22 Nov 2013

झाकलं माणिक...



मी जामखेडचा. नगर हे माझ्या जिल्ह्याचं प्रमुख ठिकाण. मी ते प्रथम पाहिलं, ते वयाच्या सहाव्या वर्षी बहुधा. 'बालशिवाजी' हा सिनेमा नगरमध्ये अप्सरा टॉकीजमध्ये (आताचं शिवम प्लाझा) लागला होता आणि तो पाहायला आम्ही काकासमवेत नगरमध्ये आलो होतो. त्यानंतर वयाच्या बारा-तेराव्या वर्षी नगरमध्ये राहायलाच आलो. त्यानंतर सलग जरी नाही, तरी सुमारे दहा-पंधरा वर्षं नगरमध्ये राहण्याचा योग आला. माझ्या आयुष्यात त्यामुळं नगर आणि तिथल्या माझ्या रहिवासाचं स्थान अविभाज्य आहे. नगरच्या आठवणी कायम मनात दाटतात. आता असं वाटतं, की हे काहीसं दुर्दैवी गाव. नैसर्गिकरीत्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात येणारं आणि सामाजिक-सांस्कृतिक अन् राजकीयदृष्ट्या पुण्याच्या छायेत येणारं. भव्य ऐतिहासिक वारसा असला, तरी भविष्याकडं जाण्यासाठी वर्तमानानं जे बोट धरावं लागतं, ते कधीच सोडून दिलेलं. एखाद्या बड्या राजघराण्यात पाच-दहा कर्तबगार मुलं असतात अन् त्यातलं एखादं सगळ्याच बाबतीत कमी असतं, तसं हे पश्चिम महाराष्ट्रातलं उणावलेलं ठाणं! खरं तर नगर खूप चांगलं, प्रगत शहर व्हायला काही हरकत नव्हती. किंबहुना ऐंशीच्या दशकात हे तसं बऱ्यापैकी टुमदार शहर होतं. तिथल्या रेल्वे स्टेशनसारखंच. पण पुढं काही तरी जबरदस्त बिनसत गेलं. नवनीतभाई बार्शीकरांसारखं या शहरावर प्रेम करणारं नेतृत्व पुन्हा झालं नाही. त्यामुळंच नाशिक व औरंगाबाद ही शहरं 'प्रगती फास्ट' करीत पुढं निघून गेली आणि नगर हे पुण्याचं (पण सावत्रच) उपनगर बनून राहिलं... पण मला तरी नगर म्हणजे कायम एक झाकलं माणिक वाटत आलेलं आहे...
...माणिक चौक हा नगरमधला एक प्रमुख चौक. माळीवाडा वेशीकडून नगरच्या सुप्रसिद्ध कापडबाजाराकडं जाताना लागतो. तिथं सेनापती बापटांचा पुतळा असून, त्याला एका सुंदर कारंज्याद्वारे संध्याकाळी साग्रसंगीत, संपूर्ण रंगीत अशी आंघोळ घातली जात असे. मी काही वर्षांपूर्वी नगरमध्ये राहत होतो, तेव्हा हे सुंदर दृश्य पाहून कायम तिथं थबकायचो. (आता काय परिस्थिती आहे, माहिती नाही.) चितळे रोड हा नगरमधला महत्त्वाचा रोड. चौपाटी कारंजापासून सुरू होऊन तेलीखुंटापाशी पुन्हा थेट त्या सुप्रसिद्ध कापडबाजाराला जाऊन मिळणारा. या चौपाटी कारंजापाशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अर्धपुतळा आहे. या पुतळ्याभोवतीही एक कारंजं असायचं आणि संध्याकाळी ते छान थुईथुई उडत सावरकरांना सचैल स्नान घडवायचं. मी संध्याकाळी चितळे रोडवर टाइमपास करून घराकडं जाताना या पुतळ्यासमोर थबकायचो. ते कारंजं पाहून मस्त, गार वाटायचं. लालटाकी रोड आणि ती लालटाकी हे नगरमधलं तेव्हाचं तरुणांचं आवडतं 'डेस्टिनेशन' होतं. या लालटाकीवर नेहरूंचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्याच्या पायाशी अर्धगोलाकार, रंगीत दिव्यांच्या झोतात पाणी सोडलं जायचं... संध्याकाळी फिरायला जायचं हे खास ठिकाण होतं... शिवाय सिद्धीबाग, वाडिया पार्क ही ठिकाणं होतीच. सावेडी विकसित होत होतं... पूर्वी झोपडी कँटीन गावाबाहेर वाटायचं, ते हळूहळू मध्यवस्तीत आलं. प्रोफेसर कॉलनी, गुलमोहोर रोड, आकाशवाणी हा सगळा भाग एकदम झक्कास झाला.


थोडक्यात सांगायचं, तर नव्वदच्या दशकातलं नगर हे तसं टुमदार, आटोपशीर व निवांत, मस्त शहर होतं. गुजर गल्ली किंवा सातभाई गल्लीत वाड्यात भाड्यानं किंवा स्वतःचा छोटा फ्लॅट घेऊन राहावं, नवीन मराठी शाळेत किंवा भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये किंवा कुलकर्णी सरांच्या समर्थ विद्या मंदिरात शिकावं, वाडिया पार्क किंवा गांधी मैदानात क्रिकेट खेळायला किंवा एरवी बड्या नेत्यांच्या सभा ऐकायला जावं, चितळे रोडवर भाजी घ्यावी, सारडा किंवा 'कोहिनूर'मधून कपडे घ्यावेत, 'वाय. प्रकाश' (म्हणजे प्रकाश येनगंदूल) किंवा 'डी. चंद्रकांत'कडून शिवून घ्यावेत, 'रामप्रसाद'चा चिवडा खावा, आशा टॉकीजला (आणि नंतर महेश) मॅटिनीचा शो बघावा, मोने कला मंदिरात (आणि नंतर सहकार सभागृहात) नाटकं पाहावीत, संध्याकाळी लालटाकी किंवा गुलमोहोर रोडला फिरायला जावं, १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला भुईकोट किल्ला हिंडून यावा, पावसाळ्यात सायकली काढून चांदबीबीचा महाल किंवा डोंगरगण गाठावं, आठवड्यातून एकदा तरी नगर-पुणे नॉनस्टॉप एसटीनं पुण्याला जावं (काही तरी काम असतंच असतं...), चतुर्थीला माळीवाड्याच्या विशाल गणपतीला किंवा दिल्लीगेटच्या शमी गणपतीला जावं, दर शनिवारी दिल्लीगेटच्या बाहेरच्या शनी मंदिरात जावं, नगर कॉलेजच्या ग्राउंडवर चाललेले सामने पाहावेत, कधी लष्कराच्या परिसरात हिंडून रणगाडे बघावेत, संक्रांतीला पचंब्याची जत्रा गाठावी... असं सगळं तेव्हाचं नगरी आयुष्य होतं. खूप स्वस्ताईही होती. गरजा फार थोड्या होत्या. आता ते खरोखर तसं राहिलं आहे का, मला शंका आहे.

गाव लहान असल्यामुळं बहुतेक सगळे जण एकमेकांना ओळखत. पुण्यात जसा पेठांचा भाग, तसं खरं नगर माळीवाडा ते दिल्लीगेट या दोन वेशींतच नांदत होतं. पूर्वी माळीवाड्याचं एकच स्टँड होतं. आता तीन तीन स्टँड झाले. माळीवाड्याच्या स्टँडच्या बाहेर प्रसिद्ध नगरी तांगे उभे असत. हे तांगे होते, तोपर्यंत बारकुडे रस्ते, गल्ल्या आणि बोळांतून वाडा संस्कृती टिकून होती. मिश्र वस्ती होती, त्यामुळं बहुतांश वेळा एकोप्यानं, गुण्या-गोविंदानं नांदण्याकडं कल असायचा. वर्ष-दोन वर्षांत दंगे-धोपे व्हायचेच. पण दोन्हीकडच्या भडक डोक्याच्या लोकांवर थंडगार पाणी ओतणारे बुजुर्गही दोन्ही बाजूंना उपस्थित असायचे. त्यामुळं ताणेबाणे असले, तरी विखारी नव्हते. शिवाय वस्ती एवढी एकमेकांना लागून आणि व्यवहाराला रोजचा संबंध... त्यामुळं गावात शांतता असे. पण ही शांतता कधी कधी अंगावर येई. कारण नगरी लोक एवढे सहनशील, की चार-चार दिवस पाणी आलं नाही, तरी हूं की चूं करणार नाहीत. आहे त्या पाण्यात भागवतील. त्या चितळे रोडवर नेहरू मार्केटसमोर रोज ट्रॅफिक जॅम व्हायचं. त्यातच गाई-गुरं, एवढंच काय म्हशींचे तांडे त्या रस्त्यावर फतकल मारून बसायचे. पण अस्सल नगरकर त्यांना वळसा घालून आपली लूना पुढं काढत आणि जाताना त्या गोमातेला हात लावून दर्शनही घेत. रस्त्यांची अवस्था भयानक, पण नगरचा माणूस शांतपणे त्यातून पुढे जाईल... नगर एरवी दुष्काळी असलं, तरी पावसाळ्यात कधी कधी जोरदार एक-दोन पाऊस पडतातच. अशा वेळी दिल्लीगेट ते न्यू आर्टस या रस्त्याचं अक्षरशः तळं होई. पण त्याविषयी ना खेद ना खंत. तेव्हा उन्हाळ्यात दिवसेंदिवस लाइट नसायचे... प्रचंड उकडायचं. पण नगरकर रागवायचे नाहीत. शांतपणे अंगणात खुर्ची टाकून डास वारीत बसायचे. ऐन सणाच्या दिवशी पाणी तोडायचं हा तर पालिकेचा खाक्याच होता. पण तेव्हाही कुठं मोर्चा निघाला नाही की निषेधाचं पत्र कुणी लिहिलं नाही. नगरमधल्या या टोकाच्या सहनशीलतेचा प्रचंड राग यायचा. पण नगरी वातावरणात तो मनातच नष्ट व्हायचा. कधी दगड उचलून मारावासा वाटला नाही.
खरं तर हे झाकलं माणिक सांस्कृतिकदृष्ट्याही किती समृद्ध होतं! नगरचं जिल्हा वाचनालय पावणेदोनशे वर्षांपूर्वी स्थापन झालं आहे. पुण्यातदेखील एवढं जुनं ग्रंथालय नाही. मामा (उर्फ मधुकर) तोरडमल, बंडू (उर्फ सदाशिव) अमरापूरकर यांच्यापासून ते मिलिंद शिंदे (उर्फ तांबडेबाबा) व्हाया अनिल क्षीरसागर, मोहन सैद असा इथल्या नाट्य क्षेत्राचा गाजावाजा आहे. नगरमध्ये अनेक नाटकं आणणारे चार्मिंग पेन सेंटरचे सतीश अडगटला यांना कोण विसरेल? रामदास फुटाण्यांपासून ते बाबासाहेब सौदागरपर्यंत अनेक कवी आणि सदानंद भणगेंपासून ते संजय कळमकरांपर्यंत अनेक लेखक अनेक वर्षांपासून नाव राखून आहेत. गंगाधर मोरजे, सुरेश जोशी यांच्यासारखे समर्पित संशोधक नगरमध्ये होऊन गेले. त्यांचं योगदान केवळ अतुलनीय आहे. विलास गिते, प्रा. लछमन हर्दवाणी अनेक वर्षे व्रतस्थपणे आपले अनुवादाचे कार्य करीत आहेत. सु. प्र. कुलकर्णी, लीला गोविलकर, मेधा काळे, अनिल सहस्रबुद्धे, मकरंद खेर यांच्यासारखे प्राध्यापक-लेखक मंडळीही उत्साहाने नगरचं सांस्कृतिक विश्व जागतं ठेवीत आले आहेत. श्रीधर अंभोरे, अनुराधा ठाकूर यांच्यासारख्या चित्रकारांनी राज्यभर नाव गाजवलं, तर शिल्पकार प्रमोद कांबळे यांचं नाव घेतल्याशिवाय नगरचा कलावारसा अपूर्ण राहील, याची खात्री आहे. नगरमध्ये गणपतीच्या मूर्ती तयार होतात आणि त्या राज्यभर जातात.  महापालिकेच्या महावीर कलादालनात वर्षभर कसली कसली प्रदर्शनं सुरू असतात. पूर्वीच्या नगरपालिकेचं पहिल्या मजल्यावरचं सुंदर सभागृह तर अनेक सांस्कृतिक-साहित्यिक सोहळ्यांचं साक्षीदार होतं. अलीकडंच ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं समजल्यावर आपल्या शरीराचाच कुठला तरी हिस्सा नाहीसा झाल्यासारखं मला दुःख झालं होतं.
शैक्षणिकदृष्ट्याही नगरला चांगली परंपरा होती. नगर कॉलेज हे सर्वांत जुनं कॉलेज. शिवाय हिंद सेवा मंडळाचं पेमराज सारडा कॉलेज आणि जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचं न्यू आर्ट्-स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ही आणखी दोन महत्त्वाची कॉलेजेस. शिवाय गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालय आणि विखे पाटलांचं विळद घाटात बांधलेलं इंजिनिअरिंग कॉलेज. या पंचकोनात नगरचं कॉलेजविश्व फिरायचं. पुणे विद्यापीठाला जोडलेलं असल्यानं दर्जा आणि प्रतिष्ठा लाभलेली. संपूर्ण जिल्ह्यातून आणि अगदी शेजारच्या मराठवाड्यातूनही मुलं नगरला शिकायला येतात. राजकीयदृष्ट्या नगर हे अत्यंत जागरूक गाव असल्यानं त्या राजकीय वारशाची लस महाविद्यालयीन जीवनातच टोचली जायची. भालचंद्र नेमाडेंच्या बऱ्याचशा कादंबऱ्यांतून नगरच्या तत्कालीन शैक्षणिक विश्वाचं चित्रण आल्याचं जाणकार सांगतात.
नगरमधील खाद्ययात्रेविषयी सहज आठवत गेलो आणि वाटलं, की नगरचं खाद्यजीवनही किती चवदार होतं... जुन्या एसटी स्टँडवरची बाबासाहेबची पुणेरी भेळ आणि त्या मालकांचं ते शास्त्रीय संगीताचं वेड नगरकरांना चांगलंच माहिती आहे. मार्केट यार्डच्या बाहेरही एक गाडी असायची. तिथं तीन रुपयांना भरपेट अन् चविष्ट फरसाण भेळ मिळायची. नगरमध्ये फरसाणला कडबा म्हणतात. तर हा कडबा आणि चुरमुरे घालून केलेला भेळभत्ता म्हणजे अनेकांचं टाइमपास खाणं... माणिक चौकातला वडापाव खूपच फेमस. संध्याकाळी तिथं प्रचंड गर्दी व्हायची. हा वडा एवढा मोठा असायचा, की तो देतानाच दोन पाव द्यायचा.

हा जंबो वडा-पाव खाल्ला, की कधी कधी एका जेवणाचं काम भागायचं. या वडापावनंतर दुर्गासिंग आणि द्वारकासिंगची लस्सी प्यायची. एक दुकान तिथं जवळच होतं, तर दुसरं चितळे रोडवर. चितळे रोडवरच नेता सुभाष चौकात खन्नूशेठ पंड्यांचं रुचिरा स्वीट्स आहे. लोक सकाळी नाष्ट्याला गरम जिलेबी घेऊन खातात, हे दृश्य माझ्या आयुष्यात सर्वप्रथम पाहिलं ते इथंच. खरोखर या जिलेबीसारखी खमंग, कुरकुरीत जिलेबी मी अन्यत्र कुठं अजून तरी खाल्लेली नाही. याच चौकात नगरचा प्रसिद्ध खवा मिळायचा, ते काका हलवाईंचं दुकान होतं. कापडबाजारात स्वीट होम हे आइस्क्रीमचं दुकान आणि तिथलं मँगो आइस्क्रीम हा कापडबाजारातल्या खरेदीनंतरचा हमखास कार्यक्रम असायचा. कोहिनूरच्या खालीच असलेला महेंद्र पेडावाला आणि त्यांचे ते जंबो साइझ पेढे परीक्षांमधलं आमचं यश खरोखर वर्धिष्णू आणि गोड करायचे. महेंद्र पेडावालांकडं मिळणाऱ्या विविध चवींच्या शेव हेही एक आकर्षण असायचं. सिद्धीबागेसमोर असलेल्या 'रॉयल' या फेमस दुकानातलं आइस्क्रीम आणि पिस्ता कुल्फी खाल्ली नाही, असा नगरकर माणूस नसेल! अर्बन बँक रोडवर रसना नावाचं मिसळीचं दुकान होतं. तिथली जहाल, तिखट मिसळ खाऊन डोळ्यांतून पाणी वाहिल्याच्या आठवणी आहेत. सारडा कॉलेजच्या कँटीनची मिसळही फेमस होती म्हणे. पण ती खाण्याचा अस्मादिकांना कधी योग आला नाही. मार्केट यार्डच्या दारात एक आवळ्याचे सर्व पदार्थ मिळणारं दुकान होतं. तिथं आवळ्याचा चहा मिळायचा. असा चहा अन्यत्र कुठंही आजतागायत मिळालेला नाही. तिथंच समोर सुखसागर नावाचं हॉटेल होतं. त्या हॉटेलात प्रथम सीताफळाच्या चवीचं आइस्क्रीम खाल्ल्याचं आठवतंय. नगरच्या पंचक्रोशीत विशेषतः पांजरपोळ संस्थेत भरणाऱ्या हुरडा पार्ट्या याही नगरच्या खाद्यजीवनाच्या अविभाज्य भाग आहेत.
नगरचे दिवस आठवले, की हे सगळं आठवतं. मग पुनःपुन्हा वाटत राहतं, की राजकीय-सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या एवढं पुढारलेलं असूनही नगर मागं का पडलं? हे झाकलं माणिक झाकलेलंच का राहिलं? त्याची किंमत कुणाला का कळली नाही? आशियातलं सर्वांत मोठं खेडं अशी कुचेष्टा नगरचेच लोक करतात. वर चांदबीबी आज जरी नगरमध्ये आली, तरी गल्ली-बोळ चुकणार नाही, असा विनोद करतात. हे प्रतिमाभंजन कशामुळं? ही आत्मपीडा कशामुळं? राजकीय नेतृत्वाची पोकळी आणि स्थानिक लोकमताच्या दबावाचा अभाव या दुहेरी कात्रीत नगरची ही दशा झाली का? माहिती नाही. पण उत्तरं शोधायला हवीत.
नगरमधली पुढची पिढी कदाचित अशी नसेल... त्यांच्यामध्ये काही वेगळ्या ऊर्मी जागत असतील... तसं असेल तर हे 'माणिक'' झळाळून उठायला वेळ लागणार नाही!

9 Nov 2013

सुवर्णभूमीत... ५


परत मायभूमीकडे...
-----------------------

सकाळी साडेसातला उठलो. कालची ती थरारक पावसाळी रात्र आणि त्या दोन बायकांसोबत अनोळखी टॅक्सीवाल्यासोबत केलेला तो प्रवास आठवला आणि स्वतःचंच हसू आलं. साडेआठपर्यंत आवरून तयार झालो. तेवढ्यात लक्ष्मीचा फोन आला, की ब्रेकफास्टला येतोयस का म्हणून. मग पावणेनऊला खाली लॉबीत गेलो. त्यांच्याबरोबर ज्यूस आणि फळं हा नेहमीचा ब्रेकफास्ट घेतला. नंतर तिथल्या वेट्रेसनं खास थाई चहा आम्हाला सर्व्ह केला. तो घेतला आणि पुन्हा वर रूमवर आलो. बँकॉक पोस्ट टाकला होता. तो चाळला. त्यात युवराजसिंगनं टी-२० वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंवर सहा षटकार मारल्याची बातमी ठळक आली होती. त्या संपूर्ण पेपरमध्ये भारताशी संबंधित अशी ती एकच बातमी होती. त्या पेपरची किंमतही होती २५ बाथ. अर्थात हॉटेलमध्ये मला तो फुकटच मिळाला होता. पण एकूण थायलंडमध्ये इंग्रजी वृत्तपत्र ही काही परवडण्याजोगी बाब आहे, असं वाटलं नाही. त्या मानानं आपल्याकडं पेपरच्या किमती फारच स्वस्त आहेत.
दहा वाजता शॉपिंगसाठी लॉबीत जमायचं असं आमचं ठरलं होतं. त्यानुसार मधुरा आणि मी पुन्हा लोटस आणि सेंट्रल या दोन मॉलमध्ये जाऊन उरलीसुरली खरेदी केली. बरोबर तीन वाजता पिंकी आम्हाला न्यायला गाडी घेऊन आली. खाली लॉबीत आम्ही चौघांनी फोटो काढून घेतले. मग गाडीतून त्याच त्या नाइन रामा रोडवरून सुवर्णभूमी विमानतळाकडं निघालो



पाऊण तासात एअरपोर्टवर पोचलो. तिथं लगेज चेक-इन, इमिग्रेशन आदी सोपस्कार पार पडल्यावर आम्ही थाई एअरवेजच्या लाउंजमध्ये जाऊन बसलो. पावणेसहा वाजता मी तिथून बायकोला मेल पाठविली आणि निघत असल्याचं कळवलं. बरोबर सहा वाजता आम्ही डी-६ नंबरच्या गेटला गेलो. तेथील सोपस्कार आटोपून मुंबईच्या विमानात बसलो. आमच्या विनंतीनुसार मार्सेलिसला बिझनेस क्लासमध्ये अपग्रेडेशन मिळालं. एकच सीट शिल्लक होती. त्यामुळं आम्ही तिघं इकॉनॉमी क्लासमध्ये बसलो. बरोबर पावणेसातला आम्ही त्या सुवर्णभूमीला टाटा करून टेकऑफ केलं. विमानात व्हेज जेवण मिळालं. कुठला तरी फालतू हिंदी सिनेमा पाहत वेळ घालविला. येताना विमान बंगालच्या उपसागरावरून उडत होतं व काही काळ जरा एअर टर्ब्युलन्स जाणवला. पहिल्यांदाच थोडी भीती वाटली. आपल्या खाली प्रचंड पाण्याचा साठा पसरलेला आहे आणि आपल्याला पोहता येत नाही, या दोन गोष्टी एकदमच मनात आल्या. सहज मी खिडकीतून बाहेर पाहिलं. माझ्या डाव्या बाजूला विमानाचा लांबलचक पंख पसरला होता. आमचं विमान ढगांच्या वरून उडत होतं. त्यामुळं खालचं काही दिसत नव्हतं. उलट चंद्र उगवला होता. ढगांच्या वरून मी पहिल्यांदाच असा चंद्र पाहत होतो. चंद्राचा पांढुरका प्रकाश खालच्या ढगांवर पडला होता आणि एका रूपेरी महासागरातून आपलं विमान नावाचं जहाज हळुवारपणं चाललं आहे, असं काही तरी मला वाटू लागलं. अचानक त्या पंखावर साक्षात पवनपुत्र हनुमान बसले आहेत, असं मला चक्क दिसलं. एक गुडघा टेकवून ते त्या पंखावर बसले आहेत आणि माझ्याकडं बघून हसताहेत, असंही मला दिसलं. आता हा निखालस भास होता, यात वाद नाही. (मी इकॉनॉमी क्लासमध्ये बसलो होतो, त्यामुळं मद्य मिळाल्याची व मी ते घेतल्याचीही शक्यता शून्य होती.) पण असं ते दृश्य अचानक माझ्या डोळ्यांसमोर का आलं, याचा उलगडा मला आजतागाजत झालेला नाही. वास्तविक मी खूप देव देव करणारा नव्हे. मारुतीचा भक्त, शनिवारचा उपवास करणारा असा तर मुळीच नव्हे. तरीही मला वाटतं, त्या भीतीच्या क्षणी माझ्या अबोध मनात कुठं तरी खोल दडून बसलेलं मारुती स्तोत्र उफाळून वर आलं असणार आणि त्या मारुती स्तोत्राच्या पुस्तकावर असतो, तसाच तो मारुतीराया तिथं बसलेला दिसला असणार. पण एकूणच त्या प्रसंगानंतर माझी भीती पूर्ण नष्ट झाली. तो एअर टर्ब्युलन्सही आता गेला होता. विमानात सर्वांत जवळचा विमानतळ कुठला, हे समोरच्या स्क्रीनवर येत होतं. आधी पोर्ट ब्लेअर आलं. नंतर हैदराबाद आलं. नंतर तर वेरूळ-अजिंठा, नाशिक हेही नकाशात दिसू लागलं. मग खाली एक झगझगीत शहर दिसलं. ते बहुधा नाशिकच असावं. थोड्याच वेळात विमानाचं डिसेंडिंग सुरू झालं. ठाणं ओलांडलं. खाडीही ओलांडली, पण मुंबईच्या विमानतळावर भरपूर ट्रॅफिक जॅम होतं, म्हणे. मग आमचं विमान आकाशात गोल गोल फेऱ्या मारीत राहिलं. लांब अरबी समुद्रात जाऊन पुन्हा ठाण्यावरून, खाडीवरून एक चक्कर झाली. अखेर खाली ग्रीन सिग्नल मिळाला आणि विमान वेगानं वांद्र्याच्या झगमगाटावरून विमानतळावर उतरलं. जाताना भव्य वाटलेलं आपलं मुंबईचं विमानतळ आता फारच छोटं आणि साधं वाटलं. इमिग्रेशनचे सोपस्कार पार पाडून ग्रीन चॅनेलमधून बाहेर आलो. मला आठवतंय, आता साठीपार गेलेला डॉलर तेव्हा फक्त ३९ रुपयांना होता. कारण समोरच एसबीआयचं करन्सी एक्स्चेंज काउंटरवर हे दर लिहिलेले मला अजून लक्षात आहेत. बाहेर आल्यावर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. कार्डांची देवाणघेवाण झाली. विमानतळाच्या बाहेर पडल्यावर मी प्री-पेड टॅक्सी केली आणि दादरला निघालो. मुंबईत हलका पाऊस सुरू होता. गणपतीचे दिवस होते. काही ठिकाणी सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. रात्री साडेदहा-अकराचा सुमार होता. पण माहीममध्ये ट्रॅफिक तुंबलं होतं. बँकॉकच्या रस्त्यांची आणि मुंबईची सारखी तुलना सुरू झाली. तरीही मुंबईचा डौल, शान, ऐट काही औरच आहे, असंच वाटलं. दादरला अकराची शिवनेरी व्होल्वो मिळाली. अडीचला शिवाजीनगरला आलो. माझे वडील मला न्यायला तिथं आले होते. पहाटे तीनला घरी पोचलो. अशा रीतीनं माझा पहिला परदेश दौरा सुफळ संपूर्ण झाला...


तेव्हा माझ्याकडं डिजिटल कॅमेरा नव्हता. तेव्हा रोल टाकून मी माझ्या कोडॅक क्रोमावर तिथले फोटो काढले. अर्थात ते सगळे चांगलेच आले. पण मोबाइलही कॅमेरावाले नव्हते. सहाच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण आपण फार काही तरी जुनी गोष्ट सांगतो आहोत, असं वाटतंय, एवढं हल्ली सगळं फार वेगानं बदलतंय. अर्थात जग कितीही बदललं, आपण कितीही बदललो, तरी आयुष्यात पहिलेपणाच्या ज्या काही गोष्टी असतात, त्या कधीच विसरल्या जात नाहीत. माझा हा पहिला परदेश दौरा असल्यानं मीही तो कधी विसरणं शक्य नाही. आयुष्याकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोन मला या ट्रिपमुळं मिळाला. थायलंडविषयीचे अनेक गैरसमज दूर झाले. या ट्रिपविषयी लिहावं, असं तेव्हा लगेच मला का वाटलं नाही, हे मला आता लक्षात येत नाही. पण सुदैवानं मी त्या पाच दिवसांची डायरी लिहिली आहे. आता इतक्या वर्षांनंतर या ट्रिपविषयी लिहावंसं वाटलं, तेव्हा त्या डायरीचा नक्कीच खूप उपयोग झाला. मधुरा आणि लक्ष्मी यांच्याशी काही काळ ई-मेलवरून संपर्कात होतो. नंतर तोही संपर्क हळूहळू कमी होत गेला. आता तर तो नाहीच. त्या दोघीही कुठं असतात, काय करतात मला ठाऊक नाही. यथा काष्ठं च काष्ठं च... म्हणतात, तसंच हे. या छोट्याशा ट्रिपमध्ये ग्रेट काही घडलं नसेल, पण तरीही माझ्यासाठी ती स्पेशल आहे, कारण शेवटी ती माझी पहिलीवहिली परदेशाची सहल आहे...


---
(समाप्त)
-----

सुवर्णभूमीत... ४


पुन्हा सुवर्णभूमीकडे...
------------------------

सकाळी साडेसहाला उठलो. साडेसातला आवरून पुन्हा सहाव्या मजल्यावर ब्रेकफास्टला गेलो. तिथं कुणीच नव्हतं. मग थोड्या वेळानं मार्सेलिस आला. त्याच्याबरोबर नाश्ता केला. साडेआठ वाजता चेक-आउट केलं. टोनीलाच यायला जरा वेळ लागला, पण तो आल्यावर आम्ही लगेच निघालो. जाताना एका सॉव्हेनिअर शॉपमध्ये भरपूर खरेदी केली. पावणेदहा वाजता क्राबी विमानतळावर पोचलो. बरोबर दहा वाजता आमचं विमान निघालं आणि साडेअकरा वाजता आम्ही बँकॉकला पोचलो. तिथं आम्हाला घ्यायला आलेल्या लोकांची आणि टोनीची जरा चुकामूक झाली. अखेर ती पिंकी नावाची आमची होस्ट मुलगी कार घेऊन आली. बँकॉकच्या मधोमध नाइन रामा रोड नावाचा एक मोठा एक्स्प्रेस-वे काढला आहे. त्या रस्त्यावरून आमची कार धावू लागली. या रस्त्यावर ४० बाथचा टोल भरावा लागला.  


दोन्ही बाजूंनी उंच उंच इमारती दिसत होत्या. त्यावर थायलंडचा लोकप्रिय राजा भूमिबोल अदुल्यदेज यांची काढलेली भव्य चित्रं लक्ष वेधून घेत होती. हा राजा एवढा लोकप्रिय आहे, की तो रोज वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घालतो आणि थायलंडमधले हजारो तरुण-तरुणी त्या दिवशी त्याच रंगाचा टी-शर्ट घालतात. कुठल्या दिवशी कुठला रंग हे म्हणे आधीच जाहीर केलं जातं. पण त्या राजाला एकूणच पिवळा रंग आवडत असावा. कारण बहुतेक चित्रांत तो पिवळ्या शर्टमध्येच होता. आम्ही गेलो, त्या दिवशी बहुधा गुलाबी रंग होता. अनेक लोक गुलाबी शर्टमध्ये होते. आम्हाला घ्यायला आलेल्या मुलीचं नावही पिंकी होतं आणि तिनंही गुलाबी टॉप घातला होता, हे लक्षात आल्यावर मला जोरदार हसू फुटलं. अखेर पाऊण तासांनी आमच्या सोफीटेल ग्रँड हॉटेलमध्ये पोचलो. हे एक २०-२२ मजली फाइव्ह-स्टार हॉटेल होतं 

तिथं गेल्यावर नियमानुसार हॉटेल इन्स्पेक्शन झालं. या हॉटेलच्या सर्वांत वरच्या मजल्यावर एक खास स्यूट होता. त्याचं नाव आता विसरलो, पण कुठलं तरी राजेशाही थाटाचंच नाव होतं. तिथं राहायला म्हणे सहा हजार डॉलर दिवसाला... लांबूनच त्या खोलीला नमस्कार केला आणि उतरलो. मग हॉटेलच्या दोन मध्यमवयीन, उत्साही मॅनेजरीणबाईंबरोबर लंच झालं. आता हे फाइव्ह-कोर्स जेवण थोडं सरावाचं झालं होतं. म्हणून मग थोडं थोडं करीत पाचही कोर्स पूर्ण केले आणि उठलो. लंचनंतर आम्ही समोरच लोटस म्हणून एक मॉल होता, तिथं गेलो. जाताना एका फूटओव्हरब्रिजच्या पायथ्याशी एक भिकारी जोडपं दिसलं आणि मनोमन समाधान वाटलं. अर्थात हे जोडपं गाणी वगैरे म्हणून भीक मागत होतं आणि जरा बरं दिसत होतं. आम्हीही काही नाणी त्यांच्यासमोर टाकली आणि परदेशी पर्यटक असल्याचं कर्तव्य निभावलं. लोटस मॉल भव्य होता, तरी आपल्याकडेही आता असे मॉल आहेतच. तिथं बरीचशी खरेदी झाली.

स रे सेक्सचा...
------------------

संध्याकाळी नाइट मार्केटला हॉटेलची एक कॅब जाते आणि तिच्यातून अर्थात फ्री जाता येतं, हे कळलं. मग त्याच कॅबनं आम्ही चौघंही त्या ठिकाणी गेलो. आपल्याकडच्या हाँगकाँग लेनसारखीच, पण रुंदीनं बरीच मोठी अशी एक गल्ली होती
बाजूनं एक प्रचंड वाहता रस्ता होता. वरून मोनोरेल जात होती. त्या गल्लीच्या तोंडाशी घड्याळं, किंवा पर्स वगैरे विकणारी दुकानं होती. खरं आकर्षण आत गेल्यावर कळलं. दोन्ही बाजूंना मद्यपानाचे बार होते. आतमध्ये सेक्स शो सुरू होते. त्याचं प्रदर्शन दारातच सुरू होतं. दाराच्या मधोमध एक उंचवटा केलेला होता. त्या उंचवट्याच्या सेंटरला एक स्टीलचा उभा बार होता. तो थेट वरच्या मजल्याला टेकवला होता. त्या बारला धरून आणि त्या प्लॅटफॉर्मवर अनेक मुली उभ्या होत्या. कामुक, उत्तेजक हावभाव करून त्या येणाऱ्या-जाणाऱ्यांना खुळावीत होत्या. त्या मुलींनी अंगावर अगदी छोटी चड्डी आणि वर लज्जारक्षणापुरतं कापड घातलं होतं. अर्थात हे दर्शनी भागात म्हणून एवढं तरी होतं. आतमध्ये या मुली पूर्ण नग्नावस्थेत सेवा देण्यासाठी सज्ज होत्या आणि त्याचीच ही दारावर केली जाणारी जाहिरात होती. मधुरा आणि लक्ष्मी या दोन्ही बायका जग पाहिलेल्या असल्यामुळं त्यांना हे दृश्य पाहून काहीच वाटत नसावं. त्या शांतपणे त्यांची, खास तुळशीबाग टाइप शॉपिंग करीत होत्या. मार्सेलिस केव्हाच एका बारमध्ये सटकला होता. आता या दोन बायका आणि मी त्या बाजारात फिरत होतो आणि दोन्ही बाजूंनी सेक्स शोंनी थैमान मांडलं होतं. त्या गल्लीत अन्य युरोपीय पर्यटकही होते आणि त्यांचा हेतू स्पष्ट होता. त्या गल्लीतून आम्ही पुढं पुढं जाऊ लागलो, तसंतसं मार्केट आणखी उघडंवाघडं होत गेलं. आता तर तिथली माणसं माझ्या हाताला धरून आत नेण्यासाठी झोंबू लागली. बहुतेकांच्या हातात अल्बम होते आणि त्यात मुलींचे फोटो. भाषा समजत नसली, तरी तो माणूस वेगवेगळ्या मुलींच्या फोटोवर बोट ठेवून खाली इंग्रजीत लिहिलेले डॉलरमधले त्यांचे दर सांगत होता, एवढं तर कळत होतंच. या गल्लीत येऊन बारच्या आत पाऊल न टाकणारा मी कुणी तरी खुळा माणूस आहे, असे भाव नंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटू लागले. नंतर त्यांनी माझा नाद सोडून युरोपीय म्हातारे पकडले. त्या गल्लीत अनेक गोरे, विशेषतः म्हातारे पुरुष होते आणि त्यांना थाई मुलींशी सेक्स करण्याचा आनंद उपभोगायचा होता. बँकॉक ही जगातल्या सेक्स मार्केटची राजधानी, हे मला माहिती होतं. पण कागदावर वाचलेलं ते वास्तव त्या गल्लीत असं एकदम माझ्या अंगावर कोसळलं होतं. एक मात्र आहे. त्या बारच्या आत जावं, असं मला चुकूनही वाटलं नाही. आधी मी मजेनं हे सगळं पाहत होतो. मग एकदम लक्षात आलं, की या मुली वयानं फारच लहान आहेत. अगदी बारा-तेरा किंवा त्याहून कमी वयाच्या काही. सर्कशीतल्या मुली दिसतात, तशा लवचिक शरीराच्या त्या मुली अजाणतेपणाने किंवा जाणतेपणाने आपलं शरीर विकायला उभ्या राहिल्या होत्या. काही वेळानंतर मला त्या मुलींची दया येऊ लागली. मधुरा आणि लक्ष्मीला मागं सोडून मी आता बरंच पुढं गेलो होतो. आमची चुकामूक झाली होती. आता पाऊसही सुरू झाला होता. मी आणखी पुढं गेल्यावर ती गल्ली संपली आणि पुन्हा एक वाहता रस्ता लागला. मी माघारी फिरलो आणि पुन्हा त्या गल्लीच्या तोंडाशी येऊन उभा राहिलो. थोड्या वेळानं मधुरा, लक्ष्मी आल्या आणि मी हुश्श केलं. त्याही मला शोधत होत्या. आम्ही मार्सेलिसची वाट पाहू लागलो. पण या गल्लीत गायब झालेला मार्सेलिस आता पुन्हा आपल्याबरोबर लवकर येणं शक्य नाही, याची लवकरच आम्हा तिघांनाही जाणीव झाली. मग त्याचा नाद सोडून आम्ही जेवणासाठी भटकू लागलो. सुदैवानं मला एक इंडियन रेस्टॉरंट दिसलं. एका शीख माणसाचं ते हॉटेल होतं. मग तिथं आम्ही मस्त पंजाबी व्हेज डिश मागविल्या आणि जेवलो. जेवण चांगलं होतं. पाच दिवसांनी नान, फ्लॉवरची भाजी, जिरा राइस असं आपल्या चवीचं जेवलो. बरं वाटलं. तिथून बाहेर पडल्यावर आमची कॅब जिथं उभी राहते, ते ठिकाण शोधू लागलो. पण ते लवकर सापडेना. अखेर कॅब गेली असेल, आता आपण आपली टॅक्सी करून जाऊ, असं मधुरा कट्टी म्हणाल्या. शेवटी मी एक टॅक्सी शोधली. रात्रीचे दहा वाजले होते. आमचं सोफीटेल हॉटेल नेमकं कुठल्या भागात आहे, हे आम्हाला आठवेना. टॅक्सीवाल्यांना विचारलं, तर ते बँकॉकमध्ये चार सोफीटेल हॉटेल आहेत, असं सांगायचे. शेवटी मधुराकडं एक कार्ड सापडलं. त्यात त्या हॉटेलचा पत्ता होता. एक म्हातारा टॅक्सीवाला शेवटी आम्हाला न्यायला तयार झाला. टॅक्सी निघाली. या दोन बायकांना घेऊन एकट्यानं बँकॉकमध्ये फिरताना मलाच टेन्शन आलं होतं. पण त्या दोघी निर्धास्त होत्या. एक तर पाऊस, त्यात टॅक्सीवाला भलत्याच रस्त्याला लागलाय, असं प्रत्येक टर्नला मला वाटायचं. हा खूप बिल करणार, याचीही आम्हा तिघांना खात्री वाटत होती. अखेर आम्ही आपल्याकडं किती पैसे आहेत वगैरे हिंदीतून बोलायला सुरुवात केली. सुमारे पाऊण तासानंतर टॅक्सीवाल्यानं आमच्या हॉटेलमध्ये आम्हाला सुखरूप नेऊन सोडलं. ते हॉटेल २२ मजली असल्यानं बरंच लांबून मला दिसलं. मग मी पुष्कळ आरडाओरडा करून टॅक्सीवाल्याला तिकडं घे, तिकडं घे, असं सांगून टेन्शन आणलं होतं. बिल फक्त १११ बाथ झालं. फसवाफसवी काही नाही. मी हुश्श केलं आणि रूमवर जाऊन पडलो...

(क्रमश:)