19 Apr 2017

बेगम जान रिव्ह्यू...

बाईचं रक्त...
---------------

 
काही काही सिनेमे प्रेक्षकांकडून काही अधिकची अपेक्षा करतात. 'बेगम जान' हा श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित नवा हिंदी सिनेमाही प्रेक्षकांकडून प्रगल्भ प्रतिसादाची अपेक्षा ठेवतो. 'बेगम जान' पाहताना काही तरी तुटल्याची जाणीव सदैव आतून हादरा देत राहते. किंबहुना अशी जाणीव होत राहावी या हेतूनेच सगळ्या सिनेमाची रचना केल्याचे दिसते. या सिनेमाला असलेली फाळणीची पार्श्वभूमी या तुटलेपणाची जाणीव आणखी अधोरेखित करत राहते. हा सिनेमा फाळणीवरचा नाहीच. तो बेगम जान या स्त्रीचा आहे, त्याचबरोबर यातल्या अम्माचा आहे, रुबिनाचा आहे, गुलाबोचा आहे, जमिलाचा आहे, लताचा आहे, अंबाचा आहे, मैनाचा आहे, राणीचा आहे.. अन् छोट्याशा शबनमचाही आहे... आणि सिनेमाच्या सुरुवातीला येणाऱ्या दृश्यातील २०१६ मधल्या दिल्लीतील बसमध्ये चार-पाच लांडग्यांच्या तावडीत सापडलेल्या आजच्या तरुणीचाही आहे...!
या सगळ्या बायका काही तरी सांगताहेत... रक्ताळून सांगताहेत, आक्रंदून सांगताहेत... छातीचा उभार आणि योनीच्या पोकळीपलीकडची 'बाई' कधीच न दिसणाऱ्या प्रचंड मोठ्या मानवी समूहासाठी फार कळकळीनं काही तरी सांगताहेत...
पहा... ती ऐंशी वर्षांची म्हातारी थंडपणे दिल्लीतल्या त्या लांडग्यांसमोर अंगातले सगळे कपडे उतरवतेय... तीच म्हातारी जेव्हा दहा वर्षांची मुलगी असते तेव्हा तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यासमोर आपल्या आईची अब्रू वाचवण्यासाठी हेच करत होती.... (अर्थात तेव्हा तिचं ते कृत्य पाहून पश्चात्ताप पावणारा पोलिस अधिकारी होता, आता काय होईल हे माहिती नाही!)... खुद्द बेगम जान राजाच्या मर्जीसाठी सर्वांत लहान मुलगी त्याच्यासाठी नैवेद्यासारखी पेश करताना, त्यानं ग्रामोफोन आणला नाहीय म्हणून स्वतः गाणं गायला बसते, तेव्हा आतडं पिळवटून टाकतेय... सुरजितचं प्रेम समजावून घेणारी रुबिना आपल्या छातीवर, खाली त्याचा हात ठेवून त्याला काही तरी फार थोर सांगतेय.... मास्टरवर प्रेम करणारी गुलाबो शेवटी त्याच्याकडूनही विकली जाते, तेव्हा दोन दांडग्यांच्या खाली जाताना काळीज हादरवणारी अस्फुट किंकाळी फोडतेय... लहान वयात कोठ्यावर आलेली शबनम शून्यात बघत असते अन् बेगम जानकडून सात-आठ लागोपाठ मुस्कटात खाल्ल्यावर जेव्हा फुटते, तेव्हा त्या दोघीही काही तरी सांगून जाताहेत... 'महिना याद मत दिलाओ साहब, हर बार आता है और लाल कर जा है...' म्हणत मोजणी अधिकाऱ्याला घालवून देणारी बेगम जान आतून आतून बोलतेय... लाडक्या कुत्र्याचं मांस कुणी तरी जेवणात कालवून घालतं तेव्हा भडभडून उलटी करणारी बेगम जान सगळ्या देहातून काही तरी सांगतेय...
असं हे रक्तरंजित आक्रंदन आहे... कोठ्यावरच्या बायका आणि देशाची फाळणी हा तेव्हाच्या काळातील तुटलेपणाचा सर्वोच्च परिपाक मानायला हरकत नसावी. पण हा सिनेमा काळाचा संदर्भ सोडूनही काही सार्वकालिक भाष्य करतो, म्हणूनच तो वेगळा ठरतो. तो सांगतो, स्त्रीच्या आत्मभानाची गोष्ट! स्त्रीच्या देहाचा आदर करा, अशी शिकवण नकळत सदैव सांगत राहतो. झाशीच्या राणीपासून रजिया सुलतानपर्यंतच्या सर्व खंबीर स्त्रियांचे संदर्भ अम्माच्या गोष्टींच्या रूपानं सदैव समोर पेरत राहतो. हा सिनेमा केवळ प्रौढांसाठीचा आहे, पण तो केवळ वयानं नव्हे, तर अकलेनंही वाढ झालेल्यांनी पाहावा असाच आहे. याचं कारण यातल्या बायकांचं दुःख, वेदना समजावून घेण्यासाठी लागणारी कुवत किमान ३५-४० पावसाळे पाहिल्याशिवाय येणं कठीण आहे.
विद्या बालननं साकारलेली बेगम जान पाहणं हा खरोखर विलक्षण आनंद आहे. विद्याची अभिनयक्षमता जबरदस्त आहे, हे वाक्य आता लिहिण्याचीही गरज नाही. विद्या ही विद्या आहे आणि म्हणूनच 'बेगम जान' उभी आहे... अर्थात या सिनेमात बेगम जानची स्वतःची स्टोरी अजून यायला हवी होती, असं वाटत राहतं... पण तो फार मोठा दोष नव्हे. सिनेमाची भाषा टोकदार, थेट आहे. एकूणच प्रभाव गडद करण्यासाठी दिग्दर्शकानं भाषेपासून ते नेपथ्यापर्यंत आणि वेषभूषेपर्यंत सगळीकडं हे टोक गाठलं आहे. पण ते बहुतांश प्रभावीच ठरतं.
बाकी गौहर खान, पल्लवी शारदा या दोघींनीही खूप चांगलं काम केलं आहे. इला अरुण अम्माच्या भूमिकेत परफेक्ट. आशिष विद्यार्थी आणि रजत कपूर भारतीय व पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहेत. त्यांचे हाफ क्लोजअप वगैरेची चर्चा भरपूर झाली असली, तरी तो प्रयोग एकूण ठीकच आहे. नसीरुद्दीन शाह राजाच्या छोट्याशा भूमिकेतही छाप पाडून जातात. त्यांचा मुद्राभिनय बघण्यासारखा... 
 या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे यात आशा भोसलेंनी दीर्घ काळानंतर केलेलं पार्श्वगायन. 'प्रेम में तोहरे' हे आशाबाईंनी गायलेलं गाणं अप्रतिम. वयाच्या ८४ व्या वर्षीही आशाबाईंचा आवाज कसला भारी लागला आहे! बेगम जानच्या अनुभवी, मुरलेल्या स्त्रीत्वाला आशाबाईंखेरीज दुसऱ्या कोणाचा आवाज सूट होणार? या निवडीबद्दल दिग्दर्शकाला खरोखर दाद दिली पाहिजे. चित्रपट संपतो, तेव्हा 'वो सुबह कभी तो आएगी' हे 'फिर सुबह होगी' (१९५८) मधलं मूळ मुकेश व आशाबाईंनी गायलेलं गाणं श्रेया घोषाल अन् अरिजितच्या आवाजात ऐकायला मिळतं. या गाण्यानं शेवट करणं हाही दिग्दर्शकाचा मास्टरस्ट्रोक आहे. त्याला काय सांगायचं आहे, हे सगळं शेवटी त्यात येतं. 'हंसध्वनी'तल्या बासरीची सुरावट हुरहुर लावत असतानाच सिनेमा संपतो...
आपण सिनेमा संपल्यानंतर आधीचे राहिलेले नसतो. आपण स्त्री नावाच्या अथांग महासागराबाबतच्या किंचित अधिक जाणिवेनं समृद्ध झालेलो असतो...
बाईचं रक्त - मग ते कोणत्याही कारणानं का निघेना - तुम्हाला नव्यानं घडवतं, जोडतं हेच खरं...!

(ता. क. सिनेमात काही त्रुटी निश्चित आहेत. काहींना तो प्रचंड अंगावर येणाराही वाटू शकतो. काहींना विस्कळितपणा जाणवेल; पण तरीही त्याकडं थोडं दुर्लक्ष करून एकदा बघावा असा हा सिनेमा नक्कीच आहे.)

दर्जा - चार स्टार
---

16 Apr 2017

पातळ आणि पातळी - मटा लेख

पातळ आणि पातळी... 
----------------------

महाराष्ट्राला विनोदाचे वावडे नाही. या प्रांतात अनेक विनोदी कलाकार, लेखक, नाटककार, दिग्दर्शक होऊन गेले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून ते पु. ल. देशपांड्यांपर्यंत विनोदी लेखनाची मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे. तीच गोष्ट विनोदी भूमिका करणाऱ्या कलावंतांची. दामुअण्णा मालवणकरांपासून शरद तळवलकरांपर्यंत आणि अशोक सराफपासून ते मकरंद अनासपुरेपर्यंत अनेक कलावंतांनी इथला विनोद समृद्ध केला आहे. आचार्य अत्र्यांपासून ते वसंत सबनिसांपर्यंत अनेक नाटककारांनी प्रेक्षकांना गडाबडा लोळायला लावतील एवढी तुफान विनोदी नाटके लिहिली आहेत. अशा या महाराष्ट्रात सध्या विनोदनिर्मितीचा हिणकस प्रकार रुजू पाहतो आहे. तो म्हणजे पुरुष कलाकारांनी साडी नेसायची आणि स्त्रीरूपात काही तरी विनोद करायचे... विशेषतः 'चला हवा येऊ द्या'सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात हे वारंवार घडताना दिसतं आहे. याशिवाय पुरस्कार सोहळ्यांचे कार्यक्रम, काही मालिका यातही हेच होताना दिसतं. विनोदनिर्मिती करण्याचे सर्व मार्ग संपल्यासारखे जो उठतो तो साडी नेसतो आणि विनोद करू लागतो, अशी स्थिती झालेली दिसते. हे जे काही चालले आहे, त्यात विनोद तर नाहीच; उलट बीभत्स रस ओतप्रोत वाहताना दिसतो आहे या संबंधित मंडळींच्या लक्षात येत नाही काय? येत असेल, तर ते केवळ नाइलाजाने, पोटासाठी हे प्रकार करीत आहेत काय? आणि लक्षातच येत नसेल, तर मात्र त्यांच्या एकूणच वकुबाविषयी शंका घ्यायला पुष्कळ संधी आहे, हे नक्की. असे प्रकार वारंवार लोकांसमोर येत राहिले, तर विनोदनिर्मिती अशीच असते आणि असं काही तरी केलं तरच तो विनोद, अशी अत्यंत चुकीची समजूत नव्या पिढीसमोर तयार होण्याची शक्यता आहे आणि ते अधिक धोकादायक आहे. त्यामुळंच या सर्व कलाकारांविषयी आदर बाळगूनही असं सांगावंसं वाटतं, की गड्यांनो, आता पातळ सोडा! कारण पातळी तुम्ही खूप आधीच सोडली आहे...
महाराष्ट्रात पुरुषांनी साडी नेसून काम करण्याची परंपरा पुष्कळ जुनी आहे. पूर्वी महिलांना रंगमंचावर काम करायची परवानगी नव्हती, म्हणून नाइलाजानं पुरुषांना हे काम करावं लागायचं. या नाइलाजाच्या संधीचं सोन्यात रूपांतर केलं ते नारायणराव राजहंसांनी, अर्थात बालगंधर्वांनी... बालगंधर्वांच्या स्त्री-रूपाविषयी पुष्कळ वेळा लिहून, बोलून झालं आहे. त्याविषयी पुनःपुन्हा सांगण्यात अर्थ नाही. एक मात्र नक्की. बालगंधर्वांनी साकारलेली स्त्री ही कधीच हिणकस वा उथळ वाटली नाही. स्त्रीच्या सर्व मानमर्यादांचं यथायोग्य पालन करूनच त्यांनी त्या भूमिका साकारल्या होत्या. स्त्रीदेह हा परमेश्वराचा एक चमत्कार आहे. तो आपल्याला लाभला नाही, याची समस्त पुरुषांनी जरूर खंत करायला हवी. मात्र, त्याच वेळी नाटकापुरतं का होईना, त्या रूपात जाण्याची संधी मिळाली तर आधी तो देह समजून घ्यायला हवा. तो देह समजून घ्यायचा तर आधी स्त्रीचं मन समजून घ्यायला हवं. आपल्या भूमिकेचा अभ्यास म्हणून तरी हे करायला हवं. बालगंधर्व असा अभ्यास करीत असत, हे त्यांच्या भूमिकांना मिळणाऱ्या प्रतिसादावरून अगदी स्पष्टच दिसतं. जाड्याभरड्या, केसाळ देहाला पाचवार वस्त्र गुंडाळलं म्हणजे पुरुषाची स्त्री होत नाही. असं करणं म्हणजे स्त्रीदेहाला अपमान आहे. असं म्हणतात, की वेडा माणूस हा निर्भय असतो. त्याला कशाचंच भय वाटत नाही, कारण त्याला ते भय जाणवतच नाही. स्त्रीचा वेष धारण करण्यामागचं भय आपल्याकडं लोकांना त्यामुळंच जाणवत नसेल का? 
बरं, साडी गुंडाळली, तर गुंडाळली. पण स्त्रीचा वेष धारण करून करायचं काय? तर अत्यंत पाचकळ, तिसऱ्या दर्जाचे विनोद. ज्या विनोदांना आता इयत्ता दुसरीची मुलंही हसत नाहीत, असे कथित, पांचट विनोद! महाराष्ट्रात चांगला विनोद लिहिणाऱ्यांची वानवा आहे, अशी खंत परवाच द. मा. मिरासदारांनी बोलून दाखविली. ते अगदी खरं आहे. चांगला विनोद लिहिला जात नाही, म्हणून तर हे साडी नेसण्याचे केविलवाणे प्रयोग करावे लागतात. चांगला विनोद लिहायचा तर तो लेखक माणूस म्हणून फार मोकळ्या मनाचा, समृद्ध जीवन जगणारा, सर्व कलांचा आस्वाद घेणारा असा हवा. त्याला आजूबाजूच्या भवतालाचं भान हवं. माणसांच्या जगण्याची ओळख हवी. चांगलं लिहिणं, चांगलं वाचणं, चांगलं बोलणं यातून त्याला आशयसमृद्ध जगण्याची चव कळायला हवी. त्यानंतर तो अशा जगण्याचा अभाव असलेल्या जीवनशैलीतील विसंगती टिपून विनोदनिर्मिती करू शकेल ना! इथं मुळात अशा जगण्याचीच ओळख नसेल, तर त्यातली विसंगती लक्षात येणार तरी कशी? एखाद्याच्या लिंगावरून, वर्णावरून, व्यंगावरून केले जाणारे विनोद हे विनोद नसतातच. तो आपल्या मनातील विकृतीचा हिणकस आविष्कार असतो. हल्ली ही विकृतीच सगळीकडं विनोद म्हणून थोपली जात असल्याचं चित्र दिसतं. यातून पुढच्या पिढीला सकस विनोद म्हणजे काय, हेच कळणार नाही हा यातला सर्वांत मोठा धोका आहे. 
पुरुष कलाकारांनी साडी नेसूच नये असं इथं मुळीच म्हणणं नाही. प्रयोग करायला सर्वांनाच आवडतात. कलाकार स्वतःला आव्हान देत असतो आणि ते योग्यही आहे. विजय चव्हाण यांनी साकारलेली 'मोरूची मावशी' किंवा कमल हसननं साकारलेली 'चाची ४२०' ही चांगल्या भूमिकांची उदाहरणं आपल्यासमोर आहेत. दिलीप प्रभावळकर 'हसवाफसवी'त साडी नेसून यायचे तेव्हाही ते कधीच हिणकस वाटले नाहीत. याचं कारण या सर्व कलाकारांनी स्त्री-भूमिका साकारताना कुठलाही अभिविनेश न बाळगता, त्या पात्रातील स्त्रीत्वाला शरण जाण्याचा मार्ग पत्करला होता. त्यातून त्यांनी उभी केलेली स्त्री प्रेक्षकांना स्वीकारार्ह वाटली होती. 'अशी ही बनवाबनवी'मध्ये सचिननं घेतलेलं स्त्री-रूप सर्वांनाच बेहद्द पसंत पडलं होतं. याचं कारण त्या भूमिकेतल्या स्त्रीचं मन अभिनेता सचिननं जाणून घेतलं होतं. स्त्रीच्या देहबोलीचा खूप बारकाईनं अभ्यास केला होता आणि स्त्रीच्या स्त्रीत्वाचा कुठंही अपमान होणार नाही, अशाच पद्धतीनं ती भूमिका पडद्यावर साकारली होती. 
मात्र, अशा गोष्टी अपवाद म्हणूनच ठीक असतात. सचिननंही एकदाच स्त्री-भूमिका केली. आयुष्यभर तो त्या भूमिका करत बसला नाही. अगदी अलीकडं टीव्हीवर वैभव मांगलेची एक मालिका आली होती. वैभव उत्तम कलाकार असला, तरी त्या स्त्री-वेषात तो हिडीसच दिसत होता. अनेक कलाकारांना स्त्री-वेष शोभत नाही. विशेषतः शरीर योग्य नसेल तर अजिबात नाही. त्यातही अॅस्थेस्टिक्सबाबत आपल्याकडं एकूणच आनंदीआनंद आहे. त्यामुळं आपण उभं केलेलं स्त्री-रूप हे हिडीस दिसतं आहे, हेच यांना अनेकदा कळत नाही. कळत असेल आणि तरीही बाष्कळ विनोदनिर्मितीसाठी ते याचा वापर करत असतील तर मात्र ते अधिक गंभीर आहे. 
केदार शिंदेच्या 'अगं बाई अरेच्चा'मधल्या नायकाला - श्रीरंग देशमुखला- अचानक बायकांच्या मनातलं ऐकू येऊ लागतं. हल्ली स्त्री-वेष घेऊन हिडीस विनोद करणाऱ्या कलाकारांना जर बायकांच्या मनातलं ऐकायला आलं, तर मनातल्या मनात त्यांचं जे वस्त्रहरण होईल, त्यापासून सोडवायला कोणताही 'श्रीरंग' येऊ शकणार नाही, एवढं मात्र नक्की.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे - दि. १६ एप्रिल २०१७)
---

7 Apr 2017

#सम्याआणिगौरीच्यागोष्टी #सीझन 1

सम्या आणि गौरीच्या गोष्टी...
---------------------------------
                                                                                                  (pascal campion)   
                                                            
इंट्रो 
-----

सम्या अन् गौरी...
आंबा अन् कैरी...
-------------------
समीर : तू हिरवी कच्ची, तू पोक्त सच्ची...
गौरी : आणि तू?
समीर : मी 'आम' आदमी...
गौरी : अरे, कोटीबाज माणसा, काय करू तुझं?
समीर : लोणचं घाल...
गौरी : घालतेच... म्हणजे रोज तोंडी लावता येईल...
समीर : वाहव्वा! पण लोणचं कैरीचं घालतात; आंब्याचं नाही...
गौरी : मग तू घालणार लोणचं माझं?
समीर : नाही... तुला असंच खाणार...
गौरी : दात आंबतील सम्या...
समीर : हो, पण नव्या 'दंत'कथाही मिळतील...
गौरी : हो, सांगू या रोज?
समीर : नक्की!

(२२-३-२०१७)
-----


१.
सम्या मरतंय आज...
--------------------------------

गौरी (कृतककोपानं) : काय रे सम्या, नेहमी काय चॅटवर असतोस?
समीर (हसून) : अगं, हाही एक प्रकारचा व्यासंगच आहे...
गौरी (चेष्टेत) : व्यासंग कसला आलाय, असंग आहे... प्राणाशी गाठ पडेल कधी तरी... लक्षात ठेव...
समीर : आपला छंद हाच आपला व्यासंग असणं ही किती महान गोष्ट आहे, तुला कळायचं नाही...
गौरी : तुझा छंदच तुला छंदीफंदी बनवतोय... कधी तरी फटका बसेल...
समीर : संगमनेरचे कवी अनंत फंदी यांचा 'फटका' प्रसिद्ध आहे... आता समीर छंदीचा फटका ऐका...
गौरी : तू कोट्या कर नुसता... आज कोण भेटलंय चॅटवर?
समीर : तुला काय करायचंय? हे माझ्या वैयक्तिक स्पेसवर अतिक्रमण आहे...
गौरी : सांगायचं नाही म्हणून सरळ सांग... वाकड्यात शिरू नको, अन् डोक्यातही जाऊ नकोस...
समीर : हम दिल में आते है... दिमाग में नहीं...
गौरी : आता माझ्या 'दिमाग'चं तू 'दही' करू नकोस हं...
समीर : मस्त लागू दे दही... मी खाईन...
गौरी : काल माझी कैरी केली होतीस, आज दही करतोयस... आंबटशौकीनच आहेस....
समीर : आता कोण करतंय कोट्या?
गौरी : ते मरू दे... तू कोणाशी बोलतोस, काय करतोस मी विचारणार नाही... माझं प्रेम कायमच असेल...
समीर : हाच तो प्रेमाचा सर्वोच्च आविष्कार... आता तू एवढ्या प्रेमात असताना मी कशाला दुसरीकडं जाऊ?
गौरी : तू नुसता बोलबच्चन आहेस. लेखकही होशील.... बरा लिहायचास... तुझ्या पूर्वीच्या मेल पाहा....
समीर : मेल्या मेलची आठवण बरी केलीस... मला कामाच्या मेल पाठवायच्यायत...
गौरी : मग कर ना मेल्या ते काम... इथं काय गप्पा मारीत बसलाहेस...
समीर : जातो, पण गौरी, मला ते तीन शब्द तुझ्याकडून ऐकायचेत...
गौरी (लाजते) : इश्श, कितीदा सांगायचं मेलं...
समीर : ईईई, ते नव्हे गं...
गौरी : मग, कोणते?
समीर (हसत) : Go to hell... किती प्रेमानं म्हणतेस तू हे तीन शब्द...
गौरी (हातातली उशी फेकत) : सम्या, मेलास तू आता...

(२३-३-२०१७)
----

२.

कांदा प्रेमाचा 
-------------------

समीर : आज मैं उपर... आसमाँ नीचे... आज मैं आगे, जमाना है पीछे...
गौरी : एवढी खूश का आहे स्वारी? 
समीर : प्रेमात पडलोय मी परत... 
गौरी : ई... ते होय.. तू सारखाच प्रेमात पडत असतोस... त्यात काय विशेष?
समीर : प्रेमात पडणं ही एक वृत्ती आहे. अशी वृत्ती असलेला माणूस सारखा कुणाच्या ना कुणाच्या प्रेमात पडत असतो.
गौरी : काही गरज नाही. उगाच आपल्या आवरता येत नसलेल्या भावनांना काही तरी तात्त्विक मुलामा द्यायचा झालं...
समीर : यात मुलामा द्यायचा प्रश्नच नाही. मुळात मी काही असं ठरवून प्रेमात पडत नाही. मला ना, ज्या गोष्टी माझ्यात नाहीत त्या ज्यांच्याकडं आहेत अशा लोकांचं आकर्षण वाटतं. मग मी त्यांच्या प्रेमात पडतो.
गौरी : पड ना... पण मग तुझ्या बाबतीत हे सगळे लोक बायका-मुलीच का असतात?
समीर : हा हा... हल्ली मी एका बाईच्या प्रेमात आहे म्हटलं, तर त्याला टीआरपी आहे अजून...
गौरी : हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही.
समीर : गंमत वाटते खरंच. प्रेम असं ठरवून करता येत असतं तर काय पाहिजे होतं? लोकांनी रेसिपी लिहिल्या असत्या प्रेमाच्या...
गौरी : लोकांनी कशाला? तूच लिहिशील. प्रेमात कसे पडावे याचे शंभर प्रकार...
समीर : लोक वेगवेगळ्या कारणांनी प्रेमात पडतात. दर वेळी ते वेगळं असतं. अनेकदा त्यात कसलीही अपेक्षा नसते. उलट काही तरी द्यावं अशी ऊर्मी असते.
गौरी : काही नाही. बायका असे खांदे शोधतच असतात. तुझा खांदा ही काही पब्लिक प्रॉपर्टी नाही हे नीटच लक्षात ठेव.
समीर : अरेरे, काय हा दुस्वास? अशानं माझ्या प्रेमालाच खांदा द्यायची वेळ यायची...
गौरी : बघ. म्हणजे देत होतास ना खांदे? 
समीर : खांद्यावरून आपल्यात वांधे नकोत... नाही तर माझ्या नाकाला कांदे लावायची वेळ यायची...
गौरी (हसत) : अरे, माझ्या अकलेच्या कांद्या, काय करू तुझं?
समीर : पापुद्रे काढायला सुरुवात कर!
(२४-३-२०१७)
-----
३.
सम्या अन् सानेगुरुजी....
-------------------------------------

समीर : चुप चुप बैठी हो, जरूर कोई बात है...
गौरी (वैतागून) : गप रे, कसली घाणेरडी गाणी म्हणतोयस सकाळी सकाळी?
समीर : घाणेरडं? काहीही हं गौरी... किती छान गाणं आहे हे!
गौरी : हो रे... पण मध्यंतरी ते सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीत वापरलं होतं ना, तेव्हापासून डोक्यात गेलंय...
समीर : अगं पण त्यात वाईट काय? जनजागृतीसाठीच वापरलं होतं...
गौरी : सम्या, शटअप! ज्या विषयातलं आपल्याला कळत नाही ना, त्यावर बोलू नये...
समीर : धिस इज नॉट डन... धिस इज इनजस्टिस... तुम्हा बायकांना आम्ही सगळे पुरुष असेच का वाटतो?
गौरी : असेच म्हणजे कसे?
समीर : म्हणजे... म्हणजे.... सदैव तुमची चेष्टा करणारे, खिल्ली उडवणारे...
गौरी : आणि सदैव आपलं पुरुषपण अंगावर मिरवणारे...
समीर : हे तूच बोललीस ते बरं... पण वाईट वाटतं खरंच...
गौरी : सम्या, अनुभव आहे बाबा... उगाच नाही बोलत...
समीर : माझा पण वाईटच अनुभव आहे? मला वाटतं, की कधी तरी तुझ्या जागी जाऊन विचार करावा... आणि मी अनेकदा तो करतोही... मग मला तुझ्या छोट्या छोट्या राग-लोभांची कारणं कळायला लागतात...
गौरी : अगं बाई, हो? हे कधीपासून झालं म्हणे?
समीर : चेष्टा नको करूस गौरी... मला खरंच वाटतं, माझ्यात ना एक स्त्रीचं मन दडलेलं आहे. जगात चार प्रकारचे लोक असतात. पुरुषी मन असलेले पुरुष, स्त्री-मन असलेले पुरुष, स्त्री-मन असलेली स्त्री आणि पुरुष-मन असलेली स्त्री... खरं तर स्त्रीच्या अशा दोन कॅटॅगरी करणं हे त्या जातीवर सर्वस्वी अन्यायकारक आहे, हे मला मान्य आहे. पण मी अगदी ढोबळ सांगतोय... मी स्वतः दुसऱ्या कॅटॅगरीतला आहे. स्त्री-मन असलेला पुरुष... सानेगुरुजी तसे होते बघ...
गौरी (खो खो हसत) : तू आणि सानेगुरुजी? वारले मी हसून... अरे माणसा, जरा काही तरी विचार कर रे नावं घेताना...
समीर : हेच मला तुझं आवडत नाही. काही नीट समजूनच घेत नाहीस...
गौरी : सम्या यार, खरंच आपल्यात तूच बाई आहेस आणि मी कोण आहे कुणास ठाऊक.... बाई असलेली पुरुष की बाई असलेली बाई, की बाई नसलेली नुसतीच बाई...
समीर : गप गं बाई...
गौरी : सम्या, स्त्री-मन आहे तुझं असा दावा करतोस ना, मग सांग बघू आत्ता माझ्या मनात काय चाललंय ते?
समीर : हां, हे सांगायचं राहिलं... एका बाईचं मन दुसऱ्या बाईलाही कळत नाही...
गौरी : उगाच काही तरी... मला माझ्या मैत्रिणींची मनं कळतात बरोबर...
समीर : असं तुला वाटतं... त्यांना वाटतं का विचार... बादवे, मलाही तुझ्या मैत्रिणींची मनं कळतात... पळा...
गौरी (हसत) : सम्या, आज माझ्या हातून तुझा खून लिहिलाय हे नाही का कळलं तुला, गाढवा...
समीर : कसं मारणार? कच्चं खाऊन की भाजून?
गौरी : पेटवून... ही हा हा हा....

(२५-३-२०१७)
----

४.
स्कॉच आणि पंचामृत...
-----------------------------------

गौरी (गुणगुणते) : तुला पाहिले मी नदीच्या किनारी...
समीर : अरे वा... छान गाणं म्हणतीयेस...
गौरी : आज ग्रेस आहेत डोक्यात सकाळपासून.... किती त्यांच्या कविता, त्यांची रूपकं, त्यांची मिथकं, त्यांची शब्दकळा... त्यांचं जगणं...
समीर : गौरी, खरं सांगू का? मला काही ग्रेस झेपत नाहीत. ते काय लिहितात, ते काही कळत नाही.
गौरी : ग्रेसची सवय व्हावी लागते. कुठलीही चांगली गोष्ट सहज मिळत नाही, हे लक्षात ठेव...
समीर : पण एवढं अवघड लिहायचंच का म्हणतो मी? मला पुलं आवडतात. त्यांनी लिहिलेलं सगळं कळतं...
गौरी (हसते) : तू स्कॉच आणि पंचामृताची तुलना करतोयस...
समीर : व्हॉट डू यू मीन? ग्रेस स्कॉच आणि पुलं पंचामृत?
गौरी : म्हणजे सारख्या नसलेल्या दोन गोष्टींची तुलना... स्कॉच आपल्या जागी, पंचामृत आपल्या जागी... दोन्ही आपल्याला आवडतंच ना... पण त्यांचा आस्वाद घेण्याच्या जागा वेगळ्या आहेत. त्यातून आनंद मिळण्याच्या जागाही वेगळ्या...
समीर : पण मग प्या ना तुम्ही स्कॉच... आम्हाला आमचं पंचामृतच बरं... आणि खरं सांगू का, ग्रेस यांचं जे काही लेखन आपल्याला कळतं, ते वाचलं तरी खचायला होतं... आयुष्यात अपरिमित दुःखाखेरीज दुसरं काहीच नाही का, असं वाटतं... माझ्यासारख्या आयुष्य समरसून जगणाऱ्या माणसाला नकोय हे दुःखाचं गाणं....
गौरी : असं बघ सम्या, आयुष्यात प्रत्येक वेळ वेगळी असते. कधी सुख असतं, तर कधी दुःख... आत्ता तुझ्या आयुष्यात दुःख नाहीय आणि टचवूड, ते कधीच नसो... पण ज्यांनी असं कमालीचं दुःख सोसलंय ना, त्यांना जाणवतं ग्रेसना काय म्हणायचंय ते... कातडी सोलवटून ते शब्द आपल्या रंध्रारंध्रात घुसतात...
समीर : ए बाई, तू ग्रेससारखं बोलू नकोस... असेल त्यांचं दुःख मोठं... पण ते दुर्बोध का असावं?
गौरी : अरे, मुद्दाम दुर्बोध लिहायचं म्हणून कुणी लिहितं का रे? आणि ते तुला दुर्बोध वाटतंय हे लक्षात ठेव. तुला जर्मन आणि जपानी भाषा कळत नाही, कारण तुला ती लिपी येत नाही. ग्रेस जाणून घ्यायचा असेल तर वेदनेची लिपी वाचायला शिकावं लागतं.... त्यासाठी स्वतःचं कशाला, दुसऱ्याचं दुःख जाणून घेता यावं लागतं...
समीर : गौरे, कुठून शिकलीस गं हे सगळं? किती छान बोलतीयेस...
गौरी : ग्रेस वाचून... मला सगळा ग्रेस कळतो असं नाही. किंवा त्याच्याएवढं दुःख मी सोसलं आहे, असंही मला वाटत नाही. पण मी त्यांच्या जागी स्वतःला ठेवून बघू शकते. त्यांनी लिहिलेल्या शब्दांच्या पलीकडचे अर्थ शोधते.
समीर : त्यांनी स्वतःला दुःखाचा महाकवी म्हटलंय... मला हे खरोखर झेपत नाही. मला आपले 'पुलं'च आवडतात. पुलंही काही वेगळं सांगत नाहीत. पण किती छान सांगतात!
गौरी : सम्या, मोठा हो रे... पुलंच्या यत्तेतून बाहेर ये... ग्रेस मोठा माणूस आहे हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तू वाचक म्हणून वयात येशील बघ...
समीर : मला 'चंद्रमाधवीच्या प्रदेशात' घेऊन चल, गौरी...
गौरी (गळ्यात हात टाकत, डोळ्यांत पाहत) : अगं बाई, बाळ मोठं झालं की लगेच...
(२६-३-२०१७)
-----

५.

आस्वाद 
------------

समीर : गौरे, चल की पिक्चर टाकू एखादा...
गौरी : वेडाबिडा आहेस काय रे जरा... आज सोमवार आहे. सुट्टी नाहीय. तू जा एकटा... नाही तर तुझ्या खांदेकरी मैत्रिणी असतीलच की मोकळ्या... 
समीर : किती कुचकं बोलशील?  पण खरंच, परवा एक मैत्रीण विचारत होती, की तू एकटा कसा काय बघू शकतोस सिनेमा? गंमतच आहे.
गौरी : त्यात काय! मलाही नाही आवडत एकटीनं बघायला...
समीर : मला आवडतं. तरी थिएटरमधे बरेच लोक असतात. कुणीच नसेल तर जास्त आवडेल खरं तर...
गौरी : अगं बाई... हो का!
समीर : कुठल्याही कलेचा आस्वाद घेण्याची प्रक्रिया ही अखेर वैयक्तिकच असते... 
गौरी : असं काही नाही. पुस्तक वाचणं हे तसं असू शकतं. तिथं आस्वादन वैयक्तिक पातळीवरच असतं. पण सिनेमा, नाटक या सामुदायिक आस्वादनासाठीच जन्माला आलेल्या कला आहेत.
समीर : नुसतं एकत्र बघणं किंवा एकत्र ऐकणं याला सामुदायिक आस्वादन म्हणता येत नाही. तसं तर काही लोक पुस्तकवाचनाचा कार्यक्रमही करतात. त्याला काय म्हणणार मग! शिवाय आकलनाची प्रक्रिया वैयक्तिकच असते.
गौरी : किती कीस पाडतोयस! शिवाय काही गोष्टींची चिकित्सा होत नसते. मला आवडतं तुझ्या हातात हात घालून  सिनेमा पाहायला... बास! 
समीर (हसत) : हे माझ्या आकलनापलीकडचं आहे...
गौरी : तेव्हा मुद्दा असा की, एकटा कुठं उलथू नकोस!
समीर : नक्की! यापुढं कुणी ना कुणी असेल माझ्यासोबत...
गौरी (उशी फेकून मारत) : तू मेलास आज सम्या...
(२७-३-२०१७)
-----
६.

नीट जा, नीट ये... जेवलास का?
------------------------------------------------

समीर (स्टेअरिंगवर हात नाचवत)​ : आज मैं​ उपर, आसमाँ नीचे... आज मैं आगे, जमाना है पीछे...​
गौरी : सम्या, गाडी हळू चालव... काटा बघ... १२०.... कंट्रोल... तू खूप फास्ट चालवतोस गाडी.... नाही तर खरोखर आज मैं उपर और गाडी नीचे अशी अवस्था व्हायची...
समीर : तू शेजारी बसून मला गाडी कशी चालवायची सांगू नकोस हं... मला कळतं...
गौरी : ए शहाण्या, काळजी वाटते आम्हाला म्हणून बोलतेय...
समीर : तुम्हा बायकांचं मला काही कळतच नाही. अगदी शेजारी बसलीयेस, तरी काळजी, शेजारी नसतानाही काळजी...
गौरी : तुला नाही कळायचं ते...
समीर : ऑफिसला निघताना मेसेज करा, पोचलो की मेसेज करा... जेवलो की मेसेज करा... पाणी पिलो की मेसेज करा, ते आपलं हे ते केलं की मेसेज करा... अरे, आम्ही काय लहान बाळ आहोत काय?
गौरी : प्रेम आहे ना म्हणून... तुला काय करायचंय बाकी? सांगितलंय ना मेसेज करायला, तेवढा गुपचूप करायचा...
समीर : सगळ्या बायका सारख्याच कशा याबाबत?
गौरी : तुला काय रे अनुभव बाकीच्या बायकांचा?
समीर (हसत) : म्हणजे, मित्र सांगतात ना... बायको, प्रेयसी, गर्लफ्रेंड, व्हॉट्सअॅप मैत्रीण, फेबु मैत्रीण, भाजीवाली मैत्रीण, जिमवाली मैत्रीण, लायब्ररीवाली मैत्रीण, मॉलवाली मैत्रीण... सगळ्यांचा आपला एकच फंडा... नीट जा... गाडी सावकाश चालव... पोचलास की मेसेज कर... मी म्हणतो, काय गरज? आणि हो, ते J1 झालं का? तो एक महाइरिटेटिंग प्रकार आहे. तो शब्द तर आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत घालणार आहेत म्हणे.
गौरी : गप्प बस... तुमची काळजी वाटते, गाढवा, म्हणून हे सगळं...
समीर : अगं हो, कळलं की... पण किती ती काळजी...
गौरी : आम्हा बायकांचं असंच असतं... तुला नाहीच कळणार...
समीर : असं काही नाही. आम्हीही तुमची काळजी करतोच की. पण पुरुषांची काळजी करण्याची पद्धत वेगळी असते...
गौरी : उदाहरणार्थ?
समीर (हसत) : आम्ही तुम्हाला शक्यतो कळूच देत नाही तुम्हाला काळजी वाटेल असं काही...
गौरी (डोळे मोठे करत) : अस्सं काय! सम्या, गुढीची काठी मोकळी होणार आहे संध्याकाळी... तू थांबच...

(२८-३-२०१७)
------

७.

आहे हे असं आहे...!
-------------------------------

समीर : ही गौरी म्हणजे कहर आहे, बाई... थोर, थोर...!
गौरी (लाजत) : एवढं काय मेलं ते कौतुक माझं....
समीर : ए, तुझं कोण कौतुक करतंय? (हातातलं पुस्तक दाखवत) मी या गौरीबद्दल बोलतोय...
गौरी : हं... गौरी देशपांडे... गौरी माझी पण आवडती आहे, तुला माहितीय... एवढी एकच आवड जुळते आपली...
समीर : आणि तुझ्यात आणि तिच्यातही नावापुरतंच साम्य आहे. ती कुठं, तू कुठं?
गौरी : एवढे काही टोमणे मारायला नकोयत... गौरीसारखं जगता येणं हे फार भाग्याचं... एवढं भाग्य प्रत्येकीच्या वाट्याला कुठून येणार?
समीर : गौरी वाचताना आपण वेगळ्याच दुनियेत जातो. तिचं जगणं, तिचे विचार, तिची माणसं सगळंच कसं स्वप्नवत...
गौरी : तिचं जगणं होतंच तसं... पण ते वाचकाला तसं भासतं यात तिच्या लेखनाचंही कौशल्य असणार...
समीर : मला हा अनेकदा प्रश्न पडतो. लेखक व्यक्त होतो तो त्याच्या अनुभवाच्या परिघातच ना... तो जे काही जगला, त्यानं जे काही पाहिलं तेच त्याच्या लेखनात येणार...
गौरी : असंच काही नाही. नाही तर फिक्शन लिहिलं नसतं कुणी. मुळात कुठलंही फिक्शन लेखन म्हणजे वास्तव आणि आभासाचा अद्भुत मेळ असतो... त्यात लेखकाचं जगणं किती आणि आभास किती हे शोधायला जाऊ नये.
समीर : असं कसं? हे कुतूहल असणारच. ज्या व्यक्तीनं एवढं ग्रेट लिहिलंय ती व्यक्ती ग्रेटच असणार ना...
गौरी : असं काही नसतं. लेखक स्वतःचे अनुभव आणि इतरांचेही अनुभव एकत्र करून लिहीत असतो. त्याच्यावर ज्यांचा प्रभाव आहे, ज्या गोष्टी त्याला भारावून टाकतात, ज्या गोष्टी त्याला करायला आवडतात, पण कदाचित करता येत नाहीत अशा सगळ्याच गोष्टी त्याच्या लेखनात उतरू शकतात...
समीर : पण तरीही मला वाटतं, लेखकाचं जगणं महत्त्वाचं आहेच. कारण जगणं हे वास्तव आहे. आता गौरी बघ, जग फिरली प्रत्यक्ष... तर तिचं अनुभवविश्व बघ आणि त्याच काळात पुण्यात दहा ते पाच नोकरी करणाऱ्या अन् फुटकळ दिवाळी अंकांत संसार कथा लिहिणाऱ्या एखाद्या बाईचं अनुभवविश्व... यांची तुलना होईल?
गौरी : अशी तुलना करू नये. आणि गौरीसारखे लेखक ना, वाचकांकडूनही एक किमान प्रगल्भतेची अपेक्षा ठेवून असतात. वाचकाला असं मोठं करणारे लेखक पण आपोआप ग्रेट ठरतात...
​समीर : पण निखळ आनंद देणारे लेखक मोठे नाहीत का?
गौरी : परत तू चुकीची तुलना करतोयस... प्रत्येक वेळेची गरज असते. आपण कायम गोडच खात नाही किंवा सदैव तिखटच खात नाही ना...
समीर : हं, पटतंय. गौरी, त्या गौरीसारखाच मी तुझ्याही प्रेमात आहे...
गौरी : बघ हं... विचार कर.... हा घाट दुस्तर आहे... एकेक पान गळावया लागले, तरी थांग लागणार नाही...
समीर : हा... हा... हा... तरीही तू आवडशीलच.... आहे हे असं आहे!

(२९-३-२०१७)
---

८.

आय अॅम द हॅपीनेस...!
------------------------------------

समीर : गौरी, तुला प्रिया आठवते? आज भेटली होती...
गौरी : कोण प्रिया? तुला छप्पन मैत्रिणी... ही कुठली?
समीर : अगं, ती आमच्या आधीच्या ऑफिसमध्ये होती बघ...
गौरी : हां, तिच्या बॉसबरोबर काही तरी पंगा घेऊन तिनं ऑफिस सोडलं होतं, ती?
समीर : हो. तीच... आज भेटली होती... आम्ही सीसीडीत गेलो मग...
गौरी (संशयानं) : तिचं काय? तुलाच कशी काय भेटली?
समीर : संशयात्म्या, ऐकू घे जरा... ती बोलताना एक वाक्य फार छान म्हणाली...
गौरी : काय?
समीर : ती म्हणाली - आय अॅम द हॅपीनेस...! मला फार आवडलं हे.... किती छान वाक्य आहे ना... आय अॅम द हॅपीनेस!
गौरी : हं.. ठीक आहे. बरं आहे...
समीर : मला याचं महत्त्व फार वाटतं. याचं कारण गेल्या काही वर्षांत ती ज्या प्रकारचं आयुष्य जगली ना, ते मला बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळं त्यातून बाहेर पडून ती आज एवढी फ्रेश दिसत होती, की मलाच खूप छान वाटलं...
गौरी : तुला माहितीय का समीर, हा स्त्रीचा स्वभावधर्म आहे. सगळ्या बायका अशाच असतात. आम्ही आमच्या आयुष्याचं ओझं वाहणं आता बंद केलंय. आम्हाला आता आनंद लुटायचा आहे...
समीर : मला तिचा अॅट्यिट्यूड आवडला. दोन-तीन वर्षांपूर्वी हीच प्रिया काय घायकुतीला आली होती, ते मी पाहिलंय...
गौरी : बायका बदलतात. काळानुसार स्वतःला अॅडजस्ट करतात. तुम्हा पुरुषांनाच नाही जमत हे...
समीर : ती आणखी काय म्हणाली माहितीय का, जोडीदाराला संपूर्ण स्वातंत्र्य देणं हेच प्रेम!
गौरी : कुठली तरी इंग्लिश कादंबरी वाचून आली असेल. त्यातली वाक्यं फेकली तुझ्या तोंडावर... काय रे, तिच्या वाक्यांचं एवढं कौतुक करतोयस... तू स्वतः काय करतोस?
समीर : प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून घ्यायला नकोय काही अगदी...
गौरी : कळलं ना सम्या, चमकदार वाक्यं टाकणं आणि तसं आयुष्य जगता येणं यात फार फरक असतो ते...
समीर : मला एवढंच कळतं, समोरच्याचं जे चांगलं असेल, ते घ्यावं... मला प्रियाचा अॅट्यिट्यूड आवडला... आता मीही म्हणणार - आय अॅम द हॅपीनेस...
गौरी (गळ्यात पडत) : नो बेबी, आय अॅम युअर हॅपीनेस.....


(३०-३-२०१७)
-----

९.

जेथे 'लाघव' तेथे सीता...
---------------------------------

गौरी : सम्या, चल, मस्त गझलचा कार्यक्रम आहे. जाऊ या...
समीर : मला नाही कळत ते... तू जा...
गौरी : आपली एकही आवड जुळत नसताना आपण का प्रेमात आहोत रे?  
समीर : म्हणूनच आहोत कदाचित... बरं असतं ते! 
गौरी : याला काय अर्थ आहे? एकमेकांच्या साथीनं आपण वाढलं पाहिजे ना! 
समीर : काय गरज? तुझी आवड तुझी... माझी आवड माझी... एकमेकांच्या स्पेसवर अतिक्रमण कशाला? 
गौरी : ही काही सक्ती नाहीय. आणि तू नाही आलास तर माझा काहीच तोटा नाहीय. पण काही गोष्टींचा आनंद एकत्रित लुटण्यात गंमत असते. तुला कधी कळणार?
समीर : ही गंमत दोघांना पण आली पाहिजे ना! 
गौरी : अरे येडू, दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होण्यातली गंमत! मला गझल आवडते तर आपण ती जाणून तरी घ्यावी असं का नाही वाटत तुला?
समीर : खरंय. आम्हा पुरुषांना हे जरा कमी असतं नाही! 
गौरी : जरा? अरे, तुम्हाला काहीच कळत नाही. आम्ही बायका वेड्या... आम्हाला भलत्या अपेक्षा असतात. आम्ही न सांगता तुम्हाला सगळं कळावं अशी आमची अपेक्षा असते. वेडेपणाच की!
समीर : नाही कळत आम्हाला... सरळ सांगितलेलं कळतं. उगाच भलत्या अपेक्षा कशाला? खरंच वेडेपणा!
गौरी : पण कधी तरी करून बघ सख्या हा वेडेपणा! कर के देखो! अच्छा लगता है...
समीर : तुझ्यासाठी येईन गं... गझलच काय, रामाच्या देवळात कीर्तनालाही येईन...
गौरी : हा हा हा... मी जायला हवं ना तिथं... 
समीर : खरंय. 'जेथे राघव तेथे सीता' हे आता शक्यच नाही, नाही का! उलट हल्ली 'जेथे लाघव तेथे सीता' असं असतं. मग हे लाघव दाखवणारा कुणी का असेना! 
गौरी : खरंय... पण मग आम्हाला हे लाघव हवं असतं हे तुम्हाला कधी कळणार? मग कशाला बोलतोस?
समीर : आम्ही नाहीच बोलत. जा... जा...
गौरी (हसत) : चिडतोयस काय वेडू! चल, मी तुला नेतेच गझल ऐकायला! च... ल... 
समीर : आपल्या वादांची गझलच किती गोड आहे!
(१-४-२१७)
----

१०.

सहेला रे...
---------------

गौरी : सम्या, कुठं गायब होतास रे एवढे दिवस?
समीर : बरं असतं असं गायब झालेलं... नाही तर अतिपरिचयात अवज्ञा होते...
गौरी : तुझा काय परिचय व्हायचा राहिलाय आता मला? आणि अवज्ञा तर तू करतोसच... त्यातही काय विशेष नाही...
समीर : तिरकस बोलणं सोडू नकोस हं अगदी...
गौरी : बरं, ते राहू दे... कुठं गेला होतास? काय करत होतास? गझलेच्या कार्यक्रमाविषयी काही बोलला नाहीस...
समीर : कधी कधी ना असं वाटतं, काही बोलूच नये. प्रत्येक वेळी आपली प्रतिक्रिया शब्दांत मांडता येतेच असं नाही. मग शांत बसावं असं वाटतं...
गौरी : हे अगदीच खरंय. मला काही काही सिनेमे पाहताना असं होतं. एकदा असं वाटतं, की तुला सांगावं, यावर काही तरी लिही... पण नंतर वाटतं नकोच. आपल्या मनात त्या कलाकृतीविषयी जे काही आतून वाटतं ना, ते तसंच राहावं असं वाटतं. कितीदा असं होतं ना...
समीर : हो, एखादं सुंदर गाणं ऐकलं, सुंदर चित्र पाहिलं, किंवा अगदी छान रंगलेली मॅच पाहिली तरी मला असं होतं...
गौरी : परवा किशोरीताई गेल्या, तेव्हा नाही का... आपण फक्त शांत बसलो आणि 'सहेला रे' ऐकलं.... मग ऐकतच राहिलो... लूपमध्ये... झोप लागलीच नाही...
समीर : कशी लागणार? कलाकार हादेखील मर्त्य माणूसच. पण त्याची कला त्याला कशी अजरामर करून ठेवते बघ! आता किशोरीताई केवळ ऐहिक अस्तित्वानं आपल्यात नसतील. त्यांच्या मैफली, त्यांचा आवाज असेलच आपल्यासोबत....
गौरी : म्हणून काही तरी असं अविस्मरणीय करून जायला हवं बघं सम्या...
समीर : आपली कुठली आली आहे एवढी कुवत?
गौरी : अरे, कुवतीचा मुद्दाच कुठं येतोय यात... तुझ्या परीनं तू जे आयुष्य जगतोयस ना, ते चांगलं जगायचा प्रयत्न कर. चांगलं बघ, चांगलं वाच, चांगलं लिही... आता तुला चांगलं लिहिता येतं ना, मग तू तेच काम कर आणि जे करशील ते सर्वोत्कृष्टच असेल याचा ध्यास घे....
समीर : पण हे 'चांगलं' ठरवणार कोण?
गौरी : तू आतून, मनापासून लिहिलंस ना की ते चांगलंच असतं बघ. मला माहितीय. मी एवढी वर्षं पाहतेय तुला लिहिताना... तू तसं लिहिलेलं मला लगेच कळतं आणि तेच आवडतं...
समीर (हसून) : आणि प्रेम करतेस म्हणूनही आवडत असेल...
​गौरी (गळ्यात हात टाकत) : प्रेमात अवघा रंग एक झाला, की असंच होत असतं....

(७-४-२०१७)
------
31 Mar 2017

एक सिनेमा - दोन रिव्ह्यू

ट्रॅप्ड - एक सिनेमा - दोन रिव्ह्यू
-----------------------------

'ट्रॅप्ड' हा सिनेमा मी काल पाहिला. या सिनेमाचा कुठलाच रिव्ह्यू मी आधी वाचला नव्हता. (तो मी एरवीही कधीच वाचत नाही.) पण तरी सिनेमा चांगला आहे, अशी चर्चा कानावर होती. विक्रमादित्य मोटवानी आणि राजकुमार राव या नावांचंही आकर्षण होतं. या दोघांचीही आधीची कामं पाहिली होती. या सगळ्यांमुळं माझी अपेक्षा कदाचित वाढली असावी. त्यामुळं सिनेमा पाहून झाल्यावर मला तो फार काही ग्रेट वगैरे वाटला नाही आणि त्याला पाचपैकी तीन(च) स्टार द्यावेसे वाटले. नंतर मुग्धा गोडबोले-रानडेनं माझ्या पोस्टवर टाकलेली कमेंट वाचून वाटलं, की खरंच आपल्याला हा सिनेमा आवडलाय की नाही? फार अपेक्षा ठेवून न जाता, कोरी पाटी ठेवून गेलो असतो, तर कदाचित आपलं मत वेगळं असतं. मग डोक्यात विचार आला, की या सिनेमाचे दोन रिव्ह्यू लिहू या. एक चांगली बाजू दाखवणारा आणि एक वाईट... दोन्ही मीच लिहिणार अर्थात... सम्या आणि गौरीच्या गोष्टींसारखाच हाही एक प्रयोग...
----

पहिला रिव्ह्यू (चांगला)
------------------------

महानगरी घुसमटीचं प्रभावी दर्शन
-----------------------------------------------------
विक्रमादित्य मोटवानीचा 'ट्रॅप्ड' हा नवा सिनेमा म्हणजे महानगरी घुसमटीचं प्रभावी दर्शन आहे. राजकुमार रावची प्रभावी भूमिका आणि अव्वल दर्जाचं ध्वनिआरेखन यामुळं 'ट्रॅप्ड' बघणं हा एक अनुभव ठरतो. विक्रमादित्यचे उडान आणि लुटेरा हे दोन्ही सिनेमे त्याच्याविषयी अपेक्षा वाढविणारे आहेत. तीच गोष्ट राजकुमार रावची. गेल्या काही काळात या अभिनेत्यानं वेगवेगळे प्रयोग करीत स्वतःला सिद्ध केलं आहे. ट्रॅप्ड हा नवा हिंदी चित्रपट म्हणजे या दोघांचाही एक नवा प्रयोगच आहे. याचं कारण म्हणजे या सिनेमाची कथा. एक तरुण मुंबईत एका एकाकी इमारतीत पस्तिसाव्या मजल्यावर अडकून पडतो. तिथून बाहेर पडण्याचे सर्व प्रयत्न तो करतो, मात्र तब्बल सात दिवस तो तिथंच कोंडून राहतो. अखेर पुढं त्याचं काय होतं, तो तिथून बाहेर पडतो का, मुळात तो तिथं अडकतोच कसा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं 'ट्रॅप्ड'मध्ये मिळतात. या सिनेमात बहुतांश भागात फक्त नायक शौर्य (राजकुमार राव) आपल्याला दिसतो. त्यासोबत दिसते ती त्याची सुटण्याची धडपड...
इथं दिग्दर्शकानं एक सिच्युएशन तयार केली आहे आणि आपला कथानायक त्यावर रिअॅक्ट होतोय. त्याच्या आयुष्यात अचानक हा संघर्ष निर्माण झालाय. आपल्याही आयुष्यात कित्येकदा काहीच कल्पना नसताना एखादं संकट समोर येऊन ठाकतं आणि आपल्या अंगात मग अचानक त्या संकटाशी लढण्याची ताकद निर्माण होते. माणसाची जीवनेच्छा ही फार आदिम आणि चिवट गोष्ट आहे. जगण्यासाठी माणूस काहीही करू शकतो. कितीही टोकाची परिस्थिती निर्माण झाली, तरी त्यावर मात करू शकतो. आपल्याला कित्येकदा आपल्यात ही क्षमता किती प्रमाणात आहे, याचा अंदाज नसतो. पण अचानक संकट निर्माण झाल्यावर आपल्यालाच आपल्यातील या तीव्र जीवनेच्छेचा शोध लागतो. तो एक दिव्य क्षण असतो. आपण आपल्याला नव्यानं शोधलेलं असतं. 'ट्रॅप्ड'च्या नायकाचं नेमकं तेच होतं. त्याचा हा शोध अत्यंत त्रासदायक आहे, वेदनादायी आहे... त्याच्यासोबत तो प्रेक्षक म्हणून आपल्यालाही सोसावा लागतो. पण दिग्दर्शकालाही हेच अपेक्षित आहे. म्हणूनच त्या रिकाम्या, उंच फ्लॅटमध्ये आपणही नायकासोबत घुसमटत राहतो, दबून जातो, किंचाळतो, ओरडतो, दमून झोपतो, स्वतःलाच दोष देत राहतो आणि अगदी प्रचंड एकटं एकटं वाटून घेतो...
त्या अर्थानं विक्रमादित्यची ही कलाकृती फारच प्रतीकात्मक आहे. महानगरी आयुष्यात याचं प्रत्यंतर आपल्याला वारंवार येत असतं. आजूबाजूला एवढी गर्दी असते, तरी आपण एकाकी असतो. फार एकाकी... इंग्रजीतला 'लोनली' हा शब्द त्यासाठी अचूक आहे. 'अलोन' नव्हे, 'लोनली'! एकटे नव्हे, एकाकी!! तर काही प्रसंगपरत्वे आपलं हे एकाकीपण अचानक आपल्यावर येऊन आदळतं आणि मग त्याचा सामना करण्यावाचून आपल्याला पर्यायच राहत नाही. अशा वेळी फार द्विधा अवस्था होते. आपल्याला हा आहे, तो आहे, असं जे आपल्याला वाटत असतं आयुष्यभर, त्या लोकांचा, त्या नात्यांचा अशा संकटसमयी काहीच उपयोग नसतो, हे एक उमगतं आणि दुसरं म्हणजे अशा संकटांच्या वेळी शेवटी आपण एकटेच असू तर या सगळ्या नात्यांचं करायचं काय, या विचारानं येणारं वैफल्य... या दोन्ही मानवी भावनांना ही कलाकृती फार आतून साद घालते.
'ट्रॅप्ड'मध्ये काही त्रुटी निश्चितच आहेत. विशेषतः पटकथेतील अनेक छिद्रं जाणवतात. सुटकेसाठी केले जाणारे प्रयत्न पाहता, काही तर्कशुद्ध प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. मात्र, दिग्दर्शकाला यातली प्रतीकात्मकता महत्त्वाची असेल, असं समजून हा सिनेमा पाहिला तर बरंच काही गवसेल. विशेषतः आग आणि पाणी या दोन पंचमहाभुतांचा केलेला वापर माणसाच्या प्रगतीचं वैयर्थ दाखवणारा आहे.
राजकुमार राव यानं एकट्यानं हा सिनेमा खाल्ला आहे. फ्लॅटमध्ये अडकल्यानंतरची त्याची घुसमट आणि नंतर सुटकेसाठी त्यानं प्राण पणाला लावून केलेले प्रयत्न त्यानं फार खरे खरे दाखवले आहेत. ते अगदी भिडतात. विशेषतः जीवावर बेततं, तेव्हा आपल्यावरचे मूल्यसंस्कार (उदा. शाकाहारी असणं) किती बेगडी ठरतात, हा अंतर्विरोध त्यानं छान दाखवलाय. चित्रपटाचं ध्वनिआरेखन (अनिश जॉन) अव्वल दर्जाचं आहे. फ्लॅटमध्ये अडकल्यानंतर शौर्यला तिथं फक्त फ्लॅटमधल्या थोड्या फार वस्तूंचा आधार असतो. या वस्तू आणि त्यांचे आवाज त्याचा एकाकीपणा आणखी गडद करतात. हा बारकावा नीटच ऐकण्यासारखा आहे. या सिनेमाला मध्यंतर नाही. सलग एक तास ४१ मिनिटांचा हा थरारक अनुभव आहे.
मला तरी 'ट्रॅप्ड' हा महानगरी जंगलात एकाकी असलेल्या माणसाचा स्वतःशीच असलेला संघर्ष वाटला. एका सिनेमाचे प्रेक्षकांना अनेक अर्थ वाटू शकणं हे त्याचं यशच मानायला हवं. नक्की बघा.
दर्जा - चार स्टार

---
रिव्ह्यू दुसरा (वाईट)
---------------------
सुटलो एकदाचा...!
------------------------------

विक्रमादित्य मोटवानीचा 'ट्रॅप्ड' हा नवा हिंदी सिनेमा संपल्यावर माझ्या मनात 'सुटलो एकदाचा...' ही एकच भावना आली. मुंबईसारख्या महानगरात एक माणूस पस्तिसाव्या मजल्यावर अडकतो, या जवळपास अशक्य वाटणाऱ्या कथानकावर ही गोष्ट आधारलेली आहे. विक्रमादित्य आणि राजकुमार राव या दोघांचेही आधीचे अनुभव आश्वासक आहेत. मात्र, या सिनेमात त्यांनी केलेला हा वेगळा प्रयोग पटकथेत अनेक त्रुटी असल्यानं केवळ प्रयोगाच्याच पातळीवर राहतो आणि एक चांगला सिनेमा होता होता राहिला, असं वाटतं.
SPOILER AHEAD
मुंबईत राहणाऱ्या शौर्य (राजकुमार राव) या तरुणाची ही गोष्ट आहे. प्रेमात पडलेल्या शौर्यला तातडीनं एक जागा हवी आहे. ती जागा मिळाली, तरच त्याची प्रेयसी त्याच्यासोबत पळून येऊन लग्न करणार आहे. या गडबडीत शौर्यला एक एजंट प्रभादेवीतल्या एका एकाकी इमारतीत पस्तिसाव्या मजल्यावर घेऊन जातो. या इमारतीचं काम अद्याप चालू आहे. तिथं कुणीच राहत नाही. खाली फक्त एक वॉचमन आहे. अगदी अडलेला असल्यामुळं शौर्य ती जागा घेतो. दुसऱ्या दिवशी घाईघाईत त्याच्याकडून किल्ली लॅचला राहते आणि मोबाइल आणायला तो फ्लॅटच्या आत गेला असताना, वाऱ्यानं धाडकन दार बंद होतं. शौर्यकडून आतला नॉबही तुटतो आणि तो अडकतो. अशा परिस्थितीत पॅनिक होऊन तोे जे काही करायचं ते करतो. पण दार काही उघडत नाही. त्यातच त्याच्या फोनची बॅटरीही संपते. त्या फ्लॅटमधलं पाणीही जातं. लाइटही जातात. एजंट निघून गेलेला असतो. शौर्य आधी जिथं राहत असतो, तिथल्या मुलांना तो गावी जातोय असं सांगून निघालेला असतो. अशा स्थितीत शौर्य या फ्लॅटमध्ये अन्न-पाण्याविना सात दिवस अडकून पडतो. शेवटी काय होतं, हे पडद्यावर पाहणं इष्ट असं म्हणणं मस्ट असलं, तरी इथं 'मस्त' मात्र नाही. 
याचं कारण म्हणजे दिग्दर्शकाला काहीही करून आपल्या नायकाला त्या फ्लॅटमध्ये अडकवायचंच आहे. त्यामुळं ही तयार केलेली सिच्युएशनच मुळात पटत नाही. त्यामुळं त्यावर डोलारा असलेला पुढचा सगळा ड्रामाही कृत्रिम वाटू लागतो. मुंबईत सहसा वीजपुरवठा खंडित होत नाही. या इमारतीत मात्र सुरुवातीला नीट असलेला वीजपुरवठा पुढं नायक त्या फ्लॅटमधून बाहेर पडेपर्यंत खंडितच असलेला दाखवला आहे. हे मुळात पटत नाही. शिवाय सुटकेसाठी तो जे प्रयत्न करतो, त्यातही बरेच अंतर्विरोध आहेत. एक मोठा टीव्ही तोे खाली फेकतो, त्याचा आवाज होऊनही वॉचमन लक्ष देत नाही, हे पटत नाही. याच वॉचमनला नंतर शौर्यनं खाली भिरकावलेलं पोस्टर मिळतं, त्यावरही तो काहीच करत नाही आणि ते पोस्टर घडी घालून ठेवून देतो, हे अगम्य आहे. नंतर एका शेजारच्या इमारतीच्या छतावर असलेल्या बाईचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो गलोलीतून खडे मारतो, असं दाखवलं आहे. ते अंतर बघता आणि दगडांचा आकार बघता ते त्या इमारतीपर्यंत पोचणं अवघड वाटतं. सगळ्यांत हाइट म्हणजे, पाण्याची गरज असताना, केवळ उंदराला घाबरून शौर्य स्वयंपाकघरात जात नाही, हे अजिबात पटत नाही. नंतर तो जे पक्षी, कीटक मारून खातो, तो सगळा प्रकार किळसवाणा आहे. एकदा तर तो टेरेसमध्ये मोठी आग लावतो तरीही कुणाच्या लक्षात येत नाही, हेही अजबच वाटतं. पाऊस येतो आणि त्याला भरपूर पाणी मिळतं, ही म्हटली तर दिग्दर्शकालाच दिलासा देणारी गोष्ट ठरते. याचं कारण नायकाला पुढचे काही दिवस तगवणार कसं? शेवटी शौर्य जो उपाय करतो, तोच उपाय मग तो पहिल्या किंवा जास्तीत जास्त दुसऱ्याच दिवशी का करत नाही? मदतीला आलेली स्त्री मधूनच परत का जाते? आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे त्याची प्रेयसी त्याचा अजिबात शोध का घेत नाही? त्याच्या टी-शर्टची कंटिन्युइटीही अनेक ठिकाणी बोंबलली आहे.
पटकथेत अशा अनेक त्रुटी असल्यानं सिनेमात गुंतायला होत नाही. नंतर नंतर तर चुका काढण्याकडंच आपला कल वाढू लागतो. शौर्य सुटल्यानंतरची त्याची देहबोली आणि एकूण प्रतिक्रिया मात्र दिग्दर्शकानं छान टिपली आहे. त्याला दाद द्यायला हवी. सिनेमाचं ध्वनिआरेखनही उत्तम दर्जाचं आहे. असं असलं, तरी एक उत्तम सिनेमा बनता बनता राहिला, असंच वाटून जातं.
राजकुमार रावनं अप्रतिम काम केलं आहे. किंबहुना त्याच्यामुळंच आपण हा सिनेमा शेवटपर्यंत पाहू शकतो. यातला नायक आणि त्याची संकटाची स्थिती राजकुमारच्या देहबोलीमुळंच आपल्याला पटू शकते. एक वेगळा प्रयोग म्हणून पाहायला हरकत नाही. पण फार अपेक्षा ठेवल्यास 'सुटकेची वाट' बघत बसावं लागेल.
दर्जा - दोन स्टार
---

5 Mar 2017

'मग्न तळ्याकाठी...'विषयी...

खोल खोल तळं...
-----------------
काल, शनिवारी 'मग्न तळ्याकाठी' नाटक पाहिलं. महेश एलकुंचवारांच्या वाडी चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी अन् युगान्त या गाजलेल्या त्रिनाट्यधारेतलं हे दुसरं नाटक. 'वाडा चिरेबंदी' हे यातलं पहिलं नाटकही काही काळापूर्वी पाहिलं होतं. त्यामुळं हा दुसरा भाग बघण्याची खूप उत्सुकता होती. तो काल अखेर पाहिला आणि धन्य झालो. त्या क्षणी एवढ्या भारावल्या अवस्थेत होतो, की कुठल्याही भावना व्यक्त कराव्याशा वाटत नव्हत्या. पण रात्री मात्र बांध फुटला अन् डोळे अखंड झरत राहिले. कुठं तरी काळजात काही तरी तुटत गेलं. शिवाय अतीव समाधानानंही कधी कधी डोळे वाहतातच की... केव्हा केव्हा तर काही कलाकृती बघून एवढा आनंद होतो की शरीराला कळतच नाही, याचं काय करायचं ते...! मग ते वेडं सगळे आउटलेट्स उघडतं. डोळे वाहायला एवढं निमित्त पुरेसं असतं. नाटककाराचे शब्द, दिग्दर्शकाचं आकलन आणि प्रेक्षकांची पंचेंद्रियं याचं असं काही मेतकूट जमून जातं, की वर्णन अपुरं पडावं. 'मग्न तळ्याकाठी' हे नाटकही आपल्याला असाच आत्मिक अनुभव देतं.
वऱ्हाडातल्या धरणगावात राहणाऱ्या धरणगावकर देशपांडे कुटुंबाची ही कथा. या नाटकाच्या पूर्वी पहिल्या भागात काय झालंय ते थोडक्यात निवेदनाद्वारे सांगितलं जातं. त्यामुळं पहिला भाग न पाहणाऱ्यांनाही बऱ्यापैकी संदर्भ कळतात. (पण माझी शिफारस अशी आहे, की पहिला भाग बघूनच हा भाग बघावा. म्हणजे आस्वादनात अजिबात कुठलीच त्रुटी राहणार नाही.) पहिल्या भागाचा काळ होता १९८५ चा, तर आत्ताचं नाटक घडतंय त्यानंतर दहा वर्षांनी - म्हणजेच १९९५ मध्ये! हा सगळा फारच नजीकचा भूतकाळ आहे. त्यामुळं आत्ता चाळिशीला असलेले लोकही त्या काळातल्या महाराष्ट्राची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती निश्चितच डोळ्यांसमोर आणू शकतात. हे संदर्भ नाटक पाहताना महत्त्वाचे ठरतात. त्यामुळं एका अर्थानं हे नाटक प्रेक्षकांकडूनही एका विशिष्ट प्रगल्भतेची अपेक्षा करतं. असा प्रेक्षक असेल, तर ते त्याला दामदुपटीनं काही तरी परत देतं. ते जे काही आपल्याला परत मिळतं ना, त्याची पावती आपलं शरीरच आपल्याला देतं. आपण कधी हसतो, कधी चिडतो, कधी रडवेले होता, कधी करुणेनं मन भरून जातं, तर कधी संतापानं कडेलोट होतो. पात्रांच्या कथेशी आपण असे तादात्म्य पावतो, याचं कारण एलकुंचवारांची लेखणी आणि चंदू कुलकर्णींच्या दिग्दर्शनाची कमाल... आणि अर्थातच कलाकारांचा अप्रतिम अभिनय!
आपल्याकडं ग्रामीण भागातील सामाजिक चौकटी वर्षानुवर्षं एकाच साच्याच्या होत्या. कुणी काय करायचं आणि कुणी काय नाही, याच्या नियम व शर्ती ठरलेल्या होत्या. महाराष्ट्रातल्या खेड्यांतल्या समाजजीवनाची एक विशिष्ट रचना होती. स्वातंत्र्यपूर्व काळात ती बहुतेक सर्व प्रदेशांत सारखी होती. विदर्भात मालगुजार होते, देशावर पाटील होते आणि कोकणात खोत होते, एवढाच काय तो फरक! उत्तर पेशवाईचा अंमल सरून शंभर वर्षं झाली असली, तरी ब्राह्मणांचा समाजजीवनातील वरचष्मा आणि दबदबा कायम होता. याचं कारण इंग्रजी राजवट आल्यानंतर ब्राह्मणांनी चतुराईनं इंग्रजी शिक्षण पदरात पाडून नोकऱ्या मिळविल्या... तर ते असो. मुद्दा असा, की या ग्रामीण समाजजीवनातील चौकटीला पहिला धक्का लागला तो महात्मा गांधींच्या हत्येनंतर. विशेषतः खेड्यातील ब्राह्मणांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात घडून आलं ते याच काळात. (सुमित्रा भावेंचा 'वास्तुपुरुष' यानंतरच्या दहा वर्षांनंतरच्या खेड्यातील ब्राह्मणांची प्रातिनिधिक कथा सांगतो. विशेष म्हणजे त्यात एलकुंचवारांनीही भूमिका केली आहे.) एलकुंचवार मात्र आणखी पुढच्या काळात येतात आणि १९८५ च्या काळातील विदर्भातील खेड्यामधल्या ब्राह्मण कुटुंबाची शोकांतिका मांडतात.
एलकुंचवारांनी यात सामाजिक मूल्यसंघर्षाचा आणि ढासळत गेलेल्या कुटुंबव्यवस्थेचा असा काही उभा छेद घेतला आहे, की ती केवळ एका कुटुंबाची वा केवळ ब्राह्मणांची शोकांतिका राहत नाही. तिला व्यापक परिमाण लाभतं ते यातल्या चिरंतन मूल्यांच्या लढाईच्या अस्तित्वामुळं. (इथं शेक्सपिअरची आठवण आल्याशिवाय राहत नाही.) एलकुंचवारांच्या लेखणीत ही ताकद असल्यानं ते धरणगावकर देशपांड्यांच्या गोष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊ शकतात.
आपण १९८५ चा काळ पाहिला तर महाराष्ट्रात व देशात तो बऱ्यापैकी अस्थैर्याचा काळ होता. ऐंशीच्या दशकाला सुमार दशकही म्हटलं जातं. केवळ समाज म्हणून नव्हे, तर देश म्हणूनही अनेक आघाड्यांवर आपण निकृष्टतेचे तळ गाठत होतो. इंदिरा गांधींची हत्या झाली होती, राजीव गांधी प्रचंड बहुमतानं सत्तेवर आले होते, भारतानं क्रिकेटचा वर्ल्ड कप नुकताच जिंकला होता, कपिल देव आणि सुनील गावसकर हे क्रिकेटचे हिरो होते, रवी शास्त्रीनं ऑडी पटकावली होती, टीव्ही नुकताच रंगीत झाला होता, दूरदर्शनवर हमलोग मालिका लोकप्रिय झाली होती, मुख्यमंत्री वसंतदादांनी नुकतीच विनाअनुदानित इंजिनीअरिंग कॉलेजांना परवानगी दिल्यानं साखरसम्राट आणि शिक्षणसम्राटांची नवनवी शिक्षण संकुलं उभारण्याकडं वाटचाल सुरू झाली होती, शरद पवार अद्याप एस काँग्रेसमध्येच होते, पुलं-सुनीताबाई अद्याप अॅक्टिव्ह होते आणि गावोगावी कवितांचे कार्यक्रम करीत होते, कुसुमाग्रज, जयवंत दळवी, वसंत बापट, विंदा करंदीकर, व्यंकटेश माडगूळकर ही सर्व मंडळी चांगली कार्यरत होती आणि महाराष्ट्रभर कार्यक्रम करत हिंडत होती, महेश कोठारे आणि सचिन या नव्या जोडगोळीनं अनुक्रमे धुमधडाका अन् नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमांद्वारे मराठी सिनेमात जान फुंकली होती, राज कपूर अद्याप सक्रिय होता; पण आता त्याला सिनेमा चालण्यासाठी ओलेत्या मंदाकिनीचा पदर लागत होता, धर्मेंद्रचा मुलगा सनी देओलनं नुकतंच बेताब नावाच्या सिनेमातून पदार्पण केलं होतं... जागतिकीकरण अद्याप फार लांब होतं, सचिन तेंडुलकर नावाचा मुलगा अजून शिवाजी पार्कपलीकडं कुणाला माहिती नव्हता, मोबाइल ही परग्रहावरची गोष्ट होती आणि सोशल मीडिया हे नावही तेव्हा कुणी ऐकलं नव्हतं...
असं असलं, तरी मराठी मध्यमवर्गीय कुटुंबांनी वर्षानुवर्षं जपलेल्या मूल्यांना, संस्कारांना तडे जायला केव्हाच सुरुवात झाली होती. स्वातंत्र्यानंतर देशात आलेल्या रोमँटिसिझमची पुढच्या वीस-पंचवीस वर्षांतच नेहरूंसोबतच राखरांगोळी झाली होती... इंदिरा गांंधींच्या काळात देशात नवा शिष्टाचार उदयास आला होता, त्याला भ्रष्टाचार असं म्हणत असत... लायसन्स राज, परमिट राजच्या काळात मुंबईतही हाजी मस्तान अन् वरदराजनच्या रूपानं तस्करांचे सम्राट जन्मू लागले होते...
खेड्यांत तर परिस्थिती फारच भीषण होती. अभावग्रस्तता संपत नव्हती, पण मूल्यांशी तडजोड करून पैशांची बेगमी करता येते याची उदाहरणं वेगानं आजूबाजूला दिसू लागली होती... भ्रष्टाचार करण्याची पहिली संधी मिळताच अनेकांनी वर्षानुवर्षं जोपासलेली नीतिमूल्यं क्षणार्धात बिछान्यावर घेतली अन् या नव्या लाटेत ते सर्वार्थानं पतित झाले.
हा सगळा बदल टिपत एलकुंचवारांनी 'मग्न तळ्याकाठी'ची कथा रंगवलीय. हे सगळं वर्णन केलेलं भू-राजकीय वास्तव त्यांच्या कथेत 'बिटवीन द लाइन्स' येत राहतं. पात्रांच्या न बोललेल्या वाक्यांतून ते टोचत राहतं. आणि मग... एका क्षणी पात्रांतलं आणि आपल्यातलं अंतर नष्ट होतं आणि आपणच यातले पराग होतो, आपणच यातला अभय होतो, आपणच बाई होतो, आपणच काकू होतो, आपणच चंदूकाका होतो अन् आपणच रंजू होतो... आपल्या स्खलनाचा सगळा आलेखच या पात्रांच्या रूपानं आरशासारखा लेखक आपल्यासमोर धरतो आणि त्यातलं आपलं नागडं प्रतिबिंब पाहून आपण अंतर्बाह्य हादरून जातो. सध्याच्या काळात आपण एवढे मुखवटे आणि गेंड्यालाही लाजवेल अशी जाड संभाविताची कातडी पांघरून बाह्य जगात वावरत असतो, की हे सगळं भेदून आत काही जाईल, अशी आपल्याला अपेक्षाच नसते. पण एलकुंचवारांमधला समर्थ लेखक आणि चंदू कुलकर्णींमधला प्रतिभावंत दिग्दर्शक असं काही जादूचं इंजेक्शन टोचतो, की हे सगळे मुखवटे, जाड कातडी भेदून या गोष्टीतलं मर्म थेट आपल्या काळजाला भिडतं. आपल्याला उभं-आडवं सोलवटून, आपलीच छिललेली त्वचा नाटककार आपल्या हातावर ठेवतो अन् सांगतो - बघ, यात काही प्राण शिल्लक आहेत का!
... म्हणून यातले भाऊ आपल्याला अगदी अस्सल वाटतात. आपल्याच घरात आपण असे भाऊ बघितलेले असतात. आपल्या वडिलांच्या, आजोबांच्या रूपानं. बिघडलेल्या मुलासमोर हतबल झालेले... पण प्रसंगी कठोर होऊन त्याला सुनावणारे... आपण बघितलेल्या असतात मध्यरात्री ओसरीवर येऊन एकमेकींना सुख-दुःखाच्या गोष्टी सांगणाऱ्या मोठ्या वहिनी अन् मुंबईची त्यांची जाऊ - अंजली... नुसत्या बघितलेल्या नसतात, तर आपणच असतो वहिनी अन् अंजली... म्हणून मग वर्षानुवर्षं पदरांआड दडलेलं त्या बायाचं आभाळाएवढं दुःख असं त्या धरणगावातल्या चांदण्यांच्या साक्षीनं आपल्या काळजात झरू लागतं, तेव्हा डोळ्यांतल्या आसवांना खळ राहत नाही... म्हणून मग पराग अन् अभय पुन्हा बोलायला लागतात, तेव्हा आपलेच हरवलेले आत्ये-मामे-चुलतभाऊ आठवत राहतात आणि त्यांच्यासोबत केलेली दंगामस्ती... पुन्हा लहान व्हावंसं वाटतं...
'मग्न तळ्याकाठी'मधल्या स्त्रियांचं चित्रण हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. देवळात राहायला गेलेल्या मुलाच्या आठवणीनं व्याकुळ होणारी अन् ओसरीवर मध्यरात्री बसून (एरवी अजिबात ऐकू येत नसताना) त्याचा आवाज 'ऐकणारी' आजी, (नवऱ्याबरोबरचं नातं सांगताना) 'आमचं ते डिपार्टमेंट केव्हाच बंद केलंय' असं सहज सांगणारी वहिनी, नवरा अन् मुलगा या दोघांमध्ये भावनांचं सँडविच झालेली अंजलीकाकू, दहा वर्षांपूर्वी मास्तरांसोबत पळून गेलेली अन् आता परागदादाच्या करड्या धाकात कोमेजणारी रंजू... अन् सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे शिकू न दिल्यानं शिक्षणाचं स्वप्न अर्धवट राहिलेली अन् माडीवर शून्यवत होऊन बसलेली प्रभाआत्या... यातलं एकेक व्यक्तिचित्र म्हणजे एकेका कादंबरीचा ऐवज आहे. विशेष म्हणजे नाटकात या पात्रांना जेवढा अवधी मिळतो, तेवढ्यात त्यांच्या जगण्याची ही दीर्घ 'कादंबरी' आपल्याला कळतेही. हेच तर मोठ्या नाटककाराचं श्रेयस असतं....
'मग्न तळ्याकाठी' हा असा भलामोठा सामाजिक-सांस्कृतिक ऐवज आहे. यातल्या तळ्यातला उल्लेख फार सूचक आहे. दहा वर्षांपूर्वी ज्या तळ्यात अभय पोहायला शिकला, ते तळं आता गावची गटारगंगा झालंय.... ज्या स्वच्छ, निर्मळ पाण्यात निर्भयतेचा श्वास घेता येत होता, त्या पाण्याशेजारी आता असह्य दुर्गंधी सुटलीय...
समाज म्हणून तरी आपलं दुसरं काय झालंय? आपल्या समाजाचं तळंही असंच घाणीनं बरबटत अन् आटत चाललंय... ही तीव्र बोचरी भावना ही कलाकृती आपल्या मनात खोल कुठं तरी रुजवते. पण याचा अर्थ हे नाटक नकारात्मक आहे असं नाही. यात अनेक ठिकाणी विनोद आहेत, गमती आहेत, शिव्या आहेत, रांगडा रोमान्स आहे... शेवटी ग्रामीण भागातला अस्सल देशपांड्यांचा तो वाडा आहे... भले आता तो चिरेबंदी नसेल... पण अजूनही आपलं काही तरी चुकलंय या विचारात, आत्मचिंतनात मग्न आहे... शेजारच्या तळ्यासारखाच!
---
दर्जा - साडेचार स्टार
---

2 Mar 2017

ला ला लँड रिव्ह्यू

गाण्याच्या देशात प्रेमाचे गाणे...
------------------------------------


'ला ला लँड' हा सिनेमा म्हणजे गाण्याच्या देशातलं एक सुरेल प्रेमाचं गाणं आहे... प्रेमाच्या जगातलं एक अतीव देखणं चित्र आहे... या चित्रात उल्हसित करणारे चमकदार रंग आहेत... हृदयात कळ उठविणारी रंगसंगती आहे... हातात हात घेऊन म्हणायची गाणी आहेत... आणि आयुष्यात हवं ते कधीच मिळत नाही याची टोचणारी सल घेऊन जगायचं अटळ प्राक्तनही आहे...
'ला ला लँड' असा आपल्या सर्व भावनांना आतून स्पर्श करतो. म्हणूनच तो केवळ एक रोमँटिक म्युझिकल सिनेमा राहत नाही, तर त्याहूनही अधिक काही देणारी मोठी कलाकृती ठरतो. हा सिनेमा पहिल्या दृश्यापासूनच आपली पकड घेतो. लॉस एंजेलिसमधल्या एका उड्डाणपुलावर रुक्ष दुपारी ट्रॅफिक जाम झालेला आहे. अशा वेळी एका गाडीतून एक तरुणी बाहेर येते आणि त्या कंटाळवाण्या जॅमवर मात करण्यासाठी गाणं गाऊ लागते. हळूहळू सगळेच लोक गाडीतून बाहेर येतात आणि त्या पुलावर मस्त गाणी म्हणत नाचू लागतात... पाच मिनिटं नुस्ता दंगा चालू राहतो... एका क्षणी जॅम संपतो... खट्कन बटण बंद केल्यासारखे सगळे जण गाडीत बसतात आणि रांग हळूहळू पुन्हा रांगू लागते... या अप्रतिम फ्लॅशमॉबच्या स्वप्नदृश्यानं दिग्दर्शक डॅमियन शेझेल आपली कहाणी सुरू करतो. पुढं सगळं स्वप्नातलंच वाटावं असं जग आपल्यासमोर अवतरतं. खरं तर नवोदित अभिनेत्री मिया (एमा स्टोन) आणि एक स्ट्रगलर जॅझ पियानिस्ट सबॅस्टियन (रायन गॉसलिंग) यांच्यातली ही प्रेमकहाणी एरवी अगदी सर्वसामान्य वाटू शकली असती. पण शेझेलच्या हाताळणीत या सिनेमाचं यश आहे. विंटर, स्प्रिंग, समर, फॉल व पुन्हा विंटर अशा विविध ऋतूंत हा सिनेमा आपल्याला क्रमशः सैर घडवितो. त्यातही आणखी दोन पातळ्यांवर सिनेमा आपल्या समोर येत राहतो. एक पातळी असते मिया आणि सबॅस्टियन यांच्या वास्तवातल्या जगण्याची. हे जगणं फारसं काही बरं नसतं. दोघंही संघर्ष करीत असतात. वास्तवाचा कडक उन्हाळा दोघांनाही चटके देत असतो. जेव्हा दोघं पहिल्यांदा भेटतात, तेव्हाही त्यांच्यात खटकेच उडतात. पण वारंवार भेटी झाल्यानंतर त्यांच्यातलं प्रेम जागं होतं. हा स्पार्क, ही ठिणगी पडल्यानंतरचा प्रत्येक क्षण दोघांच्याही आयुष्यात एक वेगळं जग घेऊन येतो. हे दुसरं जग. दिग्दर्शकानं आपल्या दृश्यमालिकेद्वारे, त्यातल्या रंगसंगतीद्वारे, नेपथ्याद्वारे आणि अर्थातच संगीताद्वारे ही दोन जगं वेगळी केली आहेत. यातलं दोघांचं प्रेमाचं जग बघण्यात अर्थातच गंमत आहे.
प्रेमात पडलेल्या प्रत्येकाच्या कल्पनाविलासाचा जणू लसावि काढून शेझेलनं हा भाग रंगविला आहे. त्याची सुरुवात या दोघांच्या पहिल्या भेटीतील नृत्यानं होते. त्या रात्री त्या उंच टेकाडावर, खाली दूरवर लॉस एंजेलिसचे 'लक्ष दीप नगरात' पेटलेले असताना, या दोघांतही परस्पर आकर्षणाचे लक्ष दिवे पेटत जातात, आणि क्रौंच पक्ष्यांसारखे जणू 'इन सिंक' होत ती दोघं जे काही अफलातून नृत्य करतात, तो भाग अप्रतिम.
त्यापूर्वी त्या दोघांची थिएटरमधली भेट व पहिल्या न घडणाऱ्या चुंबनाची धमालही पाहण्यासारखी. सगळ्यांत कळस म्हणावा असा सिक्वेन्स म्हणजे ऑब्झर्वेटरीतला. तिथं सॅब मियाला अलगद उचलतो आणि ते बघता बघता अवकाशाच्या पोकळीत पोचतात आणि आकाशगंगांच्या साक्षीनं नृत्य करतात. प्रेमात पडलेले जीव तसेही अवकाशाच्या पोकळीत तरंगत असतात. या कविकल्पनेला दिग्दर्शकानं इथं फार सुंदर दृश्यरूप दिलंय.
नंतर तिचा अभिनेत्री होण्याचा झगडा आणि त्याचंही क्लबचं स्वप्न हा प्रवास समांतरपणे चालू राहतो. दोघंही प्रेमात पडलेले जीव दुसऱ्यातलं चांगलं ते काढून घेण्याचा प्रयत्न करत असतात, हा भाग मला फार छान वाटला. तिला त्यानं स्वतंत्र क्लब काढून मोठं व्हावंसं वाटत असतं, तर त्यालाही तिनं आणखी एक ऑडिशन द्यावी आणि तिच्यातल्या टॅलेंटला न्याय द्यावा असंच वाटत असतं. दोघांमधले प्रेमाचे क्षण साजरे होतात, तेव्हाची रंगसंगती, दोघांचे ब्राइट रंगसंगतीचे कपडे, पडद्यावर येणारी विविध चित्रं हे सगळं नेपथ्य मुळातच बघण्याजोगं आहे.
एकेक ऋतू बदलतो तसे प्रेमाचेही रंग बदलतात... दोघांत प्रेमाचा वसंत येतो, तसाच शिशिरही येतो. ती तिच्या वाटेनं निघून जाते.. हा याच्या वाटेनं... खरं तर नक्की कोणाला काय हवं असतं, त्यातून नक्की काय घडतं... हे सगळं दिग्दर्शकानं मुग्धच ठेवलं आहे. पण कदाचित बहुतेक प्रेमांमध्ये येणारं हे दुराव्याचं अटळ प्राक्तन असावं.
शेवट चटका लावणारा आहे. शेवटचं स्वप्नदृश्य आणि त्यातला गॉसलिंगचा अभिनय जीव ओवाळून टाकावा असा आहे. आत कुठं तरी तुटल्याशिवाय राहत नाही, एवढं नक्की.
एमाला तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळालाच आहे. काय अप्रतिम काम केलंय तिनं! आणि तिचे डोळे... अफाट! त्या डोळ्यांत भावनांचा महासागर दिसतो. काय काय व्यक्त केलंय तिनं त्या निळ्या डोळ्यांतून... एमाला हॅट्स ऑफ! आणि अर्थातच रायन गॉसलिंग... हा देखणा अभिनेता कामही किती सहज, सुंदर करतो! या भूमिकेत त्याच्याशिवाय अन्य कुणाचा विचारच करता येत नाही, हेच त्याचं यश आहे. (वास्तविक हा रोल आधी दुसरा अभिनेता करणार होता... पण नशीब, शेवटी गॉसलिंगनंच तो केला...)
सिनेमाचं संगीत हा त्याचा प्राण आहे, हे म्हटलं तर काहीसं घिसंपिटं वाक्य. पण या सिनेमाच्या बाबतीत ते अगदी शब्दशः लागू होतं. सुरुवातीच्या त्या ट्रॅफिक जॅमच्या गाण्यापासून जस्टिन हर्विट्झचं संगीत आपल्या मनाचा ठाव घेतं. 'अनदर डे इन द सन', 'सिटी ऑफ स्टार्स', 'ए लव्हली नाइट', 'स्टार्ट ए फायर' अशी सगळीच गाणी, ट्रॅक मस्त आहेत. त्यातही 'सिटी ऑफ स्टार्स' सगळ्यांत छान अन् लोकप्रिय!
शेझेलचा हा प्रेमाच्या देशात नेणारा सांगीतिक प्रवास सर्वांनी अनुभवावा आणि नंतर प्रेमानं गाणं गुणगुणावं...

दर्जा - चार स्टार


---

27 Feb 2017

मराठी राजभाषा दिन विशेष

मराठी ज्ञानभाषा व्हावी
---------------------
मराठी राजभाषा दिनानिमित्त दर वर्षी मराठी भाषेविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होते. आपण मराठी लोक असल्यानं आपल्याला चर्चा करायला आवडते. त्यात काही वावगंही नाही. पण फक्त चर्चा केल्यानं हवा तो परिणाम मिळत नाही. मराठी भाषेविषयी नेमकं असंच होताना दिसतं. जगात दहा कोटीहून अधिक लोक ही भाषा बोलतात. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या पहिल्या वीस भाषांमध्ये मराठी आहे. मराठीला लवकरच अभिजात भाषेचाही दर्जा मिळेल. मराठीत विपुल साहित्य निर्मिती होते. असं सगळं असलं, तरी मराठी भाषा म्हटलं, की एक किंचित न्यूनगंडाची भावना आपल्या मनात तयार होते. मराठी भाषेविषयी आपण पुष्कळ दांभिक आहोत. म्हणजे एकीकडं आपण ती आपली मायबोली, मायभाषा म्हणून तिचं खूप कौतुक करतो आणि दुसरीकडं ती भाषा शिकून काय करायचंय, त्यातून करिअर का होणार आहे असंही बोलतो. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इंग्रजीसारखी मराठी ही अद्याप ज्ञानभाषा झालेली नाही. जोवर एखादी भाषा जगण्यासाठी मदत करत नाही, किंबहुना चांगलं जगण्यासाठी ती भाषा शिकण्याची अनिवार्यता तयार होत नाही तोवर ती भाषा समाजाकडून मनापासून स्वीकारली जात नाही. 
आपल्या राज्यात मराठी ही राजभाषा असली, तरी ती येत नसेल तरी आपल्याकडं कुणाचं काही अडत नाही. इथं रोजगारासाठी येणारे लोक कामचलाऊ भाषा शिकतात. मात्र, बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्षे काम करणारे मोठमोठे कलाकार मुंबईत ४०-४० वर्षं राहूनही मराठी शिकत नाहीत. याचं कारणच मुळात ती भाषा न शिकताही त्यांचं इथं चालून जातं, हेच आहे. हीच गोष्ट तमिळनाडू किंवा बंगालमध्ये घडणं जवळपास अशक्य आहे. तमिळ भाषा न येता तुम्ही चेन्नईत राहण्याचा विचारही करू शकत नाही. तीच गोष्ट कोलकत्याची. मुंबईसारखीच परिस्थिती आता पुण्याची, नाशिकची व्हायला लागली आहे. नागपुरात तर मराठी ही कधीच प्रथम प्राधान्याची भाषा नव्हती. आपल्या राज्यातल्या मोठमोठ्या शहरांमध्ये आज असं चित्र आहे. मराठी भाषेत पाट्या लावा, यासाठी आपल्याकडं आंदोलनं करावी लागतात. असं आंदोलन भारतात कुठल्याही राज्यात झालं नसेल. 
आपल्याकडच्या शिक्षणव्यवस्थेत मराठीचं स्थान फारच दयनीय आहे. एकीकडं मराठी माध्यमांच्या शाळांची अवस्था दिवसेंदिवस दारूण होत चाललीय, तर दुसरीकडं इंग्रजी माध्यमाच्या शाळांतूनही काही फार उच्च प्रतीचं इंग्रजी शिकून मुलं बाहेर पडताहेत असं दिसत नाही. दोन संस्कृतींच्या संघर्षात मुलांच्या दोन्ही भाषा बिघडत आहेत. घरातलं वातावरण आणि शाळेतलं माध्यम हे एकजिनसी नसल्यानं अनेक मुलांच्या भावविश्वावर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होताना दिसतो आहे. अनेक पालक आज आपल्या मुलांना पुन्हा माध्यम बदलून मराठी शाळांत घालायला लागली आहेत. पण माध्यम बदलणं हा मुळात उपायच नाही. कारण मराठी शाळांचा दर्जा अत्यंत चिंतनीय आहे. एके काळी पुण्या-मुंबईतल्या काही मराठी माध्यमांच्या शाळांत आपलं मूल असणं हे प्रतिष्ठेचं मानलं जाई. तेव्हा राज्यात दहावीची एकच गुणवत्ता यादी प्रसिद्ध होई आणि त्यात या शाळांचाच वरचष्मा असे. त्यामुळं या शाळा राज्यभर सर्वांना माहिती होत्या. आज अशी परिस्थिती नाही. मराठी शाळांबद्दलचं आकर्षण पूर्णपणे संपून गेलं आहे. मराठी भाषेची पाठ्यपुस्तकंही बदलत गेली. पूर्वीची पाठ्यपुस्तकं अत्यंत दर्जेदार होती. आता बदललेल्या अभ्यासक्रमाबाबत असं म्हणता येत नाही. राजकीय प्रभावामुळं अनेकदा या पुस्तकांच्या रचनेत हस्तक्षेप केला जातो. यामुळं खरे जाणकार, विद्वान लोक या प्रक्रियेपासून दूरच राहतात आणि कमअस्सल दर्जाची पाठ्यपुस्तकं मुलांच्या वाट्याला येतात. पूर्वी टीव्ही नव्हता त्या काळात मराठी मध्यमवर्गीय घराघरांत अनेक चांगली मराठी मासिकं, साप्ताहिकं आवडीनं वाचली जात. ग्रंथालयांतून चांगली पुस्तकं आणून वाचली जात. याचा परिणाम घरातील मुलांवर होऊन त्यांनाही मराठी वाचनाची गोडी लागत असे. आता ते चित्र काही अपवाद वगळता पूर्णपणे बदललं आहे. घरात मराठी वाचन संपलं, तर पुढच्या पिढीला वाचनाची गोडी कशी लागणार आणि भाषेविषयी प्रेम कसं वाटणार? वाचनसंस्कृती कमी होत आहे, असं नाही; मात्र चांगल्या मराठी साहित्याची गोडी नव्या पिढीला जेवढी असायला हवी तेवढी वाटताना दिसत नाही.
मराठीसारखंच इंग्रजीचं आक्रमण इतर एतद्देशीय भाषांवरही होताना दिसतं. त्या भाषांनी त्यावर आपापल्या पद्धतीनं उपाय शोधले आहेत. कर्नाटकात कन्नड भाषा सगळीकडं सक्तीची करण्यात आली आहे. दक्षिणेकडच्या अन्य राज्यांतही द्राविडी अस्मितेमुळं मातृभाषेविषयी कमालीचं प्रेम सगळीकडं दिसतं. भाषेचा विषय हा वांशिक अस्मितेशी जोडला गेल्यानं त्या राज्यांच्या भाषांना फायदाच होताना दिसतो. गुजराती ही व्यापाराची भाषा झाल्यानं आघाडीच्या आर्थिक वृत्तपत्रांनाही त्या भाषेतून आपली आवृत्ती काढावी लागते. हिंदीचा प्रभाव उत्तरेत सर्वत्र आहे. व्यापाराच्या भाषेत सांगायचं, तर हिंदीचं मार्केटच मोठं आहे. हिंदीत मोठमोठी वृत्तपत्रं प्रचंड खपतात. शिवाय हिंदीत साहित्यनिर्मितीही विपुल प्रमाणात होताना दिसते. बंगाली भाषाही प्रखर प्रादेशिक अस्मितेचं उदाहरण आहे. बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा झाला त्याचं एकमेव कारण बंगाली भाषा हेच होतं. बंगालमध्येही स्थानिक भाषेविषयी आत्मीयता दिसते आणि तीत पुष्कळ साहित्यनिर्मिती पूर्वीपासूनच होताना दिसून येते. 
मराठीबाबत यापैकी फारसं काही होताना दिसत नाही. महाराष्ट्राचे चार भौगोलिक भाग पडतात आणि त्या प्रत्येक भागाची मराठी वेगळी आहे. इतकंच काय, त्या प्रदेशांतर्गतदेखील जिल्हावार भाषा बदलताना दिसते. भाषेच्या आधारावर महाराष्ट्र हे राज्य निर्माण झालं खरं; पण एकच एक प्रमाण मराठी भाषा संपूर्ण राज्याला जोडून ठेवून शकलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रमाण मराठी म्हणजे पुण्याची किंवा विशिष्ट उच्चवर्णीयांची भाषा असा समज असल्यानं या भाषेविषयी अन्य प्रदेशांत किंवा समाजघटकांत ममत्व निर्माण होताना दिसत नाही. आणि ते अगदी साहजिक आहे. यावर उपाय म्हणजे प्रमाण मराठीनं अधिक व्यापक व्हायला हवं. आपल्याच बोलीभाषांमधले शब्द स्वीकारले पाहिजेत. साधं उदाहरण द्यायचं, तर ‘लई’ (म्हणजे पुष्कळ या अर्थानं) हा सगळीकडं वापरला जाणारा शब्द अजूनही प्रमाण भाषेनं स्वीकारलेला नाही. ‘राज्यात लई पाऊस’ हे शीर्षक मराठी वृत्तपत्रांत वाचायला मी अगदी उत्सुक आहे. पण प्रमाण मराठी अजूनही तिथं अडलेलीच आहे. असे किती तरी शब्द आहेत. मराठी भाषेच्या अभ्यासकांनी, संशोधकांनी, संपादकांनी एकत्र येऊन असे काही शब्द शोधून ते प्रमाण मराठीतले आहेत, असं घोषित करून वापरायला सुरुवात केली पाहिजे. अधिक व्यापक समाजाला, समूहाला ही भाषा आपलीशी वाटत नाही, तोवर ती समाजभाषा, ज्ञानभाषा होण्याची शक्यता दुरापास्तच आहे. मराठी भाषेसाठी विद्यापीठ असावं, ही फार जुनी मागणी आहे. मात्र, आपलं सरकार अद्याप राजभाषेला विद्यापीठ देऊ शकलेलं नाही. देहू आणि आळंदीच्या मधोमध हे मराठी विद्यापीठ तातडीनं उभारायला हवं. राज्यभरातले नव्हे, तर जगभरातले मराठीचे अभ्यासक तिथं येतील आणि या भाषेचा अभ्यास करतील. विशेषतः आगामी काळात मराठी ज्ञानभाषा म्हणून कशी वापरता येईल, याचा सांगोपांग अभ्यास तिथं अपेक्षित आहे. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून, सर्व प्रकारचे भाषा अभ्यासक तिथं एकत्र यायला हवेत. त्यांनी या अशा अनेक गोष्टींवर काम करावं. 
इंग्रजी शब्दांना सुलभ मराठी पर्याय दिले तर ते वापरले जातात. उदा. की-बोर्डला कळफलक हा चांगला पर्याय आहे. इंग्रजीतल्या ‘युनिव्हर्सिटी’पेक्षा मराठीतील ‘विद्यापीठ’ हा शब्द सोपा वाटतो, म्हणूनच तो प्रचलित झाला आहे. अधिकाधिक पारिभाषिक शब्द मराठीत यायला हवेत. फेसबुक किंवा इतर समाजमाध्यमांवर वापरली जाणारी मराठी हा एक वेगळ्याच अभ्यासाचा विषय आहे. आपलीच मराठी माणसे व्यक्त होताना किती वेगळ्या शब्दांतून, वेगळ्या रचनेतून, शैलीतून व्यक्त होतात, हे पाहून अचंबित व्हायला होतं. सध्याची कथित प्रमाण मराठी या अभिव्यक्तीसाठी पासंगालाही पुरणार नाही, हे लक्षात येतं. वास्तविक आंतरजालावर मराठीतून काहीही शब्दशोध करावयास गेलो, तर फारसे पर्याय मिळत नाहीत. यासाठी आंतरजालावर मराठी लेखन मोठ्या प्रमाणावर केलं पाहिजे. त्यासाठी समाजमाध्यमांतून सातत्यानं मराठी लिहिणाऱ्या चांगल्या लोकांना एकत्र आणलं पाहिजे. आधुनिक मराठी शब्दकोश तयार केला पाहिजे. त्यात अनेक नवे, आजच्या पिढीला आपलेसे वाटतील असे शब्द आले पाहिजेत. तर आणि तरच मराठी चैतन्यमय राहू शकेल. मग खऱ्या अर्थानं ‘माझा मराठीचा बोलु कवतिके, अमृतातेंही पैजा जिंके’ हे माउलींचं म्हणणं सार्थ होईल.
---
(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती, २७ फेब्रुवारी २०१७)