24 Feb 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - हायवे


प्रेमाच्या जगाकडं नेणारा महामार्ग
---------------------------------------------------------------


 माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे. आपलं रोजचं जगणं म्हणजे या प्रवासाचा रस्ता. कुणाच्या नशिबात सुंदर, गुळगुळीत महामार्ग येतो, तर कुणाच्या नशिबी नुसते खाचखळगे. प्रत्येकाचं नशीब सारखं नसतं, त्यामुळं प्रत्येकाच्या आयुष्याचा रस्ताही सारखा नसतो. माणसाच्या आयुष्यातले सुखाचे क्षण म्हणजे या रस्त्यावरची हिरवाई. त्याचं दुःख म्हणजे या रस्त्यावरचे कठीण चढणीचे अवघड घाट. इतर प्राणी आणि माणूस यांच्यातलं एक वैशिष्ट्य म्हणजे तहान, भूक, झोप, मैथुन, उत्सर्जन या मूलभूत गरजा भागल्या, की माणसाचा माणूसपणाकडचा प्रवास सुरू होतो. माणूस विचार करू शकतो, हसू शकतो, रडू शकतो, भावना व्यक्त करू शकतो. माणसाच्या माणूसपणाकडच्या प्रवासात या सर्व अभिव्यक्तींचे मुक्काम कधी ना कधी तरी येतात. यातही माणसाला अनिवार ओढ असते ती प्रेमाची, मायेची. कुठलीही अपेक्षा न ठेवता केल्या जाणाऱ्या निर्व्याज, मनःपूत प्रेमाची. ही साधी अपेक्षाही अनेकदा पूर्ण होत नाही आणि या प्रेमाऐवजी वाट्याला येते ती फसवणूक... शिवाय शोषण आणि दमन. वरकरणी नशिबानं सर्व काही बहाल केलंय, पण तरीही हाती काहीच गवसत नाही आणि दुसरीकडं फाटक्या दिसणाऱ्या नशिबाच्या खाली अनिवार प्रेमाचा खळाळता झरा. अशी दोन नशिबं चुकून एखाद्या चौकात भेटली आणि त्यांनी बरोबर प्रवास करायचा, असं ठरवलं तर...?
...तर इम्तियाज अली दिग्दर्शित 'हायवे' हा सिनेमा तयार होतो. हो, हायवे या आपल्या नव्या हिंदी सिनेमात अलीनं हेच तर सांगितलंय. अपहरणाची गोष्ट आणि रोड मूव्हीचा मसाला घालून त्यानं हा दोन आयुष्यांचा प्रवास नितांतसुंदर मांडलाय. माणूस ज्याचा निरंतर शोध घेतो आहे अशा काही मूलभूत मूल्यांचा वेध दिग्दर्शक घेऊ पाहतोय. मांडणीतला सहजपणा आणि आशयातला प्रामाणिकपणा यामुळं हायवेची ही सफर रमणीय ठरते. हे नुसतं मनोरंजन नाही, तर मनाचं तेल-पाणी आहे. गोष्टीतल्या पात्रांसोबत आपणही आपल्या जगण्यातल्या 'हे सारं कशासाठी?' या सनातन प्रश्नाचा शोध घेऊ लागतो, आपलं जगणं पुन्हा तपासायला घेतो हे या कलाकृतीचं यश.
दोन दिवसांवर लग्न असलेली दिल्लीतील उच्चभ्रू घरातली तरुणी वीरा त्रिपाठी (अलिया भट) होणाऱ्या नवऱ्यासोबत घराबाहेर पडते आणि पहाटे तीनच्या सुमारास दिल्लीच्या बाहेर असलेल्या पेट्रोलपंपावर काही गुंड तिचं अपहरण करतात. गोळीबारातून वाचण्यासाठी तिला ओलीस ठेवणं हा त्यांचा उद्देश असतो. महावीर भाटी (रणदीप हुडा) हा नामचीन गुंड त्या टोळीत असतो. वीरा एका बड्या बापाची मुलगी आहे आणि तिला पळवणं आपल्याला महागात पडेल, असा सल्ला भाटीचे इतर गुंड साथीदार त्याला देतात. मात्र, तो कुणालाही न जुमानता वीराला घेऊन टेम्पोमधून सुसाट निघतो. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांतून तो फिरत राहतो. दोघांच्या या प्रवासात अशा काही गोष्टी घडतात, की वीराला हे अपहरण दुःखद न वाटता, आपली चौकटीतल्या जगण्यातून झालेली सुटकाच वाटते. महावीरच्याही आयुष्यात पूर्वी काही घटना घडून गेलेल्या असतात. दोघांच्याही नशिबानं त्यांच्या जगण्यातलं साधंसं सुख ओरबाडून घेतलेलं असतं. अनोळखी रस्त्यांवरून फिरत असताना दोघांनाही एकमेकांविषयी सहानुभूती वाटणं आणि मूलतः आपण नशिबाची एकाच प्रकारची शिकार आहोत, हे जाणवणं हा या सिनेमाचा हायपॉइंट आहे. किंबहुना तोच सिनेमा आहे.
वीराचं लहानपणी झालेलं लैंगिक शोषण आणि महावीरनं पाहिलेलं त्याच्या पित्याकडून आईचं झालेलं वेगळ्या प्रकारचं शोषण या समान धाग्यानं वीरा आणि महावीर जोडले जातात. हा धागा दिग्दर्शकानं कमालीच्या संयमानं आणि अलवारपणानं जोडला आहे. महावीरची आई म्हणत असलेली लोरी वीरानं म्हणणं आणि त्याच्या आईसारखाच ड्रेस तिच्या अंगात असणं, त्यानंतर टेम्पोत झोपलेल्या महावीरला वीरानं आईच्या मायेनं थोपटणं हे सगळं एवढ्या सहजपणानं दिग्दर्शकानं सूचित केलं आहे, की त्याला द्यावी तेवढी दाद कमीच. वास्तविक भाटीसारखा गुंड आणि त्याची टोळी वीरासारख्या सुंदर तरुणीला पळवते, तेव्हा सर्वप्रथम ती टोळी तिचं काय करील, याचा कोणीही सहज अंदाज करू शकेल. या सिनेमातही सुरुवातीला तसंच वाटतं. मात्र, तसं काही न घडता, नंतर थेट महावीरच्या आईचा संदर्भ येणं आणि त्याअनुषंगानं त्याची तिच्याकडं पाहण्याची दृष्टी बदलणं इथपर्यंतचा प्रवास खरं तर खूपच न पटण्यासारखा वाटू शकतो. मात्र, या सिनेमात आपल्याला तसं वाटत नाही, हे दिग्दर्शकाचं यश आहे. दोघांच्या बालपणाचा संदर्भ देऊन दिग्दर्शकानं त्यांच्या जगण्यातल्या हरवलेल्या वाटा सूचित केल्या आहेत. या वाटा दोघांनाही हायवेच्या प्रवासात मिळतात. माणसाची सगळी धडपड ही शेवटी सुखाच्या, मायेच्या, आपुलकीच्या त्या चार-दोन क्षणांसाठी चाललेली असते, हे दिग्दर्शक फार सहजपणे सांगून जातो.
या सिनेमाला गती नाही, असं अनेक जणांनी लिहिलंय. मला स्वतःला तसं काही जाणवलं नाही. कारण दुसऱ्या भागातला दोन्ही प्रमुख पात्रांचा स्वतःकडं सुरू झालेला प्रवास आहे. तो उलगडत जाताना पाहणं हा एक आनंददायक अनुभव आहे. हिमालयाच्या कुशीत गेलं, की माणसाला स्वतःचा शोध लागतो, असा आपल्याकडं फार जुना, पारंपरिक समज आहे. हिमालयाची अनुभूती घेतलेल्यांना तो पटलाही आहे. दिग्दर्शकानं आपल्या पात्रांनाही शेवटी याच देवभूमीत आणलं आहे. वीराचं हळूहळू ओपन-अप होणं आणि महावीरचंही अगदी हळूहळू, पण निश्चितपणे मोकळं होणं इथं दिसतं. त्या दृष्टीनं वीराचा इंग्लिश गाण्यावरच्या डान्सचा सिक्वेन्स पाहण्यासारखा आहे. महावीर आणि वीरा शेवटी बसच्या टपावर बसून प्रवास करतात, हेही खूपच सूचक. शेवटी दोघांना ते एक मातीचं घर मिळणं, तिथं वीरानं लुटुपुटीचा संसार सुरू करणं, शेवटी महावीरच्या अंगावर जाऊन झोपणं... हे सगळं खूप हृदयस्पर्शी झालंय. त्यामुळं आपली प्रमुख पात्रं एक स्त्री आणि एक पुरुष आहेत आणि त्यांच्यात लैंगिकतेच्या अनुषंगानं काही घडतं आहे, असं कुठंही जाणवत नाही. आपल्या पात्रांना त्या मूलभूत भावनेच्या पार नेऊन, त्यांचा प्रेमासारख्या अंतिम सत्याचा शोध सुरू झाल्याचं दाखवणं यातून दिग्दर्शक हायवेला वेगळ्या उंचीवर नेतो. 
 अलिया भट आणि रणदीप हुडा या दोघांच्याही अभिनयानं हाय-वे जमला आहे. अलियानं लैंगिक शोषणानं दबलेली, अपहरण झाल्यावर घाबरलेली, पण हळूहळू खुललेली वीरा झकास साकारली आहे. या भूमिकेसाठी आवश्यक असलेला अल्लडपणा तिच्याकडं पुरेपूर आहे. काही वेळेला तिचे उच्चार मात्र खटकतात. क्वचित ती तोतरं बोलतेय की काय, असंही वाटतं. पण ते तसं नसेल तर बरं. रणदीप हुडानं महावीरची भूमिका अगदी जिवंत केलीय. भूमिकेत शिरणं म्हणतात, तसं तो या पात्रात घुसला आहे. बाकी नामवंत कलाकार कुणीही नसले, तरी या दोघांनीही ही प्रेमाची गोष्ट मस्त तोलून धरलीय.
ए. आर. रेहमानचं त्या त्या राज्याच्या लोकसंगीताच्या बाजानं जाणारं अप्रतिम संगीत, रसूल पोकुट्टीसारख्या मास्टरचं अफलातून साउंड डिझायनिंग आणि प्रत्येक रस्त्याचा नूर टिपत जाणारी अनिल मेहतांची अव्वल दर्जाची सिनेमॅटोग्राफी यामुळं सिनेमाचा परिणाम कित्येक पटींनी वाढला आहे.
तेव्हा ही सफर चुकवू नका. कम ऑन बोर्ड द टेम्पो...
---
निर्मिती - यूटीव्ही मोशन पिक्चर्स
दिग्दर्शक - इम्प्तियाज अली
संगीत - ए. आर. रेहमान
ध्वनी आरेखन - रसूल पोकुट्टी
सिनेमॅटोग्राफी - अनिल मेहता
प्रमुख कलाकार - अलिया भट, रणदीप हुडा
दर्जा - ****
---


15 Feb 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - गुंडे

थोडा कोळसा, पण बराचसा हिरा...
 ----------------------------------------
साचेबद्धपणा किंवा पठडीबाजपणा (ज्याला इंग्रजीत क्लिशे म्हणतात) याला जर कोळसा म्हटलं, तर ‘गुंडे’ या नव्या हिंदी सिनेमात दिग्दर्शक अली अब्बास जफरनं तो भरपूर उगाळला आहे. इतका, की ऐंशीच्या दशकातल्या सिनेमासारखा सिनेमा काढून दाखवा, अशी कुणी स्पर्धा ठेवली असती, तर जफरच्या या सिनेमानं नक्कीच पहिला नंबर मिळवला असता. पण ‘गुंडे’चा विशेष हा, की तो या पठडीबाजपणाच्या घासाघाशीतून पुढं जातो. चांगली पटकथा, खटकेबाज संवाद, खणखणीत अभिनय, ठेकेदार संगीत, प्रेक्षणीय सिनेमॅटोग्राफी या मूलभूत गोष्टींवर काम केल्यानं आणि त्या जमून आल्यानं या उगाळलेल्या कोळशाच्या खाणीतून एका चांगल्या कलाकृतीचा हिरा बाहेर पडतो.
‘गुंडे’ची गोष्ट आहे विक्रम (रणवीरसिंह) आणि बाला (अर्जुन कपूर) या दोन जीवश्चकंठश्च मित्रांची. १९७१ मध्ये बांगलादेश मुक्तियुद्धानंतर तेथून कलकत्त्यात आलेल्या अनेक निर्वासित मुलांपैकी ही दोन मुलं. मात्र, दोघांच्याही अंगात रगेलपणा आणि मस्ती पुरेपूर. कलकत्त्यात आल्यानंतर कोळशाच्या रूपानं त्यांना जगण्याचा मार्ग सापडतो आणि त्या जीवावर हे दोघं त्या महानगरातले सर्वांत मोठे गुंड बनतात. १९७३ च्या ‘जंजीर’पासून ते १९८७ च्या ‘मि. इंडिया’पर्यंत त्यांचा बालपण ते तरुणपणाचा प्रवास घडतो. (या दोन्ही सिनेमांचे सूचक संदर्भ यात आहेत.) या काळात देशातील आर्थिक, सामाजिक व राजकीय स्थितीही एखाद्या कोळशाच्या भट्टीसारखीच अखंड धगधगती होती. ‘गुंडे’मधल्या प्रत्येक प्रसंगाला या स्थितीचं पूरक व पुरेसं बोलकं नेपथ्य आहे. बांगलादेश युद्धातील विजयानंतर देशाभिमानाचं वारं जोरदार होतं. तिथपासून ते ऐंशीच्या दशकातल्या अशांत, विस्फोटक स्थितीपर्यंत या सिनेमातल्या प्रमुख पात्रांचाही प्रवास घडतो. या दोघांच्या दोस्तीत फूट पाडणारी एक नायिका येते. या दोघांच्या मागावर असलेला एक पोलिस अधिकारी अवतरतो. त्यानंतर उंदीर-मांजराच्या खेळाचाच एक वेगळा अवतार दाखवीत पुढचा सिनेमा पार पडतो.
क्लिशेचा उल्लेख वर झालाच आहे. या सिनेमाच्या लेटरिंगपासून ते पहिल्या अर्ध्या तासाचा भाग पाहताना, दिग्दर्शकाच्या मनावर असलेली ‘शोले’ची तीव्र पकड लक्षात येते. विशेषतः रेल्वेतल्या मारामारीचे प्रसंग पाहताना तर हे प्रकर्षानं जाणवतं. त्यानंतरही अनेक हिंदी सिनेमांत पाहिलेले प्रसंग आणि त्यांच्या नकला एकेक करून समोर येऊ लागतात. कलकत्त्यात सिनेमा घडत असल्यानं अगदी ‘परिणीता’पासून ते ‘कहानी’ ते ‘बर्फी’पर्यंत आणि धनबादमध्ये एक भाग घडताना ‘काला पत्थर’पासून ते ‘गँग्ज ऑफ वासेपूर’पर्यंत सर्व सिनेमांची भेळ पाहत असल्यासारखं वाटायला लागतं. अगदी मध्यंतराची टिपिकल स्टाइल आणि शेवटाकडे नायिकेबाबत होणारा गौप्यस्फोट हे सगळं सराइत प्रेक्षक अगदी सहज ओळखू शकतो. पण हा अखंड क्लिशेचा मारा ठेवूनही हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवील, एवढी काळजी दिग्दर्शकानं घेतल्यानं पैसे वसूल झाल्याशिवाय राहत नाहीत. याचं कारण म्हणजे चांगल्या पटकथेसोबत दिग्दर्शकानं प्रमुख पात्रांवर केलेलं काम. रणवीर, अर्जुन, इरफान आणि प्रियांका चोप्रा या चौघांनीही जबरदस्त काम करून हा सिनेमा तोलला आहे. विशेषतः रणवीर आणि प्रियांका यांचा परफॉर्मन्स झकास झाला आहे. त्यामुळं तोचतोचपणा असूनही सिनेमा कंटाळवाणा होत नाही. 

 विक्रम आणि बाला यांच्यातील मैत्रीचा घट्ट धागा हाही या सिनेमाचा कणा आहे. हा धागा अगदी सुरुवातीच्या प्रसंगात लहानग्या विक्रमला बांगलादेशी लष्करी अधिकाऱ्याच्या लैंगिक शोषणापासून बाला वाचवतो, तेथपासून ते शेवटच्या दृश्यापर्यंत कायम राहतो. हे दोघंही परिस्थितीवश गुंड झालेले असतात आणि मूलतः ते निर्मळ मनाचे, अगदी लहान मुलांसारखे निरागस असतात म्हणे. अर्थात हे एकदा म्हणून झालं, की गुंडांचे बाकी सर्व ‘नाजायज’ उद्योग दाखवायला सिनेमावाले मोकळे होतात. अब्बास जफरनं या सिनेमातही हेच केलंय. अर्थात शेवटी गुंडांचं निर्दालन होतंच, तो भाग वेगळा.
या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी उत्कृष्ट दर्जाची आहे. कोळसा हा सर्व कथानकाच्या पार्श्वभूमीवर येत असल्यानं काळा आणि प्रेमाचा, हाडवैराचा आणि पराकोटीच्या पॅशनचा रंग म्हणून लाल (रक्तवर्णी) हे दोन रंग पडद्यावर प्राधान्यानं दिसत राहतात. याला आगीच्या धगीचा पिवळा रंग जोड म्हणून येतो. ही अफलातून रंगसंगती या सिनेमाला ‘एक्सेप्शनली’ प्रेक्षणीय बनवते. याशिवाय सोहेल सेनचं ठेकेदार संगीत आहे. त्यातही ‘दिल की बजी घंटी यार’ हे गाणं जमलेलं आहे. या गाण्यातील बॉस्को-सीझरची कोरिओग्राफी अफलातून आहे. विशेषतः त्यातली ती घंटी हातात घेऊन लेझीमसारखी घेतलेली स्टेप एकदम खास!
रणवीर आणि अर्जुन या दोघांचीही कामं चांगली आहेत. त्३यातही रणवीर अधिक प्रभावी आहे. अर्जुन अजून थोडा तयार व्हायचा आहे. पण त्याचे प्रयत्न चांगलेच आहेत. प्रियांका या सिनेमात नेहमीपेक्षा अधिक छान दिसली आहे. तिची वेशभूषाही अप्रतिम आहे. दिल की घंटी गाण्यात तिघांनीही केलेला डान्स मस्त आहे. इरफान यांनी साकारलेला ‘सत्यजित सरकार’ नेहमीप्रमाणे झकास. पण त्याला ‘स्पेशल अॅपिअरन्स’ का म्हटलं आहे, कुणास ठाऊक!
थोडक्यात, हा ‘गुंडे’ एकदा पाहायला हरकत नाही.
---
निर्माता : यशराज फिल्म्स
दिग्दर्शक : अली अब्बास जफर
संगीत : सोहेल सेन
सिनेमॅटोग्राफी : असीम मिश्रा
प्रमुख : रणवीरसिंह, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा, इरफान, सौरभ शुक्ला
दर्जा : *** १/२
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे, १५ फेब्रुवारी २०१४)
----

8 Feb 2014

फर्स्ट डे फर्स्ट शो - हँसी तो फँसी

पाहाल तर हसाल...
----------------------- 
 
फर्स्ट थिंग फर्स्ट. विनिल मॅथ्यू दिग्दर्शित ‘हँसी तो फँसी’ हा एक अवखळ, खेळकर अन् निखळ प्रसन्न असा सिनेमा आहे. सध्याच्या ताण-तणावाच्या काळात दोन तास साधं-सरळ मनोरंजन करणाऱ्या आणि त्याचबरोबर कुठं तरी मनाला भिडणाऱ्या अशा कलाकृतींची फार गरज आहे. हँसी तो फँसी ही अपेक्षा नक्कीच पूर्ण करतो. सुमारे १४१ मिनिटांच्या या प्रेमळ खेळात कुठंही एक सेकंदभरही कंटाळा येणार नाही, याची शंभर टक्के तजवीज करतो. तेव्हा ‘पाहाल तर हसाल...’ असं या सिनेमाबाबत खात्रीनं सांगता येईल.
आपला पहिलाच सिनेमा दिग्दर्शित करणाऱ्या विनिलनं या साध्या-सोप्या गोष्टीची हाताळणीही तशीच साधी-सरळ केली आहे. विषय तोच असला, तरी त्याला नावीन्याचा टवटवीतपणा आहे. आपल्या इवल्याशा आयुष्यात आपण आपल्याच हाताने किती प्रॉब्लेम करून ठेवतो. आपल्या जीवाभावाच्या माणसांशी भांडतो, अबोला धरतो, दुरावा निर्माण करतो. साध्या गोष्टी गुंतागुंतीच्या करून ठेवतो. त्याऐवजी आयुष्य खूप छान आहे, ते देवानं तुम्हाला जसं दिलं आहे तसं मस्त, हसत-खेळत जगा, असा खूप सकारात्मक संदेश हा सिनेमा (तसा कुठलाही संदेश देण्याचा आविर्भाव न आणता) सुरेख पद्धतीनं देतो.
सिनेमा या कलाकृतीचा जीव तिच्या कथेत, पटकथेत, संवादात आणि मग कलाकारांच्या अभिनयात असतो. विनिलनं या सर्व टप्प्यांवर उत्तम काम केलं आहे. हर्षवर्धन कुळकर्णीची कथा आणि पटकथा मुळात दमदार आहे. यात अगदी छोटीशी व्यक्तिरेखाही सशक्तपणे लिहिली गेली आहे. प्रत्येक व्यक्तिरेखेला तिच्या अस्तित्वाचं प्रयोजन आहे. त्यामुळं ही छोटी छोटी पात्रंही सिनेमा घट्ट विणीसारखा बांधून ठेवतात.
निखिल (सिद्धार्थ) आणि मिता (परिणीती चोप्रा) या दोघांची ही गोष्ट आहे. निखिलचं लग्न मिताच्या बहिणीशी - करिश्माशी (अदा शर्मा) ठरलं आहे. त्यापूर्वीच त्याची मिताशी भेट होते. मिता आपल्या होणाऱ्या बायकोची बहीण आहे, हे त्याला अर्थातच माहिती नाही. मिता घराबाहेर का पडली आहे, याचीही एक मोठी कहाणी आहे. प्रत्यक्ष भेटीत वेड्यासारखं वागणारी, ड्रग अॅडिक्ट भासणारी, चित्र-विचित्र तोंडं करणारी, मध्येच मँडरिन भाषेत बोलणारी ही मुलगी प्रत्यक्षात आयआयटीची केमिकल इंजिनीअर आहे, हे कळल्यावर निखिलला अर्थातच धक्का बसतो. मिताच्या आयुष्यात काही पेच निर्माण झालेला असतो. तिचा पेच सोडवता सोडवता निखिलही तिच्यात गुंतत जातो.
जाहिरात क्षेत्राकडून सिनेमा दिग्दर्शनाकडं वळलेल्या विनिलनं, आपले दोन्ही नायक-नायिका पहिल्यापासूनच कसे वांड आहेत, हे दाखवण्यासाठी १९९२ मधील दोघांच्या घरातील एका प्रसंगाची सुरुवातीलाच योजना केली आहे. त्यानंतर २००६ मध्ये तरुण झाल्यानंतर हे दोघं पहिल्यांदा कसे भेटतात, तो प्रसंग येतो. त्यानंतर थेट सात वर्षांनी गोष्ट पुढं जाते आणि मग आजच्या काळात सुरू होते. असं असलं, तरी प्रमुख व्यक्तिरेखांसह दोघांच्या घरच्या व्यक्तिरेखा आणि त्यांचा वावर यांना दिग्दर्शक बऱ्यापैकी वाव देतो आणि त्यामुळं एखादी कादंबरी उलगडत जावी, तसतसं या गोष्टीतलं नाट्य उलगडत जातं. संपूर्ण सिनेमाला विनोदाचं एक प्रसन्न नेपथ्य आहे. परिणीतीचं सुरुवातीचं वागणं, निखिलचे मित्र, त्यांच्या गमतीजमती यातून हा हसरा झरा खळाळत वाहत राहतो. हाराच्या चोरीचा प्रसंग आणि परिणीतीनं वठवलेलं सीआयडीचं बेअरिंग हा संपूर्ण सीनच हास्यस्फोटक झाला आहे. परिणीती सर्वांना कपडे खरेदीला घेऊन जाते, तो प्रसंगही जमलेला. या सिनेमात दिग्दर्शकानं दाखवलेल्या मुंबईचा खास उल्लेख करायला हवा. मुंबईतला पाऊस, तिथले ओले रस्ते, समुद्र, चाळी, टोलेजंग इमारती, टॅक्सी, लोकल, विमानतळ ते कोपऱ्यावरची वडापावची गाडी इथपर्यंतच्या मनमौजी मुंबईची सफर मस्तच.
 मूळ कथा आणि त्यानंतर पटकथेची बांधणी घट्ट आणि नेटकी असल्याचा हा परिणाम. त्यानंतर येणारी बाब म्हणजे प्रमुख कलाकारांचा अभिनय. सिद्धार्थ आणि परिणीती या दोघांनीही छानच काम केलं आहे. विशेषतः परिणीतीनं तर हा सिनेमा खाऊन टाकला आहे, असं म्हटलं तरी चालेल. एवढा सहज अभिनय करणारी, बोलक्या डोळ्यांची ही लहान चणीची अभिनेत्री मोठ्या क्षमता बाळगून आहे, यात शंका नाही. या सिनेमात तिनं घेतलेलं सिनिकल बेअरिंग आणि सिद्धार्थशी मैत्री झाल्यानंतर त्याच्यासमोर उलगडत जाणारी खरी मिता तिनं फार सुंदर सादर केली आहे. सिद्धार्थ हा उमदा, देखणा तरुण अभिनेता निखिलच्या भूमिकेत छान शोभून दिसला आहे. या दोघांना अदा शर्मा, नीना कुळकर्णी, शरद सक्सेना, मनोज जोशी आदींनी उत्तम साथ दिली आहे.
सिनेमात काही वाईट बाबी अर्थातच आहेत. विशेषतः मिता आणि तिचे वडील यांच्या काही प्रसंगांत तर तर्काला पूर्ण फाटा दिल्यासारखा वाटतो. शिवाय शेवटही अगदीच फिल्मी. पण या त्रुटींकडं डोळेझाक करून आवर्जून पाहावी, अशीच ही प्रसन्न विनोदी गोष्ट आहे.
----
 निर्माते : करण जोहर, अनुराग कश्यप, विकास बहल, विक्रमादित्य मोटवानी
दिग्दर्शक : विनील मॅथ्यू
कथा-पटकथा : हर्षवर्धन कुलकर्णी
संगीत : विशाल-शेखर
पार्श्वसंगीत : अमर मंगरुळकर
प्रमुख भूमिका : परिणीती चोप्रा, सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज जोशी, अदा शर्मा, शरद सक्सेना, नीना कुळकर्णी, समीर खक्कर आदी.
दर्जा : *** १/२

---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे. ८-२-२०१४)
----