यपूर्ण होतं हे खरंच; पण ज्या तमिळनाडूच्या राजकारणात त्यांनी एवढी वर्षं राज्य केलं, त्या तमिळनाडूच्या तमिळी सिनेमांप्रमाणंच त्यात आयुष्याचे सर्व रंग गडद छटेत रंगविलेले स्पष्ट दिसत होते. जयललिता वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी (म्हणजे तशा अकालीच) गेल्यानंतर आता त्यांच्या लोकप्रियतेची त्यांच्या वागण्या-बोलण्याची, त्यांच्या स्वभावाची सगळीकडं कारणमीमांसा केली जात आहे. विविध माध्यमांतून त्यांचा वेध घेतला जात आहे. जयललितांचं स्त्री असणं, त्यातही एक लोकप्रिय अभिनेत्री असणं आणि नंतर त्यांनी स्वतःचं रूपांतर 'अम्मा'मध्ये (आई) करणं या सगळ्यांचीही वेगळ्या पातळीवर चर्चा होताना दिसते आहे. पण जयललिता यांना एवढं लोकप्रिय होण्यासाठी नक्की काय गमवावं लागलं असेल? भारतीय राजकारणातलं प्रतीकांचं माहात्म्य आणि एखाद्याचं व्यक्तिस्वातंत्र्य या लढाईत दर वेळी प्रतीकांचाच विजय का होत असेल?
तमिळनाडूच्या राजकारणात, किंवा एकूणच भारताच्या राजकारणात यशस्वी व्हायचं असेल, तर एका स्त्रीनं नक्की काय केलं पाहिजे, याची जाणीव जयललितांना काही गोष्टींमुळं निश्चितच झाली असेल. राजकारणात येण्यापूर्वी जयललिता अभिनेत्री होत्या. नुसत्या अभिनेत्री नव्हे, तर चांगल्या लोकप्रिय आणि पहिल्या क्रमांकाचं मानधन घेणाऱ्या अभिनेत्री होत्या. आपल्या देशात प्रत्येक व्यवसायासाठी, प्रत्येक पेशासाठी लोकांच्या मनात स्वतंत्र कप्पे असतात. कुठला व्यवसाय कुणी करावा किंवा कुठल्या पेशात कुणी दिसावं याचे जनतेच्या मनात काही ठोकताळे पक्के असतात. जयललिता अभिनेत्री होत्या आणि त्या क्षेत्रात त्यांचं बरं चाललं होतं. खरं तर त्यांना अभिनेत्रीही व्हायचं नव्हतं. दहावीत राज्यात पहिल्या आलेल्या मुलीनं अभिनय क्षेत्रात जायचं काहीच कारण नव्हतं; पण जयललितांचं आयुष्य एवढं सरळ असणारच नव्हतं. आईमुळं त्या अभिनय क्षेत्रात आल्या. एकदा त्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर मात्र त्यांनी तेथे अव्वल स्थान मिळवलं. एखादी नटी कष्टानं मोठं यश मिळवते, तेव्हा तिचं श्रेय तिला देण्यातही आपला समाज सदैव कुचराई करताना दिसतो. मग नट्यांना सिनेमात करावी लागणारी कथित तडजोड ते एखाद्या सुपरस्टारची मर्जी असणं इथपर्यंत सर्व गोष्टींना तिच्या यशाचं भागीदार केलं जातं. हे सगळं खरं आहे असं मानलं, तरी या गोष्टी करणारी प्रत्येक नटी मोठी होत नसते, हेही लक्षात घेतलं पाहिजे. तेव्हा जयललिता यांना काही गोष्टी अनुकूल घडल्या असं मानलं, तरी त्यापुढची वीस वर्षं या मोहमयी सृष्टीत अव्वल दर्जा टिकवून ठेवणं हे खचितच सोपं काम नाही. ते त्यांनी केलं, याचं कारण मुळात त्या हुशार होत्या. जात्याच अंगी असलेली बुद्धिमत्ता आणि तमिळी जनतेसाठी मोठा गुण ठरावा असं हिंदी-इंग्रजीवर असलेलं प्रभुत्व यामुळं जयललितांचं स्थान इतर नट्यांपेक्षा निश्चितच उजवं ठरत राहिलं. एम. जी. रामचंद्रन यांचा त्यांच्या आयुष्यावर असलेला प्रभाव त्यांनीही कधी नाकारला नाही. त्यांच्यामुळंच त्या राजकारणात आल्या. पण एमजीआर यांच्या निधनानंतर जलललितांची खरी कसोटी लागली...
एखाद्या महिलेनं राजकारणात नेतृत्व करावं याचं उदाहरण आजूबाजूला नव्हतंच अशी काही तेव्हा देशात परिस्थिती नव्हती. पंतप्रधान इंदिरा गांधी हे याचं सर्वांत मोठं आणि ठळक उदाहरण जयललितांच्या समोर होतं. अर्थात इंदिरा गांधींची पार्श्वभूमी आणि त्यांचं पंतप्रधान होणं या देशात अगदी सहज, स्वाभाविक मानलं गेलं होतं. मुळात इंदिरा गांधींचं स्त्री असणं त्यात फारसा अडथळा आणणारं ठरलं नाही. शेवटी ती 'पंडित नेहरूंची मुलगी' होती. राजा-राणीच्या गोष्टींचा पगडा असलेल्या भारतीय जनमानसासाठी 'राजा'ची मुलगीच त्याच्या गादीचा वारसदार ठरणं अगदी स्वाभाविक होतं. अर्थात तरीही इंदिरा गांधींना विरोध झालाच. पण तो त्यांनी मोडून काढला आणि इथं त्यांच्यातल्या कणखर स्त्रीचं दर्शन सर्व जगाला झालं. जयललितांचं सिनेमातलं करिअर त्याच वेळी समांतर सुरू होतं. त्या हे सगळं पाहत असणार. त्याच काळात श्रीलंकेत (तमिळनाडूला सर्वार्थानं जवळ) सिरिमाओ भंडारनायके पहिल्या महिला अध्यक्षा झाल्या होत्या. त्या तर आशियातल्या नव्हे, तर जगातल्या पहिल्या राष्ट्रप्रमुख ठरल्या होत्या. अर्थात एमजीआर असेपर्यंत जयललितांची राजकीय महत्त्वाकांक्षा निद्रितावस्थेतच होती, असं म्हणायला पाहिजे. जसं अभिनेत्री होणं हे त्यांनी मागून घेतलं नव्हतं, तसं राजकारणात जाणं हाही त्यांचा वैयक्तिक चॉइस नव्हता. एमजीआर यांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये फूट पडली आणि पक्षातला मोठा जनाधार जयललितांच्या मागं आला, हा सर्व इतिहास आपल्याला ज्ञात आहे. 
पण जेव्हा त्या प्रथम विधानसभेत आल्या आणि विरोधी पक्षनेत्या म्हणून काम करू लागल्या, तेव्हा त्यांचा खरा कस लागला. तमिळनाडूच्या विधानसभेत तोपर्यंत कुठलीही स्त्री विरोधी पक्षनेता नव्हती. जयललितांच्या रूपानं त्या विधानसभेनं प्रथमच स्त्री विरोधी पक्षनेता पाहिली. करुणानिधींचा द्रमुक सत्तेत होता. करुणानिधींच्या भाषणाला जयललितांनी आक्षेप घेतला म्हणून भर विधानसभेत त्यांची साडी फाडण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली. भारतातल्या संसदीय कामकाजाच्या इतिहासातला हा काळा अध्याय! पण जयललिता डगमगल्या नाहीत. त्या तशाच फाटक्या साडीनिशी माध्यमांना सामोऱ्या गेल्या आणि 'मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा या विधानसभेत पाय ठेवीन,' अशी प्रतिज्ञा त्यांनी केली आणि ती तडीलाही नेली. इथे सर्वप्रथम जयललितांना त्यांच्या स्त्री असण्याची आणि त्यातही अभिनेत्री असण्याची तीव्र जाणीव झाली असणार. अभिनेत्री म्हणजे तमाम जनतेची फँटसी! वर म्हटल्याप्रमाणं कुणी कुठल्या व्यवसायात असावं, याचे ठोकताळे आपल्याकडं जनतेच्या डोक्यात पक्के असतात. त्यामुळंच विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्याकडं बघण्यापेक्षा एक अभिनेत्री म्हणूनच त्यांच्याकडं पाहिलं गेलं असणार आणि त्यामुळंच सत्ताधाऱ्यांना त्यांच्या साडीला हात घालण्याचं धारिष्ट्य झालं असणार. (याचा अर्थ बाकी कुणी अभिनेत्रीशी असंच वागावं असा नव्हे; हे त्याचं समर्थनही नव्हे. फक्त हा मुद्दा मानसिकतेचा आहे.) अत्यंत हुशार असलेल्या जयललितांनी हे नक्कीच जोखलं असणार.... मुख्यमंत्री व्हायचं, राज्याची प्रमुख व्हायचं तर जनतेची 'अम्मा' होण्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी ओळखलं. त्यांनी रंगीबिरंगी साड्या नेसणं, भरपूर दागिने अंगावर घालणं बंद केलं. विशिष्ट पद्धतीनं साडी नेसून त्यांनी स्वतःचं संपूर्ण अंग झाकून टाकलं. जनतेच्या मनातली फँटसी साफ पुसून काढली. आपल्याकडच्या राजकारणातली ही प्रतीकात्मकता त्यांनी फार लवकर ओळखली. त्यांनी लगेच स्वतःचं रूपांतर 'अम्मा'मध्ये करून टाकलं. राजकारणात ताकद मिळविली. स्वतःच्या जोरावर पक्ष चालविला. पाच वेळा मुख्यमंत्री झाल्या. आपल्यातलं स्त्रीत्व विसरून त्या एक कठोर राजकारणी झाल्या. कसा केला असेल हा प्रवास त्यांनी? हा मानसिक संघर्ष किती अवघड असेल? एके काळी त्यांच्या रूपाची, सौंदर्याची चर्चा व्हायची. स्त्री म्हणून सुखावणारे कित्येक क्षण त्यांनी आयुष्याच्या पूर्वार्धात अनुभवले असणार. हे सर्व एकदम सोडून देऊन, एक मुखवटा घेऊन जगताना त्यांना काय गमवावं लागलं असेल? प्रचंड संपत्ती, हजारोंच्या संख्येत असलेल्या साड्या, शेकडो जोड आणि प्रासादतुल्य निवासस्थान या भौतिक गोष्टींमुळं त्यांना सोडाव्या लागणाऱ्या गोष्टींची भरपाई झाली असेल? 
कधी तरी सिमी गरेवालच्या मुलाखतीत 'आजा सनम मधुर चांदनी में हम' गुणगुणताना किंवा 'नरी काँट्रॅक्टरवर माझा क्रश होता' असं सांगताना हे त्यांच्यातलं स्त्रीत्व अधूनमधून दिसून येतं... पण ते तेवढंच! बाकी त्या स्त्रीत्वाचे सगळे मनोव्यापार त्यांनी त्या अवाढव्य हिरव्या साडीत आणि लांब ब्लाउजमध्ये चिणूनच टाकले असणार! कशासाठी केलं असेल हे त्यांनी आणि त्यातून शेवटी त्यांना काय मिळालं? 
आपल्याकडं राजकारणातल्या महत्त्वाकांक्षांसाठी स्त्री असो किंवा पुरुषही... यांना आपलं नैसर्गिक स्त्रीत्व आणि पौरुष  कायमचं झाकून का टाकावं लागतं? साधे-सरळ स्त्री आणि पुरुष म्हणून ते का जगू शकत नाहीत? कशाला जनतेची 'अम्मा' व्हावं लागतं? कशाला त्यांचे 'भाऊ' वा 'दादा' व्हावं लागतं? तिकडं न्यूझीलंडचे पंतप्रधान आपल्या पत्नीला वेळ देता यावा म्हणून राजीनामा देतात आणि आपल्याकडं...? स्त्रीला साधं स्त्री म्हणून जगण्याची चोरी...!
अम्मा नावाचं गारूड समजावून घेताना हा विचार करीत गेलं तर सुन्न व्हायला होतं...! 
जेव्हा या देशातलं राजकारण आणि एकूणच समाजकारण राजकीय लोकांच्या दैवतीकरणाचा आणि पप्पा वा 'अम्माकरणा'चा मोह टाळू शकेल, तेव्हा कदाचित ते अधिक निर्मळ होण्याची शक्यता आहे.
----
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, ११ डिसेंबर २०१६)
---

5 Dec 2016

चिंतन आदेश दिवाळी लेख १६

शापित गंधर्व
------------

मृत्यू या विषयावर जेवढं बोलू आणि लिहू तेवढं कमी आहे. माणसाला मृत्यूचं आणि कदाचित मृत्यूनंतरच्या संभाव्य परिस्थितीचं अमर्याद आकर्षण कायम वाटत आलेलं आहे. एखादी गोष्ट संपूर्णपणे कळत नाही, तोवर तिचा वेध घेत राहायचं हा मानवी स्वभावच आहे. 'मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा' असं महाकवी ग. दि. माडगूळकरांनी लिहून ठेवलेलं आहे. माणसाचं सरासरी आयुष्यमान ७० ते ९० वर्षं आहे, असं गृहीत धरलेलं आहे. यात अर्थातच पुढं-मागं दहा वर्षं होतात. पण जास्तीत जास्त माणसं ७० ते ९० वर्षं एवढं जगतात, असं आपण मानतो. यापेक्षा कमी वयात माणूस गेला, तर तो अकाली गेला, असं म्हणण्याची पद्धत आहे. थोडक्यात आपल्या इथल्या गणितानुसार ६० पेक्षा कमी वयात गेलेला माणूस निश्चितच अकाली मरण पावला, असं म्हणता येईल. माणूस अकाली गेला, की वाईट वाटतंच. यांनी आणखी जगायला हवं होतं, असं वाटतं. त्यात अकाली गेलेली व्यक्ती चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय व्यक्ती असेल, तर बोलायलाच नको. चित्रपटसृष्टीतील अशाच काही निखळलेल्या पाच ताऱ्यांच्या वादळी आयुष्याचा आणि शेवटच्या दिवसांचा वेध घेण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे.

रिक्त मधुघट... 
------------------------
अकाली गेलेल्या तारे-तारकांचा विषय निघाला, की पहिल्यांदा चटकन नाव येतं ते सौंदर्यसम्राज्ञी मधुबालाचं. मधुबाला केवळ ३६ वर्षं जगली. मुमताज जेहान देहलवी असं तिचं मूळ नाव. तिचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ चा आणि मृत्यू २३ फेब्रुवारी १९६९ चा. आपल्या अप्रतिम सौंदर्याच्या जोरावर भारतीय चित्रपटसृष्टीतली सर्वांत सुंदर अभिनेत्री असा गौरव तिनं प्राप्त केला होता. पण अशा सौंदयवतीला अल्पायुष्याचा शाप होता. कदाचित तिचं वयोवृद्ध होणं नियतीलाच मंजूर नसावं. म्हणूनच ती केवळ ३६ वर्षांची असताना नियतीनं तिचा डाव अर्धवट मोडला. 'द ब्यूटी विथ ट्रॅजेडी', 'द व्हीनस ऑफ इंडियन सिनेमा' अशी अनेक बिरुदं तिच्या नावामागं लागली. तिच्या जाण्यानंतरही तिच्या दिसण्याविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी आजही चर्चा होत असते. तिच्या अनेक सिनेमांतून ती आपल्याला आजही दिसते. त्या अर्थानं ती अजरामरच आहे. 
मधुबालाच्या शेवटच्या आजाराविषयी तिच्या अनेक चरित्रांत, तसंच इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. त्यानुसार, १९५४ मध्ये तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं सर्वांत प्रथम निष्पन्न झालं. त्या वेळी ती मद्रासमध्ये 'बहुत दिन हुए' नावाच्या सिनेमाच्या सेटवर काम करीत होती. पुढं पाच-सहा वर्षांत तिचा हा आजार चांगलाच बळावला. तिच्या बहिणीच्या मते, या आजारामुळं मधुबालाच्या शरीरात जादा रक्त तयार होत असे आणि ते नाक व तोंडावाटे बाहेर येत असे. अनेकदा डॉक्टर तिच्या घरी येत आणि बाटल्याच्या बाटल्या रक्त जमा करून नेत. या आजारामुळं तिच्या फुफ्फुसांवरही ताण पडे आणि त्यामुळं तिला श्वास घ्यायला त्रास होई. ती सतत खोकत असे आणि दर चार ते पाच तासांनी तिला ऑक्सिजन द्यावा लागे; अन्यथा तिचा श्वास कोंडला जाई. शेवटची सुमारे नऊ वर्षं ती अंथरुणालाच खिळून होती आणि अगदी शेवटी तर ती अगदी अस्थिपंजर झाली होती. अशी मधुबाला पाहायला आपल्याला कधीच आवडलं नसतं. 'अच्छा जी मैं हारी चलो मान जाओ ना...' म्हणणारी अवखळ किंवा 'परदा नहीं जब कोई खुदा से, बंदों से परदा करना क्या...' असं म्हणणारी करारी मधुबालाच आपल्याला आवडते. पण कलावंतांचं रूपेरी आयुष्य आणि प्रत्यक्षातलं आयुष्य यात असाच जमीन-अस्मानाचा फरक असतो. कलाकारही शेवटी माणूसच असतात आणि माणूसपणाचे, शरीराचे सर्व भोग त्यांनाही भोगावेच लागतात. कलाकार पडद्यावर आपल्याला यक्षासारखे भासतात, पण प्रत्यक्षात त्यांनाही जरेचा शाप असतोच. मधुबालासारखी एखादी या शापातून सुटते आणि चिरतारुण्यासह अजरामर होते.
मधुबाला आणि दिलीपकुमार यांचं प्रेमप्रकरण जगजाहीर होतं. मात्र, त्या प्रकरणाचा दुर्दैवी अंत झाला. या प्रेमभंगावर खुन्नस म्हणून की काय, मधुबालानं किशोरकुमारशी लग्न केलं. त्यासाठी किशोरकुमारनं इस्लाम धर्म स्वीकारला. पण पुढेही हे लग्न फार काही यशस्वी झालं असं म्हणता येत नाही. याचं कारण मुळात मधुबाला सतत आजारीच असायची. किशोरकुमारनं या काळात तिची बरीच सेवा केली, असं अनेक जण सांगतात. तर याउलट त्यानं तिला तिच्या माहेरी आणून सोडलं आणि फार काही लक्ष दिलं नाही, असाही एक मतप्रवाह आहे. साधारण १९६६ च्या आसपास मधुबालाची प्रकृती थोडी सुधारली. त्या वेळी तिनं राज कपूरसोबत अर्धवट राहिलेल्या 'चालाक' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करायचा प्रयत्न केला. मात्र, शूटिंगची थोडीशी दगदगही तिला झेपली नाही आणि हा सिनेमा अपूर्णच राहिला. पुढं १९६९ मध्ये आता आपल्याला पडद्यावर येणं शक्य नाही, हे लक्षात आल्यावर मधुबालानं सिनेमा दिग्दर्शन करण्याची घोषणा केली. 'फर्ज और इश्क' असं त्या सिनेमाचं नाव होतं. मात्र, निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यातच मधुबाला हे जग सोडून गेली आणि हाही सिनेमा केवळ घोषणेच्या पातळीवरच राहिला. मुंबईत तिची संगमरवरी समाधी बांधण्यात आली. त्यावर कुराणातील आयत कोरण्यात आले. पुढं २०१० मध्ये ही समाधी वादग्रस्तरीत्या उद्-ध्वस्त करण्यात आली. मधुबाला शरीररूपानं केव्हाच निघून गेली असली, तरी तिच्या रूपेरी पडद्यावरच्या चैतन्यमयी आणि उत्कट प्रेमात पाडणाऱ्या छबीद्वारे अद्याप आपल्यात जिवंतच आहे.

धुंद, अधुरं स्वप्न 
----------------
अकाली मरण पावलेल्या कलाकारांमध्ये आणखी एक नाव लगेच डोळ्यांसमोर येतं, ते म्हणजे गुरुदत्तचं. वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उर्फ गुरुदत्त हा हिंदी चित्रपटसृष्टीतला एक लखलखता तारा होता. तो केवळ ३९ वर्षं जगला. नऊ जुलै १९२५ रोजी बंगलोरमध्ये जन्मलेल्या गुरूनं १० ऑक्टोबर १९६४ रोजी मुंबईत आपलं जीवन संपवलं. एका मनस्वी कलावंताचा अकाली आणि दुर्दैवी मृत्यू झाला. या कलाकारांचं जगणं बघितलं, की लक्षात येतं, की ही साधीसुधी माणसं नव्हतीच. वेगळ्याच जगात वावरणारी स्वप्नाळू, वेडी माणसं होती. लौकिक जगाचे आचारविचार, रुढी-रिवाज यांना कधी पेललेच नाहीत. अनेकदा या लोकांनी जगाला फाट्यावर मारलं, तर जगानंही अनेक प्रसंगी त्यांची हेळसांड केली, थट्टा-मस्करी केली. गुरुदत्त हा विलक्षण प्रज्ञावंत कलाकार होता. त्याच्या जगण्याच्या सर्व शक्यता त्यानं स्वतः निर्माण केल्या होत्या. पारंपरिक जगण्याच्या सर्व चौकटी मोडीतच हा कलाकार एका आगळ्या धुंदीत जगला. त्याच्या त्या जगात केवळ प्रेम होतं, पॅशन होती, संगीत होतं, चित्र होतं आणि अर्थातच या सर्वांचा समुच्चय असलेला सिनेमा होता.
अशा या वेड्या, कलंदर माणसानं 'प्यासा' आणि 'कागज़ के फूल'सारखे सार्वकालिक श्रेष्ठ सिनेमे दिले. दुर्दैवानं 'कागज़ के फूल' १९५९ मध्ये प्रथम प्रदर्शित झाला, तेव्हा पडला. या सिनेमाचं अपयश गुरुदत्तच्या जिव्हारी लागलं. त्यापुढं त्यानं त्याच्या प्रॉडक्शनच्या एकाही सिनेमावर दिग्दर्शक म्हणून स्वतःचं नाव येऊ दिलं नाही. गुरुदत्तनं गायिका गीता रॉयशी १९५३ मध्ये लग्न केलं. मात्र, त्या दोघांत वारंवार खटके उडत. अभिनेत्री वहिदा रेहमानचं गुरुदत्तच्या आयुष्यात येणं ही घटना गुरू आणि गीतामधल्या तणावाला आणखी खतपाणी घालणारी ठरली. गुरुदत्त सेटवर जेवढा शिस्तबद्ध दिग्दर्शक होता, तेवढाच तो वैयक्तिक आयुष्यात स्वच्छंदी आणि बेशिस्त होता. प्रचंड प्रमाणात धूम्रपान, मद्यपान या गोष्टींच्या आहारी गेल्यानं तर शारीरिकदृष्ट्या तो आधीच पोखरून निघाला होता. पत्नीशी तणावपूर्ण संबंध आणि वहिदाबरोबरचं असफल प्रेम यामुळं गुरुदत्त मानसिकदृष्ट्या खचला होता. त्यात 'कागज़ के फूल'च्या अपयशामुळं तर आणखीनच वाईट स्थिती झाली. दहा ऑक्टोबर १९६४ रोजी मुंबईत पेडर रोडवरील भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत्या घरी बेडरूममध्ये गुरुदत्त मृतावस्थेत आढळला. मद्यात झोपेच्या गोळ्या घालून घेण्याची त्याची सवय त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली. गुरुदत्तनं आत्महत्या केली की त्याचा अपघाती मृत्यू झाला, याविषयी प्रवाद आहेत. मात्र, त्यानं पूर्वी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गुरुदत्तचा मुलगा अरुण याच्या म्हणण्यानुसार, गुरुदत्तनं आत्महत्या केली नाही; तर दारूच्या नशेत चुकून जास्त गोळ्यांचा डोस पोटात गेल्यानं त्याचा मृत्यू झाला. आत्महत्या करायची असती, तर गुरुदत्तनं दुसऱ्या दिवशी दोन मीटिंग ठेवल्या नसत्या, असं त्याचं म्हणणं. त्या वेळी गुरुदत्त प्रॉडक्शनतर्फे 'बहारें फिर भी आयेंगी' या सिनेमाचं प्री-प्रॉडक्शनचं काम सुरू होतं. त्या कामासाठी ११ ऑक्टोबरला तो माला सिन्हाला भेटणार होता; तसंच रंगीत सिनेमांचं तंत्रज्ञान त्या वेळी नुकतंच हिंदीत आलं होतं, त्याविषयी तो राज कपूरशी चर्चा करणार होता. आत्महत्या करायची असती, तर गुरुदत्तनं दुसऱ्या दिवशी या दोघांना भेटायला बोलावलं नसतं, असं त्याच्या मुलाचं म्हणणं आहे. याशिवाय गुरुदत्त अजून दोन सिनेमांवर काम करीत होता. एक होता 'पिकनिक'. यात साधना त्याची नायिका असणार होती. दुसरा होता के. असीफचा 'लव्ह अँड गॉड.' पैकी गुरूच्या मृत्यूमुळं 'पिकनिक' हा सिनेमा डब्यात गेला, तर तब्बल दोन दशकांनी १९८६ मध्ये संजीवकुमारला घेऊन 'लव्ह अँड गॉड' अखेर तयार झाला. 'गुरुदत्त प्रॉडक्शन'च्या 'बहारें फिर भी आयेंगी'चं नशीबही चांगलं होतं. गुरूच्या जागी धर्मेंद्रला घेऊन दोन वर्षांनी, म्हणजे १९६६ मध्ये हा सिनेमा पडद्यावर झळकला. 
गुरुदत्त शेवटच्या काही काळात पत्नी गीतापासून विभक्त झाला होता आणि एकटा राहत होता. अब्रार अल्वी हे गुरुदत्तचे जवळचे मित्र. त्यांनी गुरुदत्तच्या आठवणी सांगणारं पुस्तक लिहिलं आहे. मात्र, अखेरच्या दिवसांतही गुरुदत्त अब्रार यांच्याशी अनेक महत्त्वाच्या विषयांवर फार काही बोललाच नाही. अगदी गीता व वहिदाविषयीही तो काही बोलत नसे. यावरून आत्महत्या करण्याची त्यानं खरोखरच मानसिक तयारी केली होती का, असा प्रश्न पडतो. ते काही का असेना, एक कलंदर, उमदा आणि विलक्षण प्रतिभावंत असा कलाकार आपल्यातून तेव्हा अकाली निघून गेला. गुरुदत्त आणखी काही वर्षं जगला असता, तर त्यानं त्या त्या काळात कसे सिनेमे बनवले असते, याचं कुतूहल वाटतं. बहुतेकदा काळाच्या पुढचे सिनेमे देणारा हा दिग्दर्शक आता जगातल्या मोजक्या टॉपच्या दिग्दर्शकांमध्ये अढळ स्थान पटकावून बसला आहे. 

मूर्तिमंत ट्रॅजेडी
---------------

मधुबाला व गुरुदत्तप्रमाणेच अकाली हे जग सोडून गेलेली तारका म्हणजे मीनाकुमारी. हिंदी सिनेमाची ट्रॅजेडी क्वीन! तिच्या पडद्यावरील भूमिकांप्रमाणेच प्रत्यक्ष जीवनातही तिच्या वाट्याला ट्रॅजेडीच आली, हे दुर्दैव! मेहजबीन बानो उर्फ मीनाकुमारी एक ऑगस्ट १९३२ रोजी या जगात आली आणि ३१ मार्च १९७२ रोजी हे जग सोडून गेली. पुरतं चाळीस वर्षांचंही आयुष्य तिला लाभलं नाही. जन्मापासूनच दुःखानं सतत तिची सोबत केली आणि अतीव वेदनेची मूर्तिमंत प्रतिमा झालेली ही थोर अभिनेत्री अकालीच हे निर्दयी जग सोडून गेली. मीनाकुमारीचा जन्म झाला, तेव्हा तिचे पिता अली बक्ष यांना दुसरीही मुलगी झाल्याचं दुःख झालं. त्यांची परिस्थिती फारशी बरी नव्हती. मीनाच्या आईच्या बाळंतपणाची डॉक्टरांची फी देण्याचीही त्यांची ऐपत नव्हती. तेव्हा निराश अवस्थेत अली बक्ष यांनी तिला एका मुस्लिम अनाथालयाच्या दाराशी ठेवलं आणि ते तिथून निघून जाऊ लागले. मात्र, मुलीचं रडणं ऐकून त्यांना पश्चात्ताप झाला आणि ते तिला घ्यायला परत फिरले. नुकत्याच जन्मलेल्या त्या मुलीच्या अंगाला मुंग्या लागल्या होत्या. अली बक्ष यांनी तिला तातडीनं उचलून घेतलं आणि घरी परत आणलं. मीनाकुमारीचं पुढचं संपूर्ण आयुष्य दुःखमय जाणार, याची नियतीनं दाखवलेली ती चुणूकच होती. लहानग्या मेहजबीनला इच्छा नसतानाही सिनेमात काम करावं लागलं. औपचारिक शिक्षण असं काही झालंच नाही. चिमुकली मेहजबीन 'बेबी मीना' हे नाव धारण करून सिनेमांत बालकलाकाराच्या भूमिका करू लागली. चेहऱ्याला जो रंग लागला तो लागलाच. या रंगात वेदनेचा एक गहिरा रंग मिसळला होता, तो मात्र कुणाला दिसला नाही. विजय भट यांच्या अनेक सिनेमांत तिनं बालकलाकार म्हणून काम केल्यानंतर त्यांनीच तिचं नामकरण मीनाकुमारी असं केलं. वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी मीना नायिका बनली. सुरुवातीच्या काळात, म्हणजे १९४६ ते १९५१ या पाच वर्षांत तिनं अनेक पौराणिक व अन्य फँटसी सिनेमांत कामं केली. पुढं १९५१ मध्ये तिची भेट दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्यासोबत झाली. मीनाकुमारीच्या अपघातानंतर या दोघांची जवळीक वाढली. महाबळेश्वरवरून मुंबईला येताना मीनाच्या गाडीला अपघात झाला आणि तिला पुण्यात ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. तेव्हा कमाल अमरोही यांनी तिची काळजी घेतली. तेव्हापासून दोघांचं प्रेम फुललं आणि लगेच त्यांनी लग्नही केलं. तेव्हा कमाल ३४ वर्षांचे, तर मीना १९ वर्षांची होती. हे लग्न गुप्त पद्धतीनं झालं. कमाल यांचं पूर्वी एक लग्न झालं होतं आणि त्यांना तीन मुलं होती. नोंदणी पद्धतीनं लग्न झाल्यावर दोघंही आपापल्या घरी गेले होते. हे लग्न झाल्याचं मीनाच्या वडिलांना कळल्यावर ते संतापले आणि त्यांनी त्वरित तिला घटस्फोट घेण्यास सांगितलं. मात्र, मीनाकुमारीनं याला स्पष्ट नकार दिला. तरीही ती वडिलांकडंच राहत होती. पुढं एका प्रसंगी वडिलांनी रात्री तिला घरी घेण्यास नकार दिल्यानंतर तिनं तिची गाडी वळवून कमाल यांच्या घरी नेली व ती त्यांच्याकडे राहिली. या प्रसंगानंतरच मीनाकुमारीनं अमरोहींशी लग्न केलंय, ही बातमी सर्वांना समजली. मीनाकुमारीचं कमाल यांच्यावर कमालीचं प्रेम होतं. ती त्यांना कायम 'चंदन' या नावानं, तर ते तिला कायम 'मंजू' या नावानं हाक मारीत असत. पुढं मीनाकुमारी मोठी स्टार झाली. 'बैजू बावरा', 'परीणिता', 'दो बिघा जमीन', 'आझाद' आदी सिनेमांतली तिची कामं गाजली. पुढं ट्रॅजेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी मीनानं 'मिस मेरी' या चित्रपटात विनोदी भूमिकाही लीलया साकारली होती. जेमिनी गणेशन यात तिचे नायक होते. पुढं 'दिल अपना और प्रीत पराई', 'कोहिनूर', 'भाभी की चुडियाँ' (मराठी चित्रपट 'वहिनीच्या बांगड्या'चा रिमेक) अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांतून मीनाकुमारीच्या अभिनयाचं बुलंद दर्शन प्रेक्षकांना घडत गेलं. १९६२ या वर्षानं मीनाकुमारीच्या आयुष्यात इतिहास घडविला. त्या वर्षीच्या उत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये तिन्ही नामांकनं एकट्या मीनाकुमारीलाच मिळाली होती. हे चित्रपट होते 'साहिब, बिबी और गुलाम', 'आरती' आणि 'मैं चूप रहूँगी'. अर्थात 'साहिब, बिबी और गुलाम'मधल्या छोट्या बहूच्या जबरदस्त भूमिकेसाठी मीनाला त्या वर्षीचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. हा तिचा तिसरा फिल्मफेअर पुरस्कार होता. गुरुदत्तच्या या सिनेमातली 'छोटी बहू' मीनाकुमारी अक्षरशः जगली, कारण ही भूमिका तिच्या वैयक्तिक आयुष्याशी खूपच साधर्म्य सांगणारी होती. मीनाकुमारीनं साकारलेली ही भूमिका म्हणजे हिंदी सिनेमाच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातली एक फार वरच्या दर्जाची भूमिका मानली जाते.
यापुढचा मीनाकुमारीचा प्रवास म्हणजे दुःखाची 'दर्दभरी दास्तान' आहे. पती कमाल अमरोहींबरोबर झालेले मतभेद, तिच्या आयुष्यात आलेले धर्मेंद्र, सावनकुमार किंवा गुलज़ार आदी पुरुष आणि मद्याचं दिवसेंदिवस वाढत जाणारं व्यसन यामुळं तिचा घात झाला. मीनाला निद्रानाशाचा विकार होता. झोपेच्या गोळ्यांऐवजी ब्रँडीचा एक पेग घेण्याची सूचना तिच्या डॉक्टरांनी १९६३ मध्ये तिला केली होती. मात्र, ही मद्याची सवयच पुढं तिचा जीव घेईल, याची तेव्हा कुणालाच कल्पना नव्हती. पतीबरोबर मतभेद झाले आणि वेगळी राहत असली, तरी तिनं अमरोहींपासून कायदेशीर घटस्फोट कधीच घेतला नाही. 'पाकिजा' हा चित्रपट हे अमरोहींचं अल्टिमेट स्वप्न होतं. सुमारे १५ वर्षं ते या स्वप्नांचा पाठपुरावा करीत होते. त्यांच्या 'मंजू'लाही याची कल्पना होती. म्हणूनच मतभेद असतानाही तिनं 'पाकिजा' स्वीकारला आणि पूर्णही केला. 'पाकिजा' प्रदर्शित झाला आणि दीड महिन्यानं ती गेली. 'नाझ' नावानं कविता करणारी ती एक संवेदनशील शायराही होती. 'पाकिजा'साठी मीनाला फिल्मफेअरचा उत्कृष्ट अभिनयाचा (मरणोत्तर) पुरस्कार  मिळाला... आणि अर्थात शेवटचाच! अतीव वेदनेची आणि हृदयात खोलवर उमटलेल्या अमीट जखमेसारखी मीनाकुमारी कायमची त्या दुसऱ्या अलौकिक दुनियेत निघून गेली. तिच्या रूपेरी पडद्यावरच्या एकेक जबरदस्त भूमिकांद्वारे मात्र ती अद्याप आपल्यातच आहे. 

अफाट प्रतिभा, पण...
----------------------
अगदी अफाट प्रतिभा, पण देवानं दिलेलं मर्यादित आयुष्य... असंच वर्णन अभिनेता संजीवकुमारचं करावं लागेल. हिंदी चित्रपटसृष्टीवर आपला कायमस्वरूपी ठसा उमटविणाऱ्या अभिनेत्यांमध्ये संजीवकुमारचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. केवळ ४७ वर्षांचं आयुष्य संजीवकुमारला लाभलं. नऊ जुलै १९३८ रोजी सुरतमध्ये जन्मलेला हरिभाई जेठालाल जरीवाला मुंबईत सहा नोव्हेंबर १९८५ रोजी हृदयविकाराच्या जोरदार झटक्यानं मरण पावला. इतर अभिनेत्यांपेक्षा संजीवकुमारनं त्याच्या वयापेक्षा अधिक वयाच्या किती तरी भूमिका केल्या. दैवदुर्विलास असा, की तो स्वतः मात्र वयाची पन्नाशी ओलांडू शकला नाही. संजीवकुमारला हे माहिती होतं. ही एक विचित्र, परंतु खरी गोष्ट होती, की संजीवकुमारच्या कुटुंबात फारच कमी लोक वयाच्या पन्नाशीनंतर जगले होते. त्याचा धाकटा भाऊ त्याच्या आधीच गेला, तर थोरला भाऊही संजीवकुमार गेल्यानंतर सहा महिन्यांतच मरण पावला. 
संजीवकुमार उर्फ हरिभाईनं चित्रपटसृष्टीवर आपल्या अलौकिक प्रतिभेनं चांगलाच ठसा उमटवला. 'शोले'तील ठाकूर असो, की 'त्रिशूल'मधील आर. के. गुप्ता ही अमिताभच्या पित्याची भूमिका असो, संजीवकुमारनं प्रत्येक भूमिकेचं सोनं केलं. वयाच्या केवळ सदतिसाव्या वर्षी त्यानं 'शोले'तील 'ठाकूर'ची भूमिका साकार केली आहे, हे सांगून खरं वाटत नाही. आपल्या प्रत्यक्षातील वयापेक्षा जास्त वयाच्या भूमिका स्वीकारताना संजीवकुमारला कुठलंही भय वाटत नव्हतं. त्याचा स्वतःच्या अभिनयक्षमतेवर पूर्ण विश्वास होता. कवी-लेखक गुलजार यांच्यासोबत संजीवकुमारनं बरंच काम केलं. विशेषतः 'कोशिश'मधील मूकबधीर हरिचरण माथूरची भूमिका संजीवकुमारनं अत्यंत उत्कटतेनं साकारली. 'खिलौना'तील भूमिकेमुळं मुळात संजीवकुमार हिंदी चित्रपटसृष्टीत प्रकाशोझोतात आला. गुलजारसोबत त्यानं 'मौसम', 'आँधी', 'अंगूर', 'नमकीन' आदी नऊ चित्रपटांत काम केलं. दाक्षिणात्य सिनेमांच्या हिंदीत होणाऱ्या रिमेकनी राजेश खन्ना व संजीवकुमारला चांगलाच हात दिला. 'नया दिन नयी रात' या चित्रपटात संजीवकुमारनं नऊ विविध भूमिका साकारल्या होत्या. शिवाजी गणेशन यांच्या 'नवरात्री' (१९६४) या तमीळ सिनेमाचा तो रिमेक होता. 'पती, पत्नी और वो' या सिनेमातील त्यांची हलकीफुलकी भूमिकाही गाजली होती. 
साधारण १९८० च्या नंतर संजीवकुमारनं चरित्र भूमिका स्वीकारण्यास सुरुवात केली. त्याला जन्मापासूनच हृदयाचा त्रास होता. संजीवकुमार कायम अविवाहित राहिला. अभिनेत्री सुलक्षणा पंडितसोबत त्याचं नाव जोडलं गेलं. परंतु दोघेही अविवाहितच राहिले. संजीवकुमारला हृदयविकाराचा पहिला झटका आल्यानंतर त्याच्यावर अमेरिकेत बायपास सर्जरी करण्यात आली. मात्र, मुंबईत परतल्यावर त्याला सहा नोव्हेंबर १९८५ रोजी दुसरा अटॅक आला आणि त्यातच तो निवर्तला. संजीवकुमार त्या वेळी सुमारे दहा सिनेमांत काम करीत होता. हे सर्व सिनेमे नंतर यथावकाश प्रदर्शित झाले. त्यातल्या त्याच्या भूमिकांची काटछाट करण्यात आली. संजीवकुमारच्या अकाली जाण्यानं एक अफाट प्रतिभेचा उत्तम नट आपण गमावला यात शंका नाही. 

स्मिता नावाचं स्वप्न
------------------
स्मिता पाटील. किती अकाली गेली! अवघ्या एकतिसाव्या वर्षी, मुलाच्या बाळंतपणात स्मिता अचानक गेली. स्मिताचं नाव आठवलं, की आजही हळहळणारी एक पिढी आहे. स्मिता म्हणजे अत्यंत मनस्वी, कलंदर व्यक्तिमत्त्व. तिच्या गुणांविषयी बोलायचं म्हणजे पारा चिमटीत पकडण्यासारखं आहे. स्मिता म्हणजे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक मुग्ध-मधुर स्वप्न! ही अशी स्वप्नं केवळ स्वप्नातच पाहायची असतात. वास्तवाच्या रुक्ष भूमीवर ती शोधू गेल्यास हाती नैराश्याची रिक्त मूठ येण्याचीच शक्यता अधिक. स्मिताचा जन्म १७ ऑक्टोबर १९५५ रोजी शिरपूर (जि. धुळे) इथं झाला. तिचे वडील शिवाजीराव गिरीधर पाटील हे नामांकित राजकारणी. तिचं शालेय शिक्षण पुण्यात रेणुकास्वरूप हायस्कूलमध्ये झालं. स्मितानं अगदी सुरुवातीच्या काळात मुंबई दूरदर्शनवर बातम्या देण्याचंही काम केलं. तिनं पुण्याच्या 'एफटीआयआय'मध्ये शिक्षण घेतलं होतं. श्याम बेनेगल यांनी तिला 'चरणदास चोर' या सिनेमात सर्वप्रथम संधी दिली. पुढं श्याम बेनेगल यांच्या जवळपास प्रत्येक सिनेमात स्मिता होती. ती आणि शबाना आझमी तत्कालीन समांतर सिनेमाचा चेहरा बनल्या. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, कुलभूषण खरबंदा, गिरीश कर्नाड यांच्यासह तिनं अनेक चित्रपटांत महत्त्वपूर्ण कामं केली. मंथन, निशांत, भूमिका, आक्रोश, चक्र, शक्ती, नमक हलाल, आखिर क्यों, मिर्चमसाला, वारिस हे तिचे काही महत्त्वाचे चित्रपट. मराठीतही जैत रे जैत आणि उंबरठा या डॉ. जब्बार पटेल यांच्या चित्रपटांतून स्मितानं केलेल्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. स्मिता केवळ अभिनेत्री नव्हती, तर स्त्रीवादी चळवळीतही ती सक्रिय होती. तिच्या अनेक भूमिकांमधूनही तिनं सक्षम स्त्री-भूमिका रंगविल्या. 
केवळ समांतर सिनेमातच नव्हे, तर व्यावसायिक चित्रपटांतूनही तिनं अनेक भूमिका केल्या. स्मितानं अभिनेता राज बब्बरशी केलेलं लग्न वादात सापडलं होतं. राज बब्बरनं त्याची आधीची पत्नी नादिरा हिला सोडून स्मिताशी लग्न केलं. स्मितानं मूल होऊ देऊ नये, असा सल्ला तिला डॉक्टरांनी दिला होता म्हणे. मात्र, तिनं तो डावलला. मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांतच १३ डिसेंबर १९८६ रोजी मध्यरात्री ती हे जग सोडून गेली. तेव्हा ती अवघ्या ३१ वर्षांची होती. स्मिताचा मृत्यू वैद्यकीय हलगर्जीपणामुळं झाला, असाही आरोप करण्यात येतो. प्रख्यात दिग्दर्शक मृणाल सेन यांनी अनेक वर्षांनंतर हा आरोप केला होता. ते काहीही असलं, तरी स्मिता अकाली गेली एवढंच सत्य मागे उरलं. स्मिता आज हयात असती, तर ६१ वर्षांची असती. म्हणजेच चित्रपटसृष्टीत अद्यापही पुष्कळ सक्रिय असती. या बदललेल्या काळात स्मिताही निश्चितच बदलली असती आणि तिनं स्वतःच्या अस्तित्वानं नंतर आलेल्या कित्येक सिनेमांना 'चार चाँद' लावले असते, यात शंका नाही. आता आपण केवळ तिच्या त्या काळातल्या सिनेमांतल्या तिच्या प्रतिमा डोळ्यांत साठवून ठेवू शकतो. 

इतर निखळलेले तारे
---------------------

हिंदी वा मराठी चित्रपटसृष्टीत अकाली निखळलेले इतरही अनेक तारे-तारका आहेत. दिव्या भारती (वय १९), जिया खान (२०), विनोद मेहरा (४५), अमजदखान (५१), गीता बाली (३५), ऋतुपर्ण घोष (४९), निर्मल पांडे (४८), दिलीप धवन (४५), जसपाल भट्टी (५७), शफी इनामदार (५०), आदेश श्रीवास्तव (५१) असे अनेक कलाकार हे जग फार लवकर सोडून गेले. कुणी असाध्य आजारानं, तर कुणी अपघातात गेले. काहींच्या मृत्यूविषयी अद्याप गूढ आहे. नैसर्गिक मरण नक्कीच नाही, पण मग आत्महत्या की घातपात, याचं उत्तर काळाच्या उदरातच दडलेलं आहे. यापैकी जसपाल भट्टी यांच्याशी तर माझे वैयक्तिक स्नेहबंध होते. त्यामुळं त्यांचा अपघाती मृत्यू ही मला स्वतःला वैयक्तिकरीत्या अत्यंत वेदनादायी घटना होती.
मराठीतही अरुण सरनाईक (वय ४९, २१ जून १९८४ मध्ये पुणे-कोल्हापूर हायवेवर अपघाती मृत्यू), जयराम हर्डीकर (१९७८ मध्ये अपघाती मृत्यू), डॉ. काशिनाथ घाणेकर (वय ४६, मृत्यू २ मार्च १९८६), रंजना (वय ४५, मृत्यू ३ मार्च २०००), लक्ष्मीकांत बेर्डे (वय ५०), भक्ती बर्वे (वय ५१, एक्स्प्रेस-वेवर ११ फेब्रुवारी २००१ रोजी अपघातात मृत्यू), रसिका जोशी (वय ३८, ७ जुलै २०११ रोजी ल्युकेमियानं मृत्यू), स्मिता तळवलकर (वय ५९, ६ ऑगस्ट २०१४ रोजी कॅन्सरनं मृत्यू) असे अनेक कलाकार अकालीच हे जग सोडून गेले. या सर्वांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीचं मोठं नुकसान झालं, यात शंका नाही. आजच्या काळात हे सगळे असते, तर त्यांनी कुठल्या भूमिका कशा केल्या असत्या, याची आपण आता फक्त कल्पनाच करू शकतो. अर्थात हे सर्व कलाकार त्यांच्या कलाकृतींच्या रूपानं आपल्यात कायमच राहतील, यात शंका नाही.
--------

(पूर्वप्रसिद्धी : चिंतन आदेश दिवाळी २०१६, चिरनिद्रा विशेषांक)
----