15 Feb 2015

वर्ल्ड कप क्रिकेट विशेष

ते फक्त क्रिकेट नव्हतं...
----------------------------



शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर सर्व वृत्तपत्रांत वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाचे फोटो आणि बातम्या पाहिल्यानंतर वर्ल्ड कपचा ज्वर माझ्या अंगात चढू लागला. नाही तर तोपर्यंत यंदा वर्ल्ड कप आहे की नाही असंच वाटत होतं. काही तरी चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं. टीव्ही लावला. एचडी स्पोर्टस चॅनेल सुरू केलं. हे चॅनेलवाले हुशार आहेत. त्यांना माझं दुखणं नेमकं कळलं बहुतेक. टीव्हीवर ‘बॅटल रोयाल’ नावाचा कार्यक्रम सुरू होता. भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधल्या वर्ल्ड कपमधल्या लढती त्यात क्षणचित्रांच्या रूपानं दाखवत होते. १९९२ पासूनचे ते सामने पाहत पाहत मी टीव्हीलाच खिळून राहिलो. आता अंगात पूर्ण ज्वर भिनला होता. भारत-पाकिस्तान यांच्यात वर्ल्ड कपमध्ये झालेल्या सर्व लढती आपण जिंकल्या आहेत आणि या सामन्यांचं वारंवार प्रक्षेपण करणं या चॅनेलवाल्यांना किती आवश्यक आहे वगैरे मला सगळं कळत होतं. आजच्या, रविवारच्या भारत वि. पाकिस्तान या महामुकाबल्याची पूर्वतयारी म्हणून हे सगळं मार्केटिंग गिमिक चाललं आहे, हेही मेंदू ओरडून सांगत होता. पण मनाला ते मान्य नव्हतं... ते केव्हाच भूतकाळात पोचलं होतं. कारण माझ्यासाठी, आमच्या पिढीसाठी हे वन-डे क्रिकेट फक्त क्रिकेट नव्हतं... त्यापेक्षा काही तरी होतं. अधिक जिवंत, अधिक संवेदनशील, अधिक रसरशीत असं ते काही तरी होतं... क्रिकेटचा आणि आमचा असा संबंध होता. म्हणून तर मग त्या क्षणचित्रांमधले सगळे रोमांचक प्रसंग डोळ्यांसमोर काल घडल्यासारखे भरभर उभे राहत गेले.

मग त्या मियाँदादच्या माकडउड्या असोत, बंगळूरमध्ये प्रसादनं चिडक्या आमीर सोहेलची काढलेली ऑफस्टंपची दांडी असो... सचिननं थर्डमॅनच्या डोक्यावरून भिरकावून दिलेला शोएब अख्तर असो, की मागच्या वर्ल्ड कपच्या वेळी मोहालीत मिळवलेला पाचवा सफाईदार विजय असो... सगळी दृश्यं डोळ्यांसमोर उभी राहिली... या प्रत्येक सामन्यात सचिन नावाचा एक थोर माणूस कसा हिरिरीनं सहभागी होत होता ते दिसू लागलं... त्याचं प्रत्येक दृश्य डोळे ओले करू लागलं... कारण खरंच ते माझ्यासाठी, माझ्या पिढीसाठी फक्त क्रिकेट नव्हतं. आमच्या चिमुकल्या, मध्यमवर्गीय, सामान्य आयुष्यात कसल्याकसल्या आशा-आकांक्षांची ठिणगी पेटवणारं ते काही तरी भन्नाट स्पिरीट होतं...
माझा जन्म १९७५ चा. म्हणजेच वर्ल्ड कपचा आणि माझा जन्म एकाच वर्षातला. मला पहिले तिन्ही वर्ल्ड कप आठवत नाहीत. पहिले दोन न आठवणं स्वाभाविक आहे. पण १९८१-८२ च्या काही घटना (उदा. आशियाई स्पर्धा) लख्ख आठवत असूनही १९८३ चा वर्ल्ड कप मला अजिबात आठवत नाही. तेव्हा मी काय करत होतो देव जाणे. पण वयाच्या आठव्या वर्षातला हा कप मला मुळीच आठवत नाही, हे फार मोठं शल्य आजही वाटतं हे खरं. तेव्हा टीव्ही घरात नव्हता; पण पेपर तर येत होता. तरीही काहीच लक्षात नाही. पण नंतर लगेच ऑस्ट्रेलियात झालेली बेन्सन अँड हेजेस मिनी वर्ल्ड कप स्पर्धा आठवते. ही स्पर्धाही आपण जिंकली. तीही फायनलमध्ये पाकिस्तानला हरवून. रवी शास्त्रीला मिळालेली ऑडी आणि त्यानं मैदानातून त्या गाडीतून मारलेली फेरी मात्र लख्ख लक्षात आहे. मग शारजातील ती चेतन शर्मानं घालवलेली ऐतिहासिक मॅच. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कायमचा न्यूनगंड देणारी. त्यानंतर पुढचा वर्ल्ड कप १९८७ मध्ये भारतातच भरला. रिलायन्स वर्ल्ड कप नाव होतं त्याचं. आमचा हिरो गावसकरचा हा शेवटचा वर्ल्ड कप. पहिल्या वर्ल्ड कपमध्ये ६० ओव्हरमध्ये नाबाद ३६ धावांचा कुख्यात विक्रम करणाऱ्या सुनीलनं नागपुरात न्यूझीलंडची पिसं काढून चेंडूला एका धावेपेक्षा जास्त (तेव्हाच्या मानानं खूपच चांगल्या) अशा सरासरीनं शतक (त्याचं पहिलं आणि वन-डेमधलं एकमेव) ठोकलेलं अजूनही लक्षात आहे. आणि याच स्पर्धेत तिकडं कराचीत तेव्हाच्या दुबळ्या श्रीलंकेला झोडपून काढत, आमचा दुसरा हिरो व्हिव रिचर्डसनं कुटलेल्या १८९ धावा आणि वेस्ट इंडिजनं उभारलेला ३६० धावांचा डोंगरही चांगलाच लक्षात आहे. तेव्हा २२५-२५० धावा झाल्या तरी खूप चांगला स्कोअर झाला, असं मानण्याच्या काळात ३६० ही फारच मोठी धावसंख्या होती. त्याच स्पर्धेत मग मुंबईतला तो कुप्रसिद्ध उपान्त्य सामना. दिलीप वेंगसरकर त्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यानं आदल्या दिवशी बांगडा खाल्ल्यानं त्याचं पोट बिघडलं होतं म्हणे. सनीही घरच्या मैदानावर लवकर बाद झाला. नंतर गूच आणि गॅटिंगनं शास्त्री आणि मनिंदरच्या डावऱ्या फिरकीवर स्वीपमागून स्वीप मारून भारताला स्पर्धेतून पार झाडून टाकलं. (त्यानंतर झाडूचा एवढा सफाईदार उपयोग केवळ आत्ता दिल्लीच्या निवडणुकीतच पाहायला मिळाला. असो.) तेव्हाच्या त्या कृष्णधवल आठवणींत वानखेडेवर बॉलबॉयचं काम करणारा सचिन नावाचा पोरगा कुणाच्याही लक्षात राहणं शक्यच नव्हतं. त्या स्पर्धेत भारताचं स्वप्न सेमी-फायनलमध्येच भंगलं आणि इडन गार्डन्सवर ॲलन बोर्डरच्या ऑस्ट्रेलिया संघाच्या रूपानं क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळाला.
नंतर १९९२ चा वर्ल्ड कप पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झाला. आमच्या आणि देशाच्या जगण्यात बदल होत होते. राजीव गांधींच्या हत्येनंतर काँग्रेसचं अल्पमतातलं सरकार सत्तेवर आलं होतं आणि नरसिंह रावांनी देशाची धुरा हाती घेतली होती. आमच्या ओठांवर मिशीची लव फुटत होती आणि तिकडं सचिनही अठराव्या वर्षी आपला पहिला-वहिला वर्ल्ड कप खेळायला सिद्ध होत होता. देशाचं आकाश अन् अवकाश खुलं होत होतं अन् रुपर्ट मरडॉकच्या 'स्टार'च्या रूपानं परदेशी चॅनेलनं भारतात पाय टाकला होता. गावसकरच्या जोडीला हेन्री ब्लोफेल्ड, बॉयकॉट, टोनी ग्रेग प्रभृतींची कॉमेंटरी (आणि हेन्रीच्या त्या प्रसिद्ध इयरिंग्जवाल्या कमेंट्स) ऐकायला मिळू लागली होती. पहाटे चार वाजता आमच्या पॉलिटेक्निकमधल्या होस्टेलमधल्या मुलांसह पुणे युनिव्हर्सिटीच्या होस्टेलमध्ये जाऊन पाहिलेल्या त्या मॅचेस अजून आठवतात. श्रीकांत, कपिल यांसारख्या मागच्या पिढीच्या धुरंधरांसह सचिन, कांबळी ही नवी पिढी खांद्याला खांदा लावून या स्पर्धेत खेळत होती. रंगीत टेलिव्हिजन, स्टारसारखं आकर्षक चॅनेल आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमधील सुसज्ज स्टेडियममधलं भन्नाट वातावरण यामुळं हा वर्ल्ड कप पाहता पाहता कसल्याशा आकांक्षांची ज्योत नकळत आमच्याही मनात पेटली. जागतिकीकरण, उदारीकरण वगैरे शब्द कानांवरून जात होते, पण नेमकं काय घडतंय ते आकळत नव्हतं.

पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय ही आपली त्या स्पर्धेतील एकमेव कमाई. पण त्या सामन्यात पाचव्या नंबरवर येऊन नाबाद ५४ धावांची चिवट खेळी करणाऱ्या सचिननं कपिलसारख्या महान, पण तेव्हा अस्ताला निघालेल्या खेळाडूसह केलेली जोरदार भागीदारी खूपच प्रतीकात्मक वाटते आता पाहताना... कपिलच्या पिढीला क्रिकेटमध्ये फारच संघर्ष करावा लागला. पण तरीही त्यानं जिद्दीनं भारताला पहिलावहिला वर्ल्ड कप १९८३ मध्ये मिळवून दिलाच. या झुंजार पिढीनं १९९२ मध्ये सचिनसारख्या पुढच्या - अधिक आक्रमक, सामर्थ्यवान आणि जिगरबाज - पिढीकडं भारताच्या क्रिकेटचं बॅटन सोपवलं आहे, असंच वाटत होतं तो १९९२ चा भारत-पाक सामना पाहताना!
मग नंतर सचिनचं करिअर आणि जागतिकीकरणाच्या बाजारात उतरलेल्या भारताचा विकास एकाच गतीनं होऊ लागले. त्याविषयी अनेकदा अनेक माध्यमांतून लिहून आलं आहे. मी याच जोडीला आमच्या पिढीच्या विकास अन् आकांक्षांचाही आलेखही मांडीन. सचिनचं शारजातलं डेझर्ट स्टॉर्म, भारतानं वाजपेयींच्या समर्थ नेतृत्वाखाली घेतलेल्या पाच अणुचाचण्या आणि आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या नोकरीत काही तरी छान करून दाखवण्याच्या जिद्दीनं कामाला लागलेले अस्मादिक... हे सगळं एकाच काळात घडत होतं. यातला ‘मी’ हा खरोखर प्रातिनिधिक आहे. माझ्या पिढीतल्या सर्वांच्याच बाबतीत हे छान काही तरी घडत होतं. भारतात मोबाइल युग अवतरलं होतं. ते बाल्यावस्थेत असलं, तरी काही तरी क्रांतिकारक घडू पाहतं आहे, याची चाहूल लागली होती. 
तिकडं बंगळूरमध्ये अजय जडेजा वकार युनूसचं वस्त्रहरण करीत होता आणि इकडं आमच्याही मुठी काही तरी करून दाखवण्याच्या इर्षेनं वळत होत्या. (हाच जडेजा आणि अजहर पुढं मॅच-फिक्सिंगमध्ये सापडले, तेव्हा मैत्रिणीसोबत हार्टब्रेक झाल्यानं काय होईल, एवढं दुःख आम्हाला झालं होतं आणि 'यू टू ब्रूट्स?' हा आमचा या नतद्रष्टांना खडा सवाल होता.)

इंग्लंडमध्ये १९९९ मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी सुमार झाली असली, तरी कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारतानं पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा (वर्ल्ड कपमध्ये) हरवून देशवासीयांना चांगला दिलासा दिला होता. सचिनच्या वडिलांचं याच वर्ल्ड कपच्या काळात अकाली निधन झालं होतं आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून लगेच परत इंग्लंडमध्ये जाऊन सचिननं केनियाविरुद्ध शतक ठोकून त्यांना आदरांजली वाहिली होती. तेव्हा भावनोत्कट होऊन आकाशाकडं पाहणाऱ्या सचिनची प्रतिमा मनात रुतून राहिलीय. त्यानंतर केलेल्या प्रत्येक शतकाच्या वेळी सचिननं अशाच पद्धतीनं वर पाहून वडिलांचं स्मरण केलं आहे. याच काळात वायटूके समस्येमुळं भारतात डॉट कॉम कंपन्यांचं पेव फुटलं आणि भारतीय कम्प्युटर इंजिनीअरची महती सारं जग गाऊ लागलं. पुढं हा फुगा फुटला तरी हजारो कॉल सेंटर उभी राहिली आणि मोबाइलच्या जोडीला मल्टिप्लेक्स आणि मॉल नावाच्या साम्राज्यानं हा देश पादाक्रांत केला. सचिन हा आता मास्टर ब्लास्टर झाला होता आणि ब्लॅक अँड व्हाइट स्क्रीनचे का होईना, पण मोबाइल जवळपास शहरात तरी प्रत्येकाकडं दिसू लागले होते.
याच काळात अजहरुद्दीनला संघाबाहेर जावं लागलं आणि सौरभ गांगुलीकडं कर्णधारपदाची धुरा आली. सचिनसह सौरभ, राहुल आणि अनिल कुंबळे या चौघांनीही पुढं भारतीय क्रिकेटवर आणि सर्व क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकत्यातील त्या ऐतिहासिक कसोटीत या नव्या टीम इंडियाचा जन्म झाला. नंतर २००२ मध्ये नॅटवेस्ट कपमध्ये युवराज अन् कैफ जोडीनं इंग्लंडला हरवल्यानंतर लॉर्डसच्या त्या ऐतिहासिक सभ्य गॅलरीत शर्ट काढून चेव आल्यागत सेलिब्रेशन करणारा गांगुली या नव्या इंडियाच्या जबर आत्मविश्वासाचंच प्रतिनिधित्व करीत होता. याचंच प्रतिबिंब पडलं पुढच्याच वर्षी आफ्रिकेत झालेल्या वर्ल्ड कपमध्ये. 
सचिनसाठी ही स्पर्धा संस्मरणीय ठरली. विशेषतः पुन्हा एकदा पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडी एक्स्प्रेसला मैदानाबाहेर भिरकावून देत त्यानं ७५ चेंडूंत फटकावलेल्या ९८ धावा कुठला क्रिकेट चाहता विसरेल? अंतिम फेरीत आपण ऑस्ट्रेलियाकडून हरलो, तरी उपविजेतेपद मिळवून एकंदर चांगलीच कामगिरी केली होती. त्याच काळात ‘इंडिया शायनिंग’चे पोवाडे गायले जाऊ लागले होते. मोबाइल रंगीत झाले होते अन् मल्टिप्लेक्स, मॉल संस्कृतीनं महानगरांत चांगलंच मूळ धरलं होतं. सिलिकॉन व्हॅलीतील सॉफ्टवेअर कंपन्यांत भारतीय तरुण इंजिनिअर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत होती आणि मध्यमवर्गाच्या हाती पैसा खुळखुळू लागला होता. परदेश प्रवास किंवा देशांतर्गत विमान प्रवास आता हा वर्ग सहज करू लागला होता. स्थानिक पर्यटन कंपन्यांची कार्यालयं गजबजू लागली होती आणि महानगरांत दुचाकीएवढ्या सहजतेनं आता आमची पिढी चारचाकी गाड्या उडवू लागली होती.
सन २००४ च्या लोकसभा निवडणुकांत मात्र या शायनिंगवरचा वर्ख गळून गेला आणि भाजप आघाडीचा पराभव झाला. जागतिकीकरणाची लाट भारतात आणण्यात मोलाचा वाटा असलेले डॉ. मनमोहनसिंग देशाचे पंतप्रधान झाले. तिकडं सौरभ गांगुलीच्या संघानं परदेशी कसोटी विजयांचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढवलं होतं. आपण पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज या देशांना त्यांच्या देशांत जाऊन हरवलं होतं. २००६ मध्ये सचिनला टेनिस एल्बो झाला आणि त्यांचं क्रिकेट संपुष्टात येतं की काय, अशी भीती वाटू लागली. त्याच वेळी रांचीतला एक मानेपर्यंत केस रुळणारा रांगडा तरुण विकेटकीपरच्या रूपानं भारतीय संघात दाखल झाला. महेंद्रसिंह धोनी त्याचं नाव. पाकिस्तानविरुद्ध जोरदार शतक ठोकून त्यानं आपल्या आगमनाची द्वाही फिरवली.
राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या वेस्ट इंडिजमधल्या २००७ च्या वर्ल्ड कपमधल्या कामगिरीचं ‘भयानक’ या एकाच शब्दात वर्णन करता येईल. बाद फेरीतच मार खाऊन भारतीय संघ परतला आणि सचिनचं वर्ल्ड कपचं स्वप्न अधुरंच राहतं की काय अशी भीती वाटू लागली. त्यातच २००७ मधली आर्थिक आघाडीवरील सगळी कामगिरी २००८-०९ मध्ये ढासळू लागली. अमेरिकेत ‘सबप्राइम’चं संकट ओढवलं. लेहमन ब्रदर्स कंपनी बुडाली आणि जग मंदीच्या खाईत कोसळलं. भारतीय अर्थव्यवस्था मात्र बचतीच्या आधारावर भक्कम उभी होती. तिकडं भारतीय संघाला डोकं वर काढण्यासाठी महेंद्रसिंह धोनीच्या रूपात नवा ‘डॅशिंग’ कर्णधार गवसला. हा एकविसाव्या शतकातील भारतीयांचा प्रतिनिधी होता. तुलनेनं महानगरांपेक्षा लहान शहरांतून आला होता. भारतातल्या हजारो लहान गावांतील तरुणांच्या आकाक्षांचं प्रतीक धोनीमध्ये गवसलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं २००७ मध्ये टी-२० मध्ये विजेतेपद पटकावलं. दुसऱ्याच वर्षी म्हणजे २००८ मध्ये बीसीसीआयला आयपीएल नावाची कामधेनू गवसली. मोबाइलमध्ये स्मार्टफोन नामक प्रकार याच सुमारास दाखल झाला होता. आता मोबाइलमध्येच इंटरनेट मिळू लागलं होतं. तंत्रज्ञानासोबत होणारे हे बदल डोळे विस्फारणारे होते. धोनीच्या संघात आता कोहली, रैना, रवींद्र जडेजा, अश्विन असे नवे खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावू लागले होते. गांगुली, द्रविड यांना सक्तीचा संन्यास घेणं भाग पडलं होतं. या सर्व वेगवान बदलांत अभेद्य खडकासारखा अविचल उभा होता तो फक्त सचिन...

मग २०११ चा वर्ल्ड कप भारतातच व्हायचा होता आणि अंतिम सामना मुंबईत. यापेक्षा चांगलं नेपथ्य शोधूनही सापडलं नसतं. ठरवल्याप्रमाणे क्लिनिकल परफेक्ट कामगिरी बजावत धोनीच्या संघानं विजेतेपद मिळवलं. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर सचिनला खांद्यावर घेऊन मिरवणारा कोहली अन् रैना पाहून १९९२ ते २०११ हे १९ वर्षांचं वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं. तेव्हा कपिलनं सचिनकडं दिलेलं बॅटन सचिन जणू विराटकडं देत होता.
माझ्या मध्यमवर्गीय पिढीसाठीही करिअरमधले महत्त्वाचे टप्पे आले होते किंवा पार तरी झाले होते. अशा विजयानंतर किंवा करिअरमधल्या विशिष्ट टप्प्यावरील अचीव्हमेंटनंतर येणारं एक शैथिल्य सध्या सगळ्या वातावरणात भरून राहिल्यासारखं दिसतं आहे. शिवाय आता जागतिक क्रिकेटच्या मंचावरून सचिन नावाच्या दैवतानं एक्झिट घेतली आहे. सचिनमुळं क्रिकेट हा सर्व भारतीयांचा कौटुंबिक सोहळा बनला होता. तो आता पुन्हा हळूहळू फक्त मुलांच्या आवडीचा खेळ व्हायला लागला आहे. पण काळाचं चक्र सतत चालूच असतं. क्रिकेटच्या रूपानं आपल्या आशा-आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणारा कुणी तरी नवा देव अवतार घेईलच. तोपर्यंत आम्ही हा खेळ पाहत राहूच... नव्या आशेनं...



 (पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, १५ फेब्रुवारी २०१५ - संपादित)

------

8 Feb 2015

ज्याची त्याची अभिरुची...


एआयबी - अर्थात ‘ऑल इंडिया बकचोद’ नावाचा एक कार्यक्रम नुकताच मुंबईत झाला. त्यात करण जोहर, अर्जुन कपूर आणि रणवीरसिंह यांसारखे बॉलिवूडमधले बडे दिग्दर्शक-कलाकार आणि काही स्टँडअप कॉमेडियन सहभागी झाले होते. चार हजार रुपयांचं तिकीट घेऊन सुमारे चार हजार लोकांनी तो कार्यक्रम पाहिला. त्यात दीपिका पदुकोण, आलिया भट, अनुराग कश्यप असे अनेक नामवंत स्टार प्रेक्षकांत होते. इन्सल्ट कॉमेडी नावाचा हा प्रकार परदेशांत पूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्याच्या स्वरूपामुळंच त्याच्यावर आपल्याकडं जोरदार टीका झाली. अर्थात अनेकांनी तो ऑनलाइन एंजॉयही केला. या कार्यक्रमाला आक्षेप असणाऱ्यांनी असे कार्यक्रम होऊच नयेत, असं म्हणण्यापेक्षा ज्याची त्याची अभिरुची असं म्हणून त्याकडं दुर्लक्ष करावं, हेच योग्य.
काही नामवंत लोकांना या कार्यक्रमात आमंत्रित करायचं आणि उपस्थित कॉमेडियन मंडळींनी त्यांचा होता होईल तो वाईट भाषेत पाणउतारा करायचा, असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. त्यात एरवी असभ्य म्हणून गणले गेलेले शब्द आणि भाषा आलीच. अर्थात हा सर्व प्रकार मजेमजेनंच घ्यायचा असल्यामुळं ज्यांना हे मान्य आहे तेच या कार्यक्रमात सहभागी होतात, यात शंका नाही. शिमग्याला एक दिवस जसं आपल्याला वाट्टेल ते बोलण्याची परवानगी असते तसंच हे आहे. हे सगळं पाहता या कार्यक्रमावर आक्षेप येणार यात शंका नव्हतीच. तसे ते आलेही.
आपल्याकडं असभ्य किंवा वाईट शब्दांची लोकांना अॅलर्जी आहे. खासगी संभाषणात ते कितीही मुक्तपणे वापरले तरी सार्वजनिकरीत्या आणि कायदेशीर मार्गाने असं काही होतं आहे, ही कल्पनाच अनेकांना सहन होऊ शकत नाही. ते साहजिकच आहे. मात्र, हा कार्यक्रम तिकीट लावून होता आणि त्याचं स्वरूप अगदी स्पष्ट होतं. तरीही तो ज्या अर्थी हाउसफुल्ल झाला आणि त्यात महिलाही मोठ्या प्रमाणात आल्या, याचा अर्थ समाजातील एका वर्गाला असा कार्यक्रम एंजॉय करायचा आहे (आणि त्यांना त्याची सवयही आहे...) हे स्पष्ट झालं. अशा खासगीत करायच्या अनेक गोष्टी पूर्वीपासूनच महानगरांत चालत आल्या आहेत आणि जोवर त्या विशिष्ट वर्तुळातच सुरू होत्या तोपर्यंत त्याला कुणी आक्षेप घेण्याचा सवाल नव्हता. आता यू-ट्यूबच्या माध्यमातून हे सगळं समाजाच्या सर्वच स्तरांपर्यंत (अर्थात अगदी शंभर टक्के नाहीच, पण पूर्वीपेक्षा बऱ्याच मोठ्या प्रमाणात) पोचत असल्यामुळं हा सर्व प्रश्न आला आहे.
या कार्यक्रमाचा तासाभराचा संपादित अंश मीही यू-ट्यूबवर पाहिला. मला तर तो फारच फालतू वाटला. म्हणजे त्यात अश्लील शब्द वापरले म्हणून नव्हे, तर ते वापरण्यात जराही अक्कलहुशारी नव्हती किंवा त्यातून विनोदनिर्मिती करण्याचे प्रयत्न फारच टुकार होते, म्हणून. यातले ‘फ’कारी-‘भ’कारी शब्द हल्लीच्या तरुण पिढीच्या तोंडात सर्रास असतात. त्याचं समर्थन करण्याचा मुद्दा इथं नाही. पण अशा कार्यक्रमांतून प्रेक्षकांना आपण काही तरी नवं पाहतो आहे, याचा एक धक्का बसायचा असतो, तो फारसा काही बसला नाही, या अर्थानं तो फालतू होता हे नक्की. यात करण जोहरनं स्वतःवर अनेक विनोद केले किंवा उपस्थितांनीही त्याच्यावर अनेक विनोद केले. करण जोहरविषयीचे विनोद कसले असतील, हे जाणकारांना सांगण्याची आवश्यकता नाही. प्रेक्षकांत आलिया भट बसली होती. तिला थेट उद्देशून काही कॉमेडियन 'आलिया, पोटॅशियमचं रेणूसूत्र म्हणजे के... तू या विषयात प्रयत्नही करू नकोस,' किंवा 'आयसिस ही एक दहशतवादी संघटना आहे, आयएसआय मार्क असतो तो वेगळा...' असे काही विनोद करत होते. तीही हसून याला दाद देत होती. हा सगळा प्रकार फारच उथळ होता, पण निदान इथं थोडंफार हसायला तरी येत होतं. इन्सल्ट कॉमेडी करताना त्या माणसाची वैगुण्यं नेमक्या भाषेत हेरून त्याला टोमणे मारणं अपेक्षित आहे. इथं फारच कमी कॉमेडियननी तो सेन्स दाखवला. एक-दोन अपवाद. बाकी सर्वांनी लैंगिक संबंधसूचक शब्द वापरणे, एखाद्याच्या वर्णावर, जाडीवर कमेंट करणे असे सगळे फालतू प्रकार करूनच विनोद केले. या कार्यक्रमाचं समीक्षण करणं हा हेतू नाहीय. पण हा जो नवा प्रकार आपल्याकडं आणायचा तो त्यातल्या त्यात बुद्धी चालवून जरा अजून आकर्षक करण्याचा प्रयत्नही संयोजकांनी केला नाही. त्याऐवजी आपल्याकडच्या शिव्या आणि येऊन-जाऊन सेक्सवरचे टिपिकल विनोद करण्यातच त्यांनी धन्यता मानली. परदेशी कार्यक्रमांतले असे विनोद आणि आपल्याकडचे असे सेक्सी विनोद यांत दर्जात्मक फरक जाणवतो, याचं कारण मुळात त्यांच्याकडं या विषयाकडं पाहण्याचा असलेला मोकळेपणा आणि आपल्याकडचा झापडबंदपणा. त्यांच्याकडं समाजव्यवस्था खुली आहे. ती अशा कार्यक्रमांतून सहजी प्रतिबिंबित होते. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. आपल्याकडे असं नाही. त्यामुळं आपल्या आईसमोर असे घाणेरडे विनोद करताना करण जोहरला, सुरुवातीलाच काही वेळानं ‘हे ऐकून तिच्यासाठी अॅम्बुलन्स मागवावी लागेल,’ असा विनोद करावा लागला. इथंच हा कार्यक्रम फसला. आपल्याकडं अर्वाच्य शब्द उच्चारणाऱ्यांच्या तोंडी ती भाषा वापरण्यातली सहजता दिसत नाही. (आपल्या सध्याच्या समाजव्यवस्थेमुळं ती येणंही शक्य नाही आणि त्यात काहीच गैर नाही.) पण त्यामुळं त्याला घाणेरडा वास येतो, याची जाणीव संयोजकांना नव्हती. परदेशातल्या नटाने आपल्या मित्राच्या गर्लफ्रेंडला छाती उघडी करून दाखवणं खपून जातं. पण आपल्याकडं असं करणारा अर्जुन कपूर ओंगळवाणा वाटतो. परदेशांतल्या कार्यक्रमाचं केवळ अंधानुकरण केल्यानंच असं होतं.
या अशा कार्यक्रमाच्या मानसिकतेकडंही पाहायला हवं. काय उद्देश असेल असे कार्यक्रम सादर करण्याचा? विनोदातून सामाजिक व्यंगावर बोट ठेवणं हा एक असू शकेल. यासाठी जी भाषा वापरली जाते, ती मला वाटते तरुणाईच्या बंडखोरीचे प्रतीक आहे. एखादी गोष्ट करायची नाही असा समाजाचा नियम असला, की तरुणवर्गाला ती मोडण्यात विशेष काही तरी केल्यासारखं वाटतं. (आपल्या तरुणाईच्या ऊर्जेची वाफ अशा कार्यक्रमांतून दवडायची का, हा नंतरचा मुद्दा आहे. त्याला विधायक वळण कसं लावता येऊ शकतं हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे.) पण तरुणाईला तसं करण्यात सुरुवातीला गंमत वाटत असेल, तर करू द्यावं. त्यातलं नावीन्य संपलं, की ती स्वतःहूनच बाजूला होणार आहे. आपल्या समाजाचा याबाबतचा दांभिकपणा अलौकिक आहे. आपल्या पिढीत आपण बंडखोरी मानलं गेलेलं सर्व काही करायचं, पण आपल्या पुढच्या पिढीला मात्र उपदेशाचे वायफळ डोस पाजायचे हे आपल्याकडचं व्यवच्छेदक सामाजिक लक्षण आहे. किमान समाजानं तरी हे असलं ढोंगी पालकत्व घेऊ नये. आणखी एक मुद्दा, म्हणजे शिव्या देणं किंवा जाहीर रीतीनं त्या उच्चारणं हा एक उत्तम ‘स्ट्रेसबस्टर’ आहे, असं मानसशास्त्र सांगतं. तेव्हा ज्या काही शिव्या द्यायच्यात त्या सगळ्यांसमोरच द्या; सुरुवातीला थ्रिल म्हणून त्यात अपशब्द येतील, पण नंतर कदाचित ही टीका सेलिब्रिटींपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांना आत्मपरीक्षण करायला लावणारीही ठरू शकेल. आपण किती फालतू आहोत, हे समजायला लागेल. अशी टीका ऐकून घेण्याची सवय लागणं हेही चांगलंच आहे की. त्यातून वाढली तर सहिष्णुताच वाढेल. पण ती फार लांबची प्रक्रिया आहे, हे खरं.

राहिला प्रश्न तो असे कार्यक्रम होऊ द्यावेत की नाही, याचा. माझ्या मते, त्यांना विरोध करायचं काही कारण नाही. ज्याला ओंगळवाणे विनोद ऐकण्याची हौस आहे आणि ज्याच्याकडे चार हजार रुपये आहेत त्यानं खुशाल या कार्यक्रमाला जावं. ज्यांना हे पटत नाही त्यांनी तिकडं फिरकू नये. मात्र, उगाच देशाची संस्कृती बुडत असल्याचा आविर्भाव आणू नये. असे केल्यानं या फालतू कार्यक्रमाला आपण अवाजवी महत्त्व देतो. असे कार्यक्रम दर्जा नसल्यानं आपल्या मरणानंच मरतील. आपल्या समाजात एक सामूहिक शहाणपण अबाधित आहे. प्रसिद्ध वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी म्हटल्याप्रमाणे, हा देश कीर्तनानं कधी सुधारला नाही आणि तमाशानं कधी बिघडला नाही! ते खरंच आहे. त्यामुळं या कार्यक्रमाच्या नावे WTF म्हणून खडे फोडण्यात काही अर्थ नाही. श्लील-अश्लीलतेच्या कल्पना काळानुरूप बदलत असतात. काल जे खटकतं होतं, ते आज खटकतंच असं नाही. त्याची कारणं आपल्याला माहिती आहेत. कुठल्याही गोष्टीचं ओव्हरएक्स्पोजर झालं, की त्याची किंमत कमीच होते. याही कार्यक्रमाचं कदाचित तसंच होईल. त्यामुळं ज्याची त्याची अभिरुची असं म्हणून त्याकडं दुर्लक्ष करावं. सांस्कृतिक पोलिसगिरी करणं योग्य नाही. या देशात कायद्याच्या चौकटीत लोकांना जे काही अभिव्यक्त व्हायचं आहे ते होऊ द्या.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, ८ फेब्रुवारी २०१५ - संपादित)
---

6 Feb 2015

शमिताभ रिव्ह्यू

स्पीचलेस...
--------------

अमिताभ बच्चन आणि धनुष यांचा नवा सिनेमा 'शमिताभ' पाहिल्यानंतर 'स्पीचलेस...' अशी एकच प्रतिक्रिया मनात येते. वयाच्या बहात्तराव्या वर्षी एवढ्या प्रचंड ऊर्जेनं काम करणारा अमिताभ पाहून आपण केवळ थक्क होतो. या महान अभिनेत्याविषयी आपल्या मनात असलेला आदर आणखीनच वाढतो. त्याच्या जोडीला तोडीस तोड काम करणारा धनुष आणि कमलाहासनची कन्या अक्षरा हिचं पदार्पणातील सुंदर काम आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे पटकथेवर चांगली मेहनत घेऊन सिनेमा दिग्दर्शित करणारा या सिनेमाचा दिग्दर्शक आर. बाल्की यामुळं 'शमिताभ' पाहणं हा खरोखर एक अभिरुचिसंपन्न अनुभव ठरतो.
धनुषमधला 'श' (खरं तर 'ष' हवा ना) आणि अमिताभमधली सगळीच अक्षरं (कदाचित सुरुवातीचा 'अ' धनुषमधल्या षमध्ये मिसळून यांचा 'श' झाला असावा...) मिळून 'शमिताभ' हे नाव तयार करण्यापासून या सिनेमातल्या वैचित्र्याची सुरुवात होते. या नावाला सिनेमाच्या कहाणीत अर्थातच महत्त्वाचं स्थान आहे. अमिताभच्या खर्जातल्या आवाजाचा या सिनेमात केलेला वापर, किंबहुना या सिनेमातील एक पात्र म्हणून या आवाजाचा झालेला वापर हा खरोखर वैशिष्ट्यपूर्ण आहे. ही आगळी संकल्पनाच 'शमिताभ'ला बऱ्याच उंचीवर घेऊन जाते. पारंपरिक नायक-नायिका आणि खलनायक अशा टिपिकल साच्यातून हिंदी सिनेमा आता बाहेर पडला आहे आणि अनेक 'आउट ऑफ बॉक्स' विचार करणारी कथानकं हिंदी सिनेमातून येत आहेत, याचं 'शमिताभ' हे आणखी एक उदाहरण. अमिताभ आणि धनुष या दोन्ही प्रमुख कलाकारांनी अत्यंत इंटेन्सिटीनं साकारलेल्या भूमिका 'शमिताभ'चा प्रभाव वाढवतात.
दानिश (धनुष) या हिंदी सिनेमात हिरो होण्याची धडपड करणाऱ्या इगतपुरीतल्या मराठी मुलाची ही गोष्ट आहे. भारतात रोज हजारो तरुण सिनेमात हिरो होण्यासाठी मुंबईत दाखल होत असतात. दानिशही त्यातलाच एक. पण त्याचं वेगळेपण असं, की तो लहानपणापासून मुका आहे. त्याला बोलता येत नसलं, तरी अभिनयात मात्र तो अव्वल आहे. मुंबईत संघर्ष करता करता त्याला अक्षरा (अक्षरा हसन) ही असिस्टंट डायरेक्टर भेटते. ती त्याला समजून घेते. तिचे वडील डॉक्टर असतात. योगायोगानं त्यांना फिनलंडमध्ये माणसाला दुसऱ्याचा आवाज देता येणाऱ्या प्रयोगाविषयी माहिती कळते. आपल्या नायकाला ते फिनलंडमध्ये घेऊन जातात आणि तो प्रयोग यशस्वीही होतो. मात्र, त्याला आवाज कुणाचा द्यायचा हे कळत नसतं. अशातच त्यांना एक दिवस एका स्मशानभूमीत भणंग अवस्थेत दारू पिऊन पडलेला एक म्हातारा दिसतो. त्याचा खर्जातला अफलातून आवाज ऐकून ते चकित होतात. अनेक मिनतवाऱ्या करून ते त्या म्हाताऱ्याला, म्हणजेच अमिताभ सिन्हांना (अमिताभ) दानिशला आवाज देण्यासाठी राजी करतात. विशेष म्हणजे दानिशला लगेच एक सिनेमा मिळतो. त्यासाठी त्याला शमिताभ हे नवं नाव देण्यात येतं. हा सिनेमा सुपरहिट होतो आणि दानिश रातोरात सुपरस्टार होतो. पुढं अशा काही घटना घडत जातात, की दानिश आणि अमिताभ सिन्हांमधले खटके उडू लागतात. दोघांचेही इगो दुखावतात. दानिशला आवाज देण्यासाठी म्हातारा नकार देतो. त्याच वेळी त्याचा नवा सिनेमा येऊ घातलेला असतो. मधल्या काळात एक पत्रकार दानिशच्या खऱ्या आयुष्याची माहिती काढतो आणि त्याला हा मूळचा मुका माणूस असल्याचं लक्षात येतं. पुढं काय होतं, ते पडद्यावरच पाहायला हवं.
शमिताभ सिनेमा करताना दिग्दर्शक बाल्कीनं अमिताभ आणि धनुष या दोन्ही कलाकारांच्या सामर्थ्याचा खुबीनं उपयोग केला आहे. संपूर्ण सिनेमात धनुषला एकही संवाद (अर्थात स्वतःच्या आवाजातला) नाही. त्याचंही डबिंग अर्थातच अमिताभनं केलं आहे. त्या अर्थानं अमिताभनं डबल रोल केला आहे. एकूणच अमिताभच्या सर्व क्षमतांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न बाल्कीनं यातून केला आहे.
एके काळी सिनेमाजगतात हिरो व्हायला आलेल्या, पण आता नैराश्यग्रस्त मद्यपी झालेल्या सत्तरीतल्या या म्हाताऱ्याची भूमिका अमिताभनं अशा काही तडफेनं केली आहे, की सिनेमा संपल्यावर त्याला उठून उभं राहून मानवंदना द्यावीशी वाटते. त्याचा तो खास खर्जातला आवाज त्यानं या संपूर्ण सिनेमात अशा काही हुकमतीनं वापरला आहे, की तो आवाज म्हणजे एक स्वतंत्र पात्र बनूनच आपल्यासमोर येतो. या सिनेमाच्या जवळपास प्रत्येक फ्रेमवर या महानायकाची स्पष्ट छाप पडलेली आहे. अमिताभनं वयाच्या ७२ व्या वर्षी साकारलेली ही भूमिका त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांपैकी एक ठरावी. अमिताभ हे काय रसायन आहे, हे त्यानं इंजेक्शन देताना त्याला वाटणाऱ्या भीतीतून जो आरडाओरडा केलाय त्यातून पाहायला मिळतं. त्याच्या तरुण वयातल्या काही भूमिकांची आठवण यावी अशी डोळ्यांतली मिश्कील चमक, अत्यंत बोलका चेहरा आणि याही सिनेमात अत्यंत उत्साहानं गायलेलं एक गाणं अशा सर्व गोष्टींतून हा महानायक आपल्याला पुन्हा पुन्हा त्याच्या प्रेमात पडायला लावतो.
धनुषही अप्रतिम. रांझणा या सिनेमातूनच त्याच्या अष्टपैलू अभिनयक्षमतेची प्रचिती आली होती. याही सिनेमात हा कलाकार भाव खाऊन जातो. धनुषचं सर्व शरीरच बोलतं. या सिनेमात त्याला मुक्याची भूमिका करायला मिळाली आहे आणि त्यानं नेहमीच्या सहजतेनं ती झोकात साकारली आहे. मुंबईतल्या कूल एडीची भूमिका अक्षरानं सुंदर केली आहे. या सिनेमात अनेक फिल्मी योगायोग आहेत. अर्थात ते घडविल्याशिवाय सिनेमाच उभा राहू शकला नसता. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष करून हा सिनेमा एंजॉय करावा. सिनेमाचा शेवट दुःखान्त आहे. हेही बाल्कीच्या कथेचं वेगळेपण. पण या अनपेक्षित शेवटामुळं संपूर्ण सिनेमाचा प्रभाव आणखी वाढतो. इलयाराजांचं संगीतही झकास. यातलं एक टॉयलेट साँगही सिनेमाप्रमाणंच वैशिष्ट्यपूर्ण.
तेव्हा अमिताभच्या चाहत्यांनी तर नव्हेच, पण सर्वसाधारण प्रेक्षकांनीही चुकवू नये असाच हा आगळावेगळा सिनेमा आहे.
---------
निर्माते : सुनील लुल्ला, अभिषेक बच्चन, गौरी शिंदे इ.
दिग्दर्शक : आर. बाल्की
संगीत : इलयाराजा
प्रमुख भूमिका : अमिताभ बच्चन, धनुष, अक्षरा हसन
दर्जा : *** १/२
----------------

4 Feb 2015

चित्रपट परीक्षण यादी अपडेट (भाग २)

चित्रपट परीक्षण यादी (भाग २)

महाराष्ट्र टाइम्स (फर्स्ट डे फर्स्ट शो) (कंसात प्रसिद्धीची तारीख)
-----------------------------------------------------------
२०११
-----

१७७) नो वन किल्ड जेसिका (हिंदी) (--२०११)
(जेसिकाचा प्रेरणादायी पुनर्जन्म... - चार स्टार)

१७८) यमला पगला दिवाना (हिंदी) (१५--२०११)
(पंजाबी तिक्का मसाला - तीन स्टार)

१७९) धोबीघाट (हिंदी) (२२--२०११)
(संवेदनांची क्लासिक धुलाई - साडेतीन स्टार)

१८०) दिल तो बच्चा है जी (हिंदी) (२९--२०११)
((प्रेमाचा) गुलकंद, लोणचं अन् वोडका - तीन स्टार)

१८१) आरंभ (मराठी) (--२०११)
(काळीज पिळवटून टाकणारा अनुभव - चार स्टार)

१८२) सात खून माफ (हिंदी) (१९--२०११)
(एक पिक्चर माफ! - दोन स्टार)

१८३) गेम (हिंदी) (--२०११)
(उत्कंठावर्धक... तीन स्टार)

१८४) पाच नार एक बेजार (मराठी) (--२०११)
(प्रेक्षकही बेजार - दोन स्टार)

१८५) ताऱ्यांचे बेट (मराठी) (१६--२०११)
(पिसे लागले मोरपिसांचे... - साडेतीन स्टार)

१८६) चलो दिल्ली (हिंदी) (३०--२०११)
(असा प्रवास सर्वांना घडो... - साडेतीन स्टार)

१८७) शागीर्द (हिंदी) (१५--२०११)
(एक तोचि नाना... - तीन स्टार)

१८८) कुछ लव्ह जैसा (हिंदी) (२९--२०११)
(बिबीज डे आउट - दोन स्टार)

१८९) रेडी (हिंदी) (--२०११)
(नुसतंच ढिंग चिका... - अडीच स्टार)

१९०) डबल धमाल (हिंदी) (२५--२०११)
(निव्वळ आचरटपणा... - दोन स्टार)

१९१) देहल्ली बेली (हिंग्लिश) (--२०११)
(हास्याचा जोरदार फ्लश’! - साडेतीन स्टार)

१९२) मर्डर २ (हिंदी) (१०--२०११)
(भटांच्या सुरीने संवेदनेचा 'मर्डर'... - एक स्टार)

१९३) प्लॅटफॉर्म (मराठी) (१७--२०११)
(ओअॅसिस... - तीन स्टार)

१९४) सिंघम (हिंदी) (२४--२०११)
(मनोरंजनाची महा सिंहगर्जना - चार स्टार)

१९५) आगाह - द वॉर्निंग (हिंदी) (--२०११)
(रूह आली... पळा... पळा! - दीड स्टार)

१९६) आरक्षण (हिंदी) (१४--२०११)
(आरक्षणाचा नव्हे; तत्त्वरक्षणाचा लढा! - तीन स्टार)

१९७) मेरे ब्रदर की दुल्हन (हिंदी) (११--२०११)
(चांबट फार्सचा भांगडा... - तीन स्टार)

१९८) बोल (उर्दू-पाकिस्तानी) (११--२०११)
(स्त्री-जाणिवेचा पाक बोल... - चार स्टार)

१९९) फोर्स (हिंदी) (-१०-२०११)
(अॅक्शन (रिप्ले) भारी... - तीन स्टार)

२००) मोड (हिंदी) (१६-१०-२०११)
(जरा विसावू या वळणावर... - साडेतीन स्टार)

२०१) रॉकस्टार (हिंदी) (१३-११-२०११)
(दोन्ही 'आर' रॉकिंग, पण... - तीन स्टार)

२०२) देसी बॉइज (हिंदी) (२७-११-२०११)
(‘देशी’ मूल्यांचा रंगतदार डोस)

२०३) डर्टी पिक्चर (हिंदी) (-१२-२०११)
(बुम्बाट... - चार स्टार)

२०४) डॉन २ (हिंदी) (२५-१२-२०११)
(चकाचक, तेजतर्रार... - तीन स्टार)
---
(एकूण - २८, मराठी - , हिंदी - २४)
-----
२०१२
-----
२०५) प्लेअर्स (हिंदी) (--२०१२)
(लांबलेला, पण रंगलेला खेळ - तीन स्टार)

२०६) शाळा (मराठी) (२२--२०१२)
(मनाच्या वहीतील मोरपीस - चार स्टार)

२०७) गली गली चोर है (हिंदी) (--२०१२)
(भ्रष्ट विषयावरची स्वच्छ कॉमेडी - अडीच स्टार)

२०८) सतरंगी रे (मराठी) (१२--२०१२)
(फ्रेश, तरुण अन् रॉकिंग - साडेतीन स्टार)

२०९) गोळाबेरीज (मराठी) (१२--२०१२)
(चुकलेली (लोळा)गोळा बेरीज - दोन स्टार)

२१०) पानसिंग तोमर (हिंदी) (--२०१२)
(नियती नावाच्या शर्यतीची भन्नाट गोष्ट - चार स्टार)

२११) कहानी (हिंदी) (११--२०१२)
(नजरबंदीचा चित्तथरारक खेळ - चार स्टार)

२१२) थोडी खट्टी थोडी हट्टी (मराठी) (२५--२०१२) (प्रतिनिधी नावाने)
(थोडा सस्पेन्स, थोडी करमणूक - अडीच स्टार)

२१३) टायटॅनिक (-डी) (इंग्रजी) (--२०१२)
(उत्कट, उदात्त महाकाव्य - पाच स्टार)

२१४) आता कशाला उद्याची बात! (मराठी) (१५--२०१२)
(एकच बात पुन्हापुन्हा... - तीन स्टार)

२१५) उचला रे उचला (मराठी) (१५--२०१२) (प्रतिनिधी नावाने)
(उचला आणि... - दीड स्टार)

२१६) आरोही - गोष्ट तिघांची (मराठी) (२३--२०१२)
(बेसूर रिअलिटीवरचं स्वरांजन - साडेतीन स्टार)

२१७) तेज (हिंदी) (२९--२०१२)
(झणझणीत, पण जुनाच मसाला! - अडीच स्टार)

२१८) हा भारत माझा (मराठी) (--२०१२)
(अस्वस्थ आत्म्यांची सुखात्म गोष्ट - चार स्टार)

२१९) अजिंठा (मराठी) (१३--२०१३)
(रूपेरी पडद्यावरचे देखणे लेणे - चार स्टार)

२२०) डिपार्टमेंट (हिंदी) (२०--२०१२)
(‘हलवून टाकणारा प्रयोग... - दोन स्टार)

२२१) शांघाय (हिंदी) (१०--२०१२)
(दंभस्फोटाची क्लासिक केस... साडेतीन स्टार)

२२२) फेरारी की सवारी (हिंदी) (१६--२०१२)
(उत्तुंग ध्येयाची स्वप्नवत सफर - चार स्टार)

२२२) तेरी मेरी कहानी (हिंदी) (२४--२०१२)
(नो फिजिक्स, नो केमिस्ट्री’...! - दोन स्टार)

२२४) कॉकटेल (हिंदी) (१५--२०१२)
(तीन तिघाडा, काम बिघाडा... - अडीच स्टार)

२२५) क्या सुपरकुल है हम (हिंदी) (२९--२०१२)
(फक्त अन् फक्त हसा’... - तीन स्टार)

२२६) कृष्ण और कंस (थ्रीडी अनिमेशन - हिंदी) (--२०१२)
(आकर्षक कृष्णलीला - साडेतीन स्टार)

२२७) भारतीय - म्हंजी काय रं भौ? (मराठी) (११--२०१२)
(अडनिड्याप्रश्नाची (सु)बोधकथा - तीन स्टार)

२२८) एक था टायगर (हिंदी) (१८--२०१२)
(वाघ नावाचा लव्हबर्ड - अडीच स्टार)

२२९) शिरीन फरहाद की तो निकल पडी... (हिंदी) (२५--२०१२)
(बावाजींच्या बरणीतलं मुरलेलं लोणचं - साडेतीन स्टार)

२३०) कुटुंब (मराठी) (--२०१२)
(मोठ्या पडद्यावरचा कौटुंबिक रिअलिटी शो)

२३१) बर्फी (हिंदी) (१५--२०१२)
(शब्देविण संवादु.... - चार स्टार)

२३२) हिरॉइन (हिंदी) (२३--२०१२)
(मुखवट्यामागे नो सरप्राइझ... - तीन स्टार)

२३३) ओह माय गॉड (हिंदी) (२९--२०१२)
(देवाच्या नावानं... - साडेतीन स्टार)

२३४) इंग्लिश-विंग्लिश (हिंदी) (-१०-२०१२)
(लई-वई भारी-वारी - साडेचार स्टार)

२३५) दिल्ली सफारी (थ्रीडी अनिमेशन - हिंदी) (२०-१२-२०१२)
(झक्कास अनिमल स्पिरिट... - साडेतीन स्टार)

२३६) रश (हिंदी) (२७-१०-२०१२)
(भडक, बालिश अन् नीरश - दोन स्टार)

२३७) सन ऑफ सरदार (हिंदी) (१७-११-२०१२)
(एक सरदार कॉमेडी - अडीच स्टार)

२३८) लाइफ ऑफ पाय (इंग्रजी) (२४-११-२०१२)
(आदिम जीवनेच्छेचे विश्वरूप दर्शन - चार स्टार)

२३९) दबंग २ (हिंदी) (२२-१२-२०१२)
(मनोरंजनाचा जम्बो पॅक... रिपीट... - चार स्टार)

२४०) आम्ही चमकते तारे (मराठी) (२९-१२-२०१२)
(सामाजिक संदेशाची बाळगुटी - तीन स्टार)
---
(एकूण - ३६, मराठी - १२, हिंदी -२२, इंग्रजी - )
-------
२०१३
-----
२४१) स्पेशल छब्बीस (हिंदी)
(चोर-पोलिसचा रंजक खेळ - साडेतीन स्टार)

२४२) होऊ दे जरासा उशीर (मराठी)
(एसी ते गोधडी - तीन स्टार)

२४३) विश्वरूप (हिंदी)
(काही कमाल, काही किमान... - साडेतीन स्टार)

२४४) काई पो छे (हिंदी) (२३--२०१३)
(‘युवादिलांचा अस्सल ईसीजी - चार स्टार)

२४५) दि अटॅक्स ऑफ २६/११ (हिंदी) (--२०१३)
(दहशतवादाचं भेसूर दर्शन - साडेतीन स्टार)

२४६) तुह्या धर्म कोंचा? (मराठी) (१६--२०१३)
(प्रामाणिक, पण विस्कळित... - अडीच स्टार)

२४७) कमांडो - ए वन मॅन आर्मी (हिंदी) (१३--२०१३)
((फक्त) भन्नाट अक्शन... - तीन स्टार)

२४८) कुरुक्षेत्र (मराठी) (२०--२०१३)
(कलेक्टर्स चॉइस... - तीन स्टार)

२४९) आशिकी २ (हिंदी) (२७--२०१३)
(नवशिकी - दोन स्टार)

२५०) शूटआउट @ वडाळा (हिंदी) (--२०१३)
(फसलेली चकमक - दोन स्टार)

२५१) बॉम्बे टॉकीज (हिंदी) (--२०१३)
(हलत्या चित्रांचा क्लासिक मुरांबा -साडेतीन स्टार)

२५२) औरंगजेब (हिंदी) (१८--२०१३)
(रक्तरंजित, साचेबद्ध सूडनाट्य - तीन स्टार)

२५३) ये जवानी है दिवानी (हिंदी) (--२०१३)
(प्रेमाचा, मैत्रीचा (ताणलेला) बँड - अडीच स्टार)

२५४) यमला पगला दिवाना २ (हिंदी) (--२०१३)
(आधीच मर्कट... - दोन स्टार)

२५५) म्हैस (मराठी) (१५--२०१३)
(पावर नाय - दोन स्टार)

२५६) प्रेमसूत्र (मराठी) (२२--२०१३)
(प्रेम... बॉम्बे टु गोवा स्टाइल! - तीन स्टार)

२५७) घनचक्कर (हिंदी) (२९--२०१३)
(क्रेझी लॅड - तीन स्टार)

२५८) लूटेरा (हिंदी) (--२०१३)
(उत्कट प्रेमाचं रंगलेलं पान - चार स्टार)

२५९) भाग मिल्खा भाग (हिंदी) (१३--२०१३)
(आपल्या नसानसांतून धावणारा प्रेरणापट... - चार स्टार)

२६०) बजाते रहो (हिंदी) (२७--२०१३)
(न वाजणारा खुळखुळा - दोन स्टार)

२६१) चेन्नई एक्स्प्रेस (हिंदी) (१०--२०१३)
(चालो, ये पिच्चर देखेगी... - चार स्टार)

२६२) वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई - दोबारा (हिंदी) (१७--२०१३)
(दोबारा देखी, तो अकल बुरा मान जाएगी... - दोन स्टार)

२६३) मद्रास कॅफे (हिंदी) (२४--२०१३)
(वेदनादायी भूतकाळाचा अस्वस्थ अनुभव - चार स्टार)

२६४) सत्याग्रह (हिंदी) (३१--२०१३)
(‘पोलिटिकली इनकरेक्ट - साडेतीन स्टार)

२६५) सत ना गत (मराठी) (१४--२०१३)
(दाहक आणि दारूण वास्तवाचा चटका - तीन स्टार)

२६६) फटा पोस्टर निकला हिरो (हिंदी) (२१--२०१३)
(‘फटा डोंगर, निकला चूहा...- अडीच स्टार)

२६७) क्रिश ३ (हिंदी) (-११-२०१३)
(करील मनोरंजन जो मुलांचे... - साडेतीन स्टार)

२६८) सिंगसाब द ग्रेट (हिंदी) (२३-११-२०१३)
(सन्नीपाजी, तुस्सी ग्रेट हो...! - तीन स्टार)

२६९) बुलेटराजा (हिंदी) (३०-११-२०१३)
(देखोगे, तो हुडहुडी भरेगी! - अडीच स्टार)

२७०) जॅकपॉट (हिंदी) (१४-१२-२०१३)
(डोक्याला शॉट - दीड स्टार)

२७१) धूम - (हिंदी) (२१-१२-२०१३)
(फक्त आमिर & आमिर... - साडेतीन स्टार)
-----
(एकूण - ३१, मराठी - , हिंदी - २५)
----
२०१४
-----

२७२) डेढ इश्किया (उर्दू-हिंदी) (११--२०१४)
(अत्रंगी आशिकांची अवली इश्कबाजी - साडेतीन स्टार)

२७३) सांजपर्व (मराठी) (१८--२०१४)
(दुहेरी अस्वस्थता देणारा अनुभव - अडीच स्टार)

२७४) जय हो (हिंदी) (२५--२०१४)
(हिंसक, बटबटीत आमरस... - तीन स्टार)

२७५) वन बाय टू (हिंदी) (--२०१४)
(‘मेट्रोमोनियल मज्जा... - अडीच स्टार)

२७६) हँसी तो फँसी (हिंदी) (--२०१४)
(पाहाल तर हसाल... - साडेतीन स्टार)

२७७) गुंडे (हिंदी) (१५--२०१४)
(थोडा कोळसा, पण बराचसा हिरा... - साडेतीन स्टार)

२७८) शादी के साइड इफेक्ट्स (हिंदी) (--२०१४)
(जुन्या लग्नासारखा... - तीन स्टार)

२७९) गुलाब गँग (हिंदी) (--२०१४)
(Her... हर.. - तीन स्टार)

२८०) बेवकुफियाँ (हिंदी) (१५--२०१४)
(किंचित मजेशीर... - अडीच स्टार)

२८१) आँखो देखी (हिंदी) (२२--२०१४)
(स्वतः अनुभवण्याची गोष्ट - साडेतीन स्टार)

२८२) मैं तेरा हिरो (हिंदी) (--२०४)
(हास्याचा धवनी योग - तीन स्टार)

२८३) भूतनाथ रिटर्न्स (हिंदी) (१२--२०१४)
(हे भूत हवेच भविष्यासाठी! - साडेतीन स्टार)

२८४) रिव्हॉल्व्हर रानी (हिंदी) (२६--२०१४)
(स्टेशनवरची हिंदी कादंबरी - अडीच स्टार)

२८५) सलाम (मराठी) (--२०१४)
(साध्या-सच्च्या जगण्याचा कानमंत्र - साडेतीन स्टार)

२८६) हवाहवाई (हिंदी) (१०--२०१४)
(पायाच्या भिंगरीची स्वप्नील सफर - तीन स्टार)

२८७) कोच्चदैयान (हिंदी) (२४--२०१४)
(अद्-भुत, नेत्रदीपक... - साडेतीन स्टार)

२८८) सिटीलाइट्स (हिंदी) (३१--२०१४)
(शहर नावाचा चक्रव्यूह - साडेतीन स्टार)

२८९) हमशकल्स (हिंदी) (२१--२०१४)
(आचरटपणाची नऊलाई - दोन स्टार)

२९०) तुझी माझी लव्हस्टोरी (मराठी) (२१--२०१४)
(पपी लव्ह... - दोन स्टार)

२९१) बॉबी जासूस (हिंदी) (--२०१४)
(दम नसलेली बिर्याणी - दोन स्टार)

२९२) हेट स्टोरी- (हिंदी) (१९--२०१४)
(हॅट... सॉरी... - अडीच स्टार)

२९३) किक (हिंदी) (२६--२०१४)
(बसते; पण उशिरा...! - तीन स्टार)

२९४) अस्तु (मराठी) (--२०१४)
(अविस्मरणीय! - चार स्टार)

२९५) सिंघम रिटर्न्स (हिंदी) (१७--२०१४)
(मनोरंजनाचं महाचिंगम - तीन स्टार)

२९६) मर्दानी (हिंदी) (२३--२०१४)
(चवताळलेली वाघीण - साडेतीन स्टार)

२९७) मेरी कोम (हिंदी) (--२०१४)
(नॉकआउट पंच...! - साडेतीन स्टार)

२९८) फाइंडिंग फॅनी (हिंग्लिश) (१३--२०१४)
(प्रेमाच्या गोवा जावे... - तीन स्टार)

२९९) खूबसुरत (हिंदी) (२०--२०१४)
(आत्माहीन सौंदर्य... - दोन स्टार)

३००) बँग बँग (हिंदी) (-१०-२०१४)
(आम्रखंड विथ चेरी - तीन स्टार)

३०१) इश्कवाला लव्ह (मराठी) (१८-१०-२०१४) (चित्रपट प्रदर्शित - ११ ऑक्टोबर १४) 
(चो ऽऽ च्विट...!)

३०२) हॅपी न्यू इयर (हिंदी) (२६-१०-२०१४) (चित्रपट प्रदर्शित - २४ ऑक्टोबर १४)
(निव्वळ नाचरटपणा!)
३०३) रोअर - टायगर्स ऑफ द सुंदरबन्स (हिंदी) (२-११-२०१४) (चित्रपट प्रदर्शित - ३१ ऑक्टोबर १४)
(पोकळ डरकाळी)

३०४) रंगरसिया (हिंदी) (८-११-२०१४)
(रंगवेड्याचा रसिला कॅनव्हास...)

३०५) मामाच्या गावाला जाऊ या (२२-११-२०१४)
(चला, ‘मामाबनू या...)

३०६) हॅपी जर्नी (२९-११-२०१४)

(
अद्भुतसफर)
३०७) पीके (२०-१२-१०१४)
(
राइट नंबर...)
---
(एकूण - ३६, मराठी - , हिंदी - २९)  (२०-१२-२०१४ अखेर)
---
(एकूण (मटामध्ये) - १३१, मराठी - २९, हिंदी - १००, इंग्रजी - )
(एकूण सर्व (सकाळ व मटा मिळून) - ३०७, मराठी - १२०, हिंदी - १८४, इंग्रजी - )
(२०-१२-२०१४ अखेर)
----