22 Sept 2016

पिंक - रिव्ह्यू

'पिंक' बिफोर यू अॅक्ट...
---------------------------


आपण असं म्हणतो, की ज्याच्याविषयी आदर आहे अशा माणसानं समजावून सांगितलं, तर नीट कळतं. चुकत असेल, तरी अशा माणसानं एक मुस्कटात लगावून सांगितलं, तर डोक्यात कायमचा प्रकाश पडतो.
'पिंक' हा अनिरुद्ध रॉयचौधरीचा नवा हिंदी चित्रपट म्हणजे अशीच आपल्या श्रीमुखात लगावलेली एक सणसणीत चपराक आहे. आणि इथं हे समजावून सांगतोय साक्षात अमिताभ बच्चन. म्हणजे अर्थातच त्यानं साकारलेलं दीपक सहगल हे एका वकिलाचं पात्र. पण अमिताभ बच्चन या व्यक्तिरेखेशी जोडला गेलेला सारा आदर आपोआपच त्या पात्राला लाभतो आणि त्याच्या तोंडून जणू काही हा ज्येष्ठ समाजपुरुषच आपले कान (विशेषतः भरकटलेल्या तरुणाईचे) उपटतोय, असं वाटत राहतं.
इथं मी आता दीपक सहगल न म्हणता अमिताभच म्हणतो. कारण बच्चनचा 'ऑरा' असा काही आहे आणि त्याची इमेज अशी काही 'लार्जर दॅन लाइफ' आहे, की अनेकदा तो साकारत असलेल्या पात्रांनाही हे वलय चिकटतं. कधी कधी हे वलय अनावश्यक व हानीकारक असतं आणि कधी कधी ते फारच उपकारक ठरतं. इथं अमिताभ बच्चन या प्रत्यक्षातल्या व्यक्तीचा समाजमनावर असलेला प्रभाव आणि त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचा दबदबा त्यानं साकारलेल्या वकिलाच्या भूमिकेला भलताच पूरक ठरलाय. अशा या अमिताभनं आपल्या खर्जातल्या आवाजात शांतपणे, पण खणखणीतपणे आपल्याला इथं चार गोष्टी सुनावल्या आहेत. अनेक वर्षं मूल्यशिक्षणाचे तास घेऊनही जे कदाचित साध्य होणार नाही, ते इथं त्याच्या दमदार आवाजामुळं सहज साधून गेलं आहे.
अमिताभ सांगतो, जेव्हा एखादी मुलगी 'नाही' म्हणते तेव्हा त्याचा अर्थ 'नाही' असाच असतो. अगदी सोपं आहे हे! इथं ती मुलगी किंवा तरुणी कशाला 'नाही' म्हणतेय हे सांगायची गरज नाही. एखादी तरुणी महानगरात रात्री उशिरा घरी येते, किंवा मैत्रिणींसोबत एकटी राहते, किंवा पार्टीला जाते, किंवा मित्राशी हसून बोलते, किंवा त्याच्या पाठीवर सहज थाप मारते, किंवा हस्तांदोलन करते, किंवा मद्यपान करते किंवा तुमच्यासोबत रात्री डिनरला येते... तेव्हा याचा अर्थ ती कायम तुम्हाला 'उपलब्ध' असते, असं नाही. वास्तविक आता या वास्तवाशी अनेक तरुण जुळवून घेत आहेत. किंबहुना त्यांना याची हळूहळू जाणीव होते आहे, असं म्हणू या. पण तरीही समाजात उच्च सत्तास्थानी असलेले, सरंजामी मानसिकता असलेले आणि अशिक्षित अशा अनेक वर्गांमध्ये मुलींविषयी अजूनही हीच भावना आहे. या भावनेला खतपाणी घालणारी पोलिस यंत्रणा मुलींसाठी आणखीनच बिकट स्थिती निर्माण करते.
'पिंक' हा सिनेमा या सगळ्यांच्या चुकीच्या वागण्याचा पर्दाफाश करतो आणि शेवटी मुलींशी नीट कसं वागलं पाहिजे, याचा 'कायदेशीर' धडाच देतो. यातल्या कथेला नेपथ्य आहे ते दिल्लीचं. 'निर्भया' प्रकरणाचा बॅकड्रॉप निश्चितच दिसतो. दिल्ली हे शहर मुलींसाठी कायमच असुरक्षित गणलं गेलं आहे. त्यामुळं तिथल्या मुलींचा, तरुणींचा लढा अजूनच अवघड आहे. मीनल (तापसी), फलक अली (कीर्ती कुल्हारी) आणि आंद्रेया (आंद्रेया तारिआंग ) या तीन तरुणी दिल्लीत एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत असतात. मीनल दिल्लीतलीच आहे. मात्र, तिचे नाटकाचे प्रयोग वेळी-अवेळी संपतात, याचा घरच्यांना त्रास होऊ नये म्हणून ती बाहेर राहतेय. फलक अली लखनौची आहे आणि दिल्लीत एका मॅगेझिनमध्ये काम करते. तिसरी आंद्रेया ही मेघालयमधली (पण दिल्लीत सरसकट नॉर्थ-ईस्टवाली म्हणून ओळखली जाणारी), ती दिल्लीत एका कंपनीत काम करतेय. पण ती केवळ ईशान्य भारतातील मुलगी असल्याने ती 'तसलीच' असणार, असा भंपक समज तिच्या शहरात जवळपास सगळ्यांचा असतो.
या तीन मुलींपैकी फलकच्या एका मित्राच्या ओळखीतून एका रॉक कॉन्सर्टनंतर या तिघी राजवीर नावाच्या तरुणाचं डिनरचं आमंत्रण स्वीकारतात. हा राजवीर म्हणजे एका प्रभावशाली राजकारण्याचा पुतण्या असतो. राजवीर आणि त्याच्या मित्रासोबत त्या सूरजकुंड येथील एका रिसॉर्टमध्ये जातात. तिथं गेल्यानंतर राजवीर मीनलशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करतो. मीनल त्याला जबरदस्ती करण्यास विरोध करते आणि 'नाही' असं निक्षून सांगते. मात्र, तरीही राजवीर जबरदस्ती करतो, तेव्हा ती जवळचा मद्याची बाटली उचलून त्याच्या डोक्यात मारते. त्याच्या डोळ्याला गंभीर इजा होते. त्यानंतर या तिघी तिथून पळून जातात.
सिनेमा सुरू होतो तो या प्रसंगापासून. तिघीही भयभीत अवस्थेत टॅक्सीतून घरी येतात आणि तिकडे राजवीरला त्याचे मित्र अॅडमिट करतात. काही काळानंतर राजवीर आणि त्याचा एक मित्र या मुलींना, विशेषतः मीनलला धडा शिकवण्याचा विडा उचलतो. दीपक सहगल (अमिताभ) हा वकील या मुलींच्या समोरच राहत असतो. तो रोज मीनलला जॉगिंग ट्रॅकवर पाहत असतो. दीपक सहगलची पत्नी रुग्णशय्येवर असते. त्यानंही वकिली सोडलेली असते. कालांतरानं या मुलींच्या मागे सुरू झालेला त्रास तो पाहतो आणि अखेर त्यांची केस लढविण्याचा निर्णय घेतो.
राजवीर आणि त्याचे मित्र आधी या मुलींच्या मालकावर त्यांनी फ्लॅट सोडून जावे, म्हणून दबाव आणतात. नंतर फलकविषयी विकृत फोटो तयार करून तिच्या संपादकाकडं पाठवतात. त्या संपादकावर वरून दबाव आल्यानंतर तिचीही नोकरी जाते. नंतर त्या पोलिसांत तक्रार करायला जातात, तर त्यांच्याविरुद्धच खुनाचा प्रयत्न केल्याचा उलटा एफआयआर दाखल होतो. मीनलला पोलिस कोठडीत राहावं लागतं. इथं दीपक सहगल मैदानात उतरतो. दुसऱ्या दिवशी तो आपला कोट चढवून फलकच्या दारी येतो, तेव्हा आपल्याही मनगटांत जोर आल्यासारखं जाणवतं.
इथून पुढं उत्तरार्धात खरा न्यायालयीन लढा सुरू होतो आणि तोच या सिनेमाचा हायपॉइंट आहे. दिग्दर्शकानं बाकी तपशिलाचा फापटपसारा आवरून फक्त अशी कृत्ये करणाऱ्यांच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. राजवीरचा वकील प्रशांत मेहरा (पियूष मिश्रा) या मुलीच कशा बदफैली होत्या, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो. त्याच्या या संतापजनक आरोपांनी या तिघीही अनेकदा भर कोर्टात पेटून उठतात, संतापतात, ओरडतात, कधी थिजून जातात, जागीच गोठून जातात, अश्रूंना वाट करून देत राहतात... हा कोर्टरूम ड्रामा रंगतो तो दीपक सहगलच्या, अर्थात अमिताभच्या खणखणीत बचावानं. अमिताभचे या वेळचे संवाद अत्यंत प्रभावी आहेत आणि बऱ्याचदा प्रेक्षकांच्या टाळ्या-शिट्ट्या मिळविणारे आहेत. मुलींकडं चुकीच्या नजरेनं पाहणारे, त्यांना सदैव आपल्या मालकी हक्काचा माल मानणारे, त्यांचा कधीही गैरफायदा घेता येईल अशा भ्रमात असणारे अशा सगळ्यांनाच हे संवाद छान खणखणीत तोंडात वाजवतात.
अमिताभ चौऱ्याहत्तराव्या वर्षीही ज्या तडफेनं इथं कोर्टात आपली भूमिका साकारतो, ते पाहून वाटतं, की कुठून येते एवढी ऊर्जा या माणसात! राजवीरची उलटतपासणी घेत असतानाचा प्रसंग या दृष्टीनं पाहण्यासारखा आहे. त्याच्या डोळ्यांतली ती जरब प्रसंगी संपूर्ण देहबोलीत उतरते आणि त्याचा तो खर्जातला, ऑथरेटिव्ह आवाज! दिग्दर्शकाला नेमका संदेश द्यायचाय आणि त्यासाठी त्यानं खुबीनं या प्रसंगांची निवड त्यासाठी केलीय. इथं न्यायव्यवस्थेला साक्षी ठेवून दोन्ही बाजू जणू आपापली शस्त्रं परजत आहेत आणि लढाई लढत आहेत. इथं मुलींची बाजू अर्थातच न्यायाची आहे. याचं कारण त्यांच्यावर झालेला अन्याय आपल्याला ढळढळीतपणे समोर दिसतोय. विशेषतः नंतर त्यांना धडा शिकवण्याची राजवीर व त्याच्या मित्राची भाषा ऐकून हे लोक डोक्यात जातात. यांना कायमचा धडा शिकवायला पाहिजे, असं वाटून मुठी वळू लागतात. नंतर एका प्रसंगात हे लोक एका गाडीतून मीनलचं अपहरण करतात आणि तिला भयानक टॉर्चर करून, तिच्यावर जवळपास बलात्कार करून तिला पुन्हा घराजवळ आणून टाकतात. हा प्रसंग बघताना प्रचंड अस्वस्थ व्हायला झालं. याउप्पर काही बोलू नये, काही लिहू नये... शरमेनं डोकं खाली घालून बसावं... स्वतःच्याच चार तोंडात मारून घ्याव्यात... एवढा तो प्रसंग अंगावर येणारा आणि प्रत्ययकारक झालाय.
तापसी पन्नू ही अभिनेत्रीही लक्षात राहते. खूपच संवेदनशीलतेनं तिनं यातली मीनल साकारली आहे. तापसीकडं यापुढंही लक्ष राहील. कीर्ती कुल्हारी आणि आंद्रिया या दोघींनीही उत्तम कामं केलीयत. राजवीरच्या भूमिकेत अंगद बेदी आणि त्याच्या वकिलाच्या भूमिकेत पियूष मिश्रा यांनी चांगली कामं केली आहेत.
एंड स्क्रोलला मग शेवटी तो सुरुवातीला वर्णन केलेला प्रसंग दिसतो आणि त्या पार्श्वभूमीवर अमिताभच्या आवाजातील
'तू खुद की खोज में निकल,
तू किस लिए हताश है,
तू चल, तेरे वजूद की,

समय को भी तलाश है'
ही कविता ऐकू येते आणि सिनेमा संपतो.
एकूणच हा न चुकवावा असाच अनुभव आहे. हा सिनेमा पाहून देशभरातल्या तरुणांच्या नजरेतील 'पिंक' रंगाची ओळख बदलली तर अजून काय हवं!

----
दर्जा - साडेतीन स्टार
---

7 comments:

  1. रिव्ह्यू वाचून मन सुन्न झाले.थिजून गेले.

    ReplyDelete
  2. Pan mag sadeteen ch star denyamagche karan Kay?

    ReplyDelete
  3. Pan mag sadeteen ch star denyamagche karan Kay?

    ReplyDelete
  4. आधी पहिलेल्या सिनेमाचा रिव्ह्यु वाचताना पुन्हा अंगावर काटा आला इतकं छान लिहिलय. विशेषतः अमिताभमुळे सिनेमात दिलेला संदेश भिडतो हे हा ब्लॉग वाचुन लक्षात आलं.

    ReplyDelete
  5. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete