29 Nov 2015

हे ‘संस्कार’ बोर्ड बुडवा!

हे ‘संस्कार’ बोर्ड बुडवा! 
----------------------------

 जेम्स बाँड (00७) हा जगातला सर्वाधिक बुद्धिमान, ताकदीचा आणि चलाख असा माणूस असावा, असा एक आपला माझा समज होता. मात्र, साक्षात जेम्सच्या ‘तोंडचा’ मोनिका बेलुची नामक मदनिकेच्या चुंबनरूपातला घास हा हा म्हणता पळविणारा पहलाज निहलानी (१०१) हाच जगातला सर्वांत बुद्धिमान, ताकदीचा, चलाख आणि वर अत्यंत संस्कारी असा महापुरुष आहे, हे आता मला आणि या देशातल्या सगळ्या सिनेमाप्रेमींना मान्यच करावे लागेल. पहलाज निहलानींच्या पुढ्यात लिहिलेला ‘१०१’ हा क्रमांक म्हणजे अग्निशामक दलाचा क्रमांक आहे, हे आपल्याला ठाऊक आहेच; पण निहलानींनी सध्या पडद्यावर लागलेल्या कथित अश्लीलतारूपी आगीचे तांडव विझविण्यासाठी सेन्सॉर संस्कारांचा जो फवारा सध्या सुरू केलाय, तो पाहता हा क्रमांक त्यांच्या पुढ्यात कायमचा विराजमान करायला हरकत नाही. त्यामुळे आता यापुढे पडद्यावर चुंबनदृश्य आले, की ते अमुक एवढे सेकंद चालले तरच ‘संस्कारक्षम’ ठरेल. त्यापेक्षा जास्त चालले, तर ते पाहणारे प्रेक्षक बिथरून कदाचित आजूबाजूला त्या प्रयोगाची अंमलबजावणी करतील, अशी भीती सेन्सॉर बोर्डाला वाटते आहे की काय! अन्यथा दहा सेकंदांचे चुंबन योग्य आणि चाळीस सेकंदांचे म्हणजे संस्कृती बुडाली, हे कसे काय ठरले? नपेक्षा यापुढील काळात भारतात प्रदर्शित होणाऱ्या बाँडपटात जेम्स आणि त्याची मदनिका यांचे ओठ एकमेकांजवळ आले रे आले, की सरळ दोन सूर्यफुलं एकमेकांवर आपटून किंवा पोपट-पोपटीण किंवा कबुतर-मैना चोचीत चोच घालताना दाखवून काय ते सूचित करावं म्हणजे झालं! अरे, काय चाललंय काय!
सेन्सॉर बोर्डाचे नक्की काम काय आहे? आजच्या काळात त्याची उपयुक्तता खरोखर राहिली आहे काय? विशेषतः सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात वेगवेगळ्या प्रकारची माहिती आणि कित्येक प्रकारच्या चित्रफिती सहजी उपलब्ध असताना सेन्सॉर बोर्ड कशाकशाला कात्री लावणार आहे? माहितीचा विस्फोट होत असताना आणि सामाजिक स्तरावर आपण प्रचंड व्यक्तिस्वातंत्र्यवादी होत चाललो असताना सेन्सॉर बोर्ड बरोब्बर दुसऱ्या दिशेला का निघाले आहे? सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे कोणाच्या इशाऱ्यावरून सेन्सॉर बोर्डाचे हे संस्कार वर्ग सुरू आहेत? सध्या असे अनेक प्रश्न आणि प्रश्न अनेकांना पडले आहेत.
आपल्या विशालकाय आणि वैविध्यानं भरलेल्या देशात अनेक रूढी-परंपरा, चाली-रीती, प्रथा अस्तित्वात आहेत. नकळत त्यांना धक्का लागू नये आणि देशाच्या सामाजिक ऐक्याला तडे बसू नयेत याची काळजी घेतली जाते. देशाचे सार्वभौमत्व आणि देशासाठी महत्त्वाची प्रतीकं असलेल्या गोष्टींना धक्का बसू नये हेही पाहावं लागतं. हे सगळं मान्य. त्यातूनच सेन्सॉर बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांची मांडणी झाली. गेल्या ६४ वर्षांपासून या नियमावलीचा आधार घेऊन आपल्याकडे सिनेमे प्रदर्शित केले जात आहेत. एकूण चार गटांत सिनेमाची वर्गवारी केली जाते. म्हणजेच चार प्रकारची प्रमाणपत्रे दिली जातात. यातील ‘यू’ (युनिव्हर्सल) म्हणजे सर्व प्रकारच्या प्रेक्षकांसाठी, ‘ए’ (अॅडल्ट) म्हणजे केवळ प्रौढांसाठी, ‘यूए’ म्हणजे मोठ्यांच्या मार्गदर्शनाखालीच मुलांनी पाहायचे आणि ‘एस’ म्हणजे काही विशिष्ट व्यक्ती किंवा समुदायासाठीच मान्य असलेले!
सेन्सॉर बोर्डाचे सदस्य संबंधित सिनेमा पाहतात आणि त्याला कुठले प्रमाणपत्र दिले जाऊ शकते, हे ठरवतात. त्यासाठी त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेणे गरजेचे आहे. वादाचा मुद्दा असा आहे, की यातील अनेक मार्गदर्शक तत्त्वे अत्यंत ढोबळ स्वरूपात लिहिलेली आहेत. त्यामुळे त्याचा अन्वयार्थ लावणे ही गोष्ट अगदीच व्यक्तिसापेक्ष होऊन जाते. उदा. ‘चित्रपटात लैंगिक दृश्ये दाखवूच नयेत; पण कथाभागात अनिवार्य म्हणून दाखवायचेच असतील, तर कमीत कमी असावीत आणि कुठलेही तपशील दाखवू नयेत,’ अशी एक मार्गदर्शक सूचना आहे. आता कमीत कमी म्हणजे किती आणि तपशील दाखवू नयेत म्हणजे कुठले दाखवू नयेत, हे कोण कसं ठरवणार? थोडक्यात, तेव्हा बोर्डावर संबंधित सिनेमा पाहणारे जे सदस्य असतील, ते त्यांच्या आकलनानुसार, त्यांच्यावरील ‘संस्कारां’नुसार हे ठरवणार. थोडक्यात, एका राजवटीत ‘पुरोगामी’ सदस्यांना सुंदर दिसलेले प्रणयदृश्य पुढच्या राजवटीतील ‘संस्कारी’ सदस्यांना भयंकर अश्लील वाटणार!
सेन्सॉर बोर्डाच्या दुटप्पीपणाची उदाहरणे तरी किती द्यावीत! जेम्स बॉँडच्या सिनेमातले चुंबनदृश्य खटकणाऱ्या संस्कार बोर्डाला ‘डबलसीट’ या मराठी सिनेमात धाडकन अन् अगदी अनपेक्षितपणे येणारे अंकुश-मुक्ता बर्वेचे चुंबनदृश्य कसे खटकले नाही? खरं तर बाँडपट पाहायला जाणारा प्रेक्षक आणि ‘डबलसीट’ सारखा मराठी चित्रपट पाहायला येणारा प्रेक्षक यात काही फरक आहे, हे तरी सेन्सॉर बोर्डाने मान्य करावे. ‘फक्त प्रौढांसाठी’ असे सर्टिफिकेट असलेले इंग्लिश सिनेमे पाहायला जाणाऱ्या प्रेक्षकांना त्यात कसली दृश्यं असणार हे नीटच माहिती असतं. मात्र, ‘डबलसीट’सारख्या (‘यू’ सर्टिफिकेट होतं त्याला!) मराठी सिनेमाला लहान मुले घेऊन आलेली कित्येक मंडळी अंकुश-मुक्ताच्या त्या मुक्त चुंबनदृश्यानंतर बसल्या जागी थिजली होती, हे मी स्वतः अनुभवलं आहे. याचा अर्थ तुमची कात्री जिथं चालायला हवी तिथं चालत नाही आणि बाँडचा कसला किस पाडताय? 
 शिवाय ही कात्री फक्त प्रणय किंवा चुंबनदृश्यांवरच चालायला हवी असं काही नाही. मर्डर-२ नावाच्या एका हिंस्र सिनेमात खलनायक एका तरुणीचा डोक्यात खिळा ठोकून खून करतो, हे दृश्य आणि त्यातले अगदी ओंगळवाणे, हिडीस तपशील पाहून (अगदी जागतिक सिनेमे पाहणारा) माझ्यासारखा माणूसही गरगरून गेला होता. त्या सिनेमाला फक्त प्रौढांसाठी असं प्रमाणपत्र असलं, तरी काय झालं?
बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्व क्र. २ (x) मध्ये, ‘महिलांविरुद्ध लैंगिक अत्याचाराचे उदा. बलात्काराचा प्रयत्न, बलात्कार किंवा अन्य कुठल्याही स्वरूपाचा अत्याचार किंवा तत्सम स्वरूपाचे कुठलेही दृश्य टाळण्यात यावे, कथेची गरज म्हणून ते आवश्यकच असल्यास ते अगदी कमीत कमी ठेवावे आणि तपशील दाखवू नयेत,’ असं स्पष्टपणे म्हटलं आहे. या तत्त्वाचा त्या ठिकाणी सरळ भंग झाला होता. याशिवाय ‘गज़नी’सारख्या सिनेमात नायक-नायिकेच्या डोक्यात लोखंडी रॉडने जोरदार आघात करून खलनायकाने त्यांना मारलं होतं, ते कुठले संस्कार होते? अलीकडेच ‘तितली’ नावाचा सिनेमा आला होता. तो मला पाहायचा होता; पण जाणकारांनी केलेलं त्यातल्या हिंसेचं टोकाचं वर्णन वाचूनच मला शहारा आला आणि मी तो अद्याप पाहण्याचं धैर्य करू शकलेलो नाही. ‘एनएच-१०’ या अनुष्का शर्माच्या सिनेमातही त्या जोडप्याला ज्या पद्धतीनं जंगलात मारलेलं दाखवलं आहे, हे कसं काय सेन्सॉर बोर्डाला चालतं? की या हिंसेच्या मार्गावरच त्यांची पुरेपूर श्रद्धा आहे?
 अगदी काल-परवा पाहिलेल्या ‘तमाशा’ या सिनेमातही काही संवादांच्या जागी ‘बीप बीप’ ऐकू आलं आणि हसूच आवरेना. एका विनोदी दृश्यात दीपिका रणबीरसमोर कॉलगर्ल असल्याचं नाटक करते आणि काही संवाद म्हणते. त्या प्रत्येक संवादाला ‘बीप’ वाजलं. नंतर रणबीर कपूरच्या काही संवादांना ‘बीप’ वाजलं. हे शब्द सेन्सॉर करायचे तर त्या दृश्यांमधील गंमतच निघून जाते, हे ‘संस्कार बोर्डा’ला कळत नाही काय! शिवाय यातून प्रेक्षकांवर कुसंस्कार घडणार असतील, तर ते दृश्यच काढून टाकायचे ना! आता ‘अपना हाथ (बीप बीप)...’ किंवा ‘दिन में सिस्टर और रात में (बीप बीप)...’ असं रणबीर म्हणाला, तेव्हा तो ‘बीप बीप’च्या जागी काय म्हणाला, ते सर्व प्रेक्षकांना कळलंच. मग ‘बीप’ला अर्थ काय उरला? तेव्हा हे असलं दुटप्पी वागणं सेन्सॉर बोर्डानं तातडीनं थांबवायला हवं.
सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचा नव्यानं विचार करण्याची गरज आहे. वास्तविक बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये समाजाच्या बदलत्या अभिरुचीशी सुसंगत निर्णय घेण्यासंबंधी एक वाक्य आहे. शिवाय कुठल्याही परिस्थितीत कलात्मक अभिव्यक्ती दबता कामा नये, याचीही काळजी घेण्याची सूचना आहे. पूर्वीच्या काळी कुणी तरी जाणत्या, शहाण्या माणसांनीच ही तत्त्वं तयार केली असणार. खरं तर स्वतःची थोडी बुद्धी, थोडं तारतम्य वापरून ती तत्त्वं पाळली तरी पुरेसं आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देऊन आपण आपल्या संस्थांच्या स्वायत्तपणाचा जो काही चुथडा करीत आहोत, तो केवळ अलौकिक आहे.
स्वतःचे राजकीय कार्यक्रम कुणी या चित्रपट माध्यमाचा किंवा त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सेन्सॉरसारख्या संस्थेच्या माध्यमाचा वापर करून राबवीत असेल, तर त्यांना वेळीच रोखण्याची आवश्यकता आहे. अन्यथा संस्कार बोर्डाचे बकवास ‘बीप बीप’ ऐकत बसण्याशिवाय जाणत्या चित्ररसिकांच्या हाती दुसरं काहीच उरणार नाही.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे; २९ नोव्हेंबर २०१५)
---

14 Nov 2015

चाळिशी नामक 'बुंदीचा लाडू'...

चाळिशी नामक 'बुंदीचा लाडू'...
------------------------------------




माणसाला विशी आणि मिशी बरोबरच येते म्हणतात. तशी सोळाव्या वर्षी लव फुटते. पण भरघोस मिशी विशीतच येऊ शकते. चाळिशीबरोबर काय येतं हे ठाऊक नाही. पूर्वी या वयात जो चष्मा लागायचा त्याला चाळिशी असंच म्हणत. हल्ली चार वर्षे वयाच्या मुलालाही चष्मा लागतो. त्यामुळं त्या चाळिशीचा या चाळिशीशी आता संबंध जोडणं योग्य नाही. माझ्यासाठी तरी ही चाळिशी म्हणजे एक नवी ट्वेंटी-२० आहे.
विशीत आपण जसे असतो, तसेच चाळिशीत असतो म्हणतात. विशीत उत्साहानं सळसळणारं यौवन शरीरातून उसळ्या मारत असतं. सगळं जग आपण पादाक्रांत करू शकतो, अशी भावना मनात असते. मन बंडखोर असतं. प्रस्थापित गोष्टी मान्य नसतात. नवं काही तरी करावंसं वाटत असतं. पंधरा ते पंचवीस या वयोगटाला विशीचा वयोगट म्हटलं पाहिजे. या वयोगटात आपण भलतेच स्वप्नाळू तरी असतो किंवा अतिशहाणे तरी असतो. शरीरातून तथाकथित अकलेचे कोंब नको तिथून फुटून बाहेर डोकावत असतात. पण तरी शारीरिकदृष्ट्या आपला हा सर्वोत्तम काळ असतो, असं म्हणायला हरकत नाही. आपण काहीही खाऊ शकतो, पिऊ शकतो, पचवू शकतो. कुठंही हिंडू शकतो, कुठंही राहू शकतो.... एकटं भटकू शकतो. कशाची भीती म्हणून वाटत नाही. पहिलेपणाचे अनेक अनुभव या काळात आपल्या गाठोड्यात जमा होत असतात. वयात येण्याच्या पहिल्या अनुभवापासून ते पहिल्या चुंबनापर्यंत (काहींच्या बाबतीत तर त्याहीपुढे) पहिलेपणाचं नवथर संचित साचत जातं या काळात. आपण आयुष्यात पुढं काय होणार, याचा थोडा फार अंदाज येतो. तरीही जगाच्या दृष्टीनं अजून आपण 'सेटल' झालेले नसल्यानं आपण 'लहान बाळं'च असतो. तरी आयुष्यातला हा सर्वांत धमाल काळ म्हणायला हरकत नाही. थोडक्यात आयुष्य हे माउंट एव्हरेस्ट असेल, तर हा काळ म्हणजे आपला बेस कॅम्प असतो, असं म्हणायला हरकत नाही. (क्रिकेटच्या भाषेत सांगायचं, तर या काळात आपण किमान रणजी सामने खेळू लागतो. 'कसोटी' अजून दूर असते!)
मग येते तिशी... म्हणजे माझ्यासाठी २५ ते ३५ हा वयोगट. आयुष्यात तुम्हाला सर्वार्थानं स्थिर करणारा, सेटल करणारा कालखंड. आपण कोण होणार आयुष्यात, हे याच काळात नक्की ठरतं. करिअर एक तर मार्गी लागतं किंवा त्याची वाट तरी लागते. पण काही तरी निश्चित होतं. करिअर मार्गी लागलं, असं वाटलं, की मग लग्न होतं. एकाचे दोन होतात. दोनाचे चार हात होतात. आपलं जगणं फक्त आपलं राहत नाही. तिथं आयुष्यभराचा जोडीदार साथीला येतो. मग सगळी सुखं-दुःखं दोघांची होतात. आपलं घरही याच काळात होतं. गावभर पाखरांमागं उंडारणारं लेकरू संध्याकाळच्याला गपचिप घरला येऊ लागतं. पोळी-भाजी, आमटी-भात खाऊन गप पडून राहतं. पण त्याला घराकडं चुंबकासारखी खेचणारी त्याची फॅमिली नावाची संस्था तिथं अस्तित्वात आलेली असते हे महत्त्वाचं. थोडक्यात, हा काळ उभारणीचा असतो. विशी म्हणजे घराचं जोतं असेल, तर तिशी म्हणजे भिंती आणि वरचा स्लॅब असते. त्यामुळं या काळात विश्रांती घ्यायला वाव नसतो. आपण अथकपणे पळत असतो. ऑफिसात किंवा व्यवसायात आता आपण थोडे सीनियर झालेलो असतो. त्यामुळं स्वाभाविकच आपल्याकडून अधिक जबाबदारीची अपेक्षा केली जाते. तिथली आव्हानं आणि स्वतःचं घर घेणं, स्वतःची फॅमिली सुरू करणं हे सगळे उभारणीचे प्रयोग याच काळात केले जातात. गिर्यारोहणाच्या भाषेत सांगायचं तर बेस कॅम्पनंतरचा हा मुक्काम असतो. अजून शिखर दूर असतं... पण निम्मा रस्ता आपण जवळपास पादाक्रांत केलेला असतो.
यानंतर येते ती चाळिशी. म्हणजे माझ्या लेखी ३५ ते ४५ हा टप्पा. प्रत्यक्ष वयाची ४० वर्षं पूर्ण होणं म्हणजे या टप्प्यातलाही निम्मा प्रवास संपणं. पण चाळिशी या गटात राहायला अजून पाच वर्षं नक्की हातात असणं. मी ट्वेंटी-२० चा मघाशी उल्लेख केला तो याच कारणासाठी. पूर्वीचं आयुष्यमान जमेस धरलं असतं, तर चाळिशी पूर्ण केलेला माणूस आयुष्याचा निम्मा टप्पा निश्चितच पार केलेला माणूस असं आपण म्हटलं असतं. पण सध्याचं वाढतं आयुष्यमान पाहता मी आणखी पाच वर्षं या टप्प्यात ग्रेस म्हणून देऊ शकतो. थोडक्यात, ४५ वयाचे होईपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याचा निम्मा टप्पा संपला आहे, असं समजायचं कारण नाही. शिवाय आपण त्याकडं कसं पाहतो, यावरही हे अवलंबून आहेच. तर ही पाच वर्षं जमेची हातात आहेत, असं धरलं तर मात्र पुढचा काळ अक्षरशः टी-२० सारखाच खेळावं लागणार आहे, हे निश्चित.
तिशीतल्या आयुष्यानं आपल्याला सेटल केल्यानंतर पुन्हा एक थोडी आरामाची, निश्चिंततेची फेज येते आयुष्यात. तेव्हा असं वाटतं, की विशीमध्ये जे जगायला मिळालं नाही, ते आता जगू या. कारण तारुण्य कायम असतं आणि सेटल होण्यातले महत्त्वाचे टप्पेही पार झालेले असतात. मुलं असतील, तर तीही मोठी झालेली असतात. आपणही करिअरच्या अशा टप्प्यावर आलेले असतो, की तिथून फक्त पुढची शिखरं दिसत असतात. परतीचा मार्ग बंदच झालेला असतो. तेव्हा या काळात ट्वेंटी-२० सारखी तुफान फटकेबाजी करून आयुष्यात जे काही अल्टिमेट साध्य करायचंय त्या ध्येयाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. यासाठी ही चाळिशी आणि पुढची पाच वर्षं महत्त्वाची. पंचेचाळिशीनंतर मात्र आपण निश्चितपणे उताराला लागतो, असं म्हणायला हरकत नाही. अर्थात त्यानंतरही तुम्ही कर्तृत्व गाजवू शकताच. बोमन इराणीचं उदाहरण आपल्यासमोर आहेच. इतरही अनेक उदाहरणं असतील.
आणखी एक सांगायचं तर चाळिशीची एक मजा काही वेगळीच आहे. या वयात विवाहबंधनाच्या गाठी पुन्हा पुन्हा घट्ट करण्याचेही प्रसंग येत असतात. पस्तिशीतल्या स्त्रीला एका मराठी चित्रपटात 'बर्फी' असं संबोधण्यात आलं होतं. (आणि ते किती चपखल आहे, हे सांगायला नकोच.) मग पुरुषांनीच काय घोडं मारलंय? पस्तिशीतल्या किंवा चाळिशीतल्या पुरुषाला बुंदीचा लाडू म्हणण्यात यावं. हा लाडू चांगला मुरलेला असतो आणि चवीला तर माशाल्लाह!
हल्लीचा काळ तर असा आहे, की लोक घरचे पदार्थ सोडून बाहेरच बर्फी आणि लाडू खात बसले आहेत की काय, असं वाटावं. चाळिशीतल्या 'प्रमुख आकर्षणां'मधलं हे एक आकर्षण आहे. (फक्त अशा वेळी आपल्या घरच्या बर्फीवरही बाहेरचे बोके ताव मारू शकतात एवढं लक्षात ठेवावं.) बाकी यातला गमतीचा भाग सोडला, तर जेंडर बायस न ठेवता सर्वांशीच मैत्री करण्याचे आणि ती करता करता बर्फीवरून किंवा लाडवावरून घसरून पडण्याचेही हे दिवस असतात. माणसाला असा घसरणीचा मोह होऊ नये, यासाठीच या वयोगटासाठी खास डायबेटिसची योजना झाली असावी. फार गोड खाल्लंत तर पुढं आयुष्यभर ते वर्ज्य करावं लागतं, एवढा सूचक संदेश इथं पुरे.
आता थोडं स्वतःविषयी. चाळिशी आली तरी अस्मादिकांना अद्याप 'चाळिशी' लागलेली नाही. ('टच वूड'! मेल्याची 'नजर' आणि 'दृष्टी' दोन्ही चांगली आहे आणि तशीच राहो!) 'कृतान्तकटकामलध्वजा दिसो लागली' असली, तरी त्यामुळं चेहऱ्यावर एक विनाकारण मॅच्युअर व्यक्ती वगैरे असल्याचा भाव आलेला आहे. साखरेची बाधा झाली असली, तरी अस्मादिक भयंकर शिस्तीचे वगैरे असल्यानं ती बाजू भक्कमपणे लढतील यात शंका नाही.
आता महत्त्वाचं... जगण्याचं प्रयोजन शोधण्याचा प्रयत्न गेलं दशकभर तरी सुरू आहे. शेवटी अशा निष्कर्षाप्रत आलो आहोत, की लेखणी हेच आपलं भागधेय आणि लेखन हेच आपल्या जगण्याचं प्रयोजन. आपल्या लेखणीतून सर्वांना निखळ आनंद मिळावा एवढीच इच्छा. अशाच इच्छेतून झालेल्या पहिल्या-वहिल्या लिखाणाचं पहिलं-वहिलं पुस्तक - कॉफीशॉप - लवकरच, म्हणजे येत्या २० डिसेंबरला पुण्यात प्रकाशित करतोय. जगण्याचा उत्सव साजरं करणारं हे लिखाण आहे, असं मला वाटतं. निराशा, दुःख, चिंता, द्वेष आदी गोष्टींना माझ्या व्यक्तिमत्त्वात थारा नाही. तसाच तो माझ्या लिखाणातही नाही. त्यामुळं ते वाचून कुणाला चार घटका निर्भेळ आनंद मिळाला असेल (आणि तो मिळतो असं सांगणारे सुदैवानं खूप जण भेटले...) तर आणखी काय हवं?
आता मी 'वैशाली'तल्या आमच्या लाडक्या कडक कॉफीसारखं ताजतवानं जगायला या टप्प्यावर पुन्हा सिद्ध झालो आहे. माझ्या हातात हात गुंफून, माझे लेख वाचत वाचत तुम्हीही या आनंदसफरीवर यायचंच आहे...
आज इतकंच...
----

12 Nov 2015

कट्यार काळजात घुसली

'कट्यार' काळजात घुसलीच!
----------------------------------


'कट्यार काळजात घुसली...' हे मराठी रसिकांच्या काळजात घुसून तिथंच अजरामर झालेलं संगीत नाटक. रंगभूमीचे 'मास्तर' पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि प्रतिभाशाली, प्रयोगशील संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या अद्वितीय संगीतानं नटलेलं हे नाटक त्यातल्या अंगभूत नाट्यमयतेनं आणि वेगळ्या धर्तीच्या संगीतामुळं रसिकांच्या पसंतीस उतरलं. याच नाटकावर आधारित 'कट्यार काळजात घुसली' याच शीर्षकाचा सुबोध भावे दिग्दर्शित नवा मराठी चित्रपटही या नाटकाप्रमाणंच आपल्या काळजात घुसतोच! नव्या-जुन्यांचा सुरेख मिलाफ करीत, सुबोधनं माध्यमांतराचं हे आव्हान यशस्वीरीत्या पेलल्याचं, सिनेमा संपल्यानंतर पडणाऱ्या उत्स्फूर्त टाळ्यांच्या कडकडाटानं सिद्ध होतं.

विश्रामपूर या ब्रिटिशकालीन संस्थानात राजाश्रय मिळालेले ज्येष्ठ-श्रेष्ठ गायक पं. भानुशंकर शास्त्री आणि त्यांनीच मिरजेहून विश्रामपूरला आणलेले दुसरे गायक उस्ताद आफताब हुसेन बरेलीवाले उर्फ खाँसाहेब यांच्यातील संघर्षाची, घराण्यांतल्या स्पर्धेची, वैमनस्याची ही कथा आहे. त्याहीपेक्षा ती कलाकाराच्या 'अहं'शी त्याची स्वतःचीच चाललेली स्पर्धा आहे. एक सच्चा, अंतःकरणापासून उमटलेला सूरच हा अहं मिटवू शकतो. त्याला प्रत्यक्षातल्या कट्यारीची गरज नसते, असा संदेश हा सिनेमा देतो. गायक आणि दोन घराण्यांची कथित स्पर्धा असा विषय असल्यानं या नाटकात वैविध्यपूर्ण संगीताला वाव होता. पं. जितेंद्र अभिषेकींनी त्यांच्या प्रयोगशील वृत्तीने यात रंग भरले. पं. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या कसलेल्या गायकाने तेव्हा खाँसाहेबांची भूमिका करून रसिकांना भरभरून आपल्या गायकीचा आनंद दिला. नंतरही या नाटकाचे आव्हान अनेक रंगकर्मींना खुणावत राहिले. अजूनही या नाटकाचे प्रयोग धडाक्यात सुरू असतात. अशा या नाटकाचं माध्यमांतर करताना दोन आव्हानं होती. एक तर भूमिकांना न्याय देणारे योग्य कलाकार निवडणं आणि दुसरं म्हणजे या कलाकृतीचा आत्मा असलेलं संगीत त्याच दर्जाचं कायम ठेवणं. सुबोध या दोन्ही परीक्षांना उतरला आहे.
खाँसाहेबांच्या भूमिकेत सचिनची निवड अनेकांना आश्चर्यकारक आणि काहीशी अनपेक्षित वाटली होती. मीही त्याला अपवाद नव्हतो. मात्र, प्रत्यक्ष पडद्यावर सचिनचं काम पाहिल्यावर आपलं हे मत सपशेल चुकलं, हे मी कबूल करतो. सचिननं खाँसाहेबांच्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे. सचिन मूळचा गायक असल्यानं त्याला ही भूमिका साकारताना फायदा झाला असणार. शिवाय या भूमिकेला आधी न्यूनगंडाची आणि नंतर त्यातून आलेल्या अहंगंडाची जी गडद छटा आहे, ती साकारणं सचिनला सोपंच गेलं असणार. अर्थात कारणं काहीही असली, तरी प्रत्यक्ष पडद्यावरचा त्याचा परफॉर्मन्स त्याच्या सर्व टीकाकारांना गप्प बसवणारा आहे, यात वादच नाही. दुसरी महत्त्वाची भूमिका पं. शास्त्रींची. याही भूमिकेसाठी शंकर महादेवन या गुणी गायकाची निवड अशीच अनपेक्षित होती. मात्र, शंकरनंही ही भूमिका तन्मयतेनं साकारलीय आणि त्याची ही पहिलीच भूमिका आहे, हे कुठंही जाणवू दिलेलं नाही. हेही दिग्दर्शकाचंच यश. तिसरी महत्त्वाची भूमिका अर्थातच सदाशिवची. ती स्वतः सुबोधनं केली आहे. या भूमिकेच्या सर्व बारीकसारीक छटा त्यानं प्रत्ययकारकतेनं सादर केल्या आहेत.
यातला सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे संगीताचा. सुबोधनं यातही प्रयोग केला आहे. त्यानं काही रचना चालीसकट मूळ नाटकातल्या ठेवल्या आहेत, तर काही रचना पूर्णपणे नव्यानं केल्या आहेत. 'कट्यार...'ला जन्मापासूनच या सर्जनशील प्रयोगशीलतेची सवय आहे. त्यामुळं हा नवा प्रयोगही या कलाकृतीच्या स्वभावधर्माला धरूनच झाला. आणि सांगायला आनंद होतो, की तो प्रयोगही अत्यंत सुरेल ठरला आहे. पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीताएवढंच प्रयोगशील संगीत शंकर-एहसान-लॉय या त्रिकुटानं दिलं आहे. उदा. मूळ नाटकात असलेल्या या भवनातील गीत पुराणे या पदाऐवजी सिनेमात सचिनच्या तोंडी एक हिंदी-उर्दू रचना देण्यात आली आहे. याशिवाय 'सूर निरागस हो' हे छान गाणं आणि कव्वालीही वेगळी. लागी कलेजवां कटार ही रचना यात अभिषेकीबुवांच्याच आवाजात पार्श्वसंगीतासारखी वापरण्यात आली आहे. शंकर महादेवन यांच्या भूमिकेला अर्थातच त्यांचा स्वतःचा आवाज, सचिन यांना राहुल देशपांडे यांचा, तर सदाशिवला महेश काळे यांचा आवाज वापरण्यात आला आहे. हे तिघेही आजचे तयारीचे, कसदार, सुरेल गळ्याचे गायक असल्यानं सिनेमा पाहताना (किंवा खरं तर ऐकताना) मूळ नाटकाएवढाच श्रवणानंद मिळतो, हे आवर्जून सांगायला हवं.

नाटकाचं माध्यमांतर करताना अनेकदा पडद्यावर नाटकच पाहत असल्याचा भास होतो. सुबोध हा दोन्ही माध्यमांत संचार करणारा असल्यानं त्यानं हे पडद्यावरचं नाटक वाटणार नाही, याची काळजी घेतली आहे. एक तर कट्यार स्वतःच या गोष्टीचं निवेदन (आवाज रिमा यांचा) करते, असं दाखवून सुबोधनं बरंच काम सोपं केलं आहे. मूळ नाटकात नसलेलं खाँसाहेबांच्या बेगमचं पात्र इथं प्रत्यक्ष दाखवण्यात आलं आहे. शिवाय पं. शास्त्री आणि छोटा सदाशिव काजवे पकडायला जातात, तो प्रसंग आणि शास्त्रीबुवा त्या काजव्यांनी भरलेली मशाल छोट्या सदाशिवच्या हाती देतात, हा सूचक प्रसंग दिग्दर्शकाला दाद द्यावी असाच. याशिवाय खाँसाहेब शास्त्रीबुवांच्या हवेलीत राहायला जातात, तेव्हा ते झरीनाला एकेक दार-खिडकी बंद करायला सांगतात तो प्रसंगही सिनेमा माध्यमाची ताकद सांगणारा. तलावाच्या काठी कविराज (पुष्कर श्रोत्री) सदाशिवला विद्या आणि कला यातला फरक समजावून सांगतो, तो प्रसंगही असाच दाद मिळविणारा झाला आहे. 'वाह...' म्हणायला लावणारे असे अनेक छोटे-मोठे प्रसंग यात आहेत.
सिनेमाचा पूर्वार्ध शास्त्रीबुवा आणि खाँसाहेब यांच्यातील मैत्री, मग जुगलबंदी आणि मग खाँसाहेबांची वाढती ईर्षा यामुळं अत्यंत वेगवान झाला आहे. मध्यंतराच्या काही वेळापूर्वी सदाशिवचं आगमन होतं आणि मग नव्या संघर्षाची नांदी होऊन मध्यांतर होतो. इथपर्यंत सिनेमा विलक्षण उंचीवर जातो. त्रुटीच काढायची तर उत्तरार्ध ही उंची आणखी फार वाढवत नाही, एवढीच म्हणावी लागेल. शिवाय उत्तरार्धात काही ठिकाणी सिनेमा थबकतो, संथ होतो. दीर्घकाळ खाँसाहेबांचं दर्शन होत नाही. पण शेवटी तो लवकरच पुन्हा पूर्वपदावर येतो आणि शेवटपर्यंत रंगत जातो.
चित्रपटाची निर्मितीमूल्ये अत्यंत उच्च दर्जाची आहेत. राजदरबारातील सर्व दृश्ये अप्रतिम. सिनेमॅटोग्राफी (सुधीर पलसाने) आणि ध्वनिसंयोजन (अनमोल भावे) अव्वल दर्जाचं. सर्व कलाकारांची कामं उत्तम झाली आहेत. शंकर, सचिन आणि सुबोधचा वर उल्लेख झालाच आहे. अमृता खानविलकरनंही झरीनाच्या भूमिकेत जान ओतली आहे. उमाच्या भूमिकेत मृण्मयी देशपांडेनं सदाशिववरचं अव्यक्त प्रेम छान दर्शवलं आहे.
तेव्हा अजिबात न चुकवावा असाच हा देखणा स्वरानुभव आहे.

--
दर्जा - चार स्टार
---